Thursday, February 15, 2018

Samas Aathava KalaRup Nirupan समास आठवा काळरुप निरुपण


Dashak Barava Samas Aathava KalaRup Nirupan 
Samas Aathava KalaRup Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Kala or time. How we count Days,Months and Years and so on. How it is started? And how Maya is related to it?
समास आठवा काळरुप निरुपण
श्रीराम ।
मूलमाया जगदेश्र्वर । पुढें अष्टधेचा विस्तार ।
सृष्टिक्रमें आकार । आकारला ॥ १ ॥
१) परब्रह्मामध्यें प्रथम मूळ माया निर्माण झाली.मूळमायेमधील शुद्ध जाणीव तो जगदीश्र्वर होय. यानंतर अष्टधा प्रकृतीचा विस्तार झाला. त्यांत जी सृष्टिरचना झाली, तिच्यांत पुढें आकार निर्माण झाले. 
हें अवघेंच नस्तां निर्मळ । जैसे गगन अंतराळ ।
निराकारीं काळवेळ । कांहींच नाहीं ॥ २ ॥
२) अभ्र नसतांना आकाश जसें निर्मळ अंतराळ असतें त्याचप्रमाणें प्रकृति व तिचा पसारा नसतांना निर्मळ परब्रह्म असतें. निराकार स्वरुपांत काळवेळ कांहीं आढळत नाहीं.  
उपाधीचा विस्तार जाला । तेथें काळ दिसोन आला ।
येरवीं पाहातां काळाला । ठावचि नाहीं ॥ ३ ॥
३) उपाधीचा विस्तार झाला म्हणजे काळ दिसूं लागतो. एरवी काळाला स्थानच नाहीं. उपाधि म्हणजे माया किंवा प्रकृति, सद्वस्तुवर आलेलें पांघरुण होय.
येक चंचळ येक निश्र्चळ । यावेगळा कोठें काळ ।
चंचळ आहे तावत्काळ । काळ म्हणावें ॥ ४ ॥
४) एकंदर दोनच प्रकार अस्तित्वांत आहेत. एक निश्र्चळ ब्रह्म व दुसरी चंचळ माया. या व्यतिरिक्त काळ म्हणून तिसरा प्रकार अस्तित्वांत नाहीं. जोंपर्यंत चंचळ असतें तोपर्यंत काळाचें अस्तित्व जाणवते.  
आकाश म्हणिजे अवकाश । अवकाश बोलिजे विलंबास ।
त्या विलंबरुप काळास । जाणोनि घ्यावें ॥ ५ ॥
५) आकाश म्हणजे अवकाश किंवा विस्तार होय. विलंबाला अवकाश म्हणतात. काळ विलंबरुप आहे. त्याचें स्वरुप समजून घ्यावें. 
सूर्याकरितां विलंब कळे । गणना सकळांची आकळे ।
पळापासून निवळे । युगपरियंत ॥ ६ ॥
६) सूर्याच्या योगानें आपणास विलंब कळतो. विलंब हा मूळ धरुन आपल्याला गणना करतां येते. एका पळापासून युगापर्यंत गणना मोजता येते. 
पळ घटिका प्रहर दिवस । अहोरात्र पक्ष मास ।
शड्मास वरि युगास । ठाव जाला ॥ ७ ॥
७) पळ, घटका, प्रहर, दिवस, अहोरात्र, पक्ष किंवा पंधरवडा, मास किंवा महिना, सहा महिने अशा रीतीनें आपण युगापर्यंत काळ मोजूं शकतो.  
क्रेत त्रेत द्वापार कळी । संख्या चालिली भूमंडळी ।
देवांचीं आयुष्यें आगळीं । शास्त्रीं निरोपिलीं ॥ ८ ॥
८) त्यानंतर कृत, त्रेता, द्वापार,व कलि अशीं चार युगें पृथ्वीवर चालली. त्याचप्रमाणें शास्त्रांत देवांची आयुष्यें देखील खूप सांगितलीं आहेत.  
ते देवत्रयाची खटपट । सूक्ष्मरुपें विलगट ।
दंडक सांडितां चटपट । लोकांस होते ॥ ९ ॥
९) ब्रह्मा, विष्णु व महेश या तीन देवांचे कार्य सूक्ष्मरुपानें वेगवेगळें चालूं आहे.  त्यांचा नियमभंग केला कीं लोकांना काळजी वाटूं लागते. 
मिश्रित त्रिगुण निवडेना । तेणें आद्यंत सृष्टिरचना ।
कोण थोर कोण साना । कैसा म्हणावा ॥ १० ॥
१०) सत्व, रज व तम हे तिन्ही गुण एकमेकांत मिसळलेले असतात. एकमेकांपासून त्यांना वेगळें करतां येत नाहीं. सुरवातीपासून शेवटपर्यंत सारी सृष्टिरचना त्रिगुणांच्या मिश्रणानें बनलेली आहे. त्यांत कोणी मोठा वा कोणी लाहान असें म्हणतां येत नाहीं. तिन्ही देव एकाच योग्यतेचे व महत्वाचे आहेत. 
असो हीं जाणत्याचीं कामें । नेणता उगाच गुंते भ्रमें ।
प्रत्यये जाणजाणों वर्में । ठाईं पाडावीं ॥ ११ ॥
११) असो. या गोष्टी बरोबर समजणें हीं शाहाण्याची कामें आहेत. अज्ञानी माणूस उगाच भ्रमाच्या पायीं गुंतून पडतो. म्हणून सृष्टीमधिल गूढ गोष्टी स्वतः अनुभव घेऊन निश्र्चितपणें समजून घ्याव्यांत. 
उत्पन्नकाळ सृष्टिकाळ । स्थितिकाळ संव्हारकाळ ।
आद्यंत अवघा काळ । विलंबरुपी ॥ १२ ॥
१२) उत्पन्नकाळ, सृष्टिकाळ, स्थितिकाळ, संहारकाळ असा हा सगळा काळ आरंभापासून शेवटपर्यंत विलंबरुप आहे. 
जें जें जये प्रसंगीं जालें । तेथें काळाचें नांव पडिलें ।
बरें नसेल अनुमानलें । तरी पुढें ऐका ॥ १३ ॥
१३) ज्या प्रसंगीं जें घडतें त्याचे नांव काळास देण्यांत येते. हें जर बरोबर ध्यानांत येत नसेल तर पुढें ऐकावें. 
प्रजन्यकाळ शीतकाळ । उष्णकाळ संतोषकाळ ।
सुखदुःखआनंदकाळ । प्रत्यये येतो ॥ १४ ॥
१४) पर्जन्यकाळ, शीतकाळ, उष्णकाळ, संतोषकाळ, सुखदुःख आनंदकाळ, या काळांचा अनुभव येतो. 
प्रातःकाळ माध्यानकाळ । सायंकाळ वसंतकाळ ।
पर्वकाळ कठिणकाळ । जाणिजे लोकीं ॥ १५ ॥
१५) प्रातःकाळ, माध्यान्हकाळ, सायंकाळ, वसंतकाळ, पर्वकाळ कठीणकाळ हे काळ लोक जाणतात.   
जन्मकाळ बाळत्वकाळ । तारुण्यकाळ वृधाप्यकाळ ।
अंतकाळ विषमकाळ । वेळरुपें ॥ १६ ॥
१६) जन्मकाळ, बालपणाचा काळ, तारुण्यकाळ, वृद्धपणाचा काळ, अंतकाळ, विषमकाळ हे सगळे वेळरुप काळ आहेत. 
सुकाळ आणि दुष्काळ । प्रदोषकाळ पुण्यकाळ ।
सकळ वेळा मिळोन काळ । तयास म्हणावें ॥ १७ ॥
१७) सुकाळ व दुःकाळ, प्रदोषकाळ, पुण्यकाळ या सगळ्यां वेळांना मिळून काळ असे म्हणावें.  
असतें येक वाटतें येक । त्याचें नांव हीन विवेक ।
नाना प्रवृत्तीचे लोक । प्रवृत्ति जाणती ॥ १८ ॥
१८)  जेव्हां वस्तु एक असते पण दिसते भलतीच. तेव्हां त्यास हीन विवेक म्हणतात. हीन विवेक म्हणजे अविद्या किंवा अध्यास होय. नाना प्रकारच्या मनोरचनेचे लोक प्रवृत्ति काय आहे तेवढेंच जाणतात.  
प्रकृति चाले अधोमुखें । निवृत्ति धावे ऊर्ध्वमुखें ।
ऊर्ध्वमुखें नाना सुखें । विवेकी जाणती ॥ १९ ॥
१९) प्रवृत्ति अधोमुख चालते. सूक्ष्माकडून स्थूलाकडे धांव घेते. निवृत्ति ऊर्ध्वमुखानें चालते. स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाते. सूक्ष्माकडे जाण्यांत अनेक प्रकारची सुखें आढळतात. ही गोष्ट विवेकी माणसें जाणतात.   
ब्रह्मांडरचना जेथून जाली । तेथें विवेकी दृष्टि घाली ।
विवरतां विवरतां लाधली । पूर्वापर स्थिति ॥ २० ॥
२०) या ब्रह्मांडाची रचना ज्या मूळमायेपासून झाली तेथें विवेकी माणूस आपली ज्ञानदृष्टि नेऊन पोचवतो. अशा रीतीनें सूक्ष्म मनन आणि निदिध्यासन करतां करतां त्याला आरंभीची भ्रह्मरुप अवस्था प्राप्त होते.  
प्रपंची असोन परमार्थ पाहे । तोहि ये स्थितीतें लाहे ।
प्रारब्धयोगें करुन राहे । लोकांमधें ॥ २१ ॥
२१)  प्रपंचांत राहून जो परमार्थाची साधना करतो. त्याससुद्धा ही अवस्था प्राप्त होते. प्रारब्धाचा जसा योग असेल त्याप्रमाणें लोकांत राहून तो प्रपंच करतो.  
सकळांचें येकचि मूळ । येक जाणते येक बाष्कळ ।
विवेकें करुन तत्काळ । परलोक साधावा ॥ २२ ॥
२२) सर्वांचे मूळ एकच आहे. विवेकी तें जाणतो तर विवेकहीन ते जाणत नाहीं. म्हणून शाहाण्यानें विवेक वापरुन लवकर परमार्थ साधावा.
तरीच जन्माचें सार्थक । भले पाहाती उभये लोक ।
कारण मुळींचा विवेक । पाहिला पाहिजे ॥ २३ ॥ 
२३) परमार्थ साधला तरच जन्माचे सार्थक होते. यासाठीं भले लोक प्रपंच व परमार्थ दोन्ही साधतात. दोन्ही साधण्यास विवेक करीत मूळापर्यंत गेले पाहिजे.           
विवेकहीन जे जन । ते जाणावे पशुसमान ।
त्यांचें ऐकतां भाषण । परलोक कैंचा ॥ २४ ॥
२४) विवेकहीन माणसें जनावरासारखी जगतात. त्यांचें म्हणणे ऐकून परमार्थ साधणें शक्य नाहीं.
बरें आमचे काये गेलें । जें केलें तें फळास आलें ।
पेरिलें तें उगवलें । भोगिती आतां ॥ २५ ॥
२५) असो. विवेकहीनपणें कोणी जगला तर आमचे कांहीं नुकसान नाहीं. मनुष्य जें करतो त्याचे फळ त्यास मिळते. जें पेरलेले असतें तेंच उगवते. त्याचें फळ माणूस आतां भोगतोच.
पुढेंहि करी तो पावे । भक्तियोगें भगवंत फावे ।
देव भक्त मिळतां दुणावें । समाधान ॥ २६ ॥
२६) यानंतरसुद्धां माणूस जर परमार्थ करील तर तो त्यास साधेल. तो जर भक्ति करेल तर त्यास भगवंताची प्राप्ती होईल. भक्ताचें भगवंताशी ऐक्य घडून आलें कीं भक्ताचे समाधान दुपट्टप्रमाणांत वाढते. भक्त पूर्ण समाधानी बनतो.   
कीर्ति करुन नाहीं मेले । उगेच आले आणि गेले ।
शाहाणे होऊन भुलले । काये सांगावें ॥ २७ ॥
२७) भक्त म्हणून जे नांव कमावून मेले नाहींत ते उगीच जन्मास आले व  तसेंच गेले. शहाण्या माणसांना देखील येथें भुरळ पडतें. याला काय म्हणावें. 
येथील येथें अवघेंचि राहातें । ऐसें प्रत्ययास येतें ।
कोण काये घेऊन जातें । सांगाना कां ॥ २८ ॥
२८) या जगांत सगळें कांहीं येथेंच राहतें, बरोबर कांहीं येत नाहीं. असा प्रत्यक्ष अनुभव येतो. कोणी कांहींतरी बरोबर घेऊन जातो कां? तें सांगा.  
पदार्थीं असावें उदास । विवेक पाहावा सावकास ।
येणेंकरितां जगदीश । अलभ्य लाभे ॥ २९ ॥
२९) म्हणून माणसानें दृश्य वस्तूविषयीं अनासक्त वृत्ति ठेवावी. अगदी शांतपणें सूक्ष्म विवेक करावा. असें केल्यानें परमेश्र्वराचा लाभ होतो. हा मोठा अलभ्य लाभ होय.
जगदीशापरता लाभ नाहीं । कार्याकारण सर्व कांहीं । 
संसार करित असतांहि । समाधान ॥ ३० ॥
३०) परमेश्र्वर प्राप्तीसारखा मोठा लाभ या जगांत दुसरा नाहीं. प्रपंचांत जरुर असणारी कर्में योग्य प्रमाणांत करायला हरकत नाहीं. ती परमार्थाच्या आड येत नाहींत. असें वागलें तर संसार करीत असतांना सुद्धा समाधान कायम टिकते.  
मागां होते जनकादिक । राज्य करितांहि अनेक ।
तैसेचि आतां पुण्यश्र्लोक । कित्येक असती ॥ ३१ ॥
३१) पूर्वीं जनकादि अनेक राजे होऊन गेले. राज्य करीत असूनही त्यांनीं आपलें समाधान टिकवले. आत्ता सांप्रतकाळींसुद्धां असें पुण्यश्र्लोक पुरुष हयात आहेत. 
राजा असतां मृत्य आला । लक्ष कोटी कबुल जाला ।
तरि सोडिना तयाला । मृत्य कांहीं ॥ ३२ ॥
३२) समजा एखाद्या राजानें अंतःकाळीं मृत्यु टळावा म्हणून लक्षावधि रुपये देण्याची तयारी दर्शविली तरी कांहीं केल्यासुद्धा मृत्यु त्यास सोडीत नाही.
ऐसें हें पराधेन जिणें । यामधें दुखणें बाहाणें । 
नाना उद्वेग चिंता करणें । किती म्हणोनि ॥ ३३ ॥
३३) माणसाचें जगणें असें हें पराधीन आहे. तसेंच दुखणेंबाहणें, तसेंच अनेक तर्‍हेची दुःखें आणि काळज्या यांनीं तें व्यापलें आहे. सगळें सांगणें शक्य नाहीं.
हाट भरला संसाराचा । नफा पाहावा देवाचा ।
तरीच या कष्टाचा । परियाये होतो ॥ ३४ ॥
३४) संसाराचा बाजार भरला आहे. त्यांत देवाचा नफा पाहावा. तरच संसारांत केलेल्या कष्टाचा खरा मोबदला मिळतो. नाहीं तर केलेले श्रम खरोखरीच वाया गेल्यासारखें होतात.   
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे काळरुपनाम समास आठवा ॥
Samas Aathava KalaRup Nirupan 
 समास आठवा काळरुप निरुपण


Custom Search

No comments: