Dashak Aakarava Samas Sahava Mahant Lakshan
Samas Sahava Mahant Lakshan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us that in this world there are many Spiritual Leaders or Gurus but a real Guru should have which virtues, qualities to become a good spiritual leader.
समास सहावा महंतलक्षण
श्रीराम ॥
शुद्ध नेटकें ल्याहावें । लेहोन शुद्ध शोधावें ।
शोधून शुद्ध वाचावें । चुकों नये ॥ १ ॥
महंतानें शुद्ध लिहावें. लेकहन नीटनेटके असावें. लिहील्यावर त्यांत कांहीं अशुद्ध आहे कां हे तपासावें व तसें आढळल्यास तें दुरुस्त करावें किंवा काढून टाकावें. तपासल्यावर शुद्ध वाचावें. वाचतांना चुकु नये.
विश्कळित मात्रुका नेमस्त कराव्या । धाकट्या जाणोन सदृढ धराव्या ।
रंग राखोन भराव्या । नाना कथा ॥ २ ॥
२) कानामात्रा मागेंपुढें झाल्या असतील तर त्या जेथल्या तेथें नीट लिहून काढाव्या. लिहीण्याची जी पद्धत असेल ती बदलू नये. लिखाणांत चांगल्या कथा रंग भरुन लिहाव्यात.
जाणायाचें सांगतां न यें । सांगायाचें नेमस्त न ये ।
समजल्याविण कांहींच न ये । कोणीयेक ॥ ३ ॥
३) काय जाणायचें तें ज्याला सांगता येत नाही. जें सांगायाचे तें बरोबर सांगता येत नाही. ज्याला नीट समजून घेता येत नाही. असा मनुष्य महंत बनूं शकत नाही.
हरिकथा निरुपण । नेमस्तपणें राजकारण ।
वर्तायाचें लक्षण । तेंहि असावें ॥ ४ ॥
४) आत्मज्ञानाचा विचार, आवश्यक तेवढें राजकारण, चार लोकांत कसें वागायचे ह्याचें ज्ञान, या सर्व गोष्टी महंताच्या अंगी असाव्यात.
पुसों जाणें सांगों जाणें । अर्थांतर करुं जाणे ।
सकळिकांचें राखों जाणे । समाधान ॥ ५ ॥
५) कोणाला काय विचारवें, कोणाला काय सांगावें ग्रंथांचा बरोबर अर्थ कसा काढावा हें जो जाणतो व सर्वांचे समाधान कसें करावें हें त्याला कळते.
दीर्घ सूचना आधीं कळे । सावधपणें तर्क प्रबळे ।
जाणजाणोनि निवळे । येथायोग्य ॥ ६ ॥
६) पुढें घटना कशा घडणार याचा अंदाज त्याला आधींच येतो. सर्व गोष्टींकडे त्याचे लक्ष असल्यानें त्याचा विचार मोठा प्रबळ असतो. परत परत समजून घेतल्यानें त्याला सर्व गोष्टी व्यवस्थित समजतात.
ऐसा जाणे जो समस्त । तोचि महंत बुद्धिवंत ।
यावेगळें अंतवंत । सकळ कांहीं ॥ ७ ॥
७) अशा रीतीनें जो सर्व गोष्टी जाणतो, तोच खरा बुद्धिवान महंत समजावा. अशा महंताखेरीज दुसरें कशांत कांहीं अर्थ नाही. तें सर्व विनाशवंत असते.
ताळवेळ तानमानें । प्रबंद कविता जाड वचनें ।
मज्यालसी नाना चिन्हें । सुचती जया ॥ ८ ॥
८) कालवेळ, तानमान, प्रबंध, कविता, महत्वाची वचनें, सभाधीटपणा वगैरे नाना गोष्टी महंताला वेळेवर सुचतात. त्याला त्याचे ज्ञान असते.
जो येकांतास तत्पर । आधीं करीं पाठांतर ।
अथवा शोधी अर्थांतर । ग्रंथगर्भींचें ॥ ९ ॥
९) त्याला एकांत आवडतो. तो आधी स्वतः पाठांतर करतो. ग्रंथाच्या अंतरंगांतील गर्भित अर्थ शोधून काढतो.
आधींच सिकोन जो सिकवी । तोचि पावे श्रेष्ठ पदवी ।
गुंतल्या लोकांस उगवी । विवेकबळें ॥ १० ॥
१०) तो स्वतः आधी शिकतो व मग लोकांना शिकवतो. त्यातूनच त्याला मोठेपण मिळते. अडचणींत असलेल्या लोकांना विवेकाच्या बळावर बाहेर काढतो. संसार, प्रपंचात अडकलेल्यांना परमार्थमार्गी बनवतो.
अक्षर सुंदर वाचणें सुंदर । बोलणें सुंदर चालणें सुंदर ।
भक्ति ज्ञान वैराग्य सुंदर । करुन दावी ॥ ११ ॥
११) त्याचे अक्षर सुंदर असते. त्याचे वाचणें सुंदर असते. त्याचे बोलणे व चालणेंही सुंदर असते. भक्ति, ज्ञान व वैराग्य वगैरे सगळे तो सुंदर रीतीनें करुन दाखवितो.
जयास येत्नचि आवडे । नाना प्रसंगी पवाडे ।
धीटपणें प्रगटे दडे । ऐसा नव्हे ॥ १२ ॥
१२) त्याला प्रयत्न करण्याची फार आवड असते. निरनिराळ्या प्रसंगांत त्याचे मोठेपण दृष्टीस पडते. कोणत्याही प्रसंगी तो धीटपणें वागतो. प्रसंग पाहून पलायन करणारा तो नसतो.
सांकडीमधें वर्तों जाणे । उपाधीमधें मिळों जाणे ।
अलिप्तपणें राखों जाणे । आपणासी ॥ १३ ॥
१३) संकट प्रसंगीं कसें वागावें हे त्याला माहीत असते. व्यापामधें मिसळून कसें जायचे हें त्याला बरोबर समजते. परंतु यासर्वांतूनही आपण अलिप्त कसें राहायचे हें ही तो जाणतो.
आहे तरी सर्वां ठांई । पाहों जातां कोठेंचि नाहीं ।
जैसाा अंतरात्मा ठाईंचा ठाईं । गुप्त जाला ॥ १४ ॥
१४) अंतरात्म्यासारखींच महंताची अलिप्तता असते. अंतरात्मा सर्वांच्या ठिकाणीं असतो. पण त्याला पाहूं गेल्यास तो कोठेंच दिसत नाही. तो जेथल्या तेथें गुप्त होतो. तसाच महंत सर्वांमधे मिसळतो. पण त्याला पाहिला गेल्यास तो एकदम नाहींसा होतो. एकांतात जातो.
त्यावेगळें कांहींच नसे । पाहों जातां तो न दिसे ।
न दिसोन वर्तवीतसे । प्राणीमात्रांसी ॥ १५ ॥
१५) अंतरात्म्याशिवाय कोणीही असूं शकत नाही.पहायला गेल्यावर दिसत नाही. तरीसुद्धा सर्व जीवांना तो हालचाल करण्यास समर्थ बनवतो. त्याचप्रमाणें समजांतील चळवळींना महंत प्रेरणा देतो. त्यांचे चालन करतो. पण पाहावयास गेल्यास तो सापडत नाहीं. हीच त्याची अलिप्तता होय.
तैसाच हाहि नानापरी । बहुत जनास शाहाणे करी ।
नाना विद्या त्या विवरी । स्थूळ सूक्ष्मा ॥ १६ ॥
१६) अलिप्त राहणार्या अंरात्म्याप्रमाणें महंत लोकांना शहाणे करतो. स्थूल व सूक्ष्म अशा विद्या देतो. दृश्य विश्र्वाचे ज्ञान देणार्या स्थूल विद्या तर न दिसणार्या भगवंताचे ज्ञान देणार्या त्या सूक्ष्म विद्या होत.
आपणाकरितां शाहाणे होती । ते सहज चि सोये धरिती ।
जाणतेपणाची महंती । ऐसी असे ॥ १७ ॥
१७) महंत ज्या लोकांना विद्या देऊन शाहाणे बनवितो. ते लोक त्याचे अनुयायी बनतात. त्याला वश होतात. हे सहज, सरळच आहे. जाणतेपणानें केलेल्या महंतीचा प्रभाव हा असा असतो.
राखों जाणें नीतिन्याय । न करी न करवी अन्याये ।
कठीण प्रसंगीं उपाये । करुं जाणे ॥ १८ ॥
१८) खरा महंत नीति व न्याय यांचे पालन, रक्षण करणारा असतो. तो स्वतः अनीति, अन्यायानें वागत नाही. आणि इतरांकडूनही करवीत नाही. कठीण प्रसंग आलाच तर त्यांतून बाहेर पडण्याचा तो उपाय काढतो.
ऐसा पुरुष धारणेचा । तोचि आधार बहुतांचा ।
दास म्हणे रघुनाथाचा । गुण घ्यावा ॥ १९ ॥
१९) अशा मनोबलाचा जो असतो त्याचा पुष्कळ लोकांना आधार असतो. श्रीरामदास म्हणतात कीं, श्रीरामचंद्राच्या अंगी वरील गुण आहेत. ते महंतांनी जरुर घ्यावेत.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे महंतलक्षणनाम समास सहावा ॥
Samas Sahava Mahant Lakshan
समास सहावा महंतलक्षण
Custom Search
No comments:
Post a Comment