Kahani Jivatichi Shukrawarchi कहाणी जिवतीची शुक्रवारची
This is the story of Jivatichi or Fridaychi.
कहाणी शुक्रवारची जिवतीची
ऐका शुक्रवारा, तुमची कहाणी. आटपात नगर होत. तिथ एक राजा राज्य करीत होता. त्याला मुलगा नव्हता. तेव्हां राणीने काय कराव? एका सुइणीला बोलावण धाडल. अगं अगं सुइणी, मला लाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचुप आणुन दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन. सुइणीने गोष्ट कबूल केली. ती तपास करु लागली. गावांत एक गरीब ब्राह्मण बाई रहात होती. ती ब्राह्मण बाई गर्भार होती. सुईेण तिच्या घरी गेली. बाई बाई तू गरीब आहेस. तुझं बाळंतपणाच पोट दुखु लागेल तेव्हा मला कळव. मी तुझं बाळंतपण फुकट करीन. तिनं होय म्हणून सांगितलं.
नंतर ती सुईण राणीकडे आली राणीसाहेब आपल्या नगरांत एका ब्राह्मणाची बायको गरोदर आहे. तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे. लक्षणे सर्व मुलाचीच दिसत आहेत. तेव्हा आपल्या वाड्यापासून तो त्या ब्राह्मणाच्या घरापर्यंत कोणाला कळणार नाही असे भुयार कतावं. आपल्याला दिवस गेल्याची अफवा पसरावी. मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन. असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला. जसे जसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळे लागल्याच राणीने डंभ केले. पोट मोठे दिसण्याकरिता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केलं. नऊ मास भरतांच बाळंपणाची तयारी केली.
इकडे ब्राह्मण बाईचही पोट दुखू लागलं. सुइणीला बोलावून आणलं. त्याबरोबर तुम्ही पुढे व्हा. मी येते म्हणून सुइणीने सांगितले. ती धावत धावत राणीकडे आली. राणीला पोट दुखण्याच सोंग करायला सांगितले. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. बाई बाई तुझी पहिली खेप आहे. डोळे बांधलेस तर भिणार नाहीस. नाही बांधलेस तर भय वाटेल. असे सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंत झाली.मुलगा झाला. सुइणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेने राणीकडे पाठविला आणि एक वरवंटा घेऊन त्यास कुंचा बांधिला. आणि त्या ब्राह्मण बाईपुढे ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटा झाला असं सांगू लागली. त्या बाईने नशिबाला बोल लावला. मनामध्ये दुःखी झाली.सुईण निघुन राजवाड्यावर गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं कोडकौतुक होऊ लागलं.
इकडे ब्राह्मण बाईने नेम धरला. श्रावणमासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करुन म्हणावं, जय जिवती आई माते, जिथं माझ बाळ असेल, तिथं खुशाल असो. असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे, ते त्या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य. कारलीच्या मांडवा खालून जाणें वर्ज्य केले. तांदळाचं धूण वलांडणं बंद केलं. याप्रमाणं ती नेहमी वागूं लागली.
इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ती ब्राह्मण स्री न्हाऊन आपल्या अंगणांत राळे राखीत बसली होती. तेव्हा राजपुत्राची नजर तिच्यावर पडली. हा मोहीत झाला व रात्री तिची भेट घ्ययची म्हणून निश्र्चय केला. रात्री तिच्या घरी आला. दारात गाय-वासरु बांधली होती. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणाले, कोण्या पाप्याने माझ्या शेपटावर पाय दिला. तेव्हा ती गाय म्हणाली. जो आपल्या आईकडे जायला भीत नाही, तो तुझ्या शेपटावर पाय द्यावयास भिईल काय? हे ऐकून राजा मागे फिरला. घरी जाऊन आपल्या आईपासून काशीला जाण्याची परवानगी घेतली. काशीस जाऊ लागला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलें झाली. पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असतं.
राजा आला, त्या दिवशी चमत्कार झाला. पाचवीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. सटवी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण गं मेलं वाटेंत पसरलं आहे? जिवतीने उत्तर दिले, अगं अगं माझे ते नवसाचे बाळ निजले आहे. मी काही त्याला वलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आई-बाप चिंता करीत बसले होते. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तररात्र झाल्यावर सटवी व जिवती आपपल्या रस्त्याने निघून गेल्या. उजाडल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले. तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला, आजचा दिवस मुक्काम करा. अशी विनंती केली. राजाने ती मान्य केली. त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला. दुसरे दिवशी राजा चालता झाला. इकडे यांचा मुलगा जगला व वाढू लागला.
पुढे राजाने काशीला गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली, पिंड देतेवेळी ते घ्यायला दोन हात वर आले. असे होण्याचे कारण त्याने ब्राह्मणांना विचारले. ते म्हणाले घरी जा, सार्या गावातल्या बायकापुरुषांना जेवायला बोलाव, म्हणजे याचे कारण काय ते समजेल.
राजाच्या मनाला मोठी चुटपुट लागली. तो घरी आला. मोठ्या थाटांने मावंदे केले. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरी कोणी चूल पेटवू नये. सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मण बाईला मोठ संकट पडल. राजाला निरोप धाडला. मला जिवतीच व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहेत. ते पाळले तर जेवायला येईन. राजाने कबूल केले.
जिथं तांदूळाचं धूण होतं ते सारवून त्यावरुन ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत, कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही. दर वेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असे म्हणे.
पुढे पानं वाढली. मोठा थाट झाला. राजानं तूप वाढायला घेतले. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथे आला. तूप वाढू लागला. ईश्र्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेमाचे भरते येऊन पान्हा फुटला. तिच्या स्तनांतून दूधाच्या धारा फुटल्या. त्या ह्या राजाच्या तोंडात उडाल्या. तो हातची तूपाची तपेली ठेवून रुसून निजला. काही केल्या उठेना.
तेव्हा त्याची आई गेली, त्याची समजूत करु लागली. तो म्हणाला, असें होण्याचे कारण काय? तिने सांगितले की, ती तुझी खरी आई आहे. मी तुझी मानलेली आई आहे. असे सांगून तिने सर्व खरी खरी हकिगत त्याला सांगितली. पुढे भोजन समारंभ संपन्न झाला.
नंतर त्याने आपल्या खर्या आई-बापास आपल्या वाड्याशेजारी वाडा बांधून दिला व त्यांच्यासह राज्य करुं लागला. जशी जिवती त्या ब्राह्मण स्रीस प्रसन्न झाली, तशी तुम्हा आम्हा होवो. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
Custom Search
No comments:
Post a Comment