Thursday, March 24, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 5 Ovya 123 to 153 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग ५ ओव्या १२३ ते १५३

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 11 Part 5 
Ovya 123 to 153 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ११ भाग ५ 
ओव्या १२३ ते १५३

श्लोक

श्रीभगवानुवाच:

पश्य मे पार्थ रुपाणि शतशोऽथ सहस्त्रशः ।

नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च ॥ ५ ॥

५) श्रीकृष्ण म्हणाले, पार्था, नाना प्रकारचीं, नाना वर्णांची व नाना आकृतींची माझीं शेकडों, हजारों ( दिव्य ) रुपें पाहा.  

अर्जुना तुवां एक दावा म्हणितलें । आणि तेंचि दावूं तरि काय दाविलें ।

आतां देखें आघवें भरिलें । माझांचि रुपीं ॥ १२३ ॥

१२३) अर्जुना,तूं एक विश्र्वरुप दाखवा, असें म्हटलेंस आणि आम्हीं तेंच ( एक विश्वरुप ) दाखविलें, तर त्यांत आम्हीं काय मोठेसें दाखविलें? तर आतां तूं असें पाहा कीं, सर्व ( विश्र्व ) माझ्या स्वरुपांत सामावलेले आहे.    

एकें कृशें एकें स्थूळें । एकें र्‍हस्वें एकें विशाळें ।

पृथुतरें सरळें । अप्रांतें एकें ॥ १२४ ॥

१२४) कांही रोडकीं, कांही लठ्ठ, कांहीं ठेंगू, कांहीं प्रशस्त, कांहीं फारच विस्तृत, सडपातळ व कांहीं अमर्याद,

एकें अनावरें प्रांजळें । सव्यापारें निश्र्चळें ।

उदासीनें स्नेहाळें । तीव्रें एकें ॥ १२५ ॥

१२५) कांहीं न आवरणारीं व कांहीं प्रामाणिक, कांहीं सक्रिय व कांहीं निष्क्रिय, कांहीं उदासीन, कांहीं प्रेमळ, कांहीं कडक,

एकें घूर्णितें सावधें । असलगें एकें अगाधें ।

एकें उदारें अतिबद्धें । क्रुद्धें एकें ॥ १२६ ॥

१२६) कांहीं धुंद, कांहीं सावध, कांहीं उघड व कांहीं गूढ, कांहीं उदार, कांहीं कृपण आणि रागावलेलीं कांहीं;

एकें संतें सदामदें । स्तब्धें एकें सानंदें ।

गर्जितें निःशब्दें । सौम्यें एकें ॥ १२७ ॥

१२७) कांहीं सदाचरणीं, कांहीं सदा मदोन्मत्त, कांहीं स्तब्ध, कांहीं आनंदित, कांहीं गर्जना करणारी, कांहीं शब्दरहित व कांहीं शांत;

एकें साभिलाषें विरक्ते । उन्निद्रितें एकें निद्रितें ।

परितुष्टें एकें आर्ते । प्रसन्नें एकें ॥ १२८ ॥ 

१२८) कांहीं आशाखोर आणि कांहीं निराश, कांहीं जागीं झालेलीं व कांहीं झोपलेलीं, कांहीं सर्व बाजूंनी संतुष्ट, कांहीं पीडित आणि कांहीं प्रसन्न;

एकें अशस्त्रें सशस्त्रें । एकें रौद्रें अतिमित्रें ।

भयानकें एकें पवित्रें । लयस्थें एकें ॥ १२९ ॥

१२९) कांहीं बिनहत्यारी व काहीं हत्यारी, कांहीं तामसी व कांहीं अतिशय स्नेहाळू व कांहीं भयंकर, कांहीं पवित्र आणि कांहीं समाधीत असलेलीं;

एकें जनलीलाविलासें । एकें पालनशीलें लालसें ।

एकें संहारकें सावेशें । साक्षिभूतें एकें ॥ १३० ॥

१३०) कांहीं उत्पन्न करण्याचा स्वभाव असलेलीं, कांहीं मोठ्या आवेशानें संहार करणारी, कांहीं तटस्थ म्हणून राहिलेली;

एवं नानाविधें परि बहुवसें । आणि दिव्यतेजप्रकाशें ।

तेवींचि एकएकऐसें वर्णेही नव्हे ॥ १३१ ॥

१३१) याप्रमाणें अनेक प्रकारचीं, परंतु पुष्कळ व दिव्य तेजानें प्रकाशरुप, अशीं ती रुपें होती. त्याचप्रमाणें वर्णाच्याहि बाबतीत तीं रुपें एकसारखीं एक नव्हती.  

एकें तातलें साडेपंधरें । तैसीं कपिलवर्णें अपारें ।

एकें सरागें जैसें सेंदुरें । डवरलें नभ ॥ १३२ ॥ 

१३२) कांहीं तावून काढलेल्या उत्तम सोन्यासारखीं, त्याचप्रमाणें पिंगट रंग असलेली अनंत रुपें; आणि कांहीं ज्याप्रमाणें शेंदरानें माखलेले आकाश असावें त्याप्रमाणें शेंदरी.  

एकें सावियाचि चुळुकीं । जैसें ब्रह्मकटाह खचिलें माणिकीं ।

एकें अरुणोदयासारिखीं । कुंकुमवर्णें ॥ १३३ ॥

१३३) रत्नांनी ब्रह्मांड जडल्यामुळें तें जसें चमकत असावें, तशा प्रकारचीं कित्येक रुपें स्वाभाविक सौंदर्यानें चमकणारीं होतीं व कित्येक अरुणोदयाच्या केशरी वर्णाप्रमाणें होतीं; 

एकें शुद्धस्फटिकसोज्वळें । एकें इंद्रनीळसुनीळें ।

एकें अंजनाचलसकाळें । रक्तवर्णे एकें ॥ १३४ ॥

१३४) कांहीं शुद्ध स्फटिकाप्रमाणें शुभ्र असलेली, कांहीं इंद्रनील मण्याप्रमाणे चांगलीं निळीं असलेली, कांहीं काजळाच्या पर्वताप्रमाणें अतिशय काळीं असलेलीं, कांहीं तांबड्या रंगाचीं;

एकें लसत्कांचनसम पिंवळीं । एकें नवजलदश्यामळीं ।

एकें चांपेगौरी केवळीं । हरितें एकें ॥ १३५ ॥

१३५) कांहीं तेजदार सोन्याप्रमाणें पिवळ्या रंगाची, कांहीं नव्या मेघाप्रमाणें काळ्यासावळ्या वर्णांची, कांहीं केवळ चाफ्याप्रमाणें गोरी असलेली आणि कांहीं हिरव्या रंगाचीं;

एकें तप्तताम्रतांबडीं । एकें श्र्वेतचंद्र चोखडीं ।

ऐसीं नानावर्णें रुपडीं । देख माझीं ॥ १३६ ॥

१३६) कांहीं तापलेल्या तांब्यासारखीं तांबडी, कांही पांढर्‍या चंद्रासारखीं शुद्ध, अशी ही माझीं नाना रंगांची स्वरुपें पाहा.

हे जैसे कां आनान वर्ण । तैसें आकृतींही अनारिसेपण ।

लाजा कंदर्प रिघाला शरण । तैसें सुंदरें एकें ॥ १३७ ॥

१३७) हे ज्याप्रमाणें वेगवेगळे रंग आहेत, त्याप्रमाणें त्यांच्या आकृत्याहि वेगवेगळ्या आहेत. मदनहि लज्जित होऊन शरण येईल, अशी कित्येक सुंदर आहेत,

एकें अतिलावण्यसाकारें । एकें स्निग्धवपुमनोहरें ।

शृंगारश्रियेचीं भांडारें । उघडिलीं जैसीं ॥ १३८ ॥

१३८) कांहीं रुपें अति सुंदर बांध्यांची आहेत, कांहीं तुळतुळीत शरीराचीं मन हरण करणारीं आहेत, जणू काय शृंगारलक्ष्मीचे भांडारखाने उघडले आहेत, अशीं आहेत.

एकें पीनावयव मांसाळें । एकें शुष्कें अतिविक्राळें ।

एकें दीर्घकंठे विताळें । विकटें एकें ॥ १३९ ॥

१३९) कांहीं पुष्ट अवयवाची व खूप मांस असलेलीं, कांहीं वाळलेली अतिशय भयंकर, कांहीं उंच मानेचीं, कांही मोठ्या टाळूची व कांहीं हिडीस रुपांची  

एवं नानाविधाकृती । इयां पाहतां पारु नाहीं सुभद्रापती ।

जपाचां एकेकीं अंगप्रांती । देख पां जग ॥ १४० ॥

१४०) ह्याप्रमाणें अनेक प्रकारच्या आकृत्या आहेत. अर्जुना, ह्या आकृत्या पाहावयास लागलें तर त्यांना अंत नाहीं आणि त्यांच्या एकएका शरीरभागावर तूं जग पाहा.

श्लोक

पश्यादित्यान् वसून् रुद्रानश्विनौ मरुतस्तथा ।

बहून्यदृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत ॥ ६ ॥

६) आदित्य, वसु, रुद्र, अश्विनीकुमार आणि वायु पाहा. हे भरतकुलोत्पन्ना, पूर्वी कधीं न पाहिलेलीं अनेक आश्चर्ये अवलोकन कर.

जेथ उन्मीलन होत आहे दिठी । तेथ पसरती आदित्यांचिया सृष्टी ।

पुढती निमीलनीं मिठी । देत आहाती ॥ १४१ ॥

१४१) ज्या ठिकाणी ( विश्वरुप भगवंताच्या ) दृष्टि उघडतात, त्या ठिकाणी सूर्याच्या सृष्ट्या पसरतात व जेथें त्या दृष्ट्या मिटतात, तेथे त्या सूर्याच्या सृष्ट्या मावळतात.

वदनींचिया वाफेसवें । होत ज्वाळामय आघवें ।

जेथ पावकादिक पावे । समूह वसूंचे ॥ १४२ ॥

१४२) तोंडाच्या वाफेबरोबर सर्व ज्वालामय होतें. त्या ठिकाणीं अग्निआदिकरुन वसूंचा समुदाय प्राप्त होतो. 

आणि भ्रूलतांचे शेवट । कोपें मिळों पाहती एकवाट ।

तेथ रुद्रगणांचे संघाट । अवतरत देखें ॥ १४३ ॥

१४३) आणि भुवयांची टोकें रागानें एकत्र होऊं पाहतात, त्या ठिकाणीं रुद्रगणांचे समुदाय उत्पन्न होतात.पाहा.

पैं सौम्यतेचां वोलावां । मिती नेणिजे अश्र्विनौदेवां ।

श्रोत्रीं होती पांडवा । अनेक वायु ॥ १४४ ॥

१४४) विश्वरुपाच्या सौम्यतेच्या औलाव्यामध्यें अगणित अश्विनी देव उत्पन्न होतात आणि अर्जुना, विश्वरुपाच्या कानांच्या ठिकाणी अनेक वायु उत्पन्न होतात.

यापरी एकेकाचिये लीळे । जन्मती सुरसिद्धांचीं कुळें ।

ऐसीं अपारें आणि विशाळें । रुपें इयें पाहीं ॥ १४५ ॥

१४५) याप्रमाणें एकएका स्वरुपाच्या सहज खेळामध्यें देवांचे व सिद्धांचे समुदाय उत्पन्न होतात अशी ही अमर्याद व प्रचंड रुपें पाहा.

जयातें सांगावया वेद बोबडे । पहावया काळाचेंही आयुष्य थोडें ।द

धातयाही परि न सांपडे । ठाव जयांचा ॥ १४६ ॥

१४६) ज्या स्वरुपांचें वर्णन करण्यास वेद असमर्थ आहेत जीं स्वरुपें पाहावयास काळाचेहि आयुष्य थोडें आहे आणि ब्रह्मदेव खरा सर्वज्ञ, पण त्यालाहि ज्या स्वरुपाचा पत्ता लागत नाहीं;

जयांतें देवत्रयी कहीं नायके । तियें इयें प्रत्यक्ष देख अनेकें ।

भोगीं आश्र्चर्याचीं कवतिकें । महाऋद्धी ॥ १४७ ॥

१४७) ज्या स्वरुपाविषयीं तिन्ही देवांना कधीहि ऐकायास येत नाहीं, अशीं जी हीं अनेक रुपें, तीं तूं प्रत्यक्ष पाहा आणि कौतुकानें आश्चर्याचें मोठे ऐश्वर्य भोग.

मूळ श्लोक

इहैकस्थं जगत् कृत्स्नं पश्याद्य सचराचरम् ।

मम देहे गुडाकेश यच्चान्यद्  द्रष्टुमिच्छसि ॥ ७ ॥

७) हे अर्जुना, चराचरयुक्त सर्व जग व जर ( आणखी )

 दुसरें पाहण्याची इच्छा असेल, तर येथें माझ्या शरीरामध्ये

 एका ठिकाणीं स्थित आहे, तें आतां पाहा.  

इया मूर्तीचिया किरीटी । रोममूळीं देखें पां सृष्टी ।

सुरतरुतळवटीं । तृणांकुर जैसे ॥ १४८ ॥

१४८) अर्जुना, ज्याप्रमाणें कल्पतरुच्या बुडाशीं गवताचें शेंकडों अंकुर असतात, त्याप्रमाणें या विश्र्वमूर्तीच्या प्रत्येक केसाच्या बुडाशीं सृष्ट्या पाहा.

आणि वाताचेनि प्रकाशें । उडतां परमाणु दिसती जैसे ।

भ्रमत ब्रह्मकटाह तैसें । अवयवसंधीं ॥ १४९ ॥

१४९) आणि ज्याप्रमाणें वार्‍यानें उडणारे परमाणू प्रकाशांत दिसतात, त्याप्रमाणें विश्वरुपाच्या सांध्यांत अनेक ब्रह्मांडें वर खालीं जातांना दिसतात.  

एथ एकैका चिया प्रदेशीं । विश्र्व देख विस्तारेंशी ।

आणि विश्र्वाही परौतें मानसीं । जरी देखावें वर्ते ॥ १५० ॥

१५०) या विश्वरुपाच्या एक एक भागावर तूं संपूर्ण विस्तारासह विश्व पाहा आणि तुझ्या मनांत जर विश्वाहि पलीकडे पाहावें असें वाटत असेल,

तरी तियेही विषयींचें कांहीं । एथ सर्वथा सांकडें नाहीं ।

सुखें आवडे तें माझां देही । देखसी तूं ॥ १५१ ॥

१५१) तर त्याविषयींहि येथें मुळींच अडचण नाहीं. तुला वाटेल तें तूं माझ्या देहाच्या ठिकाणीं पाहा. 

ऐसें विश्र्वमूर्ती तेणें । बोलिलें कारुण्यपूर्णें ।

तंव देखत आहें कीं नाहीं न म्हणे । निवांतुचि येरु ॥ १५२ ॥

१५२) याप्रमाणें करुणेनें पूर्ण भरलेले विश्वरुपधारी श्रीकृष्ण परमात्मा बोलले, तेव्हां मी विश्वरुप पाहात आहें कां नाहीं असें कांहीं न बोलतां अर्जुन उगाच राहिला.

एथ कां पां हा उगला । म्हणोनि कृष्णें जंव पाहिला ।

तंव आर्तीचें लेणें लेइला । तैसाचि आहे ॥ १५३ ॥

१५३) या प्रसंगीं हा स्तब्ध कां राहिला आहे, म्हणून

 कृष्णानें ज्या वेळेस याच्याकडे पाहिलें, तेव्हां तो इच्छेचा

 अलंकार घालून तसाच उत्कंठित असलेला आढळला.



Custom Search

No comments: