Thursday, April 16, 2020

ShriRamCharitManas Part 8 श्रीरामचरितमानस भाग ८


ShriRamCharitManas Part 8 श्रीरामचरितमानस भाग ८
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
सब बिधि पुरी मनोहर जानी । सकल सिद्धिप्रद मंगल खानी ॥
बिमल कथा कर कीन्ह अरंभा । सुनत नसाहिं काम मद दंभा ॥
ही अयोध्यापुरी सर्व प्रकारे मनोहर सर्व सिद्धी देणारी आणि कल्याणाची खाण आहे, असे समजून मी या निर्मल कथेचा आरंभ येथे केला. ही कथा ऐकल्यावर काम, मद आणि दंभ नष्ट होतात. ॥ ३ ॥
रामचरितमानस एहि नामा । सुवत श्रवन पाइअ बिश्रामा ॥
मन करि बिषय अनल बन जरई । होइ सुखी जौं एहिं सर परई ॥
याचे नाव रामचरितमानस असे आहे. हे कानांनी ऐकताच मनःशांती मिळते. विषयरुपी दावानलामध्ये जळत असलेला मनरुपी हत्ती जर या रामचरितमानसरुपी सरोवरात पडला, तर सुखी होईल. ॥ ४ ॥
रामचरितमानस मुनि भावन । बिरचेउ संभु सुहावन पावन ॥
त्रिबिध दोष दुख दारिद दावन । कलि कुचालि कुलि कलुष नसावन ॥
हे रामचरितमानस मुनिजनांना प्रिय आहे. या सुंदर व पवित्र अशा मानसाची रचना श्रीशिवांनी केली. तिन्ही प्रकारचे दोष, दुःख आणि दारिद्र्य, कलियुगातील दुष्ट वर्तन व सर्व पापांचा नाश करणारे हे आहे. ॥ ५ ॥
रचि महेस निज मानस राखा । पाइ सुसमउ सिवा सन भाषा ॥
तातें रामचरितमानस बर । धरेउ नाम हियँ हेरि हरषि हर ॥
श्रीमहादेवांनी हे रचून आपल्या मनात ठेवले होते आणि योग्य वेळ येताच पार्वतीला सांगितले. यामुळे शंकरांनी हे आपल्या मनात वसलेले पाहून आणि प्रसन्न होऊन याला ‘ रामचरितमानस ‘ असे सुंदर नाव ठेवले. ॥ ६ ॥
कहउँ कथा सोइ सुखद सुहाई । सादर सुनहु सुजन मन लाई ॥
मी तीच सुखदायक व सुंदर रामकथा सांगत आहे. हे सज्जनानों, आदराने मनःपूर्वक हिचे श्रवण करा. ॥ ७ ॥
दोहा—जस मानस जेहि बिधि भयउ जग प्रचार जेहि हेतु ॥
अब सोइ कहउँ प्रसंग सब सुमिरि उमा बृषकेतु ॥ ३५ ॥
हे रामचरितमानस जसे आहे तसे, ज्याप्रमाणे हे बनले आणि ज्या हेतुने जगामध्ये याचा प्रचार झाला, ती सर्व कथा आता मी उमा-महेश्र्वर यांचे स्मरण करुन सांगतो. ॥ ३५ ॥
संभु प्रसाद सुमति हियँ हुलसी । रामचरितमानस कबि तुलसी ॥
करइ मनोहर मति अनुहारी । सुजन सुचित सुनि लेहु सुधारी ॥
श्रीशिवांच्या कृपेने तुलसीदासाच्या हृदयात सुंदर बुद्धीचा विकास झाला, त्यामुळे हा तुलसीदास या रामचरितमानसाचा कवी झाला. आपल्या बुद्धीनुसार तो हे मनोहरच बनवीत आहे. तरीही हे सज्जनांनो, शुद्ध चित्ताने ऐकून हे सुधारुन घ्या. ॥ १ ॥
सुमति भूमि थल हृदय अगाधू । बेद पुरान उदधि घन साधू ॥
बरषहिं राम सुजस बर बारी । मधुर मनोहर मंगलकारी ॥
सुंदर ( सात्विक ) बुद्धी ही भूमी आहे. हृदय हे तिच्यामधील गंभीर ( महत्वाचे ) स्थान आहे. वेद-पुराणे हे समुद्र आहेत आणि साधू-संत मेघ आहेत. ते श्रीरामांच्या सुयशरुपी सुंदर, मधुर, मंगलकारी अशा जलाचा वर्षाव करतात. ॥ २ ॥
लीला सगुन जो कहहिं बखानी । सोइ स्वच्छता करइ मल हानी ॥
प्रेम भगति जो बरनि न जाई । सोइ मधुरता सुरसीतलताई ॥
सगुण लीलेचे जे विस्ताराने वर्णन केले जाते, तीच राम-सुकीर्तिरुपी जलाची निर्मलता होय. ती मलाचा नाश करते. ज्या प्रेमभक्तीचे वर्णनही करता येत नाही, ती ( भक्ती ) म्हणजे या जलाची मधुरता आणि सुंदर शीतलता होय. ॥ ३ ॥
 सो जल सुकृत सालि हित होई । राम भगत जन जीवन सोई ॥
मेधा महि गत सो जल पावन । सकिलि श्रवन मग चलेउ सुहावन ॥
भरेउ सुमानस सुथल थिराना । सुखद सीत रुचि चारु चिराना ॥
ते ( राम-कीर्तिरुपी ) जल सत्कर्मरुपी भातपिकासाठी हितकारक आहे आणि श्रीरामांच्या भक्तांचे तर जीवनच आहे. ते पवित्र जल बुद्धिरुपी पृथ्वीवर पडले आणि एकत्र होऊन सुंदर कानरुपी मार्गाने प्रवाहित झाले व मानस ( हृदय ) रुपी श्रेष्ठ स्थानामध्ये भरले जाऊन तेथे स्थिर झाले. स्थिर झाल्यावर काही कालाने सुंदर, रुचिकर, शीतल आणि सुखदायक झाले. ॥ ४-५ ॥
दोहा—सुठि सुंदर संबाद बर बिरचे बुद्धि बिचारि ॥
तेइ एहि पावन सुभग सर घाट मनोहर चारि ॥ ३६ ॥
या कथेमध्ये विचारपूर्वक जे चार अत्यंत सुंदर ( भुशुंडी-गरुड, शिव-पार्वती, याज्ञवल्क्य-भरद्वाज आणि तुलसीदास संत यांचे ) संवाद रचलेले आहेत, तेच या पवित्र व सुंदर सरोवराचे चार मनोहर घाट आहेत.
सप्त प्रबंध सुभग सोपाना । ग्यान नयन निरखत मन माना ॥
रघुपति महिमा अगुन अबाधा । बरनब सोइ बर बारि अगाधा ॥
यातील सात कांडे हीच मानस-सरोवराच्या सात सुंदर पायर्‍या आहेत.
ज्ञानरुपी नेत्रांनी त्या पाहताच मन प्रसन्न होऊन जाते. श्रीरघुनाथांच्या ( प्राकृतिक गुणांच्या पलीकडील आणि एकरस ) अशा महिम्याचे जे वर्णन केले जाईल, तेच या सुंदर जलाची अथांग खोली होय. ॥ १ ॥
राम सीय जस सलिल सुधासम । उपमा बीचि बिलास मनोरम ॥
पुरइनि सघन चारु चौपाई । जुगुति मंजु मनि सीप सुहाई ॥
श्रीराम आणि सीता यांची कीर्ती ही ( या सरोवरातील ) अमृतासारखे जल आहे. यामध्ये ज्या उपमा दिलेल्या आहेत. त्याच यातील तरंगांचा मनोहारी विलास होय. यातील सुंदर चौपाया याच यामध्ये दाट पसरलेल्या कमलिनी आहेत आणि काव्यातील युक्त्या या सुंदर मोती उत्पन्न करणारे शोभिवंत शिंपले आहेत. ॥ २ ॥
छंद सोरठ सुंदर दोहा । सोइ बहुरंग कमल कुल सोहा ॥
अरथ अनुप सुभाव सुभासा । सोइ पराग मकरंद सुबासा ॥
यामध्ये सुंदर छंद, सोरठे व दोहे आहेत, तेच यामधील रंगीबेरंगी कमळांचे सुशोभित ताटवे आहेत. अनुपम अर्थ, उच्च भाव आणि सुंदर भाषा हेच पराग, मकरंद आणि सुगंध होत. ॥ ३ ॥
सुकृत पुंज मंजुल अलि माला । ग्यान बिराग बिचार मराला ॥
धुनि अवरेब कबित गुन जाती । मीन मनोहर ते बहुभॉती ॥
पुण्याचे समूह हे भ्रमरांचे सुंदर थवे होत. ज्ञान, वैराग्य आणि विचार हे हंस होत. कवितेतील ध्वनी, वक्रोक्ती, गुण आणि जाती हेच अनेक प्रकारचे मनोहर मासे आहेत. ॥ ४ ॥
अरथ धरम कामादिक चारी । कहब ग्यान बिग्यान बिचारी ॥
नव रस जप तप जोग बिरागा । ते सब जलचर चारु तडागा ॥
धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार म्हणजे ज्ञानविज्ञानविषयक विचार सांगणे, काव्यातील नवरस, जप. तप, योग आणि वैराग्याचे प्रसंग, हे सर्व या सरोवरातील सुंदर जलचर प्राणी होत. ॥ ५ ॥
सुकृती साधु नाम गुन गाना । ते बिचित्र जलबिहग समाना ॥
संतसभा चहुँ दिसि अवँराई । श्रद्धा रितु बसंत सम गाई ॥
पुण्यात्मे साधू आणि रामनाम यांचे गुणगान हेच निरनिराळ्या जल-पक्ष्यांप्रमाणे होत. संतांचा मेळावा हाच या सरोवराच्या सभोवतालची आमराई होय आणि श्रद्धा वसंत-ऋतूप्रमाणे आहे. ॥ ६ ॥
भगति निरुपन बिबिध बिधाना । छमा दया दम लता बिताना ॥
सम जम नियम फूल फल ग्याना । हरि पद रति रस बेद बखाना ॥
नाना प्रकारे केलेले भक्तीचे निरुपण आणि क्षमा, दया व इंद्रियनिग्रह हे लता-मंडप होत. मनाचा निग्रह, यम ( अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह ), नियम ( शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्र्वरप्रणिधान ) हीच फुले आहेत, ज्ञान फल आहे आणि श्रीहरीच्या चरणीचे प्रेम हेच या ज्ञानरुपी फलाचा रस होय, असे वेदांनी सांगितले आहे. ॥ ७ ॥
औरउ कथा अनेक प्रसंगा । तेइ सुक पिक बहुबरन बिहंगा ॥
या रामचरितमानसमध्ये आणखीही ज्या अनेक कथा आहेत, त्याच यातील पोपट, कोकिळा इत्यादी रंगी-बेरंगी पक्षी होत. ॥ ८ ॥
दोहा—पुलक बाटिका बाग बन सुख सुबिहंग बिहारु ।
माली सुमन सनेह जल सींचत लोचन चारु ॥ ३७ ॥
या कथेच्या श्रवणामुळे जे रोमांच येतात, तेच वाटिका, बागा व वने होत आणि सुख प्राप्त होते, ते म्हणजे सुंदर पक्ष्यांचा विहार होय. निर्मळ मन हाच माळी होय. तो प्रेमरुपी जलाचे सुंदर नेत्रांद्वारे सिंचन करतो. ॥ ३७ ॥
जे गावहिं यह चरित सँभारे । तेइ एहि ताल चतुर रखवारे ॥
सदा सुनहिं सादर नर नारी । तेइ सुरबर मानस अधिकारी ॥
जे लोक हे चरित्र लक्षपूर्वक गातात, तेच या तलावाचे चतुर रखवाल-दार आहेत आणि जे स्री-पुरुष याचे आदराने श्रवण करतात, तेच या सुंदर मानसाचे अधिकारी असलेले श्रेष्ठ देव होत. ॥ १ ॥
अति खल जे बिषई बग कागा । एहि सर निकट न जाहिं अभागा ॥
संबुक भेक सेवार समाना । इहॉ न बिषय कथा रस नाना ॥
जे अत्यंत दुष्ट व विषयी आहेत, ते दुर्दैवी बगळे व कावळे आहेत. ते या सरोवराजवळ फिरकत नाहीत. कारण या मानस सरोवरासारख्या कथेमध्ये गोगल गायी, बेडूक आणि शेवाळे यांसारख्या विषय-रसाच्या नाना गोष्टी नाहीत. ॥ २ ॥
तेहि कारन आवत हियँ हारे । कामी काक बलाक बिचारे ॥
आवत एहिं सर अति कठिनाई । राम कृपा बिनु आइ न जाई ॥
यामुळे बिचारे कावळे आणि बगळेरुपी विषयी लोक येथे येताना मनाने खचून जातात. कारण या सरोवरापर्यंत येण्यामध्ये अडचणी खूप आहेत. श्रीरामांची कृपा झाल्याविना येथे येता येत नाही. ॥ ३ ॥
कठिन कुसंग कुपंथ कराला । तिन्ह के बचन बाघ हरि ब्याला ॥
गृह कारज नाना जंजाला । ते अति दुर्गम सैल बिसाला ॥
घोर कुसंगतीच भयानक अडचण आहे. त्या दुष्ट संगतीवाल्या लोकांची वचने हीच वाघ, सिंह आणि साप आहेत. घरचे व्यवहार आणि प्रपंचाचे उपद्व्याप हेच अत्यंत दुर्गम असे मोठ-मोठे डोंगर आहेत. ॥ ४ ॥
बन बहु बिषम मोह मद माना । नदीं कुतर्क भयंकर नाना ॥
मोह, मद आणि मान हीच बिकट अरण्ये आहेत आणि नाना प्रकारचे कुतर्क ह्याच भयानक नद्या आहेत. ॥ ५ ॥
दोहा—जे श्रद्धा संबल रहित नहिं संतन्ह कर साथ ।
तिन्ह कहुँ मानस अगम अति जिन्हहि न प्रिय रघुनाथ ॥ ३८ ॥
ज्यांच्याजवळ श्रद्धारुपी वाट-खर्च नाही, ज्यांना संतांची साथ नाही आणि ज्यांना श्रीराम प्रिय नाहीत, त्यांना हे ‘ मानस ‘ प्राप्त होणार नाही. ॥ ३८ ॥
जौं करि कष्ट जाइ पुनि कोई । जातहिं नीद जुडाई होई ॥
जडता जाड बिषम उर लागा । गएहुँ न मज्जन पाव अभागा ॥
जरी कोणी मनुष्य कष्ट सहन करीत तेथपर्यंत पोहोचला, तरी तेथे जाताच त्याला निद्रारुपी हिवताप भरतो, हृदयामध्ये मूर्खतारुपी कडाक्याची थंडी वाजू लागते. त्यामुळे तेथे जाऊनही तो अभागी स्नान करु शकत नाही. ॥ १ ॥
करि न जाइ सर मज्जन पाना । फिरि आवइ समेत अभिमाना ॥
जौं बहोरि कोउ पूछन आवा । सर निंदा करि ताहि बुझावा ॥
त्याला त्या सरोवरात स्नान करता येत नाही आणि पाणीही पिता येत नाही. तो आपल्या अभिमानासह परत येतो. नंतर जर कोणी त्याला तेथिल परिस्थिती विचारायला आला, तर तो ( आपल्या दुर्भाग्याची गोष्ट न सांगता ) सरोवराची निंदा करणार्‍या गोष्टी त्याला सांगू लागतो. ॥ २ ॥
सकल बिघ्न ब्यापहिं नहिं तेही । राम सुकृपॉ बिलोकहिं जेही ॥
सोइ सादर सर मज्जनु करई । महा घोर त्रयताप न जरई ॥
ज्यांना श्रीराम सुंदर कृपा-दृष्टीने पाहतात, त्यांना ही विघ्ने बाधत नाहीत. तोच आदराने या सरोवरात स्नान करतो आणि महाभयानक ( आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक ) तापांनी होरपळून जात नाही. ॥ ३ ॥
ते नर यह सर तजहिं न काऊ । जिन्ह कें राम चरन भल भाऊ ॥
जो नहाइ चह एहिं सर भाई । सो सतसंग करउ मन लाई ॥
ज्यांच्या मनामध्ये श्रीरामांच्या चरणी सुंदर प्रेम आहे, ते हे सरोवर कधी सोडून जात नाहीत. हे बंधो, ज्याला या सरोवरात स्नान करण्याची इच्छा आहे, त्याने मनःपूर्वक सत्संग करायला हवा. ॥ ४ ॥
अस मानस मानस चख चाही । भइ कबि बुद्धि बिमल अवगाही ॥
भयउ हृदयँ आनंद उछाहू । उपगेउ प्रेम प्रमोद प्रबाहू ॥
असे ( श्रीरामचरित ) मानस-सरोवर हृदयाच्या नेत्रांनी पाहून आणि त्यामध्ये बुडी मारुन कवीची बुद्धी निर्मळ झाली, हृदयात आनंद व उत्साह भरुन आला आणि प्रेम व आनंदाचा प्रवाह वाहू लागला. ॥ ५ ॥
चली सुभग कबिता सरिता सो । राम बिमल जस जल भरिता सो ॥
सरजू नाम सुमंगल मूला । लोक बेद मत मंजुल कूला ॥
त्या श्रीरामांच्या निर्मळ कीर्तिरुपी पाण्याने भरलेली कवितारुपी नदी प्रवाहित झाली. या ( कवितारुपी ) नदीचे नाव शरयू आहे. जी सर्व मंगलांचे मूळ आहे. या नदीला लोक-मत आणि वेद-मत असे दोन सुंदर तट आहेत. ॥ ६ ॥
नदी पुनीत सुमानस नंदिनि । कलिमल तृन तरु मूल निकंदिनि ॥
या सुंदर मानस-सरोवराची ही कन्या शरयू नदी मोठी पवित्र आहे आणि कलियुगातील पापरुपी गवताला व वृक्षांना मुळासह उखडून टाकणारी आहे. ॥ ७ ॥


Custom Search

No comments: