Dashak Terava Samas Tisara Ubharani Nirupan
Samas Choutha Ubharani Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about the world and creation of it.
समास तिसरा उभारणी निरुपण
श्रीराम ॥
ब्रह्म घन आणि पोकळ । आकाशाहून विशाळ ।
निर्मळ आणि निश्र्चळ । निर्विकारी ॥ १ ॥
१) ब्रह्म सर्वत्र गच्च भरलेले आहे. पण तें अगदी सूक्ष्म असल्यानें पोकळ वाटते. आकाशाहून विशाल असणारे हे ब्रह्म निर्मळ, निश्र्चळ व निर्विकार आहे.
एैसेंचि असतां कित्येक काळ । तेथें आरंभला भूगोळ ।
तया भूगोाळाचें मूळ । सावध ऐका ॥ २ ॥
२) अशा अवस्थेंत खूप काळ गेल्यावर त्याच्यामध्यें विश्र्नि र्निमितीला आरंभ झाला. त्या विश्र्वाचें मूळ लक्षपूर्वक ऐकावें.
परब्रह्म असतां निश्र्चळ । तेथें संकल्प उठिला चंचळ ।
तयास बोलिजे केवळ । आदिनारायेण ॥ ३ ॥
३) परब्रह्म निश्र्चळपणें असतां त्यांत चंचळ संकल्प उठला त्याला आदिनारायण असें म्हणतात.
मूळमाया जगदेश्र्वर । त्यासीच म्हणिजे शड्गुणैश्र्वर ।
अष्टधा प्रकृतीचा विचार । तेथें पाहा ॥ ४ ॥
४) मूळमाया, जगदीश्र्वर यांनाच षड्गुणेश्र्वर म्हणतात. अष्टधा प्रकृतीचा विचार तेथेंच आरंभतो.
ऐलिकडे गुणक्षोभिणी । तेथें जन्म घेतला त्रिगुणीं ।
मूळ वोंकाराची मांडणी । तेथून जाणावी ॥ ५ ॥
५) त्याच्या अलीकडे गुणक्षोभिणी असते. कारण सत्व,रज व तम हे तीन गुण तेथें जन्मतात. मूळ ओंकाराची मांडणी तेथूनच होते.
अकार उकार मकार । तिनी मिळोन वोंकार ।
पुढें पंचभूतांचा विस्तार । विस्तारला ॥ ६ ॥
६) अकार, उकार व मकार मिळून ओंकार घडतो. त्यानंतर पंचभूतांचा सारा विस्तार सर्वत्र पसरतो.
आकाश म्हणिजेतें अंतरात्म्यासी । तयापासून जन्म वायोसी ।
वायोपासून तेजासी । जन्म जाला ॥ ७ ॥
७) अंतरात्म्याला आकाश म्हणतात. त्यापासून वायुचा जन्म होतो. व वायुपासून तेजाचा जन्म होतो.
वायोचा कातरा घसवटे । तेणें उष्णें वन्ही पेटे ।
सूर्यबिंब तें प्रगटे । तये ठांई ॥ ८ ॥
८) एकमेकासमोरुन येणारे वायुचे दोन प्रवाह एकमेकांशी घासतात व त्या घर्षणांतून अग्नि पेट घेतो. सूर्यबिंब तेथें प्रगट होते.
वारा वाजतो सीतळ । तेथें निर्माण जालें जळ ।
तें जळ आळोन भूगोळ । निर्माण जाला ॥ ९ ॥
९) जो थंड वारा वाहातो त्यांतून पाणी उत्पन्न होते. तें पाणी थिजते. त्यापासून पृथ्वी बनते.
त्या भूगोळाचे पोटीं । अनंत बीजंचिया कोटी ।
पृथ्वी पाण्या होता भेटी । अंकुर निघती ॥ १० ॥
१०) पृथ्वीच्या पोटीं कोट्यावधि बिजें असतात. पाण्याशी त्यांचा संबंध आल्यावर त्यांतून अंकुर फुटतात.
पृथ्वी वल्ली नाना रंग । पत्रें पुष्पांचे तरंग ।
नाना स्वाद ते मग । फळें जालीं ॥ ११ ॥
११) त्यांतून नाना प्रकारचे वृक्ष व वेली, नाना रंगाची पानें, फुलें आणि नाना प्रकारचे स्वाद असणारीं फळें निर्माण होतात.
पत्रें पुष्पें फळें मुळें । नाना वर्ण नाना रसाळें ।
नाना धान्यें अन्नें केवळें । तेथून जालीं ॥ १२ ॥
१२) नाना रंगांची व रसांनी भरलेलीं पानें, फुलें, फळें, आणि मुळें त्याचप्रमाणें नाना प्रकारची अन्नधान्यें सारी त्या अंकुरापासूनच निर्माण होतात.
अन्नापासून जालें रेत । रेतापासून प्राणी निपजत ।
ऐसी हे रोकडी प्रचित । उत्पत्तीची ॥ १३ ॥
१३) अन्नापासून वीर्य उत्पन्न होतें आणि वीर्यापासून प्राणी निपजतो. हा तर जीचवाच्या उत्पत्तीचा प्रत्यक्ष अनुभव आहे.
अंडज जारज श्र्वेतज उद्वीज । पृथ्वी पाणी सकळांचे बीज ।
ऐसें हें नवल चोज । सृष्टिरचनेचें ॥ १४ ॥
१४) अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज हे चारी प्रकारचे जीवप्राणी, पृथ्वी व पाणी यांच्यापासून उपजतात. या सृष्टिरचनेचें हेंच मोठें नवल आहे.
च्यारि खाणी च्यारि वाणी । चौर्यासि लक्ष जीवयोनी ।
निर्माण झाले लोक तिनी । पिंडब्रह्मांड ॥ १५ ॥
१५) चार खाणी, चार वाणी, चौर्याांशी लक्ष जीवयोनी, तिन्ही लोक आणि सारें पिंडब्रह्मांड अशा प्रकारें निर्माण झालें.
मुळीं अष्टधा प्रकृती । अवघें पाण्यापासून जन्मती ।
पाणी नस्तां मरती । सकळ प्राणी ॥ १६ ॥
१६) मुळांत अष्टधा प्रकृति आहे. तिच्यांतील पंचभूतांमध्यें पाणी असतें. त्या पाण्यापासून सारें जीव जन्मतात. पाणी मिळाले नाहीं तर सारें जीव मरतात.
नव्हें अनुमानचें बोलणें । याचा बरा प्रत्यय घेणें ।
वेदशास्त्रें पुराणें । प्रत्ययें घ्यावीं ॥ १७ ॥
१७) हें कांहीं नुसतें कल्पनेनें बोलणें नाहीं. पाण्यापासून सारे जीव जन्मतात याचा अनुभव घेऊन पाहावा. वेद, शास्त्र व पुराणें प्रत्यक्ष अनुभवानें स्वीकारावी.
जें आपल्या प्रत्यया येना । तें अनुमानिक घ्यावेन ।
प्रत्ययाविण सकळ जना । वेवसाये नाहीं ॥ १८ ॥
१८) जो सिद्धान्त आपल्या अनुभवास येत नाहीं. प्रत्यक्ष अनुभवाच्या परीक्षेला उतरत नाहीं, तो अनुमानानें स्वीकारु नये. जीवनांत व व्यवहारांत निर्णय घेतांना प्रत्यक्ष अनुभवावाचून दुसरें साधन नाही.
वेवसाये प्रवृत्ती निवृत्ती । दोहिंकडे पाहिजे प्रचिती ।
प्रचितीवीण अनुमानें असती । ते विवेकहीन ॥ १९ ॥
१९) व्यवहार प्रपंचाचा किंवा परमार्थाचा दोन्हीकडे अनुभवच पाहिजे. अनुभव न घेतां जे लोक नुसतें कल्पनेनें चालतात, तें विवेकहीन असतात.
ऐसा सृष्टिरचनेचा विचार । संकळित बोलिला प्रकार ।
आतां विस्ताराचा संहार । तोहि ऐका ॥ २० ॥
२०) अशा रीतीनें विश्वरचना कशीं होतें हें थोडक्यांत वर्णन केलें. आतां या विश्व विस्ताराचा संहार कसा होतो तें ऐका.
मुळापासून सवेटवरी । अवघा आत्मारामचि करी ।
करी आणि विवरी । येथेयोग्य ॥ २१ ॥
२१) अगदी प्रारंभापासून अखेरपर्यंत सगळें कांहीं आत्मारामच घडवतो. तो जसें घडवून आणतो तसाच तो सगळ्याचा उलगडा करतो.
पुढें संव्हार निरोपिला । श्रोतीं पाहिजे ऐकिला ।
इतुक्याउपरी जाला । समास पूर्ण ॥ २२ ॥
२२) पुढें संहार सांगितला आहे. तो जरुर ऐकावा. येथें हा समास संपला.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे उभारणीनिरुपणनाम समास तिसरा ॥
Samas Tisara Ubharani Nirupan
समास तिसरा उभारणी निरुपण
Custom Search
No comments:
Post a Comment