Thursday, January 25, 2018

Samas Satava ChanChal Nadi समास सातवा चंचळ नदी


Dashak Aakarava Samas Satava ChanChal Nadi 
Samas Satava ChanChal Nadi, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us that this world ChanChal Nadi means Maya. Maya means the world we see, we live in it and we die in it. We forget our aim due to bindings of this Maya.
समास सातवा चंचळ नदी
श्रीराम ।
चंचळ नदी गुप्त गंगा । स्मरणें पावन करीं जगा ।
प्रचित रोकडी पाहा गा । अन्यथा नव्हे ॥ १ ॥
१) ही चंचळ नदी म्हणजे मूळमाया होय. असेच समर्थांना अभिप्रेत आहे. मूळमाय ही एक वाहती नदी आहे. ती एक अदृश्य असलेली गंगाच आहे. की जीच्या केवळ स्मरणमात्रेच मनुष्य पावन होतो. या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पाहावा.    
केवळ अचंचळीं निर्माण जाली । अधोमुखें बळें चालिली ।
अखंड वाहे परी देखिली । नाहींच कोणी ॥ २ ॥
२) ही नदी अचंचळ ब्रह्मरुपी पर्वतावर उगम पावते व स्थूळ व दृश्य विश्र्वाकडे ती वाहात जाते. ती अखंड वाहात असूमही तीला कोणीही पाहिलेले नाही. 
वळणें वांकाणें भोवरे । उकळ्या तरंग झरे ।
लादा लाटा कातरे । ठाईं ठाईं ॥ ३ ॥
३) या नदीला वळणें व वांकड्या धारा आहेत. तिच्यांत भोवरे, उकळ्या, तरंग आणि झरे आहेत. तिच्यांत चिखल, लाटा आहेत. वाटेंतील मोठ्या खडकांमुळें तीचा प्रवाह दुभंगतो.  
शुष्क जळाचे चळाळ । धारा धबाबे खळाळ ।
चिपळ्या चळक्या भळाळ । चपळ पाणी ॥ ४ ॥   
४) कांहीं ठिकाणीं पाणी आटल्यानें प्रवाह कोतडा असतो. तर कांहीं ठिकाणीं धारा व धबदहब्यांमुळे मोठा खळखळाट असतो. तर कांहीं ठिकाणी नदीचा प्रवाह चिंचोळा ओहोळ होतो, उथळ होतो. किंवा रुंद होतो. अशा प्रकारें या नदीचे पाणी वाहाते. 
फेण फुगे हेलावे । सैरौवरा उदक धावे ।
थेंब फुईं मोजावे । अणुरेणु किती ॥ ५ ॥
५) पाण्यावर फुगे बनून ते झोके, हेलकावे खातात. प्रवाहाचें पाणी स्वच्छंदपणें वाहात असते. त्या प्रवाहांतून उडणारे मोठे थेंब व अणुरेणुंसारखें मोठे तुषार मोजणें अशाक्य आहे.   
वोसाणे वाहती उदंड । झोतावे दर्कुटे दगड ।
खडकें बेटें आड । वळसा उठे ॥ ६ ॥
६) प्रवाहामध्यें खूप करकचरा वाहात जातो. जोराचा प्रवाह आला म्हणजे कडेकपारी, दगड, खडक, लहान बेटें यांना वळसा घालून पुढें जातो. 
मृद भूमी तुटोन गेल्या । कठीण तैश्याचि राहिल्या ।
ठाईं ठाईं उदंड पाहिल्या । सृष्टीमधें ॥ ७ ॥
७) कांठची मऊ जमीन वाहून जाते. कठीण जमीन तशीच राहते. जगामध्यें ठिकठिकाणी अशा जमिनी पुष्कल पाहिल्या.   
येक ते वाहतचि गेले । येक वळशामधें पडिले ।
येक सांकडींत आडकले । अधोमुख ॥ ८ ॥
८) कित्येक जीव माया नदीच्या प्रवाहामध्यें वाहात जातात व नाश पावतात. कांहीं जीव मोठ्या हिमतीनें उगमाकडे पोहोत जातात. व ब्रह्मदर्शनाने पावन होतात. कांहीं जीव भोवर्‍यामधें सापडतात. तर कांहीं नीच योनींत जातात. कांहीं जन्म-मरणाच्या चक्रांत अडकतात. तर कांहीं देहबुद्धिनें अत्यंत स्वार्थी बनून बहिर्मुख होतात.
येक आपटआपटोंच गेली । येक चिरडचिर्डोच मेलीं ।
कितीयेक ते फुगलीं । पाणी भरलें ॥ ९ ॥
९) कांहीं जीव आपटूनापटून मेले. कांहीं जीव चिरडून चिरडून गेले. तर कांहीं जीवांच्या पोटांत पाणी शिरुन ते फुगले. याचा अर्थ असा कीं कांहीं जीव दृश्याच्या मागें लागले पण तेथें द्वैतानें संघर्ष होऊन मार खाऊन मेले. तर कांहीं संसारांतील संकटानीं मेले. आणि कांहीं अहंकारानें उन्मत्त होऊन मेले. 
येक बळाचे निवडले । ते पोहतचि उगमास गेले ।
उगमदर्शनें पवित्र जाले । तीर्थरुप ॥ १० ॥
१०) कांहीं जीव मोठे बलवान होते. प्रवाहाच्या उलट दिशेने ते पोहत पोहत नदीच्या उगमापर्यंत ते पोहचले. म्हणजेच मायेच्या विळख्यांतून निश्र्चळ ब्रह्मापर्यंत पोहोचले. स्थूलांतून सूक्ष्मापर्यंतचा प्रवास त्यांनी केला. त्यामुलें ते पवित्र झाले. पवित्रपणानेम तीर्थाची योग्यता पावतो.  
तेथें ब्रह्मादिकांचीं भुवनें । ब्रह्मांडदेवतांचीं स्थानें ।
उफराटी गंगा पाहातां मिळणें । सकळांस तेथें ॥ ११ ॥
११) या गंगेमधें उरफाटे जाऊन पाहिले तर तेथे ब्रह्मादिकांची भुवनें आढळतात. ब्रह्मांडांतील देवतांची स्थानें लागतात. त्या सगळ्यांची तेथें गांठ पडते. माणूस अंतर्मुख होत गेला म्हणजे तो सूक्ष्माच्या मार्गास लागतो. जसा तो वरवरच्या पातळीवर जातो तसे त्यास निरनिराळे लोक लागतात. तसाच तो ब्रह्मलोकांत जातो. तेथें त्याला ब्रह्मादिकांचे दर्शन घडते.  
त्या जळाऐसें नाहीं निर्मळ । त्या जळाऐसें नाहीं चंचळ ।
आपोनारायण केवळ । बोलिजे त्यासी ॥ १२ ॥
१२) उगमापाशीं मायारुप गंगेचे पाणी अत्यंत निर्मळ असते. पण तें अत्यंत चंचळ म्हणजे प्रवाही असते. म्हणून त्यास आपोनारायण म्हणतात. गुणमाया निर्माण होण्यापूर्वी मूलमाया खरोखर ब्रह्मरुपच असते. म्हणून ती अत्यंत पवित्र, निर्मल व भेदरहित असते. 
माहानदी परी अंतराळीं । प्रत्यक्ष वाहे सर्वकांळीं ।
स्वर्गमृत्यपाताळी । पसरली पाहा ॥ १३ ॥    
१३) ही माहानदी खरी पण ती आकाशांत वाहाते. सारखी प्रत्यक्ष वाहातच  आहे. स्वर्ग, मृत्यु व पाताळ या तीन्हीं लोकीं ती पसरली आहे. मूळ माया अत्यंत सूक्ष्म असल्यानें ती सूक्ष्म आकाशांत वाहाते. तीचे मूल आकाशाही पलीकडे आहे.  
अधोर्ध अष्टहि दिशा । तिचें उदक करी वळसा ।
जाणते जाणती जगदीशा । सारिखीच ते ॥ १४ ॥
१४) खालीं, वर व आठ दिशा मिळून दहाही दिशांमधें मायेचा प्रवाह भोवर्‍यासारखा फिरतो आहे. म्हणून ज्ञानी जन तीला ईश्र्वरासारखींच मानतात. ती तशीच सर्वव्यापी आहे. सर्वांवर सत्ता गाजविणारी आहे. म्हणून ती ईश्र्वरस्वरुप आहे. असे ज्ञानी समजतात.     
अनंत पात्रीं उदक भरलें । कोठें पाझपाझरोंच गेलें ।
कितीयेक तें वेचलें । संसारासी ॥ १५ ॥
१५) समजा असंख्य भांडी आहेत. त्यामधें पाणी भरलेले आहे. कांहीं भांड्यांतील पाणी पाझरुन जाते तर कांहीं भामड्यांतील पाणी संसारांत वापरले जाते.  भांडें म्हणजे जीव व पाणी म्हणजे माया. पाणी पाझरुन जाणें म्हणजे माया नाहींशी होणें. आत्मज्ञानी पुरुषांच्या बाबतींत असें घडतें. त्याच्या देहामधे स्वस्वरुप भरुन राहते. इतर माणसें मायेमुळें संसारांत गुरफटतात.   
येक्यासंगें तें कडवट । येक्यासंगें तें गुळचट ।
येक्यासंगें तें तिखट । तुरट क्षार ॥ १६ ॥
१६) ज्याप्रकारचें भांडे असतें त्या तर्‍हेची चव त्यांतील पाण्याला येते. एखाद्या भांड्यांतील फार कडवट असते, तर एखाद्यांतील फार गुळचट असते. तर इतर भांड्यांमधें तिखट, तुरट किंवा खारट आढळते. माया म्हणजे चित्शक्ती होय. सत्वगुणी माणसामधें ती गोड स्वभावानें व्यक्तरुप धारण करते. रजोगुणी माणसामधें ती विकाररुपाने व तमोगुणी माणसामधें दुष्टपणाने दिसते.   
ज्या ज्या पदार्थास मिळे । तेथें तद्रूपचि मिसळे ।
सखोल भूमीस तुंबळे । सखोलपणें ॥ १७ ॥
१७) ज्या ज्या पदार्थांशी तिचा संबंध येतो त्या पदार्थांशी ती समरस होते. खोल जमीन असेल तर ती खोलपणें तुंबुन राहते. चितशक्ति स्वतः काहींच नाही. ज्या ज्या दृश्य वस्तुशीं तिचा संबंध येईल तिच्याशी समरस होऊन राहणें येवढेंच ती करते. म्हणून वस्तुमधिल चत्शक्तीचे प्रमाण वस्तुच्या गहनतेवर किंवा खोलपणावर अवलंबून असते. 
विषामधें विषचि होतें । अमृतामधें मिलोन जाते ।
सुगंधीं सुगंध तें । दुर्गंधीं दुर्गंध ॥ १८ ॥
१८) विषामधें ती विष होते. तर अमृतामधें ती अमृत बनते. सुगंधानें सुगंधी बनणे व दुर्गंधानें दुर्गंधी बनणे हाच तिचा स्वभावधर्म आहे.  
गुणीं अवगुणीं मिळे । ज्याचें त्यापरी निवळे ।
त्या उदकाचा महिमा न कळे । उदकेंविण ॥ १९ ॥
१९) गुणांमधे ती गुणी बनते. तर अवगुणांत अवगुणी. ज्याच्याशी तीचा संबंध येतो त्याच्याप्रमाणें ती अनुभवास येते. त्या चित्शक्तिचा महिमा कळण्यासाठीं तिचीच कृपा अवश्यक असते. त्या मूलमायेचा अमंल सर्व चराचर विश्र्वावर चालतो. तिच्याच कृपेने परमार्थ विचार उत्पन्न होतात. तीच सारासार निवडून दाखविते. तीच अनुभवाची खूण आहे. म्हणून तिच्या मनांत आलें तरच माणसाला तीचे अनिर्वचनीय स्वरुप आकलन होत असते.       
उदक वाहे अपरांपर । न कळे नदी कीं सरोवर ।   
जलवास करुन नर । राहिले कितीयेक ॥ २० ॥ 
२०) या नदीला पाणी इतके अथांग आहे कीं ती नदी आहे कां सरोवर आहे. याचा पत्ता लागत नाहीं. कितीतरी माणसें मायानदीच्या पाण्यांतच वस्ती करुन राहतात. सरोवर स्थिर असते, नदी अस्थिर असते. हें दृश्य विश्र्व स्थिर आहे असें वाटते पण दृश्यानें ते इतके अपरंपार भरलें आहे कीं त्याचे अस्थिरपण प्रवाहीपण माणसाच्या ध्यानामतच येत नाही. म्हणून माणूस दृश्याच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करीत नाहीं. तो फसतो व अडकतो.       
उगमापैलीकडे गेले । तेथें परतोन पाहिलें ।
तंव तें पाणीच आटलें । कांहीं नाहीं ॥ २१ ॥
२१) जें उगमाच्या पलीकडे पोहोचले त्यांनी मागें वळून पाहीले तेव्हां त्यांना असें आधळले कीं, मायानदीचे पाणी संपूर्ण आटले. तेथें नदीचा मागमूसही उरला नाही. आपली वृत्ति अंतर्मुख करुन सूक्ष्मांत शिरलें व मायानदी ओलांडून ब्रह्मस्वरुप झाले.  त्यांच्या दृष्टीनें माया मुळीं नाहींच अशी अनुभुती आली.    
वृत्तिसुन्य योगेश्र्वर । याचा पाहावा विचार ।
दास म्हणे वारंवार । किती सांगों ॥ २२ ॥
२२) ज्यानें आपली वृत्ति शून्य केली, जो निर्वृत्ति बनला असा थोर ज्ञानी पुरुषाच्या स्थितीचा अभ्यास करुन ती समजून घ्यावी. अखेर दास म्हणतात कीं, हीच गोष्ट पुनः पुनः कितीवेला सांगावी?   
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चंचळनदीनिरुपणनाम समास सातवा ॥
Samas Satava ChanChal Nadi 
समास सातवा चंचळ नदी



Custom Search

No comments: