ShriRamcharitmans Part 48
Doha 231 to 233
श्रीरामचरितमानस भाग ४८
दोहा २३१ ते २३३
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा--करत बतकही अनुज सन मन सिय रुप लोभान ।
मुख सरोज मकरंद छबि करइ मधुप इव पान ॥ २३१ ॥
अशा प्रकारे श्रीराम हे लक्ष्मणाशी बोलत होते, परंतु मन सीतेच्या रुपावर भाळले होते व ते सीतेच्या मुखरुपी कमलाचा सौंदर्यरुप मकरंद रस भ्रमराप्रमाणे प्राशन करीत होते. ॥ २३१ ॥
चितवति चकित चहूँ दिसि सीता । कहँ गए नृपकिसोर मनु चिंता ॥
जहँ बिलोक मृग सावक नैनी । जनु तहँ बरिस कमल सित श्रेनी ॥
सीता चकित होऊन चोहीकडे पाहात होती. तिला हुरहुर लागली होती की, राजकुमार कुठे गेले असावेत ? हरिणाक्षी सीतेची दृष्टी जेथे पडत होती, तेथे जणू श्वेत कमळांच्या पंक्ती फुलत होत्या. ॥ १ ॥
लता ओट तब सखिन्ह लखाए । स्यामल गौर किसोर सुहाए ॥
देखि रुप लोचन ललचाने । हरषे जनु निज निधि पहिचाने ॥
तेव्हा सख्यांनी सीतेला वेलींच्या आड असलेल्या सुंदर श्याम व गौर कुमारांना दाखविले. त्यांचे रुप पाहून सीतेचे नेत्र आसुसले. ते नेत्र इतके प्रसन्न झाले की, जणू त्यांना आपला हरवलेला खजिनाच सापडला. ॥ २ ॥
थके नयन रघुपति छबि देखें । पलकन्हिहूँ परिहरीं निमेषें ॥
अधिक सनेहँ देह भै भोरी । सरद ससिहि जनु चितव चकोरी ॥
श्रीरामांचे रुप पाहून सीतेचे नेत्र थक्क झाले. पापण्या हलणे बंद झाले. आत्यंतिक प्रेमामुळे शरीर विव्हळ झाले. जणू शरद ऋतूतील चंद्राला बेहोष होऊन चकोरी पाहात होती. ॥ ३ ॥
लोचन मग रामहि उर आनी । दीन्हे पलक कपाट सयानी ॥
जब सिय सखिन्ह प्रेमबस जानी । कहि न सकहिं कछु मन सकुचानी ॥
नेत्रांच्या मार्गाने श्रीरामांना हृदयात आणून जानकीने पापण्यांची दारे बंद करुन घेतली. ( डोळे मिटून ती ध्यान करु लागली. ) सख्यांनी जेव्हा बघितले की, सीता प्रेमात मग्न झाली आहे, तेव्हा त्यांच्या मनात संकोच वाटू लागला. पण त्या काही बोलू शकत नव्हत्या. ॥ ४ ॥
दोहा--लताभवन तें प्रगट भे तेहि अवसर दोउ भाइ ।
निकसे जनु जुग बिमल बिधु जलद पटल बिलगाइ ॥ २३२ ॥
त्याचवेळी दोघे भाऊ लतामंडपातून बाहेर पडले. जणू दोन निर्मल चंद्र ढगांचा पडदा सारुन बाहेर आले होते. ॥ २३२ ॥
सोभा सीवँ सुभग दोउ बीरा । नील पीत जलजाभ सरीरा ॥
मोरपंख सिर सोहत नीके । गुच्छ बीच बिच कुसुम कली के ॥
दोघे भाऊ सौंदर्याची परिसीमा होते. त्यांच्या शरीराची कांती निळ्या व पिवळ्या कमळांसारखी होती. शिरावर सुंदर मोरपंख शोभत होते. त्यांच्यामधून फुलांच्या कळ्यांचे गुच्छ लावलेले होते. ॥ १ ॥
भाल तिलक श्रमबिंदु सुहाए । श्रवन सुभग भूषन छबि छाए ॥
बिकट भृकुटि कच घूघरवारे । नव सरोज लोचन रतनारे ॥
माथ्यावर तिलक व धर्मबिंदू शोभून दिसत होते. कानांतील सुंदर भूषणांची शोभा ( गालांवर ) झळकत होती. कमानदार भुवया व कुरळे केस होते. लाल नवकमलांप्रमाणे लालसर नेत्र होते. ॥ २ ॥
चारु चिबुक नासिका कपोला । हास बिलास लेत मनु मोला ॥
मुखछबि कहि न जाइ मोहि पाहीं । जो बिलोकि बहु काम लजाहीं ॥
हनुवटी, नाक व गाल फार सुंदर होते आणि त्यांच्या स्मित हास्याची शोभा मन मोहून टाकीत होती. त्या मुखाचे सौंदर्य वर्णन करण्यास मी समर्थ नाही. कारण ते पाहून असंख्य कामदेव लज्जित होत होते. ॥ ३ ॥
उर मनि माल कंबु कल गीवा । काम कलभ कर भुज बलसींवा ॥
सुमन समेत बाम कर दोना । सावँर कुअँर सखी सुठि लोना ॥
वक्षःस्थळावर रत्नांच्या माळा रुळत होत्या. शंखासारखा सुंदर गळा होता. कामदेवाच्या हत्तीच्या सोंडेप्रमाणे निमुळते होत गेलेले सुकुमार बाहू होते. ते बळाचे परमसीमा होते. ज्यांच्या डाव्या हातात फुलांनी भरलेले द्रोण आहे, हे सखी, तो सावळा कुमार तर फार सुंदर आहे. ' ॥ ४ ॥
दोहा--केहरि कटि पट पीत धर सुषमा सील निधान ।
देखि भानुकुलभूषनहि बिसरा सखिन्ह अपान ॥ २३३ ॥
सिंहासारखी ( बारीक व लवचिक ) कटी असणारे, पीतांबर परिधान केलेले, शोभा व शीलाचे भांडार असणारे, सूर्यकुलाचे भूषण, श्रीराम यांना पाहून सख्यासुद्धा भान हरपून गेल्या. ॥ २३३ ॥
धरि धीरजु एक आलि सयानी । सीता सन बोली गहि पानी ॥
बहुरि गौरि कर ध्यान करेहू । भूपकिसोर देखि किन लेहू ॥
एक चतुर सखी मोठ्या धीराने सीतेचा हात धरुन म्हणाली, ' गिरिजादेवीचे ध्यान नंतर कर. यावेळी राजकुमाराला का पाहून घेत नाहीस ? ' ॥ १ ॥
सकुचि सीयँ तब नयन उधारे । सनमुख दोउ रघुसिंघ निहारे ॥
नख सिख देखि राम कै सोभा । सुमिरि पिता पनु मनु अति छोभा ॥
तेव्हा सीतेने लाजून नेत्र उघडले आणि रघुकुलातील ते दोन्ही सिंह आपल्यासमोर उभे ठाकल्याचे तिला दिसून आले. श्रीरामांची नख-शिखांत पाहून आणि नंतर आपल्या पित्याच्या पणाची आठवण येऊन तिचे मन अतिशय हेलावून गेले. ॥ २ ॥
परबस सखिन्ह लखी जब सीता । भयउ गहरु सब कहहिं सभीता ॥
पुनि आउब एहि बेरिआँ काली । अस कहि मन बिहसी एक आली ॥
सख्यांनी जेव्हा पाहिले की, सीता प्रेमात बुडाली आहे, तेव्हा त्या बावरुन म्हणू लागल्या, ' फार उशीर झाला. ( आता निघाले पाहिजे ). उद्या पुन्हा येऊ. ' असे म्हणत एक सखी मनात हसली. ॥ ३ ॥
गूढ़ गिरा सुनि सिय सकुचानी । भयउ बिलंबु मातु भय मानी ॥
धरि बड़ि धीर रामु उर आने । फिरी अपनपउ पितुबस जाने ॥
सखीचे हे गूढ बोलणे ऐकून सीता लाजली. उशीर झाला आहे, असे पाहून तिला आईची भीती वाटली. मोठ्या धैर्याने तिने श्रीरामांना आपल्या अंतःकरणात बसवून आणि ( त्यांचे ध्यान करीत ) आपण आपल्या पित्याच्या अधीन असल्याचे जाणून ती नाइलाजाने परत निघाली. ॥ ४ ॥
Custom Search
No comments:
Post a Comment