Monday, February 12, 2018

Samas Sahava Srushtikram Nirupan समास सहावा सृष्टिक्रम निरुपण

Dashak Barava Samas Sahava Srushtikram Nirupan 
Samas Sahava Srushtikram Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us How this world came into extiencs.
समास सहावा सृष्टिक्रम निरुपण
श्रीराम ।
ब्रह्म निर्मळ निश्र्चळ । शाश्वत सार अमळ विमळ ।
अवकाश घन पोकळ । गगनाऐसें ॥ १ ॥
१) परब्रह्म अत्यंत निर्मळ व निश्र्चळ आहे. तें शाश्वत असून अत्यंत मलरहित आहे. तसेंच तें सर्वांचे सार असून आकाशाप्रमाणें सगळीकडे भरलेले व अत्यंत सूक्ष्म आहे.  
तयास करणें ना धरणें । तयास जन्म ना मरणें ।
तेथें जाणणें ना नेणणें । सुन्यातीत ॥ २ ॥
२) ब्रह्माला करणें नाहीं व धरणें नाहीं. त्यास जन्म नाही अथवा मरण नाहीं. त्याला ज्ञान नाहीं व अज्ञान नाहीं. तरी तें शून्य नाहीं. शून्याच्या पलीकडे आहे. 
तें रचेना ना खचेना । तें होयेना ना जायेना ।
मायातीत निरंजना । पारचि नाहीं ॥ ३ ॥
३) तें रचत नाहीं वा खचत नाहीं. तें होत नाहीं व जात नाहीं. नाहींसे होत नाहीं अशा त्या मायेपलीकडे असणार्‍या ब्रह्माला शेवट नाहीं.
पुढें संकल्प उठिला । षडगुणेश्र्वर बोलिजे त्याला ।
अर्धनारीनटेश्र्वराला । बोलिजेतें ॥ ४ ॥
४) अशा ब्रह्मामध्यें संकल्प उठला, त्या अर्धनारीनटेश्र्वराला षड्गुणैश्र्वर महणतात.
सर्वेश्र्वर सर्वज्ञ । साक्षी द्रष्टा ज्ञानघन ।
परेश परमात्मा जगजीवन । मूळपुरुष ॥ ५ ॥
५) शिवाय सर्वेश्र्वर, सर्वज्ञ, साक्षी, द्रष्टा, ज्ञानघन, मुळपुरुष अशीहीं त्यास नांवें आहेत. 
ते मूळमाया बहुगुणी । अधोमुखें गुणक्षोभिणी ।
गुणत्रये तिजपासूनि । निर्माण जाले ॥ ६ ॥
६) मूळमाय बहुगुणी आहे. खालीं तोंड करुन ती गुणक्षोभिणी बनते. सत्व, रज व तम हे तीन गुण तिच्यापासून प्रगट होतात. 
पुढें विष्णु जाला निर्माण । जाणतीकळा सत्वगुण ।
जो करिताहे पाळण । त्रैलोक्याचें ॥ ७ 
७) पुढें विष्णु जन्मास आला. विष्णु म्हणजे सत्वगुण, शुद्ध जाणीव होय. तो त्रैलोक्याचें पालन करतो. 
पुढें जाणीवनेणीवमिश्रित । ब्रह्मा जाणावा नेमस्त ।
त्याच्या गुणें उत्पत्ति होत । भुवनत्रैं ॥ ८ ॥
८) नंतर ब्रह्मदेव जन्मास आला. त्याच्या ठिकाणी जाणीव व नेणीव या दोहींचे मिक्षण असते. हें खात्रीनें समजावें. त्याच्या कर्तृत्वानें तिन्ही भुवनें उत्पन्न होतात. 
पुढें रुद्र तमोगुण । सकळ संव्हाराचें कारण ।
सकळ कांहीं कर्तेपण । तेथेंचि आलें ॥ ९ ॥
९) पुढें रुद्र जन्मास आला. तो तमोगुणी आहे. तो सगळ्या संहाराचें मूळ कारण आहे. विश्वामधील सारें कर्तेपण रुद्रापाशीं असते.   
तेथून पुढें पंचभूतें । पावलीं पष्ट दशेतें ।
अष्टधा प्रकृतीचें स्वरुप तें । मुळींच आहे ॥ १० ॥
१०) यानंतर पंचभूतें व्यक्तदशेला आली. अव्यक्तरुपानें ती अष्टधा प्रकृतीचें मूळस्वरुपच पंचभूतात्मक आहे.   
निश्र्चळीं जालें चळण । तेंचि वायोचें लक्षण ।
पंचभूतें आणि त्रिगुण । सूक्ष्म अष्टधा ॥ ११ ॥
११) निश्चळ ब्रह्मामध्यें जें चळण होतें तेंच वायूचें लक्षण होय. पांच भूतें व तीन गुण मिळून बनणारी अष्टधा प्रकृति प्रथम सूक्ष्म असते. 
आकाश म्हणिजे अंतरात्मा । प्रत्ययें पाहावा महिमा ।
त्या आकाशापासून जन्मा । वायो आला ॥ १२ ॥
१२) आकाश म्हणजे अंतरात्मा होय. तो किती मोठा आहे. हें अनुभवानें बघावें. त्या आकाशापासून वायु झाला. 
तया वायोच्या दोनी झुळुका । उष्ण सीतळ ऐका ।
सीतळापासून तारा मंयका । जन्म जाला ॥ १३ ॥  
१३) उष्ण व थंड असें वायुचें दोन प्रकार आहेत. थंड वायुपासून चंद्र व तारकांचा जन्म झाला.    
उष्णापासून रवि वन्ही । विद्युल्यता आदिकरुनि ।
सीतळ उष्ण मिळोनि । तेज जाणावें ॥ १४ ॥
१४) उष्ण वायुपासून सूर्य, अग्नि, वीज इत्यादि निर्माण झाले. तेजदेखील उष्ण व थंड असें दोन प्रकारचे आहे. 
तया तेजापासून जालें आप । आप आळोन पृथ्वीचें रुप ।
पुढें औषधी अमूप । निर्माण जाल्याा ॥ १५ ॥ 
१५) त्या तेजापासून पाणी झाले. पाणी घट्ट होऊन पृथ्वी झाली. पृथ्वीवर असंख्य वनस्पती उगवल्या. 
औषधीपासून नाना रस । नाना बीज अन्नरस ।
चौर्‍यासि लक्ष योनीचा वास । भूमंडळीं ॥ १६ ॥
१६) वनस्पतींपासून नाना रस, बीजें आणि अन्नरस उत्पन्न झाले. पृथ्वीवरील चौर्‍यांशी लक्ष जीवप्राणी अन्नरसावरच जगतात.   
ऐसी जाली सृष्टिरचना । विचार आणिला पाहिजे मना ।
प्रत्ययेंविण अनुमाना । पात्र होइजे ॥ १७ ॥
१७) अशा क्रमानें पृथ्वीची रचना झाली. साधकानें या क्रमाचा नीट विचार करावा. खरा अनुभव नसेल तर उगीच कल्पना करीत बसावें लागतें. 
ऐसा जाला आकार । येणेंचि न्यायें संव्हार ।
सारासारविचार । यास बोलिजे ॥ १८ ॥
१८) अशा पायरीपायरीनें विश्व आकाराला आलें. याच पद्धतीनें त्याचा संहार देखील होतो. आकार व संहार यांचा नीट विचार करण्याला सारासार विचार असें म्हणतात. 
जें जें जेथून निर्माण जालें । तें तें तेथेंचि निमालें ।
येणेंचि न्यायें संव्हारलें । माहाप्रळईं ॥ १९ ॥
१९) जें ज्याच्यांतून येते तें त्याच्यांतच विलीन होते. याच पद्धतीनें महाप्रलयाच्यावेळीं सर्व विश्र्वाचा संहार घडून येतो. 
आद्य मध्य अवसान । जें शाश्वत निरणजन ।
तेथें लावावें अनुसंधान । जाणते पुरुषीं ॥ २० ॥
२०) विश्वरचनेच्या आरंभी, मध्यें व शेवटीं शाश्वत ब्रह्म अत्यंत मलरहित राहते. जानत्या पुरुषानें त्याचें एकाग्र मनानें अखंड चिंतन करावें.   
होत जाते नाना रचना । परी ते कांहींच तगेना ।
सारासार विचारणा । याकारणें ॥ २१ ॥
२१) या विश्वामध्यें अनंत प्रकारच्या रचना होतात व जातात. कोणतीही रचना कायमपणें टिकत नाहीं. म्हणून सार कोणतें व असार कोणतें याचा विचार करावा लागतो. 
द्रष्टा साक्षी अंतरात्मा । सर्वत्र बोलती महिमा ।
परी हे सर्वसाक्षिणी अवस्ता मां । प्रत्ययें पाहावी ॥ २२ ॥
२२) अंतराळ हा केवळ द्रष्टा आहे. असा त्याचा महिमा सगळेजण  सांगतात. पण तो कांहीं शुद्ध ब्रह्म नव्हे. हे प्रत्ययास येण्यासाठीं सर्वसाक्षिणी अवस्थेचा स्वतः अनुभव घ्यावा.  
मुळापासून सेवटवरी । अवघी मायेची भरोवरी ।
नाना विद्या कळाकुंसरी । तयेमधें ॥ २३ ॥
२३) विश्वाच्या अगदी मूळापासून तें शेवटपर्यंत सगळा मायेचाच विस्तार आहे. तिच्यामध्यें ानेक विद्या, कला व कौशल्य भरलेले आहे. तें सारें विश्वांतआढळते.   
जो उपाधी सेवट पावेल । त्यास भ्रम ऐसें वाटेल ।
जो उपाधीमध्यें आडकेल । त्यास काढिता कवण ॥ २४ ॥
२४) पण हें सगळें उपाधीरुप आहे. त्यानें शुद्ध ब्रह्मावर पांघरुण पडते. जो कोणी विवेकानें उपाधीचा शेवट गांठतो त्यास हा विश्वपसारा भ्रम आहे असें समजते. पण जो उपाधींत अडकतो, गुंतून राहतो, ती उपाधी खरी आहे असे धरुन चालतो  त्याला तिच्यांतून बाहेर पडणें कठीण आहे. 
विवेकप्रत्ययाचीं कामें । कैसीं घडती ल अनुमानभ्रमें ।
सारासारविचाराचेन संभ्रमें । पाविजे ब्रह्म ॥ २५ ॥
२५) विवेक वाढवून प्रत्यक्ष अनुभव घेण्याचें जें काम आहे तें केवळ भ्रमात्मक कल्पना करण्यानें साधणार नाहीं. सारासार विचाराच्या सामर्थ्यानेंच परब्रह्माची प्राप्ती होत असते.  
ब्रह्मांडींचें माहाकारण । ते मूळमाया जाण ।
अपूर्णास म्हणती ब्रह्म पूर्ण । विवेकहीन ॥ २६ ॥
२६) ब्रह्मांडाच्या महाकारण देहाला मूळमाया म्हणतात. तो देह अपूर्णच आहे. पण त्या अपूर्णाला विवेकहीन माणसें पूर्णब्रह्म म्हणतात.      
सृष्टीमधें बहुजन । येक भोगिती नृपासन ।
येक विष्टा टाकिती जाण । प्रत्येक्ष आतां ॥ २७ ॥
२७) जगामध्यें पुश्कळ माणसें आहेत. त्यांपैकीं कांहीं सिंहासनाचा भोग घेतात. तर इतर कांहीं घाण उपसत बसतात. असें प्रत्यक्ष आढळतें. विवेकहीन लोक दुसर्‍याप्रकारचे समजावेत. 
ऐसे उदंड लोक असती । आपणास थोर म्हणती ।
परी ते विवेकी जाणती । सकळ कांहीं ॥ २८ ॥
२८) स्वतःला मोठे म्हणवून घेणारे लोक जगांत पुष्कळ आहेत. परंतु विवेकी पुरुष खरा मोठा कोण हें बरोबर जाणतात. 
ऐसा आहे समाचार । कारण पाहिजे विचार ।
बहुतांच्या बोलें हा संसार । नासूं नये॥ २९ ॥
२९) या विषयाची कथा अशी आहे. सांगण्याचें कारण हें कीं, माणसाला सूक्ष्म विचार आवश्यक आहे. पुष्कळ लोकांच्या नादीं लागून आपल्या संसाराचा विचार करुं नये.  
पुस्तकज्ञानें निश्र्चये धरणें । तरी गुरु कासया करणें ।
याकारणें विवरणें । आपुल्या प्रत्ययें ॥ ३० ॥
३०) अनुभवावांचून या परमात्मस्वरुपाचा निश्चय होत असता तर सद्गुरु करण्याची आवश्यकताच राहीली नसती. पण पुस्तकी ज्ञान लटकें असतें म्हणून स्वतः अनुभव घ्यावा. आणि मग सारासार विचार करावा. आपला विवेक आपल्या प्रत्ययावर आधारलेला असावा.   
जो बहुतांच्या बोलें लागला । तो नेमस्त जाणावा बुडाला । 
येक साहेब नस्तां कोणाला । मुश्यारा मागावा ॥ ३१ ॥   
३१) जो अनेकांच्या नादीं लागतो तो खात्रीनें बुडतो असें पक्के समजावें. ज्याचा एकच मालक नाहीं त्याला कोणाकडेहि मेहनतीचा मोबदला मागता येत नाहीं.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सृष्टिक्रमनिरुपण नाम समास सहावा ॥
Samas Sahava Srushtikram Nirupan
समास सहावा सृष्टिक्रम निरुपण


Custom Search

No comments: