Sunday, January 21, 2018

Samas Pachava Rajkaran Nirupan समास पांचवा राजकारण निरुपण


Dashak Aakarava Samas Pachava Rajkaran Nirupan 
Samas Pachava Rajkaran Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us that this world who wants to be a leader and wants to be a politician then what qualities he should have and requires to develop to become a good leader.
समास पांचवा राजकारण निरुपण 
श्रीराम ॥
कर्म केलेंचि करावें । ध्यान धरिलेंचि धरावें ।
विवरलेंचि विवरावें । पुन्हा निरुपण ॥ १ ॥
१) एकच कर्म पुनः पुनः करावें. भगवंताचे ध्यान पुनः पुनः धरावें. आत्मज्ञानाबद्दल ऐकलेल्या विषयावर पुनः पुनः मनन करावें. 
तैसें आम्हांस घडलें । बोलिलेंचि बोलणें पडिलें ।
कां जें बिघडलेंचि घडलें । पाहिजे समाधान ॥ २ ॥
२) माझ्या बाबतींत असेंच घडलें आहे. मागें जें मी एकदा सांगितलेआहे. तेंच पुनः पुनः सांगावे लगत आहे. पण याचें कारण असें कीं ऐकणाराचे समाधान पुनः पुनः बिघडते. समाधान पूर्ववत होण्यासाठीं तेंच तेंच सांगावें लागतें.  
अनन्य राहे समुदाव । इतर जनास उपजे भाव ।
ऐसा आहे अभिप्राव । उपायाचा ॥ ३ ॥
३) आपले अनुयायी, त्यांचा समुदाय आपल्यापाशी राहणें जरुर आहे. म्हणजे मगसमुदाया बाहेरील लोकांना आपल्याबद्दल विश्र्वास उत्पन्न होतो. हें साध्य होणें म्हणजे पुढारीपण यशस्वी होणें समजावें. असें पुढारीपण यशस्वी होण्यास कसें वागावें तें पुढें सांगितले आहे. 
मुख्य हरिकथा निरुपण । दुसरें तें राजकारण ।
तिसरें तें सावधपण । सर्वविषंई ॥ ४ ॥
४) आध्यात्माची पार्श्वभूमी हें पहिलें लक्षण होय.भगवंताचा विसर कधीं पडू देतां कामा नये. व्यवहारानें वागणें हें दुसरे लश्रण होय. व्यवहार उत्तम रीतीनें करण्यास लागणारें चातुर्य असावे. सर्व बाबतींत सावधपणें असावे. हें तिसरे लक्षण होय. पुढार्‍याचे लक्ष चौफेर असलें पाहिजे.   
चौथा अत्यंत साक्षप । फेडावे नाना आक्षप ।
अन्याये थोर अथवा अल्प । क्ष्मा करीत जावे ॥ ५ ॥
५) अतिशय उद्योगीपणा हे चौथे लक्षण होय. अविरत उद्योगावाचून कायम टिकणारे यश मिळत नाही. आपल्या ध्येयाबद्दल व कामाबद्दल नाना प्रकारचे निघणारे आक्षेप व संशय असतात. त्यांचे निरसन करावें अनुयायी लहान मोठ्या चुका करतात. त्याबद्दल त्यांना क्षमा करावी.  
जाणावें पराचें अंतर । उदासीनता निरंतर ।
नीतिन्यायासि अंतर । पडोंच नेदावें ॥ ६ ॥
६) दुसर्‍याच्या मनांत काय आहे तें ओळखावें. आपण आपली वृत्ती नेहमी अलिप्त ठेवावी. आपले वागणें नीतिन्यायास धरुनच असावें.  
संकेतें लोक वेधावा । येकूनयेक बोधावा ।
प्रपंचहि सावरावा । येथानशक्त्या ॥ ७ ॥
७) केवळ खुणेनें माणूस जवळ करावा. मग त्याला ज्ञान देऊन शहाणा करावा. हें करीत असतां आपला प्रपंचही सांभाळावा.   
प्रपंचसमयो वोळखावा । धीर बहुत असावा ।
संमंध पडों नेदावा । अति परी तयाचा ॥ ८ ॥    
८) प्रपंचांत कमीजास्त प्रसंगांचे गांभिर्य ओळखावें. अंगी पुष्कळ धीर असावा. पण प्रपंच्याच्या मर्यादेपलीकडे संबंध लावून घेऊं नये.  
उपाधीसी विस्तारावें । उपाधींत न संपडावें ।
नीचत्व पहिलेंच घ्यावें । आणि मूर्खपण ॥ ९ ॥
९) आपला व्याप वाढवावा. आपल्या कार्याचे क्षेत्र वाढवावें. पण त्यामध्यें गुंतून जाऊं नये. मनानें त्यांत अडकू नये. सुरवातीपासून आपल्याकडे कमीपणा व अज्ञानपणा घ्यावा.   
दोष देखोन झांकावे । अवगुण अखंड न बोलावे ।
दुर्जन सांपडोन सोडावे । परोपकार करुनी ॥ १० ॥
१०) दुसर्‍याचे दोष दिसतात. पण त्यावर पांघरुण घालावें. दुसर्‍याचे अवगुण आपण कधीहीं बोलून दाखवूं नयेत. दुर्जनावर उपकार करुन त्याला आपलासा करावा. 
तर्‍हे भरोंच नये । सुचावे नाना उपाये । 
नव्हे तेंचि करावें कार्ये । दीर्घ प्रेत्नें ॥ ११ ॥
११) उगीच तर्‍हवाईकपणें वागूं नये. प्रसंग आला असता नाना प्रकारचे उपाय सुचावेत. जें कार्य घडून येणें कठीण असते तें दीर्घ प्रयत्नाने घडवून आणावे. 
फड नासोंचि नेदावा । पडिला प्रसंग सांवरावा ।
अतिवाद न करावा । कोणीयेकासी ॥ १२ ॥
१२) एका कामासाठीं जमलेल्या समुदायांत फुट पडूं देऊं नये. कठीण प्रसंग धीरानें निभावून न्यावा. कोणाशीही मर्यादेबाहेर वाद घालूं नये.  
दुसर्‍याचें अभिष्ट जाणावें । बहुतांचें बहुत सोसावें ।
न सोसे तरी जावें । दिगांतराप्रती ॥ १३ ॥
१३) दुसर्‍यांचे कल्याण कशांत आहे हें ओळखून त्याप्रमाणें वागावे. पुष्कळ लोकांसाठी भरपूर कष्ट सोसावेत. असें कष्ट सोसत नसतील तर सर्व सोडून एकांतात जावें.
दुःख दुसर्‍याचें जाणावें । ऐकोन तरी वांटून घ्यावें ।
बरें वाईट सोसावें । समुदायाचें ॥ १४ ॥
१४) दुसर्‍याचे दुःख ओळखावें. ऐकावे व ऐकून आपणही त्यांत वाटेकरी व्हावें. समुदायाच्या सुखांत व दुःखांत आपण सहभागी व्हावे.   
अपार असावें पाठांतर । सन्निधचि असावा विचार ।
सदा सर्वदा तत्पर । परोपकारासी ॥ १५ ॥
१५) खूप पाठांतर असावें. पुष्कळ ग्रंथांचें अवलोकन करावें. नेहमी विचारानें वागण्याची, विवेकपूर्वक कर्म करण्याची सवय असावी. परोपकार करण्यास केव्हांही मनापासून तयार असावें.
शांती करुन करवावी । तर्‍हे सांडून सांडवावी ।
क्रिया करुन करवावी । बहुतांकरवीं ॥ १६ ॥
१६) कठीण प्रसंगी आपण शांत असावें. आणि इतरांना शांत राहण्यास शिकवावे. आपण कर्म करावें व इतरांकडूनही करवून घ्यावें 
करणें असेल अपाये । तरी बोलो दाखऊं नये ।
परस्परेंचि प्रत्यये । प्रचितीस आणावा ॥ १७ ॥
१७) एखाद्याला अपाय करावयाचा असेल तर त्याची वाच्यता करुं नये. आपण त्यांत न सापडता दुसर्‍याकरवीं तो घडवून आणावा. 
जो बहुतांचें सोसीना । त्यास बहुत लोक मिळेना ।
बहुत सोसितां उरेना । महत्व आपुलें ॥ १८ ॥
१८) जो पुष्कळांचें सुखदुःख सोशीत नाहीं. त्याच्याकडे पुष्कळ लोक आकर्षित होत नाहीत. पण दुसर्‍यांचे किती सोसावें यास मर्यादा आहे. या मर्यादेबाहेर सोसल्यानें आपली किंमत उरत नाहीं. 
राजकारण बहुत करावें । परंतु कळोंच नेदावें ।
परपीडेवरी नसावें । अंतःकरण ॥ १९ ॥
१९) लोकसंग्रह होण्यासाठी पुष्कळ गुप्त कार्य करावें लागते. तें करावें पण लोकांना कळूं देऊं नये. दुसर्‍याला छळण्याचा, त्रास देण्याचा विचारही मनांत आणूं नये. 
लोक पारखून सांडावें । राजकारणें अभिमान झाडावे ।
पुन्हा मेळऊन घ्यावें । दुरील दोरे ॥ २० ॥
२०) लोकांची परीक्षा करुन त्यांना बाजूस सारावें. अभिमानी माणसांचा अभिमान मोठ्या युक्तीनें नाहींसा करावा. या कारणांनी दुरावलेली माणसें परत समुदायांत आणावीत. 
हिरवटासी दुरी धरावें । कचरटासी न बोलावें ।
समंध पडता सोडून जावें । येकीकडे ॥ २१ ॥
२१) तापट व विवेकहीन माणसांना लांबच ठेवावे. भित्र्या व अंगचोर माणसांना आपले गुप्त बेत सांगू नयेत. अशा लोकांशी संबंध आला तर आपण दुसरीकडे निघून जावे.   
ऐसे असो राजकारण । सांगतां ते असाधारण । 
सुचित अस्तां अंतःकरण । राजकारण जाणे ॥ २२ ॥
२२) असो. राजकारण म्हणजे लोकसंग्रहाचें काम हें असें असतें. त्याचें संपूर्ण वर्णन करणें शक्य नाही. ज्याचें चित्त एकाग्र होऊं शकते त्यास तें आकलन होतें. 
वृक्षीं रुढासी उचलावें । युद्धकर्त्यास ढकलून द्यावें । 
कारबारावें सांगावें । आंग कैसें ॥ २३ ॥
२३) आपला जीव वाचवण्यासाठीं माणूस भयानें झाडावर चढून बसतो. समाजामध्यें असें जें भयग्रस्त व दुबळें असतात त्यांच्या मदतीसाठीं आपण धावावें. त्यांना जे छळणारे असतात त्या युद्धकर्त्यांना हाकलून लावावें. अशा या परोपकार वर्तनाचे सांगोपांग वर्णन करणें शक्य नाहीं. 
पाहाता तरी सांपडेना । कीर्ति करुं तरी राहेना ।
आलें वैभव अभिळासीना । कांहीं केल्यां ॥ २४ ॥
२४) खरा निःस्वार्थी लोकसंग्रही माणूस कार्य झालें की निघून जातो. त्याचा शोध घेऊनही तो सापडत नाहीं. त्याचा मानसन्मान करावा म्हटला तर तो राहात नाहीं. चालून आलेल्या वैभवाचीही अभिलाषा तो धरत नाहीं. 
येकांची पाठी राखणें । येकांस देखो न सकणें ।
ऐसीं नव्हेत कीं लक्षणें । चातुर्याचीं ॥ २५ ॥
२५) एकाच्या पाठीशी उभा राहून त्यास संरक्षण देणें व त्याचबरोबर दुसर्‍याचा उत्कर्ष सहन न होणें अशी मनोवृत्ति असणें हें कांहीं चातुर्याचें लक्षण नाही. 
न्याय बोलतांहि मानेना । हित तेंचि न ये मना ।
येथें कांहींच चालेना । त्यागेंविण ॥ २६ ॥
२६) ज्या माणसाला योग्य व न्याय्य काय आहे तें सांगूनसुद्धां पटत नाहीं, आपल्या कल्याणाचे जें आहे ते जो माणूस मनावर घेत नाहीं, अशा माणसापुढें उपाय नाही. त्याला सोडणें हाच उत्तम मार्ग होय.  
श्रोतीं कळोन आक्षेपिलें । म्हणौन बोलिलेंचि बोलिलें ।
न्यूनपूर्ण क्ष्मा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ २७ ॥
२७) श्रोत्यांना हे सारें माहीत आहे. तरी त्यांनी शंका काढली म्हणून मागें सांगितलेलें पुनरपि सांगावें लागलें. त्यामध्यें जें कमीजास्त झालें असेल त्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे राजकारणनिरुपण समास पांचवा ॥
Samas Pachava Rajkaran Nirupan 
 समास पांचवा  राजकारण निरुपण 




Custom Search

No comments: