Wednesday, March 16, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 2 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग २

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 11 Part 2 
Ovya 31 to 60 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ११ भाग २ 
ओव्या ३१ ते ६०

म्हणे मागां कवणीं कहीं । जें पढियंतेनि पुसिलें नाहीं ।

सहसा कैसें काइ । सांगा म्हणों ॥ ३१ ॥

३१) अर्जुन म्हणतो, पूर्वी कोणीहि केव्हांच जें अत्यंत प्रिय

 असणार्‍यानेहि विचारलें नाही तें एकाएकी सांगा, म्हणून

 कसें काय म्हणावें ?   

मी जरी सलगीचा चांगु । तरी काय आइसीहुनी अंतरंगु ।

परि तेही हा प्रसंगु । बिहाली पुसों ॥ ३२ ॥

३२) मी जरी चांगला दाट परिचयाचा असलों, तरी लक्ष्मीमातेपेक्षां जवळचा आहे का ? परंतु ती इतक्या जवळचा असून देखील हा विषय विचारावयास भ्याली.

माझी आवडे तैसी सेवा जाहली । तरी काय होईल गरुडाचिया येतुली ।

परी तोही हे बोली । करीचिना ॥ ३३ ॥

३३) माझी वाटेल तितकी जरी सेवा झाली असली, तरी ती गरुडाच्या सेवेच्या बरोबरीला येइल काय ? परंतु एवढी निकट सेवा केलेला जो गरुड तो देखील ह्या संबधीची गोष्ट काढीतच नाही. 

मी काय सनकादिकांहूनि जवळां । परि तयाही नागवेचि हा चाळा ।

मी आवडेन काय प्रेमळां । गोकुळींचिया ऐसा ॥ ३४ ॥

३४) मी सनकादिकापेक्षां जास्त जवळचा आहे काय ? परंतु त्यांना देखील ही उठाठेव करतां आली नाहीं, मी गोकुळामधील प्रेमळ गोपगोपी इतका प्रिय आहे काय ? 

तयातेंही लेकुरपणें झकविलें । एकाचे गर्भवासही साहिले ।

परि विश्र्वरुप हें राहविलें । न दावीच कवणा ॥ ३५ ॥

३५) त्या गोकुळाच्या भाविक लोकांनासुद्धा, आपण केवळ मूल आहोंत असें दाखवून फसविलें, एकाकरितां ( अंबरिष राजाकरितां ) दहा गर्भवास देखील सोसले; परंतु विश्वरुप हें गुप्त राखून ठेवले. तें कोणाला दाखविलें नाही.  

हा ठायवरी गुज । याचिये अंतरींचें हें निज ।

केवीं उराउरी मज । पुसों ये पां ॥ ३६ ॥

३६) इतकी ही गुह्य गोष्ट, याच्या अंतर्यामांतील खास गोष्ट आहे, तेव्हां ती मला एकदम कशी विचारतां येईल ?

आणि न पुसोंचि जरी म्हणें । तरी विश्र्वरुप देखिलियाविणें ।

सुख नोहेचि परि जिणें । तेंही विपायें ॥ ३७ ॥

३७) बरें, पुसूं नये असें जर म्हटलें तर ते विश्वरुप पाहिल्यावांचून सुख तर होणार नाहींच, परंतु जगणें तें देखील क्वचितच संभवणार आहे. 

म्हणोनि आतां पुसों अळुमाळसें । मग करुं देवा ठाके तैसें ।

येणें प्रवर्तला साध्वसें । पार्थु बोलों ॥ ३८ ॥

३८) तर आतां थोडेसें विचारुं या; मग देवाची ज्याप्रमाणें मर्जी असेल तसें करुं, अशा रीतीनें अर्जुन भीत भीत बोलावयास लागला.

परी तेंचि ऐसेनि भावें । जें एका दों उत्तरांसवें ।

दावी विश्र्वरुप आघवें । झाडा देउनि ॥ ३९ ॥

३९) परंतु तेंच त्याचें बोलणें अशा खुबीचें होतें कीं, एक-दोन शब्दां बरोबरच देव झाडा देऊन सर्व विश्वरुप दाखवील.

अहो वांसरु देखिलियाचि साठीं । धेनु खडबडोनि मोहें उठी ।

मग स्तनामुखाचिये भेटी । काय पान्हा न ये ॥ ४० ॥

४०) अहो, वांसरु पाहिलें कीं लागलीच प्रेमानें गाय खडबडून उभी राहते; मग प्रत्यक्ष तिच्या स्तनाची व त्याच्या मुखाची गांठ पडल्यावर तिला पान्हा येणार नाही काय ? 

पाहा पां तयां पांडवाचेनि नांवें । जो कृष्ण रानींही प्रतिपाळूं धांवे ।

तयांतें अर्जुनें जंव पुसावें । तंव साहील काई ॥ ४१ ॥

४१) पाहा बरें. त्या पांडवांचे नांव ऐकल्याबरोबर जो कृष्ण त्यांचे रक्षण करण्याकरितां रानांतहि धांव घेतो, त्याला अर्जुनाने विचारावें व मग आपण सांगावें, एवढें तरी सहन होईल काय ?

तो सहजेंचि स्नेहाचे अवतरण । आणि येरु स्नेहा घातलें आहे माजवण ।

ऐसिये मिळणी वेगळेपण । उरे हेंचि बहु ॥ ४२ ॥

४२) तो श्रीकृष्ण परमात्मा स्वभावतःच प्रेमाची मूर्ति असून, त्या प्रेमास अंमल आणणारा अर्जुन, हा उत्तेजक पदार्थ घातला आहे. अशा एक होणार्‍या प्रसंगीं त्यांचें वेगळेपण राहिलें हेच फार आहे.  

म्हणोनि अर्जुनाचिया बोलासरिसा । देव विश्र्वरुप होईल आपैसा ।

तोचि पहिला प्रसंगु ऐसा । ऐकिजो तरी ॥ ४३ ॥  

४३) म्हणून अर्जुनाच्या बोलण्याबरोबर श्रकृष्ण सहजच विश्वरुप धारण करील, तोच पहिला प्रसंग असा आहे, तर तो ऐकावा.

श्लोक

अर्जुन उवाच

मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसज्ञितम् ।

यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम ॥ १ ॥

१) अर्जुन म्हणाला, ( हे श्रीकृष्णा ) माझ्यावर अनुग्रह करण्याकरितां अध्यात्म नांवाचे अत्यंत गुह्य असें जे भाषण तूं बोललास, त्यानें हा माझा मोह निःशेष नाहींसा झाला.  

मग पार्थु देवातें म्हणे । जी तुम्हीं मजकारणें ।

वाच्य केलें न बोलणें । कृपानिधे ॥ ४४ ॥

४४) मग अर्जुन कृष्णाला म्हणाला, कृपासागरा, जें बोलतां यावयाचें नाहीं, तें तुम्ही माझ्याकरितां बोललात. 

जैं महाभूतें ब्रह्मीं आटती । जीवमहदादींचें ठाव फिटती ।

तैं जें देव होऊनि ठाकती । ते विसवणें शेषींचें ॥ ४५ ॥

४५) ज्या वेळीं पंचमहाभूतें ब्रह्मामध्यें नाहींशीं होतात व जीव आणि महन्तत्त्व वगैरे यांचा पत्ता नाहींसा होतो, त्यावेळीं देवा, आपण जें ( ब्रह्मरुप ) होऊन राहतां तें शेवटचें विश्रांतिस्थान आहे.   

होतें हृदयांचा परीवरीं । रोंविलें कृपणाचिये परी ।

शब्दब्रह्मासिही चोरी । जयाची केली ॥ ४६ ॥

४६) जी स्वरुपस्थिति वेदांसहि कळूं न देतां ( आपण आपल्या ) अंतःकरणरुपी घरांत कृपणासारखी ठेवली होती,

तें तुम्हीं आजि आपुलें । मजपुढां हियें फोडिलें ।

जया अध्यात्मा वोवाळिलें । ऐश्र्वर्य हरें ॥ ४७ ॥

४७) ती आज तुम्ही आपल्या अंतःकरणांतील गुप्त गोष्ट माझ्यापुढें प्रकट केली. या अध्यात्मज्ञानावरुन शंकराने आपलें ऐश्र्वर्य ओंवाळून टाकलें आहे.

ते वस्तु मज स्वामी । एकिहेळां दिधली तुम्हीं ।

हें बोलों तरि आम्ही । तुज पावोनि भिन्न कैंचे ॥ ४८ ॥

४८) महाराज, अशी जी वस्तु, ती तुम्ही मला एका क्षणांत दिलित, असें म्हणावें तर आम्ही तुम्हांपासून वेगळे ( तरी ) कोठे आहोंत ?

परि साचचि महामोहाचां पुरीं । बुडालेया देखोनि सीसवरी ।

तुवां आपणपें घालोनि श्रीहरी । मग काढिलें मातें ॥ ४९ ॥

४९) पण खरोखर मोहाच्या महापुरांत मी डोक्यापर्यंत बुडालों आहें, असें पाहून श्रीकृष्ण, तुम्हीं आपण स्वतः उडी घालून मग मला बाहेर काढलें.

एक तूंवांचूनि कांहीं । विश्र्वीं दुजियाची भाष नाहीं ।

कीं आमुचें कर्म पाहीं । जे आम्ही आधी म्हणों ॥ ५० ॥

५०) एक तुझ्याशिवाय या अखिल विश्वामध्यें दुसर्‍याची कशाची वार्ता नाहीं. ( अशी वास्तविक स्थिति असतांना ), आमचें दुर्दैव पाहा कीं, आम्हीं अभिमानानें, आम्ही कोणीतरी एक आहोंत, असें समजतो.     

मी जगीं एक अर्जुनु । ऐसा देहीं वाहें अभिमानु ।

आणि कौरवांतें इया स्वजनु । आपुला म्हणें ॥ ५१ ॥

५१) जगामध्यें मी एक अर्जुन आहें, असा देहाच्या ठिकाणीं अभिमान बाळगतों आणि या कौरवांना आपलें भाऊबंद म्हणतों.

याहीवरी यांतें मी मारीन । म्हणें तेणें पापें के रिगेन ।

ऐसें देखत होतों दुःस्वप्न । तों चेवविला प्रभु ॥ ५२ ॥

५२) यावर देखील यांना मी मारीन आणि त्या पापाच्या योगानें मग मला कोणती गति मिळेल, असें म्हणत होतों. याप्रमाणें मी वाईट स्वप्न पाहात होतों तो त्या मला, महाराज, आपण जागें केलें,    

देवा गंधर्वनगरीची वस्ती । सोडूनि निघालों लक्ष्मीपती ।

होतों उदकाचिया आर्तीं । रोहिणी पीत ॥ ५३ ॥

५३) देवा, गंधर्वनगराची वस्ती सोडून मी बाहेर पडलों. हे लक्ष्मीपते, मी पाण्याच्या इच्छेने मृगजळ पीत होतों.

जी किरडूं तरी कापडाचें । परी लहरी येत होतिया साचें ।

ऐसें वायां मरतया जीवाचें । श्रेय तुवां घेतलें ॥ ५४ ॥

५४) महाराज, सर्प कापडाचाच होता, ( पण त्यावर पाय पडून तो चावला असा भ्रम होऊन ) विषाच्या लहरी मात्र खर्‍या येत होत्या; याप्रमाणें आपण मरतों असें भ्रमाने वाटणार्‍या जीवाला ( मला ) वांचविण्याचें पुण्य तुम्हीं घेतले. 

आपुलें प्रतिबिंब नेणतां । सिंह कुहां घालील देखोनि आतां ।

ऐसा धरिजे तेवीं अनंता । राखिलें मातें ॥ ५५ ॥

५५) विहिरींत दिसणारी ही आपली पडछाया आहे, हे न समजतां आतां सिंह आंत उडी टाकणार, इतक्यांत त्याला कोणी येऊन धरावें. त्याप्रमाणें हे अनंता, आपण माझें रक्षण केलेंत.   

एर्‍हवीं माझा तरीं येतुलेवरी । एथ निश्र्चय होता अवधारीं ।

जें आतांचि सातांही सागरीं । एकत्र मिळिजे ॥ ५६ ॥

५६) ऐका, एर्‍हवीं माझा तर येथें इतका निश्र्चय झाला होता कीं, आतांच जरी सातहि समुद्र एकवट झाले;

हें युगचि आघवें बुडावें । वरि आकाशहि तुटोनि पडावें ।

परि झुंजणें न घडावें । गोत्रेंशीं मज ॥ ५७ ॥

५७) हा प्रलय जरी झाला अथवा आकाशहि तुटून पडलें ( तरी चालेल ), पण माझ्यावर माझ्या कुळाशीं लढण्याचा प्रसंग न यावा;

ऐसिया अहंकाराचिये वाढी । मियां आग्रहजळीं दिधली होती बुडी ।

चांगचि तूं एर्‍हवीं काढी । कवणु मातें ॥ ५८ ॥

५८) अशा अहंकाराच्या वाढीनें मीं आग्रहरुपी पाण्यांत बुडी मारली होती. ( प्राण गेला तरी बेहत्तर, पण मी गोत्रजांशी लढणार नाहीं, असा माझा कृतनिश्र्चय होता. ) पण आपण चांगले ( जवळ ) होता म्हणून ठीक झालें; नाहीं तर मला त्यातून कोणीं काढलें असतें ?   

नाथिलें आपणपें एक मानिलें । आणि नव्हतया नाम गोत्र ठेविलें ।

थोर पिसें होतें लागलें । परि राखिलें तुम्हीं ॥ ५९ ॥

५९) वास्तविक मीं कोणी एक नसताना, खोटेंच मी कोणी ( अर्जुन ) आहे, असें मानलें; आणि वास्तविक कांहीं नाहींत, असे जे कौरव, त्यांस नातलग असें नांव ठेवलें. याप्रमाणे मला मोठें वेड लागलें होतें, पण तुम्हीं माझे रक्षण केलेंत.      

मागां जळत काढिलों जोहरीं । तैं तें देहासीच भय अवधारीं ।

आतां हे जोहरवाहर दुसरी । चैतन्यासकट ॥ ६० ॥

६०) ऐका. मागें ( पूर्वीं एकदां ) जेव्हां आम्ही अग्नींत (

 लाक्षागृहांत ) जळण्याच्या बेतांत होतों, तेव्हां तूं आम्हाला

 बाहेर काढलेंस. तेव्हां काय तें एक स्थूल देहासच भय

 होतें; पण आतां या ( मोहरुपीं ) दुसर्‍या अग्नीच्या

 पीडेपासून चैतन्यासकट देहाला भय होतें,  



Custom Search

No comments: