Friday, April 10, 2020

Dnyeneshwari Adhyay 1 Part 3 ज्ञानेश्र्वरी अध्याय पहिला भाग ३

ज्ञानेश्र्वरी अध्याय पहिला भाग ३ 
Dnyeneshwari Adhyay 1 Part 3


ज्ञानेश्र्वरी अध्याय पहिला भाग ३
Dnyeneshwari Adhyay 1 Part 3

हा सुभद्राहृदयनंदनु । जो अपरु नवा अर्जुनु ।
तो अभिमन्यु म्हणे दुर्योधनु । देखें द्रोणा ॥ १०१ ॥
१०१) दुर्योधन म्हणाला, अहो द्रोणाचार्य, सुभद्रेच्या अंतःकरणाला आनंद देणारा व प्रति अर्जुनच असा तिचा मुलगा अभिमन्यु, हा पहा.
आणीकही द्रौपदीकुमर । हे सकळही महारथी वीर ।
मिती नेणिजे परी अपार । मीनले असती ॥ १०२ ॥
१०२) आणखीहि द्रौपदीचे पुत्र, हे सर्वच महारथी वीर आहेत. यांची मोजदाद करता येत नाहीं; पण असे अपरिमित महारथी वीर या ठिकाणी जमले आहेत.
आतां आमुचां दळीं नायक । जे रुढ वीर सैनिक ।
ते प्रसंगे आइक । सांगिजती ॥ १०३ ॥
१०३) आतां आमच्या सैन्यामध्ये प्रमुख प्रमुख असे जे महायोद्धे आहेत, ते प्रसंगाच्या ओघानेंच सांगतों, ऐका.
उद्देशें एक दोनी । जायिजती बोलोनी ।
तुम्हीआदिकरुनी । मुख्य जे जे ॥ १०४ ॥
१०४) तुम्ही आदिकरुन जे जे मुख्य ( वीर ) आहेत, त्यांपैकी एकदोन नावें केवळ संक्षेपानें सांगून टाकतो.
हा भीष्मु गंगानंदनु । जो प्रतापतेजस्वी भानु ।
रिपुगजपंचाननु । कर्ण वीरु ॥ १०५ ॥
१०५) प्रतापाने केवळ तेजस्वी सूर्यच असा हा गंगेचा पुत्र भीष्म आहे आणि शत्रुरुपी हत्तीला सिंहासारखा असणारा हा वीर कर्ण.
या एकेकाचेनि मनोव्यापारें । हे विश्र्व होय संहरे ।
हा कृपाचार्य न पुरे । एकलाचि ॥ १०६ ॥
१०६) या एकेकट्याच्या केवळ संकल्पाने या जगाची उत्पत्ति व संहार होऊं शकतात. फार कशाला ? हा एकटाच कृपाचार्य यांना पुरे नाहीं का ?
एथ विकर्ण वीरु आहे । हा अश्र्वथामा पैल पाहें ।
याचा अडदरु सदा वाहे । कृतांतु मनीं ॥ १०७ ॥
१०७) येथें विकर्ण वीर आहे. तो अलीकडे अश्र्वथामा पहा. याची धास्ती प्रत्यक्ष यमहि मनांत नेहमीं बाळगतो.
समितिंजयो सौमदत्ति । ऐसे आणीकहि बहुत आहाती ।
जयांचिया बळा मिती । घाताही नेणे ॥ १०८ ॥
१०८) समितिंजय आणि सोमदत्ति असे आणखीहि पुष्कळ आहेत. त्यांच्या सामर्थ्याची मर्यादा ब्रह्मदेवालाहि समजत नाही.
जे शस्त्रविद्यापारंगत । मंत्रावतार मूर्त ।
हो कां जे अस्त्रजात । एथूनि रुढ ॥ १०९ ॥
१०९) ते शस्त्रविद्येंत तरबेज आहेत, ( शस्त्रांच्या ) मंत्रविद्येचे मूर्तिमंत्र अवतार आहेत. फार काय सांगावें ? जेवढी म्हणून शस्त्रें आहेत, तेवढी सर्व यांच्यापासून रुढ झाली आहेत.
हे अप्रतिमल्ल जगीं । पुरता प्रतापु अंगीं ।
परी सर्व प्राणें मजचिलागीं । आराइले असती ॥ ११० ॥  ११०) हे या जगांत अद्वितीय योद्धे आहेत; यांच्या अंगात पुरेपुर शौर्य आहे. एवढें असूनहि हे सर्व वीर अगदी जिवावर उदार होऊन माझ्या बाजूला मिळाले आहेत.
पतिव्रतेचें हृदय जैसें । पतीवांचूनि न स्पर्शें ।
मी सर्वस्व या तैसें । सुभटांसी ॥ १११ ॥
१११) ज्याप्रमाणें पतीव्रतेचें मन पतीवांचून इतराला स्पर्श करीत नाही, त्याप्रमाणें या चांगल्या योद्ध्यांना मीच काय ते सर्वस्व आहे.
आमुचिया काजाचेनि पाडें । देखती आपुलें जीवति थोकडें ।
ऐसें निरवधि चोखडे । स्वामिभक्त ॥ ११२ ॥
११२) आमच्या कार्यापुढें यांना आपलें जीवित अगदीं तुच्छ वाटतें. असे हे निस्सीम व उत्तम स्वामीभक्त आहेत.   
झुंजती कुळकणी जाणती । कळे कीर्तीसी जिती ।
हें बहु असो क्षात्रनीती । एथोनियां ॥ ११३ ॥
११३) हे युद्धकलाकुशल असून युद्धकौशल्यानें कीर्तीस जिंकणारे आहेत. फार काय सांगावे ! क्षात्रधर्म ( मूळ ) यांच्यापासूनच ( उत्पन्न ) झाला आहे.
ऐसें सर्वांपरी पुरते । वीर दळीं आमुतें ।
आतां काय गणूं यांतें । अपार हे ॥ ११४ ॥
११४) याप्रमाणें सर्व अंगांनी पूर्ण असे वीर आमच्या सैन्यांत आहेत, आतां यांची गणती काय करुं ? हे अपार आहेत.
वरी क्षत्रियांमाजि श्रेष्ठु । जो जगजेठी जगीं सुभद्रु ।
तया दळवैपणाचा पाटु । भीष्मासी पैं ॥ ११५ ॥
११५) आणखी, क्षत्रियांमध्यें श्रेष्ठ व या जगांत नाणावलेले योद्धे असे जे भीष्माचार्य , त्यांना या सेनेच्या अधिपत्याचा अधिकार दिलेला आहे.
आतां याचेनि बळें गवसलें । हें दुर्ग जैसें पन्नासिलें ।
येणें पाडें थेंकुलें । लोकत्रय ॥ ११६ ॥
११६) आतां यांनी आपल्या सामर्थ्यानें आवरुन या सैन्याची अशी कांहीं रचना केली आहे, की जसे काय किल्लेच बांधले आहेत. याच्यापुढें त्रिभुवनहि कःपदार्थ आहे.
आधींच समुद्र पाहीं । तेथ दुवाडपण कवणा नाहीं ।
मग वडवानळु तैसेयाही । विरजा जैसा ॥ ११७ ॥
११७) आधीं असें पाहा, समुद्र हा कोणाला दुस्तर नाही ? तशांत त्याला ज्याप्रमाणें वडवानल साह्यकारी व्हावा;  
ना तरी प्रलयवह्नि महावातु । या दोघां जैसा सांघातु ।
तैसा हा गंगासुतु । सेनापति ॥ ११८ ॥
११८) किंवा प्रळयकाळचा अग्नि व प्रचंड वारा या दोहोंचा ज्याप्रमाणें मिलाप व्हावा, त्याप्रमाणें या गंगेच्या पुत्राच्या सेनापतित्वाची जोड या पराक्रमी सैन्याला मिळाली आहे.
आतां येणेंसि कवण भिडे । हें पांडव सैन्य कीर थोडें ।
ओइचलेनि पाडें । दिसत असे ॥ ११९ ॥
११९) आतां या सैन्याबरोबर कोण झगडेल ? आधी सांगितलेल्या आमच्या सैन्याच्या मानाने हें पांडवांचे सैन्य खरोखर अपुरें दिसत आहे.
वरी भीमसेन बेथु । तो जाहला असे सेनानाथु ।
ऐसें बोलोनि हे मातु । सांडिली तेणें ॥ १२० ॥ 
१२०) आणि त्यात भीमसेन ( अगोदरच ) आडदांड आणि तो त्यांच्या सैन्याचा अधिपति झाला आहे. असें बोलून त्यानें ती गोष्ट सोडून दिली.
मग पुनरपि काय बोले । सकळ सैनिकांते म्हणितलें ।
आतां दळभार आपुलाले । सरसे करा ॥ १२१ ॥
१२१) मग पुन्हा काय म्हणाला ते ( ऐका.) तो सर्व सेनापतिंना म्हणाला, आतां आपापले सैन्यसमुदाय सज्ज करा.
जया जिया अक्षौहिणी । तेणें तिया आरणी ।
वरगण कवणकवणी । महारथिया ॥ १२२ ॥
१२२) ज्यांच्या ज्या अक्षौहिणी आल्या असतील, त्यांनी त्या अक्षौहिणी युद्धभूमीवर कोणकोणत्या महारथ्याकडे विभागून द्यावयाच्या त्या द्याव्यात. 
तेणे तिया आवरिजे । भीष्मातळीं राहिजे ।
द्रोणातें म्हणे पाहिजे । तुम्हीं सकळ ॥ १२३ ॥
१२३) त्या महारथ्याने त्या अक्षौहिणीला आपल्या हुकमतीत ठेवावें आणि भीष्मांच्या आज्ञेंत राहावे. ( नंतर ) दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणाला, तुम्ही सर्वांवर देखरेख करावी.
हाचि एकु रक्षावा । मी तैसा हा देखावा ।
येणें दळभारु आघवा । साचु आमुचा ॥ १२४ ॥
१२४) या भीष्मांचे एकट्याचेच रक्षण करावें; यांना माझ्याप्रमाणेंच मानावें. यांच्या योगानेंच आमचा हा सर्व सेनाभार समर्थ आहे. ( आमच्या सर्व सेनेची मदार यांच्यावर आहे. )
या राजाचिया बोला । सेनापति संतोषला ।
मग तेणें केला । सिंहनादु ॥ १२५ ॥
१२५) ( या दुर्योधनाच्या बोलण्याने संतुष्ट होऊन  त्या दुर्योधनाला हर्ष उत्पन्न करणारा कुरुकुलांतील वृद्ध पितामह प्रतापी भीष्माचार्य सिंहनादाप्रमाणे मोठी गर्जना करुन शंख वाजविता झाला. )
राजाच्या या भाषणाने सेनापति भीष्माला संतोष झाला. मग त्यानें सिंहासारखी गर्जना केली.
तो गाजत असे अद्भुत । दोन्ही सैन्यांआंतु ।
प्रतिध्वनि न समातु । उपजत असे ॥ १२६ ॥
ती गर्जना दोन्ही सैन्यांत विलक्षण तर्‍हेने दुमदुमत राहिली.तिचा प्रतिध्वनि ( आकाशांत ) न मावतां पुनःपुन्हां उठूं लागला.
तयाचि तुलगासवें । वीरवृत्तीचेनि थावें ।
दिव्य शंख भीष्मदेवें । आस्फुरिला ॥ १२७ ॥
१२७) तो प्रतिध्वनि उठत असतांच वीरवृत्तीच्या बलानें ( स्फुरण येऊन ) भीष्मदेवानें आपला दिव्य शंख वाजविला.
ते दोन्ही नाद मिनले । तेथ त्रैलोक्य बधिरभूत जाहलें ।
जैसें आकाश कां पडिलें । तुटोनियां ॥ १२८ ॥
१२८) ते दोन्ही आवाज मिळाले, तेव्हा त्रैलोक्याच्या कानठळ्या बसल्या. त्या वेळी जणूं काय आकाशच तुटून पडतें कीं काय असें वाटलें .
धडधडीत अंबर । उचंबळत सागर ।
क्षोभलें चराचर । कांपत असे ॥ १२९ ॥
१२९) ( त्यामुळें ) आकाश धडधडलें, सागर उसळला आणि स्थावर व जंगम जग गांगरुन कापूं लागलें.
तेणें महाघोष गजरें । दुमदुमिताती गिरिकंदरें ।
तंव दलामाजि रणतुरें आस्फारिलीं ॥ १३० ॥
१३०) त्या मोठ्या आवाजाच्या नादानें डोंगरांतील दर्‍या दणाणून राहिल्या. इतक्यांत त्या सैन्यांत रणवाद्ये सुरुं झाली.
उदंड सैंध वाजलें । भयानकें खाखातें ।
महाप्रळयो जेथें । धाकडांसी ॥ १३१ ॥
१३१) नाना प्रकारचीं रणवाद्यें जिकडे तिकडे इतकीं भयंकर व कर्कश वाजूं लागलीं कीं, मी मी म्हणणारांनाहि तो महाप्रलय वाटला. 
भेरी निशाण मांदळ । शंख काहळा भोंगळ ।
आणि भयासुर रणकोल्हाळ । सुभटांचे ॥ १३२ ॥
१३२) नौबती, डंके, ढोल, शंख, मोठ्या झांजा व कर्णे, आणखी महायोद्ध्यांच्या भयंकर गर्जना ( या सर्वाची एकच गर्दी झाली. ) 
आवेशें भुजा त्राहाटिती । विसणैले हांका देती ।
जेथ महामद भद्रजाती । आवरती ना ॥ १३३ ॥
१३३) ( कित्येक योद्धे ) आवेशानें दंड ठोकूं लागले, ( कोणी ) त्वेषानें ( एकमेकांना ) युद्धार्थ हांका मारुं लागले आणि त्या ठिकाणी मदोन्मत्त हत्ती आवरतनासे झाले.
तेथ भेडांची कवण मातु । कांचया केर फिटतु ।
जेणें दचकला कृतांतु । आंग नेघे ॥ १३४ ॥
१३४) अशा स्थितींत भ्याडांची तर गोष्ट कशाला पाहिजे ? कच्चे लोक तर कस्पटाप्रमाणे उडून गेलेच, पण प्रत्यक्ष यमास धाक पडला तो पायच धरीना.  
एकां उभयांचि प्राण गेले । चांगांचे दांत बैसले ।
बिरुदांचे दादुले । हिंवताती ॥ १३५ ॥
१३५) ( त्यांपैकी ) कित्येकांचे तर उभ्या उभ्याच प्राण गेले. जे धैर्यवान होते, त्यांची दांतखिळी बसली; आणि मी मी म्हणणारे नामांकित वीर थरथर कांपू लागले.
ऐसा अद्भुत तूरबंबाळु । ऐकोनि ब्रह्मा व्याकुळु ।
देव म्हणती प्रळयकाळु । ओढवला आजी ॥ १३६ ॥
१३६) असा वाद्यांचा मोठा विलक्षण आवाज ऐकून ब्रह्मदेव व्याकुळ झाला व आज प्रळयकाळ येऊन ठेपला असे देव म्हणू लागले.
ऐसी स्वर्गी मातु । देखोनि तो आकांतु ।
तव पांडवदळांआंतु । वर्तलें कायी ॥ १३७ ॥
१३७) तो आकांत ऐकून स्वर्गांत अशी गोष्ट झाली. इतक्यांत इकडे पांडवांच्या सैन्यांत काय झाले ?
हो कां निजसार विजयाचें । कीं तें भांडार महातेजाचें ।
जेथ गरुडाचिचे जावळियेचे । कांतले चार्‍ही ॥ १३८ ॥
१३८) जो रथ विजयाचा गाभा किंवा महातेजाचें भांडारच ( होता ) ज्याला गरुडाची बरोबरी करणारे चार घोडे जुंपले होते,  
की पाखांचा मेरु जैसा । रहंवरु मिरवतसे तैसा ।
तेजें कोंदाटलिया दिशा । जयाचेनि ॥ १३९ ॥
१३९) व ज्याच्या तेजानें सर्व दिशा भरुन गेल्या होत्या असा जो दिव्य रथ तो असा शोभत होता की, जणूं काय पंख असलेला मेरु पर्वतच.
जेथ अश्र्ववाहकु आपण । वैकुंठीचा राणा जाण ।
तया रथाचे गुण । काय वर्णूं ॥ १४० ॥     
१४० लक्षांत घे, ज्या रथाचे सारथ्य करणारा प्रत्यक्ष वैकुंठाचा राजा श्रीकृष्ण आहे, त्या रथाचे गुण काय वर्णावेत ?
ध्वजस्तंभावरी वानरु । तो मूर्तिमंत शंकरु ।
सारथी शार्ङ्गधरु । अर्जुनेसीं ॥ १४१ ॥
१४१) रथावर लावलेल्या निशाणाच्या खांबावर असणारा वानर ( मारुति ) हा प्रत्यक्ष शंकरच  व शार्ङ्गधर श्रीकृष्ण हा अर्जुनाचा सारथी होता.  
देखा नवल तया प्रभूचें । प्रेम अद्भुत भक्तांचें ।
जे सारथ्य पार्थाचें । करितु असे ॥ १४२ ॥
१४२) पाहा त्या प्रभूचें नवल ! त्याचें भक्ताविषयीं प्रेम विलक्षण आहे. कारण ( तो सर्व शक्तिमान परमेश्र्वर, पण ) अर्जुनाच्या सारथ्याचेहि काम करीत होता. 
पाइकु पाठीसीं घातला । आपण पुढां राहिला ।
तेणें पांचजन्यु आस्फुरिला । अवलीळाचि ॥ १४३ ॥
१४३) आपल्या दासास पाठीशी घालून ( तो ) स्वतः युद्धाच्या तोंडावर राहिला. त्या श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा शंख लीलेनेच वाजविला.
परी तो महाघोषु थोरु । गाजत असे गंहिरु ।
जैसा उदैला लोपी दिनकरु । नक्षत्रांतें ॥ १४४ ॥
१४४) परंतु त्याचा तो भयंकर आवाज गंभीरपणानें घुमत राहिला. ज्याप्रमाणें उगवलेला सूर्य नक्षत्रांना लोपवून टाकतो.
तैसे तुरबंबाळु भंवते । कौरवदळीं गाजत होते।
ते हारपोनि नेणों केउते । गेले तेथ ॥ १४५ ॥ 
१४५) त्याचप्रमाणें कौरवांच्या सैन्यांत जिकडे तिकडे दुमदुमणारा जो वाद्यांचा कल्लोळ , तो ( त्या शंखाच्या महानादानें  ) कोणीकडे लोपून गेला, तें कांहीं कळेना.
  तैसाचि देखें येरें । निनादें अति गहिरें ।
देवदत्त धनुर्धरें । आस्फुरिला ॥ १४६ ॥
१४६) त्याचप्रमाणें पाहा, नंतर त्या अर्जुनानें अतिगंभीर आवाजानें देवदत्त नांवाचा आपला शंख वाहविला.
ते दोनी शब्द अचाट । मिनले एकवट ।
तेथ ब्रह्मकटाह शतकूट । हों पाहत असे ॥ १४७ ॥
१४७) ते दोन्ही अचाट आवाज जेव्हां एकत्र मिळाले, तेव्हां हे सर्व ब्रह्मांड शतचूर्ण होतें कीं काय, असें वाटूं लागलें.   
तंव भीमसेनु विसणैला । जैसा महाकाळु खवळला ।
तेणें पौंड्र आस्फुरिला । महाशंखु ॥ १४८ ॥
१४८) इतक्यांत खवळलेल्या कृतांताप्रमाणें आवेग चढलेल्या भीमानें आपला पौंड्र नांवाचा मोठा शंख वाजविला.   
तो महाप्रलयजलधरु । जैसा धडधडिला गंहिरु ।
तंव अनंतविजयो युधिष्ठिरु । आस्फुरित असे ॥ १४९ ॥
१४९) त्याचा आवाज कल्पान्ताच्या वेळच्या मेघगर्जनेप्रमाणें अतिगंभीर असा मोठा झाला. इतक्यांत धर्मताजानें अनंतविजय नांवाचा शंख वाजविला.
नकुळें सुघोषु । सहदेवें मणिपुष्पकु ।
जेणें नादें अंतकु । गजबजला ठाके ॥ १५० ॥
नकुलानें सुघोष आणि सहदेवानें मणिपुष्पक वाजविले. त्या आवाजानें काळहि गडबडून गेला.


Custom Search

No comments: