Shri Dnyaneshwari
तैसा कृतनिश्र्चय वायां
गेला । जैसा कोणी एकु कांजी प्याला ।
मग परिणाम पाहों लागला ।
अमृताचा ॥ १५१ ॥
१५१) तसा परमात्मा
देहधारी आहे असा त्यांचा ठाम निश्र्चय व्यर्थ गेला, ( हें कसें झालें ? ) तर ज्याप्रमाणें
कोणी एखाद्यानें भाताची पेज पिऊन मग अमृताचा परिणाम पाहावा ( त्याप्रमाणें ).
तैसें स्थूलाकारीं नाशिवंते
। भरंवसा बांधोनि चित्तें ।
पाहती मज अविनाशातें । तरी
कैंचा दिसें ॥ १५२ ॥
१५२) तसें नाशिवंत जो
स्थूल आकार तेंच माझे खरें स्वरुप, असा आपल्या मनामध्यें निश्र्चय करुन ते जर मला
अविनाशाला पाहूं जातील, तर त्यांना मी कसा दिसेन ?
काइ पश्र्चिमसमुद्राचिया
तटा । निधिजत आहे पूर्विलिया वाटा ।
कां कोंडा कांडतां सुभटा ।
कणु आतुडे ॥ १५३ ॥
१५३) अर्जुना,
पूर्वेच्या मार्गाला निघून कोणाला पश्र्चिम समुद्राच्या किनार्यावर पोहोंचतां
येईल काय ? अथवा अर्जुना, कोंडा कांडून त्यापासून दाणें प्राप्त होतील काय ?
तैसें विकारलें हें स्थूळ ।
जाणितलेया मी जाणवतसें केवळ ।
काइ फेण पितां जळ । सेविलें
होय ॥ १५४ ॥
१५४) त्याप्रमाणें
आकाराला आलेले हे शरीर, हेंच मी, असें मला जाणलें असतां माझें केवळ ( खरे ) स्वरुप
जाणलें जाईल काय ? फेस प्याल्यानें पाणी प्याल्यासारखें होईल काय ?
म्हणोनि मोहिलेनि मनोधर्में
। हेंचि मी मानूनि संभ्रमें ।
मग येथिंचीं जियें
जन्मकर्मे । तियें मजचि म्हणती ॥ १५५ ॥
१५५) म्हणून मोहित
झालेल्या मनोवृत्तीनें हें स्थूल शरीरच मी ( परमात्मा ) आहें असें मानून, मग या
देहाची जी जन्मादि कर्में, ती तें माझ्यावर लादतात.
येतुलेनि अनामा नाम । मज
अक्रियासि कर्म ।
विदेहासि देहधर्म । आरोपिती
॥ १५६ ॥
१५६) यामुळें नांव
नसलेल्या मला तें नांव देतात. वस्तुतः मी क्रियाशून्य असून मी क्रिया करतों असें
म्हणतात व देहादि मर्यादेनें रहित असलेल्या मला जन्ममरणादिक जे देहधर्म, त्यांचा
संबंध लावतात.
मज आकारशून्या आकारु ।
निरुपाधिका उपचारु ।
मज विधिविवर्जिता व्यवहारु
। आचारादिक ॥ १५७ ॥
१५७) जो मी निराकार
आहे, त्या मला आकार आहे असें मानतात व देहरहित जो मी त्या मला पूजेचे उपचार अर्पण
करतात. शास्त्रमर्यादेचे बंधन नसलेल्या मला आचारादिक व्यवहार लावतात.
मज वर्णहीना वर्णु ।
गुणातीतासि गुणु ।
मज अचरणा चरणु । अपाणिया
पाणी ॥ १५८ ॥
१५८) जातीच्या पलीकडे
असणार्या मला एका विशिष्ट जातीचा समजतात; निर्गुणाला सगुण समजतात, पाय नसतांना
माझ्या ठिकाणीं पायांची कल्पना करतात व त्याचप्रमाणें हातांच्या कल्पनेस माझ्या
ठिकाणीं जागा नसूनहि, हात वा अवयवांची कल्पना करतात.
मज अमेया मान । सर्वगतासी
स्थान ।
जैसें सेजेमाजी वन । निदेला
देखे ॥ १५९ ॥
१५९) मोजतां न
येण्याइतकें माझें स्वरुप अमर्याद आहे; परंतु मलाहि मर्यादेंत घालतात. मी खरोखर
सर्व ठिकाणीं असूनहि मला एखादें ठिकाण कल्पितात. ज्याप्रमाणें आपल्या अंथरुणावर
निजलेला मनुष्य स्वप्नात अरण्य पाहतो ,
तैसें अश्रवणा श्रोत्र । मज
अचक्षूसी नेत्र ।
अगोत्रा गोत्र । अरुपा रुप
॥ १६० ॥
त्याप्रमाणें कान वगैरेचा
संबंध माझ्या ठिकाणी नसतांना कानांची कल्पना करतात. डोळ्यांचा संबंध माझ्या
ठिकाणीं नसतांनाहि डोळे कल्पितात व कोणत्याहि नात्याचा संबंध नसतांना नातेवाईकांची
कल्पना करतात. मी काळागोरे वगैरे नसतांनाहि तसल्या रुपाची माझ्या ठिकाणी कल्पना
करतात.
मज अव्यक्तासि व्यक्ती ।
अनार्तासी आर्ती ।
स्वयंतृप्ता तृप्ती । भाविती गा ॥ १६१ ॥
मी जो अदृश्य, त्या मला दृश्य असें समजतात; मी जो
इच्छारहित, त्या मला इच्छा आहे असें मानतात; मी जो स्वतःसिद्ध तृप्त, त्या मला
तृप्ति कल्पितात.
मज अनावरणा प्रावरण । भूषणातीतासि भूषण ।
मज सफळकारणा कारण । देखती ते ॥ १६२ ॥
१६२) मी वस्त्रांत गुंडाळतां येण्यासारखा नसून, मला वस्त्र
नेसवितात; शृंगाराच्या पलीकडे असतांना माझ्याकरितां दागिन्यांची योजना करतात. सर्व
जगाला मी उत्पन्न करणारा असून, मलाहि उत्पन्न करण्याची कल्पना ते करतात.
मज सहजातें करिती । स्वयंभातें प्रतिष्ठिती ।
निरंतरातें आव्हानिती । विसर्जिती गा ॥ १६३ ॥
१६३) नित्य असणारा जो मी, त्या मला ( मूर्तिवगैरेंच्या
द्वारें ) घडवितात. मी जो नित्यसिद्ध, त्या माझी प्राणप्रतिष्ठा करतात. अर्जुना,
सर्वांच्या आत्मत्वानें अखंड दंडायमान असणारा जो मी, त्या मला आवाहन करतात आणि
माझें विसर्जन करतात.
मी सर्वदा स्वतःसिद्धु । तो कीं बाळ तरुण वृद्धु ।
मज एकरुपा संबंधु । जाणती ऐसें ॥ १६४ ॥
१६४) मी जो सर्वदा स्वतःसिद्ध आणि एकरुप आहें, त्या मला
बाल्य, तारुण्य व वृद्धावस्थां यांचा संबंध आहे, असें समजतात.
मज अद्वैतासि दुजें । मज अकर्तयासि काजें ।
मी अभोक्ता कीं भुंजें । ऐसे म्हणती ॥ १६५ ॥
१६५) माझी अद्वैत स्थिति असतांना, माझ्या मागें द्वैत
लावतात व मी कर्मरहित असून कर्में करतों, असें मानतात; आणि मी जो अभोक्ता, तो मी भोग
भोगतो, असें मानतात.
मज अकुळाचें कुळ वानिती । मज नित्याचेनि निधनें शिणती ।
मज सर्वांतरानें कल्पिती । अरि मित्र गा ॥ १६६ ॥
१६६) माझें कुळरहिताचें कुळ वर्णन करतात. मी जो नित्य, त्या
माझ्या मरणानें दुःखी होतात व अर्जुना, मी जो सर्वांच्या अंतर्यामीं असणारा त्या
मला शत्रुमित्र आहेत, असें मानतात.
मी स्वानंदाभिरामु । तया मज अनेकां सुखांचा कामु ।
आघवाचि मी असें समु । कीं म्हणती एकदेशी ॥ १६७ ॥
१६७) स्वकीय आनंदांत रममाण असणारा जो मी, त्या मला अनेक
सुखांची इच्छा आहे, असे म्हणतात. मी सगळीकडे सारखा व्यापलेला असून मी एका ठिकाणीं
आहें, दुसर्या ठिकाणीं नाहीं, असें म्हणतात.
मी आत्मा एक चराचरीं । म्हणती एकाचा कैंपक्ष करीं ।
आणि कोपोनि एकातें मारी । हेंचि वाढविती ॥ १६८ ॥
१६८) मी स्थावरजंगमांचा एकच असा आत्मा असतां मी एकाचा कैवार
घेतों, असें म्हणतात, आणि रागावून एकाला मारतों, हेंच जगांत प्रसिद्ध करतात.
किंबहुना ऐसे समस्त । जे हे मनुष्यधर्म प्राकृत ।
तयाचि नांव मी ऐसें विपरीत । ज्ञान तयांचें ॥ १६९ ॥
१६९) फार काय सांगावें ? असे हे जे मनुष्याचे सामान्य धर्म
तेच सर्व माझ्या ठिकाणी आहेत, असें त्या
अज्ञानी लोकांचे विपरीत ज्ञान असतें.
जंव आकारु एक पुढां देखती । तंव हा देव येणें भावें भजती ।
मग तोचि विघडलिया टाकिती । नाहीं म्हणोनि ॥ १७० ॥
१७०) जेव्हां एखादी मूर्ति आपल्यापुढे पाहतात, त्या वेळेला
त्या मूर्ति एवढाच देव आहे, अशा समजुतीनें भक्ति करतात; आणि मग तीच मूर्ति भंगली,
म्हणजे आतां देव नाहींसा झाला, असे समजून पूजा करण्याचें थांबतात.
मातें येणें येणें प्रकारें । जाणती मनुष्य ऐसेनि आकारें ।
म्हणऊनि ज्ञानचि तें आंधारें । ज्ञानासि करी ॥ १७१ ॥
१७१) अशा या प्रकारांनी आकारावरुन इतर देहधार्यांसारखाच मी
एक मनुष्य आहें, असें समजतात. म्हणून त्यांचें तें विपरीत ज्ञान माझ्या शुद्ध
स्वरुपाच्या यथार्थ ज्ञानास टाकतें.
मूळ श्लोक
मोघाशा मोघकर्माणो
मोघज्ञाना विचेतसः ।
राक्षसीमासुरीं चैव
प्रकितिं मोहिनीं श्रिताः ॥ १२ ॥
१२) त्यांच्या इच्छा निष्फळ
आहेत, त्यांची कर्में निष्फळ आहेत, त्याचें ज्ञान निष्फळ आहे. ( कारण ) ते
विवेकशून्य लोक राक्षसी आणि आसुरी अशा मोहमय प्रकृतीवर अवलंबून राहतात.
यालागीं जन्मलेचि ते मोघ ।
जैसे वार्षियेवीण मेघ ।
कां मृगजळाचे तरंग ।
दुरुनीचि पाहावे ॥ १७२ ॥
१७२) म्हणून त्यांचें
जन्माला येणेंच फुकट आहे. ज्याप्रमाणें पावसाळ्यावांचून आलेले ढग किंवा मृगजळांत
दिसणार्या लाटा ह्या गोष्टी दुरुनच दिसण्यात बर्या असतात;
अथवा कोल्हेरीचे असिवार ।
नातरी वोडंबरीचे अळंकार ।
कीं गंधर्वनगरीचे आवार ।
आभासती कां ॥ १७३ ॥
१७३) अथवा मातीचे घोडेस्वार
किंवा गारुडी विद्येनें केलेले दागिने किंवा आकाशांत ह्यांच्या आकृतीमुळें दिसणार्या
गावांचें गांवकूस, हीं ज्याप्रमाणें दिसतात मात्र, पण वास्तविक मिथ्या असतात;
सांवरी वाढिन्नल्या सरळा ।
वरी फळ ना आंतु पोकळा ।
कां स्तन आले गळां । शेळिये
जैसे ॥ १७४ ॥
१७४) सरळ वाढलेल्या कांड्यानिवडुंगाला वर फळ नसतें
व आंत गाभाहि नसतो ( पोकळ असतो ); किंवा शेळीचे गलोल व्यर्थ असतात;
तैसें मूर्खांचें तयां
जियालें । आणि धिक् कर्म तयांचें निपजलें ।
जैसें सांबरी फळ आलें ।
घेपे ना दीजे ॥ १७५ ॥
१७५) त्याप्रमाणें त्या
अविचारी लोकांचें व्यर्थ आहे.
ज्याप्रमाणें सांबरीला आलेले फळ देवघेवीच्या उपयोगाचे नसतें, ( त्याप्रमाणें
त्यांचे कर्म व्यर्थ असतें ) म्हणून त्यांच्या हातून घडलेल्या कर्माला धिक्कार
असो.
मग जें कांहीं ते पढिन्नले
। तें मर्कटें नारळ तोडिलें ।
कां आंधळ्या हातीं पडिलें ।
मोती जैसें ॥ १७६ ॥
१७६) मग ते अज्ञानी जें
कांहीं शिकलेले असतात तें त्यांस, माकडानें नारळ तोडल्यासारखें अथवा आंधळ्याच्या
हातांत मोती पडल्यासारखें ( निरुपयोगी आहे. ).
किबहुना तयांचीं शास्त्रें
। जैशीं कुमारीहातीं दिधलीं शस्त्रें ।
कां अशोच्या मंत्रें । बीजें
कथिली ॥ १७७ ॥
१७७) फार काय सांगावें
? त्यांची जेवढी म्हणून शास्त्रें आहेत, तेवढी जशी का लहान मुलींच्या हातांत
दिलेली शस्त्रें अथवा अशुद्ध मनुष्यांस सांगितलेले बीजमंत्र ( त्याप्रमाणें
निरर्थक असतात ).
तैसें ज्ञानजात तया । आणि
जें कांहीं आचरलें गा धनंजया ।
तें आघवेंचि गेलें वायां ।
जे चित्तहीन ॥ १७८ ॥
१७८) त्याप्रमाणें
अर्जुना, त्याचें संपूर्ण ज्ञान व जें कांही आचरण केलें असेल, ते संपूर्ण व्यर्थ
जातें. कारण कीं, त्यांचें चित्त स्थिर नसतें.
पैं तमोगुणाची राक्षसी । जे
सद्बुद्धीतें ग्रासी ।
विवेकाचा टावोचि पुसी ।
निशाचरी ॥ १७९ ॥
१७९) सद्बुद्धीला गिळून
टाकणारी व विचाराचा ठावठिकाणा नाहींसा करणारी व ( अज्ञानरुपी ) रात्रींत संचार
करणारी जी तमोगुणरुपी राक्षसी,
तिये प्रकृती वरपडे जाले ।
म्हणऊनि चिंतेचेनि कपोलें गेलें ।
वरि तामसीयेचिये पडिले ।
मुखामाजीं ॥ १८० ॥
१८०) त्या आसुरी
प्रकृतीच्या आधीन झाले, म्हणून ते चिंतारुपी गालाच्या द्वारें आणखी त्या तामसी
राक्षसीच्या मुखात पडले गेले.
जेथ आशेचिये लाळे । आंतु
हिंसा जीभ लोळे ।
तेवींचि संतोषाचे चाकळे ।
अखंड चघळी ॥ १८१ ॥
१८१) जिच्या मुखांत
आशेच्या लाळेमध्ये हिंसारुपी जीभ लोळते, त्याप्रमाणें जी राक्षसी संतोषरुपी चघळ
नेहमीं चघळीत असते; ( म्हणजे संतोष नेहमी नाहींसा करते; )
जे अनर्थाचे कानवेरी । आवाळुवें
चाटीत निघे बाहेरी ।
जे प्रमादपर्वतींची दरी ।
सदाचि मातली ॥ १८२ ॥
१८२) जी राक्षसी अनर्थाच्या
कानापर्यंत ओठांचे कांठ चाटीत बाहेर निघते व जी राक्षसी नेहमींच प्रमादरुपी
पर्वताची माजलेली ( भयप्रद ) दरी आहे;
जेथ द्वेषाचिया दाढा । खसखसां ज्ञानाचा करिती रगडा ।
जे अगस्तीगवसणी मूढां । स्थूलबुद्धी ॥ १८३ ॥
१८३) जिच्या तोंडामध्यें द्वेषरुपी दाढा ज्ञानाचा खसखसा
चुराडा करीत आहेत व जी अगस्ती ऋषींस आवरण असलेल्या कुंभाप्रमाणें स्थूल बुद्धीच्या
मूर्खांना आवरण करणारी आहे;
ऐसें आसुरिये प्रकृतीचां तोंडी । जे जाले गा भूतोंडीं ।
ते बुडोनि गेले कुंडीं । व्यामोहाचां ॥ १८४ ॥
१८४) अशा आसुरी प्रकृतीच्या तोंडांत, जें भूताला टाकलेल्या
बळीप्रमाणें पडले, ते भ्रांतीच्या कुंडांत बुडून गेले.
एवं तमाचिये पडिले गर्ते । न पविजतीचि विचाराचेनि हातें ।
हें असो ते गेले जेथें । ते शुद्धीचि नाहीं ॥ १८५ ॥
१८५) याप्रमाणें तमोगुणाच्य खळग्यांत पडले; ते विचाराच्या
हाताला लागत नाहीत. हें असो ! ते अशा ठिकाणाला गेले कीं जेथें त्यांचा पत्ताच लागत
नाही;
म्हणोनि असोतु इयें वायाणीं । कायशीं मूर्खांचीं बोलणीं ।
वायां वाढवितां वाणी । शिगेल हन ॥ १८६ ॥
१८६) म्हणून हें निष्फळ वर्णन राहूं दे मूर्ख लोकांची कथा
कशाला ? तिच्या विस्तारानें वाचेला व्यर्थ शीण मात्र होणार आहे.
ऐसें बोलिलें देवें । तेथ जी म्हणितलें पांडवें ।
आइकें जेथ वाचा विसवे । ते साधुकथा ॥ १८७ ॥
१८७) श्रीकृष्ण याप्रमाणें म्हणाले, त्या प्रसंगी अर्जुन
म्हणाला, होय महाराज ! ( तेव्हां श्रीकृष्ण म्हणाले, ) ज्या
साधूंच्या वर्णनांत वाणीला विश्रांति मिळते, ती साधूकथा
ऐक.

No comments:
Post a Comment