Wednesday, March 16, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 3 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग ३

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 11 Part 3 
Ovya 61 to 88 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ११ भाग ३ 
ओव्या ६१ ते ८८

दुराग्रहें हिरण्याक्षें । माझी बुद्धिवसुंधरा सूटली काखे ।

मग मोहार्णव गवाक्षे । रिघोनी ठेला ॥ ६१ ॥

दुराग्रहरुपी हिरण्याक्ष दैत्याने, माझी बुद्धिरुपी पृथ्वी काखेंत घातली व मग तो मोहरुपी समुद्राच्या द्वाराने आंत शिरुन राहिला.

तेथ तुझेनि गोसावीपणें । एकवेळ बुद्धीचिया ठाया येणें ।

हें दुसरें वराह होणें । पडिलें तुज ॥ ६२ ॥

६२) देवा, आपल्या सामर्थ्यानें पुन्हां एक चेळ माझी बुद्धि आपल्या मूळ ठिकाणाला आली. हे देवा, या, वेळीं तुम्हांला दुसर्‍यांदा वराह अवतार घ्यावा लागला.

ऐसें अपार तुझें केलें । एकी वाचा काय मी बोलें ।

परि पांचही पालव मोकलिले । मजप्रती ॥ ६३ ॥

६३) याप्रमाणें तुमची अनंत उपकारांचीं कृत्यें आहेत. त्याचें मी एका वाचेनें काय वर्णन करुं ? परंतु ( एवढें मात्र मीं तुम्हांला सांगू शकतों कीं ) तुम्हीं आपलें पंचप्राण माझ्यासाठीं अर्पण केलें आहेत.    

तें कांहीं न वचेचि वायां । भलें यश फावलें देवराया ।

जे साद्यंत माया । निरसिली माझी ॥ ६४ ॥

६४) देवा, तें आपले करणें काहीं एक व्यर्थ गेलें नाहीं. हें आपल्याला चांगलें यश प्राप्त झालें आहे; कारण की, माझें अज्ञान साद्यंत नाहीसें झालें. 

जी आनंदसरोवरींचीं कमळें । तेसे जे हे डोळे ।

आपुलिया प्रसादाचीं राउळें । जयालागीं करिती ॥ ६५ ॥

६५) महाराज, आनंदरुप सरोवरांतील कमळासारखे हे तुमचे डोळे आपल्या कृपाप्रसादाची घरें ज्याला करतील,   

हां हो तयाही आणि मोहाची भेटी । हे कायसी पाबळी गोठी ।

केउली मृगजळाची वृष्टी । वडवानळेंसीं ॥ ६६ ॥

६६) अहो महाराज, त्याला देखील, आणी भ्रांतीनें ग्रासावें ? ही दुबळी गोष्ट काय बोलावी ? वडवानळ ( समुद्रांत जळत असलेला अग्नि ) समुद्राच्या पाण्यानें ( देखील ) विझला जात नाहीं. त्यावर मृगजळाच्या वृष्टीचा काय परिणाम होणार आहे ?

आणि मी तंव दातारा । कृपेचां ये रिघोनि गाभारां ।

घेत आहें चारा । ब्रह्मरसाचा ॥ ६७ ॥

६७) आणि तशांत अहो श्रीकृष्णा, मी तर आपल्या या कृपेच्या गाभार्‍यांत शिरुन ब्रह्मरसाचे भोजन करीत आहे.  

तेणें माझा जी मोह जाये । एथ विस्मो कांहीं आहे ।

तरी उद्धतलों कीं तुझे पाये । शिवतले आहाती ॥ ६८ ॥  

६८) महाराज, त्या योगानें माझी भ्रांति नष्ट होईल, यांत काय आश्र्चर्य आहे ? पण माझी भ्रांति गेली इतकेंच नव्हे, तर माझा उद्धार झाला, हें तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतों.   

मूळ श्लोक

भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया ।

त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम् ॥ २ ॥

२) हे कमलप्राक्षा, भूतांची उत्पत्ति व नाश तुझ्याकडून विस्तारपूर्वक ऐकले आणि तसेंच तुझें अपार माहात्म्यहि मी तुझ्यापासून सविस्तर ऐकलें.

पैं कमलायतडोळसा । सूर्यकोटितेजसा ।

मियां तुजपासोनि महेशा । परिसिलें आजि ॥ ६९ ॥

६९) कमळासारखे मोठे डोळे असणार्‍या व कोटि सूर्यांसारख्या तेजःपुंज अशा देवा, महेशा, मी आपल्यापासून आजच असें ऐकलें आहें कीं, 

इयें भूतें जयापरी होती । अथवा लया हन जैसेनि जाती ।

ते मजपुढां प्रकृती । विवंचिली देवें ॥ ७० ॥

७०) हे सर्व प्राणी ज्या रीतीनें ( प्रकृतीपासून ) उत्पन्न होतात, अथवा उत्पन्न झालेलीं भूतें ज्या रीतीनें ( पुन्हा प्रकृतीमध्ये ) लय पावतात, ती प्रकृति देवानें मला सांगितली. 

आणि प्रकृती कीर उगाणा दिधला । परि पुरुषाचाही ठावो दाविला ।

जयाचा महिमा पांघरोनि जाहला । घडौता वेदु ॥ ७१ ॥

७१) आणि प्रकृतिच्या स्वरुपाचा खरोखर सर्व हिशोब दिला आणि ज्या परमेश्वराचा महिमा पांघरुन वेद सवस्त्र ( सुशोभित ) झाला, त्या परमेश्वराचेहि ठिकाण तुम्ही मला दाखवलें.

जी शब्दराशी वाढे जिये । कां धर्माऐशया रत्नातें विये ।

ते एथिंचे प्रभेचे पाये । वोळगे म्हणौनि ॥ ७२ ॥

७२) महाराज, वेद वाढतो ( उत्कर्ष पावतो ) व जगतो ( टिकतो ), अथवा धर्मासारख्या रत्नाला प्रसवतो, तें सर्व या आपल्या स्वरुपसामर्थ्याचा आश्रय करतो म्हणून  

ऐसें अगाध माहात्म्य । जे सकळमार्गैकगम्य ।

जे स्वात्मानुभवरम्य । तें इयापरी दाविलें ॥ ७३ ॥

७३) असें आपलें अपार माहात्म्य आहे. आपलें माहात्म्य हे सर्व मार्गांनी जाणण्याचा एकच विषय आहे व जें आपल्या स्वतःच्या आत्म्याच्या अनुभवामुळे रममाण होण्यास योग्य असें जें आपलें माहात्म्य, तें आपण मला याप्रमाणें दाखविलें.      

जैसा केरु फिटलिया आभाळीं । दिठी रिगे सूर्यमंडळी ।

कां हातें सारुनि बाबुळी । जळ दाविजे ॥ ७४ ॥

७४) ज्याप्रमाणें आकाशांतील ढग नाहींसे झाल्यावर दृष्टी सूर्यमंडळांत प्रवेश करते, अथवा पाण्यावरील गोंडाळ हातानें दूर करुन मग ज्याप्रमाणें पाणी दाखवावें,  

नातरि उकलतयां सापाचे वेढे । जैसें चंदना खेंव देणें घडे ।

अथवा विवसी पळे मग चढे । निधान हातां ॥ ७५ ॥

७५) अथवा, सापाचे वेढे उकलले असतां ज्याप्रमाणें चंदनाला भेटतां येतें, अथवा पिशाच्च दूर गेल्यावर जसें पुरलेलें द्रव्य हातीं लागतें;

तैसी प्रकृति हे आड होती । ते देवेंचि सारिली परौती ।

मग परतत्त्व माझिये मती । शेजार केलें ॥ ७६ ॥

७६) त्याप्रमाणें माझ्या स्वरुपाच्या आड अज्ञान होतें; तें देवांनीच दूर सारलें. नंतर माझ्या बुद्धीला आपणच परब्रह्माचें शेजघर केलें ( ब्रह्मस्वरुपी माझी बुद्धि स्थिर केली).

म्हणौनि इयेविषयींचा मज देवा । भरवंसा कीर जाहला जीवा ।

परि आणीक एक हेवा । उपनला असे ॥ ७७ ॥

७७) म्हणून देवा, याविषयीं माझ्या जीवाची बरोबर खात्री पटली; परंतु आणखी एक उत्कट इच्छा उत्पन्न झाली आहे.

तो भिडां जरी म्हणों राहों । तरी आना कवणा पुसों जावों ।

काइ तूंवांचोनि ठावो । जाणतआहों आम्ही ॥ ७८ ॥

७८) आम्ही भिडेमुळे ती गोष्ट जर विचारावयाची राहूं दिली, तर आम्ही दुसर्‍या कोणास विचारावयास जावें ? तुझ्यावांचून दुसरी विचारण्याची जागा आम्हांस माहीत आहे काय ?

जळचरु जळाचा आभारु धरी । बाळक स्तनपानी उपरोधु करी ।

तरी तया जिणयासी श्रीहरी । आन उपायो असे ॥ ७९ ॥

७९) पाण्यांत राहणर्‍या प्राण्यांची जर पाण्याच्या उपकाराचें ओझें मानलें, अथवा मूलानें स्तनपान करण्याविषयी आईची भीड धरली, तर देवा, त्यास जगण्यास दुसरा उपाय आहे काय ?

म्हणौनि भीडसांकडी न धरवे । जीवीं आवडे तेंही तुजपुढां बोलावें ।

तंव राहें म्हणितलें देवें । चाड सांगें ॥ ८० ॥ 

८०) म्हणून भीड अथवा संकोच धरत नाहीं. मनाला जें बरें वाटेल, तें देखील तुझ्यापुढें बोलून दाखवावें.त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, थांब; तुझी इच्छा काय असेल ती सांग.        

मूळ श्लोक

एवमेतद्यथात्थ त्वमात्मानं परमेश्र्वर ।

द्रष्टुमिच्छामि ते रुपमैश्र्वरं पुरुषोत्तम ॥ ३ ॥

३) हे परमेश्र्वरा, तूं स्वतः विषयीं हे जें सांगितलेंस, त्याप्रमाणें हे पुरुषोत्तमा, हें तुझें ऐश्र्वर्ययुक्त विश्र्वरुप ( प्रत्यक्ष) पाहण्यची माझी इच्छा आहे.   

मग बोलिला तो किरीटी । म्हणे तुम्हीं केली जे गोठी ।

तिया प्रतीतीची दिठी । निवाली माझी ॥ ८१ ॥

८१) मग तो अर्जुन म्हणाला, देवा, तुम्हीं, ( मागें दहाव्या अध्यायांत ) जी गोष्ट सांगितलीत, त्या योगानें माझ्या अनुभवाची दृष्टी शांत झाली.   

आतां जयाचेनि संकल्पें । हे लोकपरंपरा होय हारपे ।

जया ठायातें आपणपें । मी ऐसे म्हणसी ॥ ८२ ॥

८२) आतां ज्याच्या संकल्पाने ही लोकांची मालिका उत्पन्न होते व नाहींशी होते आणि ज्या स्थानास तूं ‘ मी ‘ असे म्हणतोस,

तें मुद्दल स्वरुप तुझें । जेथूनि इयें द्विभुजें हन चतुर्भुजें ।

सुरकार्याचेनि व्याजें । घेवोंघेवों येसी ॥ ८३ ॥

८३) जेथून हीं दोन हातांची अथवा चार हातांची रुपें देवाचें कार्य करण्याच्या निमित्तानें वारंवार घेऊन येतोस, तें तुझें मूळ स्वरुप होय.

पैं जळशयनाचिया अवगणिया । कां मत्स्य कूर्म इया मिरवणिया ।

खेळु सरलिया तूं गुणिया । सांठविसी जेथ ॥ ८४ ॥

८४) हा अवतारांचा खेळ संपल्यावर क्षीरसमुद्रांत झोंप घेण्याचें सोंग, किंवा मत्स्य, कूर्म इत्यादिक अलंकार, यांना तूं गारोडी जेथें ( ज्या मूळ स्वरुपांत ) सांठवितोस.

उपनिषदें जें गाती । योगिये हृदयीं रिगोनि पाहाती ।

जयातें सनकादिक आहाती । पोटाळुनियां ॥८५ ॥

८५) उपनिषदें ज्याचें वर्णन करतात, योगी लोक आपल्या हृदयांत शिरुन ज्याचा साक्षात्कार करुन घेतात, ज्याला सनकादिक संत मिठी मारुन राहिलेले आहेत,

ऐसें अगाध जें तुझें । विश्र्वरुप कानीं ऐकिजे ।

ते देखावया चित्त माझें । उतावीळ देवा ॥ ८६ ॥

८६) असें अमर्याद असलेलें तुझें विश्वरुप कानांनी जे मी ऐकतों, तें पाहण्याकरितां देवा, माझें चित्त फारच उत्कंठित झालें आहे. 

देवें फेडूनियां सांकड । लोभे पुसिली जरी चाड ।

तरि हेचि एकी वाड । आर्ती जी मज ॥ ८७ ॥

८७) माझा संकोच दूर करुन माझी इच्छा काय आहे, असें ज्या अर्थी देवानें प्रेमानें विचारलें आहे तर महाराज, मी असें सांगतो की, हीच एक मला मोठी तीव्र इच्छा आहे.   

तुझें विश्र्वरुपपण आघवें । माझिये दिठीसि गोचर होआवें ।

ऐसी थोर आस जीवें । बांधोनि आहें ॥ ८८ ॥

८८) तूंच या विश्वांत भरला आहेस, हें पूर्णपणें माझ्या या डोळ्यांना दिसावें, अशी मोठी इच्छा मी मनांत बाळगून राहिलों.    



Custom Search

No comments: