Tuesday, February 20, 2018

Samas Dahava UttamPurusha Nirupan समास दहावा उत्तमपुरुष निरुपण


Dashak Barava Samas Dahava UttamPurusha Nirupan 
Samas Dahava UttamPurusha Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Uttam Purusha. How those who are having knowledge should behave. He is required to use his knowledge to impart it with others.
समास दहावा उत्तमपुरुष निरुपण 
श्रीराम ॥
आपण येथेष्ट जेवणें । उरलें तें अन्न वाटणें ।
परंतु वाया दवडणें । हा धर्म नव्हे ॥ १ ॥
१) आपण यथेच्छ जेवावें. आपण जेवल्यावर जें अन्न उरलें असेल तें दुसर्‍यांना वाटावें. उरलेले अन्न वाया दवडणें हा कांहीं धर्म नव्हे. 
तैसें ज्ञाने तृप्त व्हावें । तेंचि ज्ञान जनास सांगावें ।
तरतेन बुडों नेदावें । बुडतयासी ॥ २ ॥
२) हें ज्याप्रमाणें तसेंच आपण स्वतः आत्मज्ञानाने तृप्त व्हावें, समाधान मिळवावें. मग त्या ज्ञानचा उपयोग करुन लोकांना शिकवावे. जो स्वतः उत्तम पोहतो व तरतो त्यानें बुडणार्‍या माणसाला वांचवावे व तारावें हें योग्य आहे.  
उत्तम गुण स्वयें घ्यावे । ते बहुतांस सांगावे ।
वर्तल्याविण बोलावे । ते शब्द मिथ्या ॥ ३ ॥
३) आधीं स्वतः उत्तम गुण अंगीं आणावेत आणि मग तें पुष्कळांना सांगावेत. त्या गुणांचे आचरण स्वतः न करतां जर लोकांना सांगितलें तर सांगणारा खोटे शब्द बोलतो.  
स्नान संध्या देवार्चन । येकाग्र करावें जपध्यान ।
हरिकथा निरुपण । केलें पाहिजे ॥ ४ ॥
४) ज्ञानी माणसानें आचार व उपासना सोडूं नये. स्नान, संध्या, देवाची पूजा, एकाग्र मनानें; जप, ध्यान, हरिकथा आणि निरुपण या सर्व गोष्टीं करणें जरुर आहे.  
शरीर परोपकारीं लावावें । बहुतांच्या कार्यास यावें ।
उणें पडों नेदावें । कोणियेकाचें ॥ ५ ॥
५) आपलें शरीर परोपकारांत झिजवावें. पुष्कळ लोकांची कामें करुन द्यावी. कोणाचेंहि उणे पडूं देऊं नये. 
आडलें जाकसलें जाणावें । यथानशक्ति कामास यावें ।
मृदवचनें बोलत जावें । कोणीयेकासी ॥ ६ ॥
६) ज्यांचें अडलें असेल तें ओळखावें. जो गांजला असेल त्याचे दुःख जाणून, शक्य असेल तितकें त्याचे काम करुन द्यावें. कोणीही माणूस असो त्याच्याशी मृदु शब्दांनी बोलण्याची सवय ठेवावी.   
दुसर्‍याच्या दुःखें दुःखवावें । परसंतोषें सुखी व्हावें ।
प्राणीमात्रास मेळऊन घ्यावें । बर्‍या शब्दें ॥ ७ ॥  
७)  दुसर्‍याच्या दुःखानें दुःखी व्हावें. तसेंच दुसर्‍याच्या संतोषानें सुखी व्हावें. गोड शब्द बोलून माणसांना आपलेसें करुन घ्यावें.    
बहुतांचे अन्याये क्ष्मावे । बहुतांचे कार्यभाग करावे ।
आपल्यापरीस व्हावे । पारखे जन ॥ ८ ॥
८) पुष्कळांना त्यांच्या अन्यायाची क्षमा करावी. पुष्कळ लोकांना त्यांच्या कामांत मदत करावी. परके लोक आपल्या बाजुला वळवून घ्यावेत. 
दुसर्‍यांचें अंतर जाणावें । तदनुसारचि वर्तावें ।
लोकांस परीक्षित जावें । नाना प्रकारें ॥ ९ ॥
९) दुसर्‍याच्या मनांत काय आहें तें ओळखून त्या धोरणानें वागावें. अनेक प्रकारें लोकांची परीक्षा करीत असावें. 
नेमकचि बोलावें । तत्काळचि प्रतिवचन द्यावें ।
कदापी रागास न यावें । क्ष्मारुपें ॥ १० ॥
१०) जरुर तेवढेंच बोलावें. कोणी प्रश्र्ण विचारला तर त्याचे उत्तर चटकन द्यावें. अंगीं क्षमा असावी तिच्या बळावर कधीहीं रागाच्या आधीन होऊं नये. 
आलस्य अवघाच दवडावा । येत्न उदंडचि करावा ।
शब्दमत्सर न करावा । कोणीयेकाचा ॥ ११ ॥ 
११) आळस संपूर्ण नाहींसा करावा. अगदीं खूप प्रयत्न करावा. कोणी एखादा वेडा वाकडा शब्द बोलला तर तेवढ्यावरुन त्याचा द्वेष करुं नये.       
उत्तम पदार्थ दुसर्‍यास द्यावा । शब्द निवडून बोलावा ।
सावधपणें करीत जावा । संसार आपला ॥ १२ ॥
१२) उत्तम पदार्थ आपण न घेतां दुसर्‍यास द्यावा. शब्द बोलतांना अगदी निवडून बोलावा. अगदी सावधपणें आपला संसार करावा. 
मरणाचें स्मरण असावें । हरिभक्तीस सादर व्हावें ।
मरोन कीर्तीस उरवावें । येणें प्रकारें ॥ १३ ॥
१३) आपण एक दिवस मरणार आहोत याची जाणीव विसरुं नये. हरिभक्तीला नेहमी तयार असावें. अशा रीतीनें आयुष्य जगावें व मेल्यावर आपली कीर्ति मागें राहूं द्यावी. 
नेमकपणें वर्तों लागला । तो बहुतांस कळों आला ।
सर्व आर्जवी तयाला । काये उणें ॥ १४ ॥
१४) आपल्या ध्येयाला अनुरुप अशा शिस्तीनें माणूस एकदां कां वागूं लागला म्हणजे तो पुष्कळ लोकांना माहीत होतो. सर्व लोक त्याचे चाहते होतात. मग त्याला कांहीं कमी पडत नाहीं. 
ऐसा उत्तम गुणी विशेष । तयास म्हणावें पुरुष ।
जयाच्या भजनें जगदीश । तृप्त होये ॥ १५ ॥
१५) अशा उत्तम गुणांनी जो संपन्न असतो त्याला उत्तम पुरुष म्हणावें. त्यानें केलेल्या भक्तीनें परमेश्र्वर तृप्त होतो. प्रसन्न होतो. 
उदंड धिःकारुन बोलती । तरी चळों नेदावी शांति ।
दुर्जनास मोळोन जाती । धन्य ते साधु ॥ १६ ॥
१६) कोणी कितीही अवहेलना करुन बोलला तरी उत्तम पुरुषानें आपली शांती भंगू देऊं नये. दुर्जनांशी जे समरस होऊं शकतात ते साधु पुरुष खरोखर धन्य समजावेत.   
उत्तम गुणी श्रृंघारला । ज्ञानवैराग्यें शोभला ।
तोचि येक जाणावा भला । भूमंडळीं ॥ १७ ॥
१७) जो पुरुष उत्तम गुणांचा प्रेमानें अंगीकार करतो, ज्ञानानें व वैराग्यानें जो खरोखर शोभतो, तोच एक पुरुष जगामध्यें खरोखर चांगला असतो.  
स्वयें आपण कष्टावें । बहुतांचें सोसित जावें ।
झिजोन कीर्तीस ञरवावें । नाना प्रकारें ॥ १८ ॥
१८) आपण स्वतः कष्ट करावें. पुष्कळांसाठीं पुष्कळ सोसावें. लोकांसाठीं नाना प्रकारें झिजून आपली कीर्ति मागे ठेवावी. 
कीर्ती पाहों जातां सुख नाहीं । सुख पाहातां कीर्ती नाहीं ।
विचारेंविण कोठेंचि नाहीं । समाधान ॥ १९ ॥
१९) कीर्ति हवी असेल तर देहाला सुख देऊन चालणार नाहीं. देहाला सुख देण्याची लालसा असेल तर कीर्ति मिळणार नाहीं. विचारांवाचून कोणालाही खरें समाधान मिळणार नाहीं. 
परांतरास न लावावा ढका । कदापि पडों नेदावा चुका ।
क्ष्मासीळ तयाच्या तुका । हानी नाहीं ॥ २० ॥
२०) दुसर्‍याचे अंतःकरण दुखवूं नये. आपल्याहातून कधीहिं गैर कृति घडूं नये. जो खरा क्षमाशील असतो त्याच्या मोठेपणास कधीहिं उणेपणा येत नाहीं. 
आपलें अथवा परावें । कार्य अवघेंच करावें ।
प्रसंगीं कामास चुकवावें । हें विहित नव्हे ॥ २१ ॥
२१) एखादे काम आपलें असो कीं दुसर्‍याचे असो तें अगदी मनापासून करावें. काम करण्याचा प्रसंगा आला असतां कामचुकारपणा करणें कांहीं बरोबर नव्हें.     
बरें बोलतां सुख वाटतें । हें तो प्रत्यक्ष कळतें ।
आत्मवत परावें तें । मानीत जावें ॥ २२ ॥
२२) गोड शब्द बोलण्यानें मनाला आनंद होतो. हा तर प्रत्यक्ष अनुभव आहे. यावरुन आपण दुसर्‍याला आपल्यासारखें मानायला शिकावें.     
कठिण शब्दें वाईट वाटतें । हें तों प्रत्ययास येतें ।
तरी मग वाईट बोलावें तें । काये निमित्य ॥ २३ ॥
२३) कोणी कठोर शब्द बोलला तर मनाला वाईट वाटतें हाहि प्रत्यक्ष अनुभव येतो. तर मग विनाकारण वाईट बोलूं नये हें उत्तम होय.  
आपणास चिमोटा घेतला । तेणें कासाविस जाला ।
आपणावरुन दुसर्‍याला । राखत जावें ॥ २४ ॥
२४) आपल्याला कोणी चिमटा घेतला तर आपला जीव कासावीस होतो. हें लक्षांत ठेवून दुसर्‍याला दुःख देऊं नये. 
जे दुसर्‍यास दुःख करी । ते अपवित्र वैखरी । 
आपणास घात करी । कोणियेके प्रसंगीं ॥ २५ ॥
२५) ज्या बोलण्यानें दुसर्‍यास दुःख होतें, जी वाणी दुसर्‍यास दुःखी करते, ती वाणी अपवित्र होय. कोण्या एका प्रसंगी ती आपलादेखील घात करते. 
पेरिलें तें उगवतें । बोलण्यासारिखें उत्तर येतें ।
तरी मग कर्कश बोलावें तें । काये निमित्य ॥ २६ ॥
२६) जें बी पेरावें तेंच उगवते. आपण जसें बोलावें तसें उलट उत्तर येते. असें जर आहे तर मग विनाकारण कठोर व कटू शब्द न बोलणें हें उत्तम होय.   
आपल्या पुरुषार्थवैभवें । बहुतांस सुखी करावें ।
परंतु कष्टी करावें । हे राक्षेसी क्रिया ॥ २७ ॥ 
२७) आपण श्रेष्ठपदास चढून वैभव मिळवावें. त्या वैभवानें पुष्कळांना सुखी करावें. पण त्या वैभवाच्या जोरावर लोकांना दुःखी करणें हें राक्षसी होय.
दंभ दर्प अभिमान । क्रोध आणी कठिण वचन ।
हें अज्ञानाचें लक्षण । भगवद्गीतेंत बोलिलें ॥ २८ ॥
२८) दंभ, दर्प, अभिमान, क्रोध आणि कठोर वाणी ही अज्ञानाची लक्षणें आहेत. असें भगवद्गीता सांगते. 
जो उत्तम गुणें शोभला । तोचि पुरुष माहा भला ।
कित्येक लोक तयाला । शोधीत फिरती ॥ २९ ॥
२९) वर सांगितलेल्या उत्तमगुणांनी जो शोभून दिसतो तोच खरा थोर पुरुष होय. अशा पुरुषाला लोक शोधीत येतात.
क्रियेवीण शब्दज्ञान । तेंचि स्वानाचें वमन ।
भले तेथें अवलोकन । कदापी न करिती ॥ ३० ॥
३०) क्रियाहीन नुसतें शब्दज्ञान हें कुत्र्याच्या ओकारीप्रमाणें अति किळसवाणें असते. चांगली माणसें त्याच्याकडे कधीं लक्षही देत नाहीत. 
मनापासून भक्ति करणें । उत्तम गुण अवश्य धरणें ।
तया माहांपुरुषाकारणें । धुंडीत येती ॥ ३१ ॥
३१) जो अगदी मनापासून भगवंताची भक्ति करतो आणि अगत्यानें उत्तमगुणांचा अभ्यास करतो, तो खरा थोर पुरुष असतो. अशा थोर पुरुषाला लोक शोधीत येतात.  
ऐसा जो माहानुभाव । तेणें करावा समुदाव ।
भक्तियोगें देवाधिदेव । आपुला करावा ॥ ३२ ॥
३२) असा जो थोर स्वानुभवी पुरुष असेल त्यानें लोकांना एकत्र आणून त्यांचे पुढारीपण करावें. लोकांना भक्तीच्या मार्गास लावून भगवंत आपलासा करुन घ्यावा. 
आपण आवचितें मरोन जावें । मग भजन कोणें करावें ।
याकारणें भजनास लावावे । बहुत लोक ॥ ३३ ॥
३३) समजा जर आपण असस्मात मरुन गेलेो तर भगवंताची भक्ति करणारा राहाणार नाहीं. म्हणून पुष्कळ लोक भगवंताच्या भजनाला लावावेत. 
आमची प्रतिज्ञा ऐसी । कांहीं न मागावें शिष्यासी ।
आपणामागें जगदीशासी । भजत जावें ॥ ३४ ॥
३४) आपण आपल्या शिष्यांजवळ कांहींहि मागायचे नाहीं अशी त्याची प्रतिज्ञा असते. तरी देखील तो एक गोष्ट मागतो; ती ही कीं आपल्या पश्र्चात शिष्यांनी भगवंताची भक्ति चालूं ठेवावी.
याकारणें समुदाव । जाला  पाहिजे मोहोछाव ।
हातोपातीं देवाधिदेव । वोळेसा करावा ॥ ३५ ॥
३५) हें साध्य होण्यासाठीं लोकसमुदाय तयार व्हायला पाहिजे. आणि मोठे उत्सव घडवून आणले पाहिजेत. मग परमार्थ पाहतां पाहतां आपल्यावर कृपा करील असें करणें शक्य होतें.  
आतां समुदायाकारणें । पाहिजेती दोनी लक्षणें ।
श्रोतीं येथें सावधपणें । मन घालावें ॥ ३६ ॥
३६) अशा प्रकारचा लोकसमुदाय तयार होण्यासाठीं पुढार्‍याच्या अंगीं दोन लक्षणें असावी लागतात. श्रोत्यांनीं मनापासून तीं सावधानतेनें ऐकावी. 
जेणें बहुतांस घडे भक्ति । ते हे रोकडी प्रबोधशक्ति ।
बहुतांचें मनोगत हातीं । घेतलें पाहिजे ॥ ३७ ॥
३७) रोकडी प्रबोधशक्ति हे पहिलें लक्षण तर पुष्कळ लोकांचें मनोगत हातीं घेणें, हें दुसरें लक्षण होय.  महंताच्या अंगीं उत्तम प्रकारचे वकृत्व असावें. आपला विषय उत्तमप्रकारें, सोपा करुन, रसभरित करुन लोकांपुढें मांडता आला पाहिजे. शिवाय माणसांशी संबंध येईल त्यांची निष्ठा आपल्यावर बसेल असें बोलणें, चालणें असलें पाहिजें.  
मागां बोलिले उत्तम गुण । तयास मानिती प्रमाण ।
प्रबोधशक्तीचें लक्षण । पुढें चाले ॥ ३८ ॥
३८) मागें जें उत्तम गुण सांगितलें ते ज्याच्या अंगीं आढळतात त्याला लोक मानूं लागतात. अशा पुरुषाच्या वकृत्वाला वजन येते. व त्यांच्या कार्याचा प्रसार होतो. 
बोलण्यासारिखें चालणें । स्वयें करुन बोलणें ।
तयाचीं  वचनें प्रमाणें । मानिती जनीं ॥ ३९ ॥
३९) जो पुरुष जसें बोलतो तसें वागतो, जो स्वतः आधी आचरण करतो व मग लोकांना तसें वागण्यास सांगतो, अशा पुरुषाच्या शब्दाला लोक प्रमाण मानतात. 
जें जें जनास मानेना । तें तें जनहि मानीना ।
आपण येकला जन नाना । सृष्टिमधें ॥ ४० ॥
४०) जी गोष्ट लोकांच्या मनाला पटत नाहीं ती गोष्ट लोक कधींहि प्रमाण मानीत नाहींत. " माझेंच म्हणणें खरें " असें जगांत चालत नाहीं. आपण एकाकी व जगांत पुष्कळ लोक आहेत. त्यामुळें आपण जगांत एकटे पडूं. 
म्हणोन सांगाती असावे । मानत मानत शिकवावे ।
हळु हळु सेवटा न्यावे । विवेकानें ॥ ४१  ॥   
४१) म्हणून लोकांना बरोबर घेऊन चालावें. क्रमाक्रमानें त्यांना शिकवावें. आणि विवेकानें त्यांना हळुहळु शेवटच्या पायरीपर्यंत न्यावें.  
परंतु हे विवेकाची कामें । विवेकी करील नेमें ।
इतर ते बापुडे भ्रमें । भांडोंच लागले ॥ ४२ ॥
४२) परंतु अशाप्रकारचें पुढारीपणाचे काम हें विवेकाचे आहे. जो खरोखरी विवेकी आहे तो हें बरोबर करतो. इतर बिचारे गैरसमजानें आपापसांत भांडत बसतात. 
बहुतांसीं भांडतां येकला । शैन्यावांचून पुरवला । 
याकारणें बहुतांला । राजी राखावें ॥ ४३ ॥
४३) सैन्यावांचून सेनापती जसा एकटा लढूं शकत नाहीं त्याचप्रमाणें जो पुढारी पुष्कळ लोकांशी भांडतो तो एकटा कार्य करुं शकत नाहीं. म्हणून त्यानें पुष्कळ लोकांना आपलेसे करुन ठेवावें. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे उत्तमपुरुषनिरुपणनाम समास दहावा ॥
Samas Dahava UttamPurusha Nirupan
समास दहावा उत्तमपुरुष निरुपण 


Custom Search

No comments: