Dashak Terava Samas Pahila Aatmanatma Vivek
Samas Pahila Aatmanatma Vivek, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Aatma and Anatma. Samarth is asking us to think what is real and what is not; What is permanent and what is temporary.
समास पहिला आत्मानात्मविवेक
श्रीरामसमर्थ ॥
आत्मानात्मविवेक करावा । करुन बरा विवरावा ।
विवरोन सदृढ धरावा । जीवामद्हें ॥ १ ॥
१) साधकाने आत्मानात्मविवेक करावा. त्या विवेकानें चांगलें विवरण करावें. असें विवरण केल्यावर मग तो विवेल अंतःकरणांत दृढपणें स्थिर ठेवावा.
आत्मा कोण अनात्मा कोण । त्याचें करावें विवरण ।
तेंचि आतां निरुपण । सावध ऐका ॥ २ ॥
२) आत्मा कोणता व अनात्मा कोणता याचें सूक्ष्म विवरण करावें. तेंच विवरण आतां लक्ष देऊन ऐकावें.
च्यारि खाणी च्यारि वाणी । चौर्यासि लक्ष जीवप्राणी ।
संख्या बोलली पुराणीं । वर्तती आतां ॥ ३ ॥
३) जगामध्यें जें जीवप्राणी आढळतात त्यांच्या चार खाणी व चार वाणी मिळून चौर्यांशी लक्ष योनी आहेत. असें पुराणांतरीं वर्णन आहे.
नाना प्रकारीचीं शरीरें । सृष्टींत दिसती अपारें ।
तयामधें निर्धारें । आत्मा कवणु ॥ ४ ॥
४) या चौर्यांशीं लक्ष योनींमध्यें अनेक प्रकारची शरीरें दिसतात. त्यांच्या अंतर्यामीं आत्मा कोणता तें निश्र्चयात्मक रीतीनें शोधून काढावें.
दृष्टीमधें पाहातो । श्रवणामध्यें ऐकतो ।
रसनेमध्यें स्वाद घेतो । प्रत्यक्ष आतां ॥ ५ ॥
५) देहांत राहणारा आत्मा डोळ्यांतून पाहातो. कानांतून ऐकतो. जिभेंतून स्वाद घेतो. असें प्रत्यक्ष दिसतें.
घ्राणामधें वास घेतो । सर्वांगीं तो स्पर्शतो ।
वाचेमधें बोलवितो । जाणोनि शब्द ॥ ६ ॥
६) तो नाकांतून वास घेतो. सर्वांगानें स्पर्श करतो. शब्द ओळखून वाणींतून बोलवितो.
सावधान आणि चंचळ । चहुंकडे चळवळ ।
येकलाचि चालवी सकळ । इंद्रियेंद्वारा ॥ ७ ॥
७) आत्मा मोठा सावध असून चंचळ आहे. गतिमान आहे. इंद्रियांच्या द्वारां तो एकटा सर्व बाजूस सगळी हालचाल घडवून आणतो.
पाये चालवी हात हालवी । भृकुटी पालवी डोळा घालवी ।
संकेतखुणा बोलवी । तोचि आत्मा ॥ ८ ॥
८) तों पायानें चालवतो, हात हलवतो, भुवया खालीवर करतो, डोळे झांकतो, तोच आत्मा संकेत, खुणा करुन मनांतील हेतु स्पष्ट करतो.
धिटाई लाजवी खाजवी । खोंकवी वोकवी थुंकवी ।
अन्न जेऊन उदक सेवी । तोचि आत्मा ॥ ९ ॥
९) आत्माच धीटपणा देतो. तोच लाजवतो, खाजवतो, तसेच तोच खोकायला, ओकायला व थुंकायला लावतो. जेवण झाल्यावर आत्माच पाणी पिण्यास लावतो.
मळमूत्रत्याग करी । शरीरमात्र सावरी ।
प्रवृत्ति निवृत्ति विवरी । तोचि आत्मा ॥ १० ॥
१०) तोच आत्मा मलमूत्राचा त्याग करवतो. सर्व शरीराचा समतोल सावरुन धरतो. तोच प्रवृत्ति व निवृत्ति यांचे विवरण करतो.
ऐके देखे हुंगे चाखे । नाना प्रकारें वोळखे।
संतोष पावे आणी धाके । तोचि आत्मा ॥ ११ ॥
११) तोच आत्मा ऐकत , पाहतो, हुंगतो, चाखतो, अनेक रीतीनें ओळखतो, आनंदी होतो आणि घाबरतो.
आनंद विनोद उदेग चिंता । काया छ्याया माया ममता ।
जीवित्वें पावे नाना वेथा । तोचि आत्मा ॥ १२ ॥
१२) आनंद, विनोद, उद्वेग, चिंता वगैरे अनुभव तो आत्माच देतो. आत्म्याची छाया असणार्या देहाबद्दल खरेपणाचा भ्रम व ममता तोच निर्माण करतो. जीवदशेमध्यें भोगावें लागणारें अनेक क्लेश तो आत्माच भोगतो.
पदार्थाची आस्था धरी । जनीं वाईट बरें करी ।
आपल्यां राखे पराव्यां मारी । तोचि आत्मा ॥ १३ ॥
१३) अनेक पदार्थांची आसक्ति धरणारा, लोकांत बरीवाईट कर्में करणारा, आपल्या माणसास सांभाळणारा, आणि परक्यास मारणारा तो आत्माच होय.
युध्ये होतां दोहिंकडे । नाना शरीरीं वावडे ।
परस्परें पाडी पडे । तोचि आत्मा ॥ १४ ॥
१४) जेव्हां एखादें युद्ध पेटतें तेव्हां दोन्ही बाजूंच्या अनेक शरीरांत तो आत्माच वावरतो.. एकमेकांशीं लढणार्या माणसांपैकी त्याच्यामुळें एक पाडतो व दुसरा त्याच्यामुळेंच पडतो.
तो येतो जातो देहीं वर्ततो । हासतो रडतो प्रस्तावतो ।
समर्थ करंटा होतो । व्यापासारिखा ॥ १५ ॥
१५) तो देहांत येतो, देहांतून जातो व देहांत राहतो. तो हांसतो, रडतो व पश्र्चाताप पावतो. ज्याच्या त्याच्या व्यापाप्रमाणें तो आत्माच भग्यवान किंवा भाग्यहीन बनतो.
होतो लंडी होतो बळकट । होतो विद्यावंत होतो धट ।
न्यायेवंत होतो उत्धट । तोचि आत्मा॥ १६ ॥
१६) तो आत्माच बलहीन, भ्याड किंवा बलवान होतो. विद्यासंपन्न किंवा धटिंगण बनतो. न्यायप्रिय किंवा उद्धट होतो.
धीर उदार आणि कृपण । वेडा आणि विचक्षण ।
उछक आणि सहिष्ण । तोचि आत्मा॥ १७ ॥
१७) तो आत्माच धीर, उदार आणि कंजूष होतो. वेडा वा शाहाणा होतो. उश्रृंखल आणि सहनशील होतो.
विद्या कुविद्या दोहिकडे । आनंदरुप वावडे ।
जेथें तेथें सर्वांकडे । तोचि आत्मा॥ १८ ॥
१८) विद्या आणि अविद्या दोन्हींमध्यें तो आत्माच असतो. आनंदरुपानें तो आत्माच जिकडेतिकडे सर्वांच्या ठिकाणीं वावरतो.
निजे उठे बैसे चाले । धावे धावडी तोले ।
सोइरे धायेरे केले । तोचि आत्मा॥ १९ ॥
१९) तो आत्माच निजतो, उठतो, बसतो, चालतो, पळतो, पिटाळतो, डोलतो, तोलतो, आणि सोयरेधायरे जोडतो.
पोथी वाची अर्थ सांगे । ताळ धरी गाऊं लागे ।
वाद वेवाद वाउगे । तोचि आत्मा॥ २० ॥
२०) तो आत्माच पोथी वाचतो व अर्थ सांगतो. ताल धरतो व गाणें गातो. आणि उगाच वादविवाद करत बसतो.
आत्मा नस्तां देहांतरीं । मग तें प्रेत सचराचरीं ।
देहसंगें आत्मा करी । सर्व कांहीं ॥ २१ ॥
२१) देहांत जर आत्मा नसेल तर तें प्रेतच होते. या विश्र्वांत देहाच्यायोगें आत्मा सगळें कांहीं करतो.
येकेंविण येक काये । कामा नये वायां जाये ।
म्हणोनि हा उपाये । देहयोगें ॥ २२ ॥
२२) देह आणि आत्मा यांपैकी एक असेल व त्याच्याबरोबर दुसरे नसेल तर दोन्ही कामास येत नाहींत. फुकट जातात. म्हणून आत्म्याचा देहाशी संयोग होणें हाच दोन्ही उपयोगी पडण्याचा मार्ग आहे.
देह अनित्य आत्मा नित्य । हाचि विवेक नित्यानित्य ।
अवघें सूक्ष्माचें कृत्य । जाणती ज्ञानी ॥ २३ ॥
२३) देह नाशवंत आहे. तर आत्मा शाश्वत आहे. हें विचारानें पटणें याचे नांव नित्यानित्यविवेक होय. जगांतील सार्या घटना सूक्ष्म आत्म्याच्या सत्तेनेच चालतात. हीं गोष्ट ज्ञानी माणसें ओळखतात.
पिंडी देहधर्ता जीव । ब्रह्मांडीं देहधर्ता शिव ।
ईश्र्वरतनुचतुष्टये सर्व । ईश्र्वर धर्ता ॥ २४ ॥
२४) पिंडाच्या दृष्टीनें देह धारण करणारा आत्मा तो जीव, तर ब्रह्मांडाच्या दृष्टीनें विश्व धारण करणारा आत्मा तो शिव होय. विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूळप्रकृति या आपल्या चार देहांनीं ईश्र्वर सर्व विश्र्वाला धारण करतो.
त्रिगुणापर्ता जो ईश्र्वर । अर्धनारीनटेश्र्वर ।
सकळ सृष्टीचा विस्तार । तेथून जाला ॥ २५ ॥
२५) तीन गुणांच्या पलीकडे असणारा जो ईश्र्वर किंवा अर्धनारीनटेश्र्वर, त्याच्यापासून संपूर्ण विश्र्वाचा विस्तार झालेला आहे.
बरवें विचारुन पाहीं । स्त्री पुरुष तेथें नाहीं ।
चंचळरुप येतें कांहीं । प्रत्ययासी ॥ २६ ॥
२६) अर्धनारीनटेश्र्वर असें म्हणत असतां तेथें स्त्री व पुरुष असा भेद नसतो. हें नीट विचारानें समजून घ्यावें. त्या ठिकाणीं थोडे चंचळपण अनुभवास येते इतकेंच.
मुळींहून सेवटवरी । ब्रह्मादि पिल्पीका देहधारी ।
नित्यानित्य विवेक चतुरीं । जाणिजे ऐसा ॥ २७ ॥
२७) अगदी मूळापासून ते शेवटपर्यंत किंवा ब्रह्मदेवापासून ते मुंगीपर्यंत सगळे देहधारी आहेत. साकार आहेत. त्याला अनुसरुन शहाण्या माणसांनीं नित्य काय व अनित्य काय याचा विवेक करावा.
जड तितुकें अनित्य । आणि सूक्ष्म तितुकें नित्य ।
याहिमध्यें नित्यानित्य । पुढें निरोपिलें ॥ २८ ॥
२८) जें जें जड तें तें अनित्य समजावें. जें जें सूक्ष्म आहे तें तें नित्य समजावें. यामधें अधिक खोलांत शिरुन आणिक नित्यानित्य विवेक कसा करावा तें पुढें सांगितलें आहें.
स्थूळ सूक्ष्म वोलांडिलें । कारण माहाकारण सांडिलें ।
विराट हिरण्यगर्भ खंडिलें । विवेकानें ॥ २९ ॥
२९) या खोल विवेकांत स्थूल सूक्ष्म मागें टाकायचे, कारण माहाकारण देह मागें टाकायचे , विराट व हिरण्यगर्भसुद्धा ओलांडायचे.
अव्याकृत मूळप्रकृती । तेथें जाऊन बैसली वृत्ती ।
तें वृत्ति व्हावया निवृत्ति । निरुपण ऐका ॥ ३० ॥
३०) अशा रीतीनें वृत्ति सूक्ष्म व विशाल होत अव्याकृत व मूळप्रकृतीशी जाऊन बसतें. त्या वृत्तिचीही निवृत्ति व्हायला पाहिजे. त्याचा उपाय ऐका.
आत्मानात्मविवेक बोलिला । चंचळात्मा प्रत्यया आला ।
पुढिले समासीं निरोपिला । सारासार विचार ॥ ३१ ॥
३१) या समासांत जो आत्मानात्मविवेक सांगितला त्याच्या योगानें चंचळ अंतरात्मा अनुभवास येतो. त्याच्या पलीकडे जाण्यास पुढील समासांत सारासार विचार सांगितला आहे.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मानात्मविवेकनाम समास पहिला ॥
Samas Pahila Aatmanatma Vivek
समास पहिला आत्मानात्मविवेक
Custom Search
No comments:
Post a Comment