Friday, March 27, 2020

ShriRamCharitManas Part 6 श्रीरामचरितमानस भाग ६


ShriRamCharitManas Part 6 श्रीरामचरितमानस भाग ६ 
ShriRamcharitManas is written by Tulsidas. He was a great devotee of God Ram. RamcharitManas is in Avadhi Language.


श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा—नामु राम को कलपतरु कलि कल्यान निवासु ।
जो सुमिरत भयो भॉग तें तुलसी तुलसीदासु ॥ २६ ॥
कलियुगामध्ये श्रीरामांचे नाम हे मनोवांछित पदार्थ देणारे आणि कल्याणाचा निवास आहे. त्याचे स्मरण केल्याने भांगेप्रमाणे ( निकृष्ट ) असलेला तुलसीदास तुळशीप्रमाणे ( पवित्र ) झाला. ॥ २६ ॥
चहुँ जुग तीनि काल तिहुँ लोका । भए नाम जपि जीव बिसोका ॥
बेद पुरान संत मत एहू । सकल सुकृत फल राम सनेहू ॥
चारी युगांमध्ये तिन्ही कालांमध्ये आणि तिन्ही लोकांमध्ये नामाचा जप करुन जीव शोकमुक्त झाले आहेत. वेद, पुराणे व संत यांचे मत हेच आहे की, सर्व पुण्याचे फळ श्रीरामांवर प्रेम उत्पन्न होण्यातच आहे. ॥ १ ॥
ध्यानु प्रथम जुग मख बिधि दूजें । द्वापर परितोषत प्रभु पूजें ॥
कलि केवल मल मूल मलीना । पाप पयोनिधि जन मन मीना ॥
सत्ययुगात ध्यानाने, त्रेतायुगात यज्ञाने आणि द्वापरयुगात पूजनाने भगवान प्रसन्न होत असत. परंतु कलियुग हे फक्त पापाचे मूळ आणि मलिन आहे. यामध्ये मनुष्याचे मन पापरुपी समुद्रातील मासा बनले आहे. ॥ २ ॥
नाम कामतरु काल कराला । सुमिरत समन सकल जग जाला ॥
राम नाम कलि अभिमत दाता । हित परलोक लोक पितु माता ॥
अशा घोर कलियुगामध्ये नाम हाच कल्पतरु आहे. त्याचे स्मरण करताच ते संसारातील सर्व दगदग नाहीशी करुन टाकणारे आहे. कलियुगात हे रामनाम मनोवांछित फळ देणारे आहे. ते परलोकीचे परम कल्याण करणारे असून या लोकीचे माता-पिता आहे. ॥ ३ ॥
नहिं कलि करम न भगति बिबेकू । राम नाम अवलंबन एकू ॥
कालनेमि कलि कपट निधानू । नाम सुमति समरथ हनुमानू ॥
कलियुगामध्ये कर्म, भक्ती किंवा ज्ञानही नाही. रामनामाचा एकमात्र आधार आहे. कपटाची खाण असलेल्या कलियुगरुपी कालनेमीला ( ठार मारण्यासाठी ) रामनाम हेच बुद्धिमान आणि समर्थ असा हनुमान आहे. ॥ ३ ॥
दोहा—राम नाम नरकेसरी कनककसिपु कलिकाल ।
जापक जन प्रहलाद जिमि पालिहि दलि सुरसाल ॥ २७ ॥
रामनाम हे भगवान नृसिंह आहे, कलियुग हे हिरण्यकशिपू आहे आणि नामाचा जप करणारे लोक प्रल्हादाप्रमाणे आहेत. हे रामनाम देवांचा शत्रू असलेल्या ( कलियुगरुपी ) दैत्याला मारुन जप करणार्‍यांचे रक्षण करील. ॥ २७ ॥
भायँ कुभायँ अनख आलासहूँ । नाम जपत मंगल दिसि दसहूँ ।
सुमिरि सो नाम राम गुन गाथा । करउँ नाइ रघुनाथहि माथा ॥
प्रेमाने, वैराने, क्रोधाने किंवा आळसाने कशाही प्रकारे नाम जपल्यामुळे दाही दिशांना कल्याणच होते. त्याच रामनामाचे स्मरण करुन आणि श्रीरघुनाथांसमोर मस्तक नम्र करुन मी त्यांच्या गुणांचे वर्णन करतो. ॥ १ ॥
मोरि सुधारिहि सो सब भॉती । जासु कृपा नहिं कृपॉ अघाती ॥
राम सुस्वामि कुसेवकु मोसो । निज दिसि देखि दयानिधि पोसो ॥
ते माझे चुकलेले सर्व प्रकारे सुधारुन घेतील. त्यांची कृपा ही कृपा करुन करुन कधी तृप्त होत नाही. श्रीराम हे उत्तम स्वामी आहेत आणि माझ्यासारखा वाईट सेवक कोणी नाही. तरीही दयानिधी श्रीरामांनी आपल्या ब्रीदाचा विचार करुन माझे पालन केले. ॥ २ ॥
लोकहुँ बेद सुसाहिब रीती । बिनय सुनत पहिचानत प्रीती ॥
गनी गरीब ग्राम नर नागर । पंडित मूढ मलीन उजागर ॥
या जगामध्ये व वेदामध्ये चांगल्या स्वामीची हीच रीत प्रसिद्ध आहे की, विनंती ऐकताच तो प्रेम ओळखतो. गरीब-श्रीमंत, खेडूत-नागरिक, पंडित-मूर्ख, कुप्रसिद्ध-सुप्रसिद्ध, ॥ ३ ॥
सुकबि कुकबि निज मति अनुहारी । नृपहि सराहत सब नर नारी ॥
साधु सुजान सुसील नृपाला । ईस अंस भव परम कृपाला ॥
सुकवि-कुकवि व सर्व स्री-पुरुष हे आपापल्या बुद्धीप्रमाणे राजाची स्तुती करतात आणि साधु बुद्धिमान, सुशील, ईश्र्वरी अंशाने उत्पन्न  राजा हा, ॥ ४ ॥
सुनि सनमानहिं सबहि सुबानी । भनिति भगति नति गति पहिचानी ॥
यह प्राकृत महिपाल सुभाऊ । जान सिरोमनि कोसलराऊ ॥
त्या सर्वांचे ऐकून घेऊन आणि त्यांची वाणी, भक्ती, विनय आणि वर्तणूक ओळखून गोड वाणीने त्या सर्वांचा यथायोग्य सन्मान करतो. हा स्वभाव लौकिक राजांचा असतो. कोसलनाथ श्रीराम तर महान ज्ञानी आहेत. ॥ ५ ॥
रीझत राम सनेह निसोतें । को जग मंद मलिनमति मोतें ॥
श्रीराम हे खरेतर शुद्ध प्रेमाने प्रसन्न होतात, परंतु या जगात माझ्यापेक्षा मूर्ख आणि मलिन बुद्धीचा दुसरा कोण असणार ? ॥ ६ ॥
दोहा—सठ सेवक की प्रीति रुचि रखिहहिं राम कृपालु ।
उपल किए जलजान जेहिं सचिव सुमति कपि भालु ॥ २८ ( क) ॥
परंतु कृपाळू श्रीराम माझ्यासारख्या दुष्ट सेवकाचेही प्रेम आणि आवड नक्कीच स्वीकारतील. त्यांनी पाषाणांना तरणारे जहाज ( सेतु ) आणि वानर-अस्वलांना बुद्धिमान मंत्री बनविले. ॥ २८ ( क ) ॥
हौंहु कहावत सबु कहत राम सहत उपहास ।
साहिब सीतानाथ सो सेवक तुलसीदास ॥ २८ ( ख ) ॥
सर्व लोक मला श्रीरामांचा सेवक म्हणतात आणि मीसुद्धा ( लाज न बाळगता ) तसे म्हणवून घेतो. कृपाळू श्रीरामही ही निंदा सहन करुन घेतात की, सीतानाथांसारख्या स्वामींचा तुलसीदासासारखा ( यःकश्र्चित ) सेवक आहे. ॥ २८ ( ख ) ॥
अति बडि मोरि ढिठाई खोरी । सुनि अघ नरकहुँ नाक सकोरी ॥
समुझि सहम मोहि अपडर अपनें । सो सुधि राम कीन्हि नहिं सपनें ॥
हे माझे मोठे धाडस आणि दोष आहे. माझे पाप ऐकून नरकानेही नाक मुरडले. या विचाराने कल्पित भयामुळे मला भीती वाटत आहे, परंतु भगवान श्रीरामांनी स्वप्नातही माझ्या या दोषांकडे लक्ष दिले नाही. ॥ १ ॥
सुनि अवलोकि सुचित चख चाही । भगति मोरि मति स्वामि सराही ॥
कहत नसाइ होइ हियँ नीकी । रीझत राम जानि जन जी की ॥
उलट, माझे प्रभू श्रीरामचंद्रांनी ही गोष्ट ऐकून, पाहून आणि आपल्या सुचितरुपी चक्षूंनी निरीक्षण करुन माझ्या भक्तीचे व बुद्धीचे कौतुक केले. कारण बोलण्यात जरी चूक असली ( अर्थात मी स्वतःला भगवंताचा सेवक म्हणत-म्हणवीत असलो ) तरी हृदयात चांगुलपणा असला पाहिजे. ( मनात मी स्वताःला त्यांचा सेवक बनण्यास योग्य न मानता पापी आणि दीन आहे, असेच मानतो, हा चांगुलपणा. ) श्रीरामसुद्धा या आपल्या दासाच्या मनाची स्थिती चांगल्या प्रकारे जाणून प्रसन्न होतात. ॥ २ ॥
रहति न प्रभु चित चूक किए की । करत सुरति सय बार हिए की ॥
जेहिं अघ बधेउ ब्याघ जिमि बाली । फिरि सुकंठ सोइ कीन्हि कुचाली ॥
प्रभु रामांच्या मनात आपल्या भक्तांची चूक-भूल राहात नाही ( ते ती विसरुन जातात ) आणि त्यांच्या मनाची चांगली भावना शंभर वेळा आठवीत असतात. ज्या पापासाठी त्यांनी व्याधाप्रमाणे वालीला ठार मारले, त्याचप्रमाणे नंतर सुग्रीवसुद्धा वाईट वागला. ॥ ३ ॥
सोइ करतूति बिभीषन केरी । सपनेहुँ सो न राम हियँ हेरी ॥
ते भरतहि भेंटत सनमाने । राजसभॉ रघुबीर बखाने ॥
तशीच कृती बिभीषणाचीही होती, परंतु श्रीरामांनी ती स्वप्नातसुद्धा मनात धरली नाही. उलट भरताची भेट झाली, तेव्हा श्रीरघुनाथांनी बिभीषणाचा सन्मान केला आणि राजसभेमध्ये त्याच्या गुणांची वाखाणणी केली. ॥ ४ ॥
दोहा—प्रभु तरु तर कपि डार पर ते किए आपु समान ।
तुलसी कहूँ न राम से साहिब सीलनिधान ॥ २९ ( क) ॥
प्रभु श्रीराम हे वृक्षाखाली आणि वानर झाडांच्या फांदिवरचे. ( अर्थात कुठे मर्यादापुरुषोत्तम श्रीराम आणि कुठे फांद्यांवर उड्या मारणारे वानर. ) परंतु त्यांनी अशा वानरांना आपल्यासारखे बनविले. तुलसीदास म्हणतात की, श्रीरामांच्यासारखे शीलनिधान स्वामी कुठेही मिळणार नाहीत. ॥
राम निकाईं रावरी है सबही को नीक ।
जौं यह सॉची है सदा तौ नीको तुलसीक ॥ २९ ( ख ) ॥
हे प्रभु श्रीराम, तुमच्या चांगुलपणामुळेच सर्वांचे कल्याण आहे. ( अर्थात तुमचा कल्याणमय स्वभाव सर्वांचे भले करणारा आहे. ) ही गोष्ट खरी असेल, तर तुलसीदासाचे सुद्धा कल्याण होईल. ॥
एहि बिधि निज गुन दोष कहि सबहि बहुरि सिरु नाइ ।
बरनउँ रघुबर बिसद जसु सुनि कलि कलुष नसाइ ॥ २९ ( ग ) ॥
अशाप्रकारे आपले गुणदोष सांगून आणि सर्वांना नमस्कार करुन मी रघुनाथांच्या निर्मळ कीर्तीचे वर्णन करतो. ते ऐकल्याने कलियुगातील पापे नाहीशी होतात. ॥ २९ ( ग ) ॥
जागबलिक जो कथा सुहाई । भरद्वाज मुनिबरहि सुनाई ॥
कहिहउँ सोइ संबाद बखानी । सुनहुँ सकल सज्जन सुखु मानी ॥
याज्ञवल्क्य मुनींनी जी मधुर कथा मुनिश्रेष्ठ भरद्वाजांना ऐकविली होती, तोच संवाद मी वर्णन करुन सांगत आहे. तो सर्व सज्जनांनी सुखाने ऐकावा. ॥ १ ॥
संभु कीन्ह यह चरित सुहावा । बहुरि कृपा करि उमहि सुनावा ॥
सोइ सिव कागभुसुंडिहि दीन्हा । राम भगत अधिकारी चीन्हा ॥
प्रथम भगवान शिवांनी हे सुंदर चरित्र रचले आणि नंतर कृपा करुन ते पार्वतीला ऐकविले. शंकरांनी काकभुशुंडी हे रामभक्त असल्याचे पाहून व त्यांचा अधिकार ओळखून तेच चरित्र त्यांना दिले. ॥ २ ॥
तेहि सन जागबलिक पुनि पावा । तिन्ह पुनि भरद्वाज प्रति गावा ॥
ते श्रोता बकता समसीला । सवँदरसी जानहिं हरिलीला ॥
काकभुशुंडींकडून नंतर ते याज्ञवल्क्यांना मिळाले. त्यानंतर त्यांनी ते भरद्वाज मुनींना ऐकविले. ते दोघे वक्ता आणि श्रोता ( याज्ञवल्क्य आणि भरद्वाज ) समानशील, समदर्शी आणि हरीची लीला जाणणारे आहेत. ॥ ३ ॥
जानहिं तीनि काल निज ग्याना । करतल गत आमलक समाना ॥
औरउ जे हरिभगत सुजाना । कहहिं सुनहिं समुझहिं बिधि नाना ॥
ते दोघे आपल्या ज्ञानाने तिन्ही काळांतील घटना तळहातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे ( प्रत्यक्ष ) जाणतात आणि जे भगवंताच्या लीलांचे रहस्य जाणणारे हरिभक्त आहेत, ते हे चरित्र नानाप्रकारे सांगतात, ऐकतात व समजून घेतात. ॥ ४ ॥
दोहा—मैं पुनि निज गुर सन सुनी कथा सो सूकरखेत ।
समुझी नहिं तसि बालपन तब अति रहेउँ अचेत ॥ ३० ( क ) ॥
नंतर मी तीच कथा वाराह-क्षेत्रामध्ये आपल्या गुरुजींच्याकडून ऐकली. परंतु त्यावेळी बालपणामुळे मला विशेष समज नव्हती, त्यामुळे ते चरित्र मला चांगल्या प्रकारे समजले नाही. ॥ ३० (क) ॥
श्रोता बकता ग्याननिधि कथा राम कै गूढ ।
किमि समुझौं मैं जीव जड कलि मल ग्रसित बिमूढ ॥ ३० ( ख ) ॥
श्रीरामांच्य गूढ कथेचा वक्ता व श्रोता हे दोघे ज्ञानाचे भांडार असतात. कलियुगातील पापांनी ग्रासलेला मी महामूर्ख जड जीव ती कशी समजू शकणार बरे ? ॥ ३० ( ख ) ॥
तदपि कही गुर बारहिं बारा । समुझि परी कछु मति अनुसारा ॥
भाषाबद्ध करबि मैं सोई । मोरें मन प्रबोध जेहिं होई ॥
तरीही गुरुजींनी जेव्हा वारंवार ती कथा सांगितली, तेव्हा माझ्या बुद्धीप्रमाणे मला काहीशी समजली. आता तीच मी माझ्या मनाला समाधान मिळण्यासाठी लौकिक भाषेत लिहीत आहे. ॥ १ ॥
जस कछु बुधि बिबेक बल मेरें । तस कहिहउँ हियँ हरि के प्रेरें ॥
निज संदेह मोह भ्रम हरनी । करउँ कथा भव सरिता तरनी ॥
माझ्यामध्ये जे काही थोडे बुद्धी व विवेकाचे बळ आहे, त्यानुसार मी हरीच्या प्रेरणेने ही कथा सांगेन. मी स्वतःच्या संशय, अज्ञान व भ्रम यांचे हरण करणार्‍या कथेची रचना करीत आहे. कारण ती संसाररुपी नदी तरुन जाण्यासाठी नाव आहे. ॥ २ ॥
बुध बिश्राम सकल जन रंजनि । रामकथा कलि कलुष बिभंजनि ॥
रामकथा कलि पंनग भरनी । पुनि बिबेक पावक कहुँ अरनी ॥
रामकथा ही पंडितांना विसावा देणारी, सर्व मनुष्यांना प्रसन्न करणारी आणि कलियुगातील पापांचा नाश करणारी आहे. रामकथा कलियुगरुपी सर्पासाठी मोर आहे आणि विवेकरुपी अग्नी प्रकट करण्यासाठी अरणी ( अग्नीमंथन करण्याचे काष्ठ ) आहे. ॥ ३ ॥
रामकथा कलि कामद गाई । सुजन सजीवनि मूरि सुहाई ॥
सोइ बसुधातल सुधा तरंगिनि । भय भंजनि भ्रम भेक भुअंगिनि ॥
रामकथा ही कलियुगामध्ये सर्व मनोरथ पूर्ण करणारी कामधेनू आहे आणि सज्जन लोकांसाठी संजीवनी आहे. पृथ्वीवर हीच अमृताची नदी आहे. जन्म-मरणरुपी भयाचा नाश करणारी आहे आणि भ्रमरुपी बेडकांना खाऊन टाकणारी सर्पीण आहे. ॥ ४ ॥
असुर सेन सम नरक निकंदिनि । साधु बिबुध कुल हित गिरिनंदिनि ॥
संत समाज पयोधि रमा सी । बिस्व भार भर अचल छमा सी ॥
रामकथा ही असुरांच्या सेनेप्रमाणे असणार्‍या ( भयंकर ) नरकांचा नाश करणारी आणि साधुरुप देवांच्या कुलाचे हित करणारी पार्वती आहे. संत-समाजरुपी क्षीरसागरासाठी लक्ष्मीसारखी आहे आणि संपूर्ण विश्र्वाचा भार उचलून धरण्यासाठी अचल पृथ्वीसारखी आहे. ॥ ५ ॥
जम गन मुहँ मसि जग जमुना सी । जीवन मुकुति हेतु जनु कासी ॥
रामहि प्रिय पावनि तुलसी सी । तुलसिदास हित हियँ हुलसी सी ॥
रामकथा ही यमदूतांच्या तोंडाला काळोखी फासणार्‍या या जगातील यमुनेप्रमाणे आहे आणि जीवांना मुक्ती देण्यासाठी जणू काशीच आहे. ही कथा श्रीरामांना पवित्र तुळशीप्रमाणे आवडते आणि तुलसीदासाचे ( तुलसीदासांची आई ) हुलसी प्रमाणे मनापासून हित करणारी आहे. ॥ ६ ॥
सिवप्रिय मेकल सैल सुता सी । सकल सिद्धि सुख संपति रासी ॥
सदगुन सुरगन अंब आदिति सी । रघुबर भगति प्रेम परमिति  सी ॥

ही रामकथा शंकरांना नर्मदेप्रमाणे आवडणारी आहे. ही सर्व सिद्धींची आणि सुख-संपत्तीची खाण आहे. ही सद्गुणरुपी देवांना उत्पन्न करुन त्यांचे पालन-पोषण करणार्‍या माता अदितीसारखी आहे. ही जणू श्रीरघुनाथांच्या भक्ती व प्रेमाच्या परम सीमेसारखी आहे. ॥ ७ ॥


Custom Search

No comments: