Friday, April 3, 2020

Dnyeneshwari Adhyay 1 Part 2 ज्ञानेश्र्वरी अध्याय पहिला भाग २


ज्ञानेश्र्वरी अध्याय पहिला भाग २
Dnyeneshwari Adhyay 1 Part 2
आता जो श्रीकृष्णानें अर्जुनाला संवादरुपानें उपदेशिला, तो गीता नांवाचा प्रसंग ( विषय ) भारतामध्ये कमलांतील परागाप्रमाणे आहे.
 तरी शब्दब्रह्माब्धि । मथिलेया व्यासबुद्धि ।
निवडिलें निरवधि । नवनीत हे ॥ ५१ ॥
अथवा, व्यासांनी आपल्या बुद्धीने वेदरुपी समुद्राचें मंथन करुन हे भारतरुपी अमर्याद लोणी काढले.
मग ज्ञानाग्निसंपर्के । कडसिलें विवेकें ।
पद आलें परिपाकें । आमोदासी ॥ ५२ ॥
मग तें ( भारतरुप ) लोणी ज्ञानरुप अग्नीच्या संसर्गानें विवेकाचा कढ देऊन कढविल्यावर त्याचा परिपाक होऊन त्याला सुगंध प्राप्त झाला. ( त्याचे गीतारुप साजूक तूप बनले. )
जें अपेक्षिजे विरक्तीं । सदा अनुभविजे संतीं ।
सोहंभावें पारंगतीं । रमिजे जेथ ॥ ५३ ॥
वैराग्यशील पुरुष ज्याची इच्छा करतात, संत जें नेहमीं अनुभवितात व सोऽहंभावनेनें पार पावलेले जेथें रममाण होतात; 
जें आकर्णिजे भक्तीं । जें आदिवंद्य त्रिजगतीं ।
ते भीष्मपर्वी संगती । सांगिजैल ॥ ५४ ॥
 भक्तांनी जिचें ( गीतेचें ) श्रवण करावें, जी तिन्ही लोकांत प्रथम नमस्कार करण्याला योग्य आहे,
जें भगवद्गीता म्हणिजे । जें ब्रह्मेशांनीं प्रशंसिजे ।
जें सनकादिकीं सेविजे । आदरेसी ॥ ५५ ॥
जिला भगवद्गीता असें म्हणतात, ब्रह्मदेव व शंकर जिची प्रशंसा करतात व जिचें सनकादिक आदरानें सववन करतात;   
जैसे शारदियेचे चंद्रकळे--। माजीं अमृतकण कोंवळे ।
ते वेंचिती मनें मवाळें । चकोरतलगें ॥ ५६ ॥
५६) ज्याप्रमाणें शरद्ऋतूच्या चंद्रकिरणांतील अमृताचे कोमल कण चकोरांची पिलें मृदु मनानें वेंचतात;
तियापरी श्रोतां । अनुभवावी हे कथा ।
अति हळुवारपण चित्ता । आणूनियां ॥ ५७ ॥
५७) त्याप्रमाणें चित्त अगदीं हळुवार करुन ( वासनांचे जाड्य काढून ) मग श्रोत्यांनीं ही कथा अनुभवावी.
हे शब्देविण संवादिजे । इंद्रियां नेणतां भोगिजे ।
बोलाआदि झोंबिजे । प्रमेयासी ॥ ५८ ॥
५८) हिची चर्चा शब्दांवांचून करावी. ( मनांतल्या मनांत हिचा विचार करावा. ) इंद्रियांना पत्ता लागूं न देतां हिचा उपभोग घ्यावा व हिच्यांत प्रतिपादक शब्दांच्या अगोदर त्यांत सांगितलेल्या सिद्धांतांचे आकलन करावें.               
जैसे भ्रमर परागु नेती । परी कमळदळें नेणती ।
तैसी परी आहे सेविती । ग्रंथी इये ॥ ५९ ॥
५९) कमलांतील पराग भुंगे घेऊन जातात, परंतु कमळाच्या पाकळ्यांना त्याची खबरहि नसते; या ग्रंथाचे सेवन करण्याची रीत तशी आहे.
कां आपुला ठावो न सांडितां । आलिंगिजे चंदु प्रगटतां ।
हा अनुरागु भोगितां । कुमुदिनी जाणे ॥ ६० ॥
६०) किंवा चंद्र दिसूं लागतांच चंद्रविकासी कुमुदिनी प्रफुल्ल होऊन, आपली जागा न सोडतां त्याला आलिंगन देते; हे प्रेमसौख्य कसें भोगावें हे एक तिचें तिलाच ठाऊक !   
ऐसोनि गंभीरपणें । स्थिरावलेनि अंतःकरणें ।
आथिला तोचि जाणे । मानूं इथे ॥ ६१ ॥
६१) त्याचप्रमाणें गंभीर व शांत अंतःकरणानें जो संपन्न आहे, तोच या गीतेचे रहस्य जाणतो.
अहो अर्जुनाचिये पांती । जे परिसणया योग्य होती ।
तिहीं कृपा करुनि संतीं । अवधान द्यावें ॥ ६२ ॥
६२) अहो, अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याची ज्यांची योग्यता असेल त्या संतांनी कृपा करुन इकडे लक्ष द्यावें.
हें सलगी म्यां म्हणितलें । चरणां लागोनि विनविलें ।
प्रभू सखोल हृदय आपुलें । म्हणऊनियां ॥ ६३ ॥
६३) अहो महाराज, आपलें अंतःकरण सखोल आहे म्हणून हें ( वरील ओवींतील ) विधान मी केवळ लडिवाळपणें केलें. ही ( वास्तविक ) आपल्या पायांजवळ विनंती आहे.
जैसा स्वभावो मायबापांचा । अपत्य बोले जरी बोबडी वाचा ।
तरी अधिकची तयाचा । संतोष आधी ॥ ६४ ॥
६४) लहान मूल जरी बोबड्या शब्दांनी बोललें, तरी त्याचा अधिकच संतोष मानावयाचा, हा ज्याप्रमाणें आईबापांचा स्वभाव असतो;   
तैसा तुम्हीं मी अंगीकारिलां । सज्जनीं आपुला म्हणितला ।
तरी उणें सहजें उपसाहला । प्रार्थूं कायी ॥ ६५ ॥
६५) त्याचप्रमाणें तुमच्याकडून माझा अंगीकार झाला आहे व सज्जनांनी मला आपला म्हणून म्हटले आहे, तेव्हां अर्थातच ( माझें जे काय ) उणें असेल तें सहन करुन घ्यालच. त्याबद्दल आपली प्रार्थना कशाला ?     
परी अपराधु तो आणीक आहे । जें मी गीतार्थु कवळूं पाहें ।
तें अवधारा विनवूं लाहें । म्हणऊनियां ॥ ६६ ॥
६६) परंतु ( खरा ) अपराध, तो वेगळाच आहे. तो हा की, मी गीतेचा अर्थ आकलन करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून ऐका, ही मी तुमची विनंती करीत आहे.
हें अनावर न विचारितां । वायांचि घिंवसा उपजला चित्ता ।      
येर्‍हवीं भानुतेजीं काय खद्योता । शोभा आधी ॥ ६७ ॥
६७) ( हे गीतार्थाचे काम ) न झेपणारें आहे, याचा विचार न करतां उगाच हें साहस करण्याचें मनांत आणलें. वास्तविक पाहिलें तर, सूर्यप्रकाशांत काजव्याची काय शोभा आहे ?
कीं टिटिभू चांचुवरी । माप सूये सागरीं ।
मी नेणतु त्यापरी । प्रवर्ते येथ ॥ ६८ ॥
६८) किंवा टिटवीनें ( समुद्र आटविण्यासाठी ) ज्याप्रमाणें आपल्या चोचीनें समुद्राचे पाणी उपसून टाकण्याचा ( अजाणतेपणाने ) प्रयत्न करावा, त्याप्रमाणें अजाण मी गीतार्थ करण्यास प्रवृत्त झालो आहे.
आइका आकाश गिंवसावें । तरी आणीक त्याहूनि थोर होआवें ।
म्हणऊनि अपाहु हें आघवें । निर्धारितां ॥ ६९ ॥
६९) हें पाहां, आकाशाला कवळायचे असल्यास आकाशाहून मोठे व्हावयास पाहिजे; म्हणूनच हे सर्व करणें विचार केला असतां, माझ्या योग्यतेबाहेरचे आहे.
या गीतार्थाची थोरी । स्वयें शंभू विवरी ।
जेथ भवानी प्रश्नु करी । चमत्कारोनी  ॥ ७० ॥
७०) या गीतार्थाची महती एवढी आहे की, स्वतः शंकर आपल्या मनाशीच त्याचा विचार करीत असतां, देवी पार्वतीनें “ आपण एकसारखा विचार कशाचा करीत असतां ?” असा त्यांना मोठ्या आश्र्चर्याने प्रश्र्ण केला.   
तेथ हरु म्हणे नेणिजे । देवी जैसें कां स्वरुप तुझें ।
तैसें हे नित्य नूतन देखिजे । गीरातत्त्व ॥ ७१ ॥
७१) त्यावर शंकर म्हणाले, “ हे देवी, ज्याप्रमाणें तुझ्या स्वरुपाचा थांग लागत नाही, त्याचप्रमाणें गीतातत्त्वाचा विचार करावयास जावे, तेव्हा ( तें ) रोज नवीनच आहे असे दिसते.
हा वेदार्थसागरु । जया निद्रिताचा घोरु ।
तो स्वयें सर्वेश्र्वरु । प्रत्यक्ष अनुवादला ॥ ७२ ॥
७२) समुद्राप्रमाणें अमर्याद असणारा वेदार्थ हा ( योग-निद्रेत असलेल्या ) ज्या सर्वेश्र्वराचें झोपेतोंच घोरणे आहे, त्या परमात्म्यानें स्वतः प्रत्यक्ष गीता सांगितली.
ऐसें जें अगाध । जेथ वेडावती वेद ।
तेथ अल्प मी मतिमंद । काय होय ॥ ७३ ॥
७३) असे हें ( गीतार्थाचे काम ) गहन आहे. या कामी वेदांचीहि मति कुंठित होते. मी तर पडलों लहान मंदमति, तेव्हा तेथें माझा पाड कसा लागणार ?
हें अपार कैसेनि कवळावें । महातेज कवणें धवळावें ।
गगन मुठीं सुवावें । मशकें केवी ॥ ७४ ॥  
७४) या अमर्याद गीतार्थाचे कसें आकलन होणार ? सूर्याला कोणी उजळावें ? चिलटानें आकाश आपल्या मुठींत कसें ठेवावें ?
परी एथ असे एकु आधारु । तेणेचि बोलें मी सधरु ।
जे सानुकूळ श्रीगुरु । ज्ञानदेवो म्हणे ॥ ७५ ॥
७५) असें आहे तरी, ज्ञानदेव म्हणतात, या कामी ( मला ) एक श्रीगुरु निवृत्तिनाथ यांची अनुकुलता आहे. त्यांच्या आधारावर धीर धरुन मी बोलतो. येर्‍हवीं तरी मी मुर्खु । जरी जाहला अविवेकु ।
तरी संतकृपादीपकु । सोज्वळु असे ॥ ७६ ॥
७६) एरवी मी तर बोलून-चालून मूर्ख आहे व माझ्या हातून हा अविचार होत आहे. तरी ( पण ) संतकृपेचा दिवा ( मजपुढे सारखा ) लखलखीत जळत आहे.
लोहाचें कनक होये । हे सामर्थ्य परिसींच आहे ।
कीं मृतही जीवित लाहे । अमृतसिद्धि ॥ ७७ ॥
७७) लोखंडाचें सोनें होतें खरें; परंतु तसे करण्याचे सामर्थ्य केवळ परिसामध्येंच आहे; किंवा अमृत प्राप्त झाल्यानें मेलेल्यालाहि जीवित लाभते.
जरी प्रकटे सिद्धसरस्वती । तरी मुकया आथी भारती ।
एथ वस्तुसामर्थ्यशक्ती । नवल कायी ॥ ७८ ॥
७८) जर प्रत्यक्ष सरस्वती प्रगट होईल, तर मुक्याला वाचा फुटेल. ही केवळ वस्तुसामर्थ्याची शक्ति आहे, यांत आश्र्चर्य तें काय ?
जयातें कामधेनु माये । तयासी अप्राप्य कांहीं आहे ।
म्हणऊनि मी प्रवार्तों लाहें । ग्रंथी इये ॥ ७९ ॥
७९) कामधेनु ही ज्याची आई आहे त्याला न मिळण्यासारखें काय आहे ? आणि म्हणूनच मी हा ग्रंथ करण्यास प्रवृत्त झालों आहे.
तरी न्यून तें पुरतें । अधिक तें सरतें ।
करुनि घेयावें हें तुमतें । विनवितु असें ॥ ८० ॥
८०) तरी उणें असेल तें पुरें करुन घ्यावें आणि जास्त असेल तें सोडून द्यावें, अशी माझी आपणास विनंती आहे.
आतां देईजो अवधान । तुम्हीं बोलविल्या मी बोलेन ।
जैसें चेष्टे सूत्राधीन । दारुयंत्र ॥ ८१ ॥
८१) आतां आपण लक्ष द्यावें. आपण मला बोलवित आहां; म्हणून मी बोलतों ( गीतेचे व्याख्यान करतों. ) ज्याप्रमाणें लाकडी कळसूत्री बाहुली सूत्रधाराची दोरी जशी नाचवील तशी नाचते;
तैसा मी अनुग्रहीतु । साधूंचा निरुपितु ।
ते आपला अलंकारितु । भलतयापरी ॥ ८२ ॥
८२) त्याप्रमाणें मी आपल्या कृपेंतील असून साधूंचा केवळ निरोप्या आहे. आतां त्यांनी मला वाटेल तसें नटवावें.    
तंव श्रीगुरु म्हणती राहीं । हें तुज बोलावें नलगे कांहीं ।
आतां ग्रंथा चित्त देईं । झडकरी वेगा ॥ ८३ ॥
८३) तेव्हा श्रीगुरु म्हणाले, ‘ राहूं दे. हें तूं आम्हांला सांगावें असें नाही. आतां तूं लवकर ग्रंथ सांगण्यास आरंभ कर. ‘
या बोला निवृत्तिदासु । पावूनि परम उल्हासु ।
म्हणे परियेसा मना अवकाशु । देऊनियां ॥ ८४ ॥
८४) या श्रीगुरुंच्या भाषणावर निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव अतिशय उल्हसित होऊन म्हणाले, मी बोलतों तें मोकळ्या मनानें ऐका.
मूळ श्रलोक:
धृतराष्ट्र उवाच: धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः ।
मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय ॥ १ ॥
१)   धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, धर्माचें स्थान अशा कुरुक्षेत्रामध्ये जमलेले आणि युद्धाची इच्छा करणारे माझे पुत्र ( कौरव ) आणि पांडव यांनीं काय केलें ?
तरी पुत्रस्नेहें मोहितु । धृतराष्ट्र असे पुसतु ।
म्हणे संजया सांगें मातु । कुरुक्षेत्रींची ॥ ८५ ॥
८५) मुलाच्या ममतेने वेडा झालेला धृतराष्ट्र संजयास प्रश्र्ण करुं लागला की, ‘ संजया, कुरुक्षेत्राची काय हकीकत आहे, ती मला सांग.     
जें धर्मालय म्हणिजे । तेथ पांडव आणि माझे ।
गेले असती व्याजें । झुंजाचेनि ॥ ८६ ॥
८६) ज्या कुरुक्षेत्राला धर्माचें घर म्हणतात, तेथें पांडव आणि माझें पुत्र लढ़ाईच्या निमित्ताने गेले आहेत.
तरी तिही येतुलां अवसरीं । काय किजत असें येरयेरीं ।
तें झडकरी कथन करीं । मजप्रती ॥ ८७ ॥
८७) तरी ते एकमेक एवढा वेळ काय करीत आहेत हें मला लवकर सांग.
श्रीमद् भगवद्गीतेंतील मूळ श्र्लोक:
संजय उवाच दृष्टवा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा ।
आचार्यंमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् ॥ १ ॥
पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्यं  महतीं चमूम् ।
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥ २ ॥
१ व २) संजय म्हणाला, त्या वेळीं राजा दुर्योधन, पांडवांचे सैन्य तर व्यूहाच्या आकारानें उभें राहिलेलें पाहून, द्रोणाचार्यांजवळ जाऊन त्यांना बोलला. २ हे गुरो, तुमचा बुद्धिमान् शिष्य द्रुपदपुत्र ( धृष्टद्युम्न ) यानें व्यूह रचून उभी केलेली अशी ही पांडवांची मोठी सेना अवलोकन करा.  
तिये वेळीं तो संजय बोले । म्हणे पांडवसैन्य उचललें ।
जैसें महाप्रळयीं पसरलें । कृतांतमुख ॥ ८८ ॥
८८) त्यावेळी तो संजय बोलला. तो म्हणाला कीं पांडव-सैन्यानें उठाव केला, तेव्हां ज्याप्रमाणें महाप्रळयाच्या वेळीं काळ आपलें तोंड पसरतो;
तैसें तें घनदाट । उठावलें एकवाट ।
जैसें उसळलें कालकूट । धरी कवण ॥ ८९ ॥
८९) त्याप्रमाणें त्या घनदाट सैन्यानें एकदम उठाव केला ( तेव्हा त्याला कोण आवरणार ? ) जसें काळकूट एकदा उसळलें म्हणजे त्याचें शमन करण्याला कोण समर्थ आहे ?
ना तरी वडवानलु सादुकला । प्रलयवातें पोखला ।
सागर शोषूनि उधवला । अंबरासी ॥ ९० ॥
९०) अथवा वडवानल ( समुद्राच्या पोटांतील अग्नी ) एकदां पेटला, तशांत प्रलयकालच्या वार्‍याने हात दिला, म्हणजे तो ज्याप्रमाणें सागराचे शोषण करुन आकाशापर्यंत भडकतो;
तैसें दळ दुर्धर । नानाव्यूहीं परिकर ।
अवगमलें भयासुर । तियें काळीं ॥ ९१ ॥
९१) त्याप्रमाणें न आटोपणारें तें सैन्य अनेक व्यूह रचून सज्ज झालेलें असल्यामुळें त्यावेळी फारच भयंकर भासलें.
तें देखिलेयां दुर्योधनें । अव्हेरिलें कवणें मानें ।
जैसें न गणिजे पंचाननें । गजघटांतें ॥ ९२ ॥
९२) ज्याप्रमाणें हत्तीच्या कळपांना सिंह मुळीच मोजीत नाही, त्याप्रमाणें तें सैन्य पाहून दुर्योधनाने त्याची मुळीच चर्चा केली नाहीं. 
मग द्रोणापासीं आला । तयातें म्हणे हा देखिला ।
कैसा दळभारु उचलला । पांडवांचा ॥ ९३ ॥
९३) नंतर दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ येऊन त्यांना म्हणाला, पांडवांचे हे सैन्य कसें उसळलें आहे पाहिलें कां ?
गिरिदुर्ग जैसे चालते । तैसे विविध व्यूह संभवते ।
हे रचिले आधि बुद्धिमंते । द्रुपदकुमरें ॥ ९४ ॥
९४) हुशार असा द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नानें सैन्याचे हे नाना प्रकारचे व्यूह सभोंवार रचले आहेत. जसे काय चालते डोंगरी किल्लेच !  
जो का तुम्हीं शिक्षापिला । विद्या देऊनि कुरुठा केला ।
तेणें हा सैन्यसिंहु पाखरिला । देखदेख ॥ ९५ ॥
९५) ज्याला तुम्ही शिकविलेत, विद्या देऊन शहाणे केलेंत त्यानें ( धृष्टद्युम्नाने ) हा सैन्यसिंह कसा उभारला ( तयार केला ) आहे, पाहा ! पाहा तर खरें. 
मूळ श्र्लोक
अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि । युयुधानो विराटश्र्च द्रुपदश्र्च महारथः ॥ ४ ॥
या सेनेमध्ये भीमार्जुनांसारखे युद्धमध्यें शूर व महाधनुर्धर योद्धे आहेत. ( त्यांची नावें सांगतो. ऐका- युयुधान (सात्यकि ), विराट, महारथी द्रुपद. ४  
आणीकही असाधारण । जे शस्रास्रीं प्रवीण ।
जे क्षात्रधर्मी निपुण । वीर आहाती ॥ ९६ ॥
९६) आणखीहि जे शस्त्रास्त्रांत प्रवीण व क्षात्रधर्मांत निपुण असे असामान्य योद्धे आहेत;
जे बळें प्रौढी पौरुषें । भीमार्जुनांसारिखे ।
ते सांगेन कौतुकें । प्रसंगेचि ॥ ९७ ॥
९७) जे शक्तीने, मोठेपणाने व पराक्रमाने भीम व अर्जुन यांच्यासारखें आहेत. त्यांची नावें प्रसंग आला आहे म्हणून कौतुकानें सांगतों.
एथ युयुधानु सुभदु । आला असे विराटु ।
महारथी श्रेष्ठु । द्रुपद वीरु ॥ ९८ ॥
९८ येथें लढवय्या सात्यकि, विराट, महारथी, श्रेष्ठ आणि शूर असा द्रुपद हे आले आहेत.
चेकितान धृष्टकेतु । काशीश्र्वरु विक्रांतु ।
उत्तमौजा नृपनाथु । शैब्य देख ॥ ९९ ॥
९९) चेकितान, धृष्टकेतु आणि वीर्यसंपन्न काशिराज, पुरुजित्, कुंतिभोज, तसाच नरवीर शैब्य;
हा कुंतिभोजु पाहें । एथ युधामन्यु आला आहे ।
आणि पुरुजितादि राय हे । सकळ देखें ॥ १०० ॥
१००) हा कुंतिभोज पाहा. येथें हा युधामन्यु आला आहे. आणखी हे पुरुजित् वगैरे इतर सर्व राजे आलेले आहेत. ते पाहा.


Custom Search

No comments: