Shri Dnyaneshwari
जयांचे वाचेपुढां भोजे ।
नाम नाचत असे माझें ।
जें जन्मसहस्रीं वोळगिजे ।
एक वेळ मुखासि यावया ॥ २०६ ॥
२०६) जें माझें नाम एक वेळ मुखांत यावयास हजारों
जन्म सेवा करावी लागते, तें माझें नाम ज्यांच्या वाचेपुढे मोठ्या प्रेमाने नाचत
असतें;
तो मी वैकुंठीं नसे । एक
वेळ भानुबिंबीही न दिसें ।
वरी योगियांचींही मानसें ।
उमरडोनी जाय ॥ २०७ ॥
२०७) तो मी एक वेळ
वैकुंठांत नसतों; एक वेळ सूर्यबिंबांतहि असत नाही; याशिवाय मी एक वेळ योग्यांची
हृदयेंदेंखील उल्लंघन करुन जातो;
परी तयांपाशीं पांडवा । मी
हारपला गिंवसावा ।
जेथ नामघोषु बरवा । करिती
ते माझे ॥ २०८ ॥
२०८) परंतु अशा रीतीनें
मी जरी हरवलों असलों तरी पण माझें भक्त जेथें माझा नामघोष चांगला करतात,
त्यांजपाशीं अर्जुना, मला शोधावा, ( मी तेथें सांपडवयाचाच. )
कैसे माझां गुणीं धाले ।
देशकाळाते विसरले ।
कीर्तनसुखें झाले ।
आपणपांचि ॥ २०९ ॥
२०९) ते महात्मे माझे
गुण गाण्यांत असे तृप्त झालें आहेत कीं, त्या योगानें त्यास आपण कोठें आहोंत व
आपला काल भजनांत किती गेला, याची खबरच नसते. ते कीर्तनाच्या सुखानें आपल्या
ठिकाणींच आपलें स्वरुप होऊन राहिले आहेत.
कृष्ण विष्णु हरि गोविंद ।
या नामाचे निखळ प्रबंध ।
माजी आत्मचर्चा विशद । उदंड
गाती ॥ २१० ॥
२१०) ते महात्मे कृष्ण,
विष्णु, हरि, गोविंद यां नामांचेंच केवळ कथन करतात व मधून मधून स्पष्ट रीतीनें
पुष्कळ आत्मचर्चा करतात.
हें बहु असो यापरी ।
कीर्तित माते अवधारीं ।
एक विचरती चराचरीं ।
पांडुकुमरा ॥ २११ ॥
२११) आतां हें फार
वर्णन करणें राहूं दे. अर्जुना, ऐक याप्रमाणें माझे किती एक भक्त माझी कथा करीत
करीत चराचरांमध्यें संचार करीत असतात.
मग आणिक ते अर्जुना ।
साविया बहुवा जतना ।
पंचप्राणा मना । पाढाऊ
घेऊनी ॥ २१२ ॥
२१२) अर्जुना, मग किती
एक जे आहेत, त्यांनीं सहजच मोठ्या तत्परतेनें पांच प्राण व मन हें वाटाडे बरोबर
घेऊन,
बाहेरी यमनियमांची कांटी
लाविली । आंतु वज्रासनाची पौळी पन्नासिली ।
वरी प्राणायामांचीं
मांडिलीं । याहातीं ॥ २१३ ॥
२१३) बाहेरच्या बाजूला
यमनियमांचें कांटेरी कुंपणाच्या आंत मूळबंधाचा कोट तयार केला व त्या कोटावर
प्राणायामरुपी चालूं असलेल्या तोफा ठेविल्या.
तेथ उल्हाटशक्तीचेनि
उजिवडें । मनपवनाचेनि सुरवाडें ।
सतरावियेचे पाणियाडें ।
बळियाविलें ॥ २१४ ॥
२१४) तेथें कुंडलिनीच्या
प्रकाशानें व मन आणि प्राणवायू यांच्या मदतीनें सतरावी जी जीवनकला हेंच कोणी एक
तळें, ( त्यांनी ) बळकवलें,
तेव्हां प्रत्याहारें
ख्याति केली । विकारांची संपिली बोहली ।
इंद्रियें बांधोनि आणिलीं ।
हृदयाआंतु ॥ २१५ ॥
२१५) त्या वेळीं
प्रत्यहाराने मोठा पराक्रम केला. ( तो असा कीं, ) त्यामुळें विकारांची भाषा संपली;
( व त्यानें ) इंद्रियांना हृदयाच्या आंत बांधून आणलें .
तंव धारणावारु दाटिले ।
महाभूतांतें एकवटिलें ।
मग चतुरंग सैन्य निवटिलें ।
संकल्पाचें ॥ २१६ ॥
२१६) तों इतक्यांत
धारणारुपी घोड्यांनी गर्दी केली, ( व त्यांच्या बळानें ) योगी साधकांनी पृथ्वी
वगैरे महाभूतांना एकत्र केलें व नंतर त्यांनी संकल्पांचें चतुरंग सैन्य ( मन,
बुद्धि, चित्त, अहंकार ) ठार केलें.
तयावरी जैत रे जैत ।
म्हणोनि ध्यानाचें निशाण वाजत ।
दिसे तन्मयाचें झळकत ।
एकछत्र ॥ २१७ ॥
२१७) त्यानंतर, ‘ जय
झाला रे झाला ‘ म्हणून ध्यानाची नौबद वाजू लागली व स्वरुपऐक्याचें एक छत्र (
एकसत्ता ) चमकत असलेलें दिसलें,
पाठीं समाधीश्रियेचा अशेखा
। आत्मानुभवराज्यसुखा ।
पट्टाभिषेकु देखां । समरसें
जाहला ॥ २१८ ॥
२१८) नंतर समाधिरुपी
लक्ष्मीचें जें आत्मानुभवरुपी संपूर्ण राज्यसुख, त्यांना समरसतेनें त्यांस
राज्यभिषेक झाला. पाहा.
ऐसें हें गहन । अरजुना
माझें भजन ।
आतां ऐकें सांगेन । जे
करिती एक ॥ २१९ ॥
२१९) अर्जुना,
याप्रमाणें हे माझें ( अष्टांगयोगद्वारां होणारें ) भजन फार कठीण आहे; आतां किती
एक मला दुसर्या प्रकारानें ( नमनरुप भक्तीनें ) भजतात. तो प्रकार सांगतों; ऐक.
तरी दोन्हीं पाचववेरी ।
जैसा एक तंतू अंबरीं ।
तैसा मेवांचूनी चराचरीं ।
जाणती ना ॥ २२० ॥
२२०) तर वस्त्रामध्यें
ज्याप्रमाणें एका पदरापासून दुसर्या पदरापर्यंत एक सूतच असतें, त्याप्रमाणें सजीव
व निर्जीव पदार्थांत माझ्यावाचून दुसर्यास ते ओळखत नाहींत.
आदि ब्रह्मा करुनी । शेवटीं
मशक धरुनी ।
माजी समस्त हें जाणोनी ।
स्वरुप माझें ॥ २२१ ॥
२२१) ब्रह्मदेवापासून
आरंभ करुन, अखेर चिलटापर्यंत, मध्यें जे काहीं आहे ते सर्व माझें स्वरुप आहे, हे
जाणून,
मग वाड धाकुटें न म्हणती ।
सजीव निर्जीव नेणती ।
देखिलिये वस्तू उजू लुंटिती
। मीचि म्हणोनि ॥ २२२ ॥
२२२) मग मोठा, लहान
याचा विचार न करतां, किंवा सजीव व निर्जीव हा भेद न करतां, जो पदार्थ दृष्टीपुढे
येईल, त्यास मीच ( परमात्मा ) समजून ते सरळ लोटांगण घालतात.
आपुलें उत्तमत्व नाठवे ।
पुढील योग्यायोग्य नेणवे ।
एकसरें व्यक्तिमात्राचेनि
नांवें । नमूंचि आवडे ॥ २२३ ॥
२२३) त्यास आपल्या
श्रेष्ठपणाची आठवण नसते व समोर असलेले योग्य आहे किंवा अयोग्य आहे, हें कांहीं न
जाणतां वस्तुमात्राला उद्देशून सरसकट नमस्कार करणेंच त्यांना आवडते.
जैसें उंचीं उदक पडिलें ।
तें तळवटवरी ये उगेलें ।
तैसें नमिजे भूतजात देखिलें
। ऐसा स्वभावोचि तयांचा ॥ २२४ ॥
२२४) उमचावरुन पडलेलें
पाणी जसें सखल जागेकडेआपोआप जाऊं लागतें, त्याचप्रमाणे समोर दिसलेल्या
प्राणिमात्रांस नमस्कार करण्याचाच त्यांचा स्वभाव असतो.
कां फळलिया तरुची शाखा ।
सहजें भूमीसी उतरे देखा ।
तैसें जीवमात्रां अशेखां ।
खालवती ते ॥ २२५ ॥
२२५) अथवा पाहा की,
फळभारानें लगडलेल्या झाडाची फांदी जशी सहजच जमिनीकडे लवते, त्याप्रमाणें सर्व
प्राणीमात्रांपुढें ते नम्रपणाने लवतात;
अखंड अगर्वता होऊनि असती ।
तयांतें विनयो हेचि संपत्ती ।
जे जयजयमंत्रे अर्पिती ।
माझांचि ठायीं ॥ २२६ ॥
२२६) ते नेहमीं
निरभिमान होऊन राहिलेले असतात; व नम्रपणा ही त्यांची संपत्ति असते. ती संपत्ति ते
‘ जय जय ‘ मंत्रानें माझ्याच ठिकाणी अर्पण करतात.
नमितां मानाभिमान गळाले ।
म्हणोनि अवचितें ते मीचि जहाले ।
ऐसे निरंतर मिसळले ।
उपासिती ॥ २२७ ॥
२२७) नमस्कार करीत
असतांना मान व अभिमान हे नाहीसे झाले, म्हणून ते सहजगत्या मद्रूप झाले. याप्रमाणें
माझ्या स्वरुपांत मिसळून ते माझी निरंतर उपसना करतात.
अर्जुना हे गुरुची भक्ती ।
सांगितली तुहप्रती ।
आतां ज्ञानयज्ञें यजिती ।
ते भक्त आइकें ॥ २२८ ॥
२२८) अर्जुना, तुला ही
श्रेष्ठ प्रतीची भक्ति सांगितली. आतां ज्ञानरुप यज्ञानें जें माझी आराधना करतात.
त्या भक्तांचा प्रकार ऐक.
परि भजन करिती हातवटी । तूं
जाणत आहासि किरीटी ।
जै मागां इया गोष्टी ।
केलिया आम्हीं ॥ २२९ ॥
२२९) परंतु ( ही ) भजन
करण्याची रीति, अर्जुना, तुला माहीत आहेच. कारण आम्ही या गोष्टी मागें ( अध्याय ४
था श्लोक ३३-४२ ) तुला सांगितल्या आहेत.
तंव आथि जी अर्जुन म्हणे । तें
दैविकिया प्रसादाचें करणें ।
तरि काय अमृताचें आरोगणें ।
पुरे म्हणवे ॥ २३० ॥
२३०) तेव्हां अर्जुन
म्हणाला, होय महाराज, मी जाणत आहें व देवाच्या प्रसादाचें कार्य आहे. म्हणून
अमृताचे भोजन मिळाल्यावर, ‘ पुरें, आतां नको, ‘ असें म्हणवेल काय ;
या बोला अनंते । लागटा
देखिलें तयातें ।
कीं सुखावलेनि चित्तें ।
डोलतु असे ॥ २३१ ॥
२३१) अर्जुनाच्या वरील
बोलण्यारुन, तो हें जाणण्याविषयीं उत्सुख आहे असें पाहून, लागलीच अंतःकरणांत संतोष
झाल्यामुळे, श्रीकृष्ण डोलावयास लागले.
म्हणे भलें केलें पार्था ।
एर्हवीं हा अनवसरु सर्वथा ।
परि बोलवीतसे आस्था । तुझी
मातें ॥ २३२ ॥
२३२) श्रीकृष्ण म्हणाले,
अर्जुना, फार चांगलें केलेंस, नाहीं तर ( मागें एकवार सांगितलें असल्यामुळें ) हा
मुळींच बोलण्याचा प्रसंग नव्हता; परंतु तुझी कळकळ मला बोलण्यास भाग पाडते.
तंव अर्जुन म्हणे हें कायी
। चकोरेंवीण चांदिणेंचि नाहीं ।
जग निवविजे हा तयांचा ठायीं । स्वभावो कीं जी ॥ २३३ ॥
२३३) तेव्हां अर्जुन म्हणाला, असें काय म्हणता ? चकोर पक्षी
असला तरच चंद्र उगवतो, एर्हवी उगवत नाही काय ? महाराज जगाला शांत करावें, हा
त्याच्या ( चंद्राच्या ) ठिकाणी स्वभावच आहे.
येरें चकोरें तियें आपुलिये चाडे । चांचू करिती चंद्राकडे ।
तेविं आम्ही विनवूं तें थोकडें । देवो कृपासिंधु ॥ २३४ ॥
२३४) आतां हे चकोर आहेत, ते केवळ आपलीच शांतता व्हावी, या
इच्छेनें चंद्राकडे चोच करतात; त्याप्रमाणें आमची विनंती ती किती थोडी आहे ! पण
देवा, आपण कृपासिंधु आहांत.
जी मेघ आपुलिये प्रौढी । जगाची आर्ति दवडी ।
वांचूनि चातकाची ताहान केवढी । तो वर्षावो पाहुनी ॥ २३५ ॥
२३५) महाराज, मेघ हा आपल्या उदारपणाच्या वर्षावानें संपूर्ण जगाची पीडा घावितो. वास्तविक पाहिलें तर, त्या पावसाच्या दृष्टीच्या मानानें चातकांची तहान ती केवढी ?
No comments:
Post a Comment