Sunday, March 8, 2020

ShriRamCharitMans Part 1 श्रीरामचरितमानस भाग १


श्रीरामचरितमानस भाग १ 
ShriRamCharitMans Part 1 It is a very pious grantha written by Tulicidas. It is in Avadhi Language. It is a God Ram life story which guides us on every aspects of our life to improve it and make our life meaningful.
श्रीरामचरितमानस हा अवधी भाषेंत लिहिलेला अत्यंत पवित्र ग्रंथ आहे. तो श्री तुलसीदासांनी लिहिलेला आहे. त्याची योगयता साहित्याच्या, अध्यात्माच्या वगैरे क्षेत्रांत जगभरांत प्रसिद्ध आहे. आपले जीवन कसे जगावे/घडवावे  याची  शिकवण आपल्याला या भगवान श्रीरामांच्या जीवन कथेवरुन येते. 

ShriRamCharitManas Part 1
श्रीरामचरितमानसस भाग १ 
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
श्लोक
वर्णानामर्थसंघानां रसानां छन्दसामपि ।
मङ्गलानां च कर्त्तारौ वन्दे वाणीविनायकौ ॥ १ ॥
 अक्षरे, अर्थसमूह, रस, छंद आणि मंगल यांची निर्मिती करणार्‍या श्रीसरस्वती व श्रीगणेश यांना मी वंदन करतो.  
भवानीशङ्करौ वन्दे श्रद्धाविश्र्वासरुपिणौ ।
याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धाः स्वान्तःस्थमीश्र्वरम् ॥ २ ॥
ज्यांच्याशिवाय सिद्धजन अंतःकरणात असलेल्या ईश्र्वराला पाहू शकत नाहीत. अशा श्रद्धा व विश्र्वासस्वरुप असलेल्या पार्वती व शंकरा यांना मी वंदन करतो.
वन्दे बोधमयं नित्यं गुरुं शङ्कररुपिणम् ।
यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्रः सर्वत्र वन्द्यते ॥ ३ ॥
ज्यांचा आश्रित असल्यामुळे वाकडा चंद्रसुद्धा सर्वत्र वंदनीय ठरतो, अशा ज्ञानमय, शंकररुपी गुरुंना मी नित्य वंदन करतो.
सीतारामगुणग्रामपुण्यारण्यविहारिणौ 
वन्दे विशुद्धविज्ञानौ कवीश्र्वरकपीश्र्वरौ ॥ ४ ॥
श्रीसीतारामांच्या गुणसमूहरुपी पवित्र वनात विहार करणार्‍या, विशुद्ध विज्ञानसंपन्न असणार्‍या कवीश्र्वर वाल्मीकी व कपीश्र्वर हनुमान यांना मी वंदन करतो.
उद्भवस्थितिसंहारकारिणीं क्लेशहारिणीम् 
सर्वश्रेयस्करीं सीतां नतोऽहं रामवल्लभाम्  ॥ ५ ॥
जी उत्पत्ती, स्थिती आणि संहार करते, क्लेश हरण करते, तसेच संपूर्ण कल्याण करते, त्या श्रीरामचंद्रांची प्रियतम असलेल्या श्रीसीता-देवींना मी नमस्कार करतो.
यन्मावशवर्त्ति विश्र्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा
यत्सत्त्वादमृषैव भाति सकलं रज्जौ यथाहेर्भ्रमः ।
यत्पादप्लवमेकमेव हि भवाम्भोधेस्तितीर्षावतां
वन्देऽहं तमशेषकारणपरं रामाख्यमीशं हरिम् ॥ ६ ॥
संपूर्ण विश्व, ब्रह्मादी देव आणि असुर हे ज्यांच्या मायेच्या अधीन आहेत, दोरीवर साप असल्याचा भास होतो. त्याप्रमाणे ज्यांच्या सत्तेमुळे हे संपूर्ण दृश्य जग सत्यच वाटते आणि ज्यांचे केवळ चरण हेच भवसागरातून तरुन जाऊ इच्छिणार्‍यांसाठी एकमात्र नौका आहेत, अशा संपूर्ण कारणांचेही श्रेष्ठ कारण असलेल्या आणि ज्यांना श्रीराम म्हटले जाते, त्या भगवान श्रीहरींना मी वंदन करतो.
नानापुराणनिगमागमसम्मतं यद् 
रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि 
स्वान्तःसुखाय तुलसी रघुनाथगाथा-
भाषानिबन्धमतिमञ्जुलमातनोति  ॥ ७ ॥
अनेक पुराणे, वेद आणि तंत्रशास्त्र यांना संमत असलेले जे वर्णन रामायणात आलेले आहे ते, तसेच श्रीरघुनाथांच्या इतरत्र उपलब्ध असलेल्या कथा यांचा तुलसीदास स्वतःच्या आनंदासाठी अत्यंत मनोहर अशा लोकभाषेमध्ये विस्तार करीत आहे.
अशाप्रकारे श्रीसरस्वती, श्रीगणपती, देव व गुरु यांना वंदन करुन आता लोकभाषेंत तुलसीदास सुरवात करीत आहेत.       
जो सुमिरत सिधि होइ गन नायक करिबर बदन 
करउ अनुग्रह सोइ बुद्धि रासि सुभ गुन सदन  ॥ १ ॥
१)    ज्याच्या स्मरणाने सर्व कार्ये सिद्ध होतात, जो गणांचा स्वामी, सुंदर गजमुख, बुद्धीचे भांडार पवित्र गुणांचा आश्रय आहे, असा श्रीगजानन माझ्यावर कृपा करो.  
मूक होइ बाचाल पंगु चढइ गिरिबर गहन 
जासु कृपॉं सो दयाल द्रवउ सकल कलि मल दहन  ॥ २ ॥
२)   ज्यांच्या कृपा प्रसादामुळे मुका बोलू लागतो आणि लंगडा दुर्गम पर्वतावर चढतो, असे ते कलियुगातील सर्व पापे जाळून टाकणारे दयाळू भगवान माझ्यावर कृपा करोत.
नील सरोरुह स्याम तरुन अरुन बारिज नयन 
करउ सो मम उर धाम सदा छीरसागर सयन  ॥ ३ ॥
३)  ज्यांचा वर्ण निळ्या कमळासारखा सावळा आहे, ज्यांचे नेत्र फुललेल्या लाल कमळासारखे आहेत आणि जे नेहमी क्षीरसागरामध्ये शयन करतात, ते भगवान नारायण माझ्या हृदयात निवास करोत.
कुंद इंदु सम देह उमा रमन करुना अयन 
जाहि दीन पर नेह करउ कृपा मर्दन मयन  ॥ ४ ॥
४)   ज्यांचे अंग कुंदपुष्पाप्रमाणे व चंद्राप्रमाणे गौरवर्णाचे आहे, जे पार्वतीचे प्रियतम आणि दयेचा सागर आहेत, ज्यांचे दीनांवर प्रेम आहे व जे कामदेवाला भस्म करणारे आहेत, अशा शंकरांनी माझ्यावर कृपा करावी.
बंदउँ गुरु पद कंज कृपा सिंधु नररुप हरि 
महामोह तम पुंज जासु बचन रबि कर निकर  ॥ ५ ॥
५) जे कृपासागर असून नर-रुपामध्ये प्रत्यक्ष श्रीहरीच आहेत व ज्यांचे वचन हे महामोहरुपी घनदाट अंधाराचा नाश करणारा सूर्यकिरणांचा झोत आहे, त्या सद्गुरुंच्या चरणांना मी वंदन करतो.  
बंदऊँ गुरु पद पदुम पराग । सुरुचि सुबास सरस अनुरागा ।
अमिअ मूरिमय चूरन चारु । समन सकल भव रुज परिवारु ॥
जे सुंदर स्वाद, सुगंध आणि प्रेमरसाने परिपूर्ण आहे, जे संजीवनी-मूळाचे सुंदर चूर्ण आहे, जे भवरोगाच्या संपूर्ण परिवाराचा नाश करणारे आहे, त्या श्रीगुरुमहाराज्यांच्या चरण कमल परागाला मी वंदन करतो.
सुकृति संभु तन बिमल बिभूती । मंजुल मंगल मोद प्रसूती ॥
जन मन मंजु मुकुर मल हरनी । किएँ तिलक गुन गन बस करनी ॥
जे परागकण शंकरांच्या शरीराला सुशोभित करणार्‍या निर्मळ विभूतीप्रमाणे पुण्यवानाला सुशोभित करतात, जे सुंदर कल्याण व आनंद यांची जननी आहेत, भक्तांच्या मनरुपी सुंदर आरशावरील मळ नाहीसा करणारे आहेत, तसेच जे कपाळावर धारण केल्यास गुणांचा समूह प्राप्त करुन देणारे आहेत.
श्रीगुरु पद नख मनि गन जोती । सुमिरत दिब्य दृष्टि हियँ होती ॥
दलन मोह तम सो सप्रकासू । बडे भाग उर आवइ जासू ॥
श्रीगुरुंच्या नखांची ज्योती रत्नांच्या तेजासारखी आहे, तिचे स्मरण करताच हृदयामध्ये दिव्य उत्पन्न होते. तो प्रकाश अज्ञानरुपी अंधाराचा नाश करणारा आहे. ज्याच्या हृदयात तो प्रकट होतो, तो मोठा भाग्यवान होय.
उघरहिं बिमल बिलोचन ही के । मिटहिं दोष दुख भव रजनी के ॥
सूझहिं राम चरित मनि मानिक । गुपुत प्रगट जहँ जो जेहि खानिक ॥
तो प्रकाश हृदयात प्रकट होताच निर्मळ दृष्टी प्राप्त होते आणि संसाररुपी रात्रीमधील दोष व दुःख नाहीसे होते. तसेच श्रीरामचरित्ररुपी रत्ने, माणिके , गुप्त किंवा प्रकट जिथे कुठे खाणीत असतात, ती सर्व दिसू लागतात.
दोहा
जथा सुअंजन अंजि दृग साधक सिद्ध सुजान ।
कौतुक देखत सैल बन भूतल भूरि निधाम ॥ १ ॥
ज्याप्रमाणे साधक, सिद्ध व सुजाण लोक डोळयांमध्ये सिद्धांजन घालून पर्वत, वने व पृथ्वी यांमधील पुष्कळशा खाणी सहजपणे पाहात असतात.
गुरु पद रज मृदु मंजुल अंजन । नयन अमिअ दृग दोष बिभंजन ॥
तेहिं करि बिमल बिबेक बिलोचन । बरनउँ राम चरित भव मोचन ॥
श्रीगुरुंच्या चरणांची धूळ ही फार कोमल आणि सुंदर असे डोळ्यांना अमृताप्रमाणे असणारे अंजन होय. ती नेत्रांतील दोषांचा नाश करणारी आहे. त्या अंजनाने विवेकरुपी नेत्रांना निर्मळ करुन संसाररुपी बंधनांतून मुक्त करणार्‍या श्रीरामचरित्राचे मी वर्णन करतो.
बंदउँ प्रथम महीसुर चरना । मोह जनित संसय सब हरना ॥
सुजन समाज सकल गुन खानी । करउँ प्रनाम सप्रेम सुबानी ॥
सर्वांत प्रथम मी ब्राह्मणांच्या चरणांना वंदन करतो. कारण ते अज्ञानामुळे उत्पन्न होणार्‍या सर्व संशयांचे निराकरण करतात. त्यानंतर मी सर्व गुणांची खाण असलेल्या संत-समाजाला प्रेमाने व सुंदर वाणीने प्रणाम करतो.
साधु चरित सुभ चरित कपासू । निरस बिसद गुनमय फल जासू ॥
जो सहि दुख परछिद्र दुरावा । बंदनीय जेहिं जग जस पावा ॥
संतांचे चरित्र हे कापसासारखे कल्याणकारक असते. कारण कापसाचे बोंड हे नीरस, स्वच्छ व गुणमय असते. तसेच संतांचे जीवन हे विषयासक्तिरहित असते. त्यासारखे संतांचे हृदयही अज्ञान व पापरुपी अंधकाराने रहित असते म्हणून ते उजळ असते कापसात गुण (तंतु)  असतात, तसे संतांच्या हृदयात सद्गुणांचे भांडार असते, म्हणून ते गुणमय असते. (ज्याप्रमाणे कापसाचा धागा स्वतःला अर्पण करुन सुईचे छिद्र झाकून टाकतो किंवा ज्याप्रमाणे कापूस हा पिंजणे , सूत कातणे आणि विणणे यांचे कष्ट सहन करुन वस्त्राच्या रुपात परिणत होतो आणि दुसर्‍यांची छिद्रे (दोष) झाकून टाकतो, त्यामुळे तो जगामध्ये वंदनीय कीर्ती प्राप्त करतो.
मृदु मंगलमय संत समाजू । जो जग जंगम तीरथराजू ॥
राम भक्ति जहँ सुरसरि धारा । सरसइ ब्रह्म बिचार प्रचारा ॥
संतांचा समुदाय हा आनंदमय आणि कल्याणमय होय. तो जगातील चालता-फिरता तीर्थराज प्रयागच होय. कारण तेथे राम-भक्तिरुपी गंगेचा प्रवाह आणि ब्रह्मविचाराच्या प्रचाराची सरस्वती असते.
बिधि निषेधमय कलिमल हरनी । करम कथा रबिनंदनि बरनी ॥
हरि हर कथा बिराजति बेनी । सुनत सकल मुद मंगल देनी ॥
तसेच तेथे विधि-निषेधरुपी कर्मांची कहाणी ही कलियुगातील पापांचे हरण करणारी यमुना नदी असते आणि हरिहरांच्या कथा त्रिवेणी रुपाने शोभत असतात. ज्या ऐकताच संपूर्ण आनंद देऊन कल्याण करणार्‍या असतात.
 बटु बिस्वास अचल निज धरमा । तीरथराज समाज सुकरमाया ॥
सबहि सुलभ सब दिन सब देसा । सेवत सादर समन कलेसा ॥
(त्या संत-समाजरुपी तीर्थराज प्रयागावर ) आपल्या धर्मावरील अढळ विश्र्वासरुप अक्षय वट आहे आणि शुद्ध-कर्मे हाच त्या तीर्थराजाचा परिवार होय. तो सर्व देशांमध्ये आणि सर्व काळांमध्ये सर्वांना सहज प्राप्त होऊ शकतो. त्याचे आदराने सेवन केल्यास तो सर्व क्लेशांचा नाश करणारा आहे.
अकथ अलौकिक तीरथराऊ । देइ सद्य फल प्रगट प्रभाऊ ॥
तो तीर्थराज हा अलौकिक आणि अवर्णनीय असून तत्काळ फळ देणारा आहे. हा त्याचा प्रभाव प्रत्यक्ष दिसतो.
दोहासुनि समुझहिं जन मुदित मन मज्जहिं अति अनुराग ।
          लहहिं चारि फल अछत तनु साधु समाज प्रयाग ॥ २ ॥   
जी माणसे या संत-समाजरुपी तीर्थराजाचा प्रभाव आनंदित मनाने ऐकून व समजून घेतात, तसेच त्यात प्रेमाने मग्न होतात, ते या मनुष्य देहात असतानाच धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त करतात.
मज्जन फल पेखिअ ततकाला । काक होहिं पिक बकउ मराला ॥
सुनि आचरज करै जनि कोई । सतसंगति महिमा नहिं गोई ॥
या तीर्थराजातील स्नानाने तत्काळ फळ म्हणजे त्यायोगे कावळे कोकीळ बनतात आणि बगळे हंस बनतात. हे ऐकून कोणीही आश्र्चर्य करु नये; कारण सत्संगतीची महती कधी लपून राहात नाही.
बालमीक नारद घट जोनी । निज निज मुखनि कही निज होनी ॥
जलचर थलचर नभचर नाना । जे जड चेतन जीव जहाना ॥
(याला पुरावा म्हणजे स्वतः ) वाल्मीकी, नारद आणि अगस्त्य यांनी स्वतःच्या मुखाने आपला जीवज-वृत्तांत सांगितलेला आहे. या जगात जे जलचर, स्थलचर, गगनचर तसेच नाना प्रकारचे जड चेतन असे जीव आहेत,
मति कीरति गति भूति भलई । जब जेहिं जतन जहॉं जेहिं पाई ॥
. सो जानब सतसंग प्रभाऊ । लोकहुँ बेद न आन उपाऊ ॥
त्यापैकी ज्यांनी, ज्या वेळी, जेथे, ज्या प्रयत्नाने, बुद्धी, कीर्ती, तसर्वच सत्संगाचा प्रभाव समजला पाहिजे. वेदांमध्ये आणि या लोकामध्ये हे सर्व प्राप्त होण्यासाठी सत्संगाशिवाय दुसरा कोणताही उपाय सापडत नाही.
 बिनु सतसंग बिबेक न होई । राम कृपा बिनु सुलभ न सोई ॥
सतसंगत मुद मंगल मूला । सोइ फल सिधि सब साधन फूला ॥
सत्संगाशिवाय विवेक येत नाही आणि श्रीरामांच्या कृपेशिवाय सत्संग सहजपणें मिळत नाही. सत्संगती ही आनंद व कल्याण यांचे मूळ आहे. सत्संगाची प्राप्ती हेच फळ असून सर्व साधने ही फुले होत.
सठ सुधरहिं सतसंगति पाई । पारस परस कुधात सुहाई ॥
बिधि बस सुजन कुसंगत परहीं । फनि मनि सम निज गुन अनुसरहीं ॥
ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंड हे सुंदर सोने बनते, त्याप्रमाणे दुष्ट लोकही सत्संगती मिळाल्यावर सुधारतात. दैवयोगाने जर कधी सज्जन मनुष्य वाईट संगतीत पडले तर तेथेही ते सर्पाच्या मण्याप्रमाणे आपल्या गुणांचेच आचरण करतात. ( अर्थात ज्याप्रमाणे सापाची संगत असूनही मणी त्याचे विष घेत नाही आणि तो आपला सहज गुण असलेला प्रकाश सोडत नाही, त्याप्रमाणे साधू पुरुष दुष्टांच्या संगतीत राहूनही दुसर्‍यांना प्रेम देतात. त्यांच्यावर दुष्टांचा कोणताही दुष्परिणाम होत नाही.)
बिधि हरि हर कबि कोबिद बानी । कहत साधु महिमा सकुचानी  
सो मो सन कहि जात न कैसें । साक बनिक मनि गुन गन जैसें ॥
ब्रह्मदेव, विष्णू, शिव, कवी व पंडित यांची वाणीसुद्धा संत-महिमा गाताना कुंठित होते मग मला त्या संतांच्या महिम्याचे वर्णन कसे करता येणार ? भाजीपाला विकणारा रत्नांच्या गुणांचे वर्णन काय करणार ?
दोहाबंदउँ संत समान चित हित अनहित नहिं कोइ ।
           अंजलि गत सुभ सुमन जिमि सम सुगंध कर दोइ ॥ ३ (क)
ज्यांच्या मनात समता असते, ज्यांचा कोणी मित्र नसतो, की शत्रू नसतो, त्या संतांना मी प्रणाम करतो. ओंजळीत ठेवलेली फुले ( ज्या हाताने फुले तोडली आणि ज्या हातात ती ठेवली त्या ) दोन्हीही हातांना सारखीच सुगंधित करतात. (त्याप्रमाणेच संत हे शत्रू व मित्र दोघांचेही सारखेच कल्याण करतात ).
संत सरल चित जगत हित जानि सुभाउ सनेहु ।
बालबिनय सुनि करि कृपा राम चरन रति देहु ॥ ३ (ख) ॥
संत हे सरळ मनाचे आणि जगाचे हित करणारे असतात, त्यांचा हा स्वभाव व स्नेह जाणून मी त्यांना प्रार्थना करतो की, मज बालकाची प्रार्थना ऐकून व कृपा करुन त्यांनी श्रीरामांच्या चरणी मला प्रेम द्यावे.     
  बहुरि बंदि खल गन सतिभाएँ  । जे बिनु काज दाहिनेहु बाएँ 
  पर हित हानि लाभ जिन्ह केरें  । उजरें हरष बिषाद बसेरें ॥
आता मी चांगल्या भावनेने दुष्टांना वंदन करतो. जे विनाकारण आपले हित करणार्‍यांशीसुद्धा प्रतिकूल वर्तन करतात. त्यांच्या दृष्टीने दुसर्‍यांच्या हिताची हानी हाच लाभ असतो. दुसर्‍यांचा सर्वनाश झाल्याने त्यांना आनंद होतो आणि दुसर्‍यांचा उत्कर्ष झाल्याने विषाद वाटतो.
हरि हर जस राकेस राहु से  । पर अकाज भट सहसबाहु से 
जे पर दोष लखहिं सहसाखी । पर हित घृत जिन्ह के मन माखी ॥
जे (दुष्ट) हरि आणि हर यांच्या कीर्तिरुपी पौर्णिमेच्या चंद्रासाठी राहूसारखे आहेत, (अर्थात जेथे कोठे भगवान विष्णु किंवा शिव यांच्या कीर्तीचे वर्णन चालते, तेथे ते विघ्न आणतात.) आणि दुसर्‍यांची निंदा करण्यामध्ये सहस्रबाहुसारखे शूर असतात, ते दुसर्‍यांचे दोष हजार डोळ्यांनी पाहतात आणि दुसर्‍यांच्या हितरुपी तुपामधील माशीसारखे असतात. (अर्थात माशी तुपात पडून ते खराब करुन टाकते व स्वतःही मरुन जाते. त्याप्रमाणे दुष्ट लोक स्वतःचे नुकसान झाले तरी दुसर्‍याने केलेले काम बिघडवून टाकतात.
तेज कृसानु रोष महिषेसा  । अघ अवगुन धन धनी धनेसा 
उदय केत सम हित सब ही के । कुंभकरन सम सोवत नीके 
जे तेजामध्ये अग्निप्रमाणे (प्रखर) वा क्रोधामध्ये यमाप्रमाणे असतात, जे पापरुपी आणि अवगुणरुपी धनामध्ये कुबेराप्रमाणे संपन्न असतात, ज्यांचा उत्कर्ष हा सर्वांच्या हिताचा नाश करण्यासाठी धूमकेतुसारखा असतो, ते दुष्ट लोक कुंभकर्णाप्रमाणे झोपी जाण्यामध्ये जगाचे कल्याण आहे.
पर अकाजु लगि तनु परिहरहीं  । जिमि हिम उपल कृषी दलि गरहीं ॥
बंदउँ खल जस सेष सरोषा  । सहस बदन बरनउ पर दोषा 
ज्याप्रमाणे गारा या पिकाची नासाडी करुन मग स्वतःही (विरघळून ) नाश पावतात, त्याप्रमाणे दुष्ट लोक दुसर्‍याच्या कामात विघ्न आणण्यासाठी आपल्या देहाचाही त्याग करतात. त्या दुष्टांना मी (हजार मुखे असणार्‍या ) शेषाप्रमाणे मानून वंदन करतो. कारण ते दुसर्‍याची निंदा मोठ्या रागाने हजारो मुखांनी करीत असतात.
पुनि प्रनवउँ पृथुराज समाना  । पर अघ सुनइ सहस दस काना 
बहुरि सक्र सम बिनवउँ तेही  । संतत सुरानीक हित जेही 
यानंतर मी त्यांना राजा पृथुसारखे (ज्याने भगवंताच्या कीर्ती ऐकण्यासाठी दहा हजार कान मागितले होते ) मानून मी प्रणाम करतो. ज्यांना मद्य हे चांगले व हितकारक वाटते, अशा त्यांना मी इंद्राप्रमाणे मानून वंदन करतो, कारण इंद्राला सुरानीक म्हणजे देवांची सेना हितकारक वाटते.
        बचन ब्रज जेहि सदा पिआरा  । सहस नयन पर दोष निहारा 
        त्यांना कठोर वचनरुपी वज्र नेहमी आवडते आणि ते हजारो                  डोळ्यांनी दुसर्‍यांचे दोष पाहात असतात. (इंद्राच्या हातात वज्र असते व त्याला हजार डोळे आहेत.)
  दोहा : उदासीन अरि मीत हित सुनत जरहिं खल रीति 
           जानि पानि जुग जोरि जन बिनती करइ सप्रीति  ॥ ४ ॥
दुष्टांची ही रीतच असते की, ते तटस्थ, शत्रू किंवा मित्र या कोणाचेही भले झालेले ऐकून चरफडत असतात. हे जाणून मी त्यांना हात जोडून प्रेमाने विनंती करतो.
           मैं अपनी दिसि कीन्ह निहोरा । तिन्ह निज ओर न लाउब भोरा ॥
           बायस पलिअहिं अति अनुराग । होहिं निरामिष कबहुँ कि  कागा ॥
मी विनंती केली तरी ते आपल्याकडून वाईट करण्यात कधीही चुकणार नाहीत. कावळ्यांना कितीही प्रेमाने पाळले, तरी ते मांस खाणे सोडतील काय ?
बंदउँ संत असज्जन चरना  । दुखप्रद उभय बीच कछु बरना 
बिछुरत एक प्रान हरि लेहीं । मिलत एक दुख दारुन देहीं 
(आता ) मी संत व दुष्ट दोघांच्या चरणांना वंदन करतो. दोघेही दुःख देणारे आहेत. परंतु त्यांच्यामध्ये मोठा फरक आहे. तो असा की, संत वियोगाने प्राणहरणाचे दुःख देतात आणि दुष्ट भेटण्याने दारुण दुःख देतात.
उपजहिं एक संग जग माहीं । जलज जोंक जिमि गुन बिलगाहीं 
सुधा सुरा सम साधु असाधू । जनक एक जग जलधि अगाधू 
जगामध्ये दोघेही बरोबरच उत्पन्न होतात. परंतु एकाच जागी उत्पन्न होनार्‍या कमळ व जळूप्रमाणे त्यांचे गुण भिन्न असतात. ( कमळ हे दर्शनाने व स्पर्शाने सुख देते, तर जळू स्पर्श होताच रक्त शोषू लागते.) साधू हा अमृतासारखा (मृत्युरुपी संसारांतून उद्धार करणारा ) असतो, तर दुष्ट मदिरेसारखा ( मोह, प्रमाद आणि जडता उत्पन्न करणारा ) असतो. दोघांना उत्पन्न करणारा जगरुपी अगाध समुद्र एकच आहे. ( जसे एकाच समुद्रातून अमृत आणि मदिरा दोन्हींची उत्पत्ती झाली आहे. )
भल अनभल निज निज करतूती । लहत सुजस अपलोक बिभूती ॥
सुधा सुधाकर सुरसरि साधू । गरल अनल कलिमल सरि ब्याधू ॥
गुन अवगुन जानत सब कोई । जो जेहि भाव नीक तेहि सोई ॥
चांगले व वाईट हे आपापल्या करणीप्रमाणे सुंदर कीर्ती किंवा अपकीर्तीची जोड करतात. साधूंचा स्वभाव अमृत, चंद्र व गंगा यांच्याप्रमाणे असतो तर दुष्टांचा स्वभाव विष, अग्नी व कर्मनाश ( याकलियुगांतील पापांच्या ) नदीप्रमाणे असतो. यांचे गुण-अवगुण सर्वजण जाणतात. परंतु ज्याला जे आवडते, त्याला तेच बरे वाटते.

 दोहा- भलो भलाइहि पै लहइ लहइ निचाइहि नीचु ।
          सुधा सराहिअ अमरतॉं गरल सराहिअ मीचु  ॥ ५ ॥
चांगला माणूस चांगलेच घेतो आणि नीच माणूस वाईटच ग्रहण करतो. अमृताची थोरवी अमर करण्यामध्ये असते, तर विषाची मारुन टाकण्यामध्ये असते. ५
खल अघ अगुन साधु गुन गाहा । उभय अपार उदधि अवगाहा ॥
तेहि तें कछु गुन दोष बखाने । संग्रह त्याग न बिनु पहिचाने  ॥ १ ॥
दुष्ट लोकंच्या पापांच्या व अवगुणांच्या कथा तसेच साधूंच्या गुणांच्या कथा या दोन्ही अपार व अथांग समुद्राप्रमाणे आहेत. त्यामुळे (येथे) काही गुणांचे वा दोषांचे वर्णन केलेले आहे. कारण ते ओळखून घेतल्याशिवाय गुणांचे ग्रहण करता येत नाही किंवा दोषांचा त्यागही करता येत नाही. १-५
भलेउ पोच सब बिधि उपजाए  । गनि गुन दोष बेद बिलगाए 
कहहिं बेद इतिहास पुराना  । बिधि प्रपंचु गुन अवगुन साना  ॥ २ ॥
चांगले-वाईट हे सर्वच ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेले आहे, परंतु गुण आणि दोषांचा विचार करुन वेदांनी त्यांना वेगवेगळे केले आहे. वेद, इतिहास व पुराणे असे म्हणतात की, ही सृष्टी गुण-अवगुणांनी भरलेली आहे. २-५
दुख सुख पाप पुन्य दिन राती  । साधु असाधु सुजाति कुजाती 
दानव देव ऊँच अरु नीचू  । अमिअ सुजीवनु माहुरु मीचू 
माया ब्रह्म जीव जगदीसा  । लच्छि अलच्छि रंक अवनीसा 
कासी मग सुरसरि क्रमवासा । मरु मारव महिदेव गवासा 
सरग नरक अनुराग बिरागा । निगमागम गुन दोष बिभागा ॥ ३ ॥
सुख-दुःख, पाप-पुण्य, दिवस-रात्र, साधू-असाधू, सुजाति-कुजाती, देव-दानव, उच्च-नीच, अमृत-विष, जीवन-मरण, माया-ब्रह्म, जीव-ईश्र्वर, संपत्ति-दारिद्र्य, रंक-राजा, काशी-मगध, गंगा-कर्मनाशा (पापनदी), मारवाड-मारवा, ब्राह्मण-कसाई, स्वर्ग-नरक, अनुराग-वैराग्य, या सर्व गोष्टी ब्रह्मदेवाच्या सृष्टीत आहेत. वेद-शास्त्रांनी गुण-दोषांनुसार त्यांचे विभाग केले आहेत. ३-५



Custom Search

No comments: