Sunday, September 27, 2020

ShriRamcharitmans Part 49 श्रीरामचरितमानस भाग ४९

 

ShriRamcharitmans Part 49 
Doha 234 to 236 
श्रीरामचरितमानस भाग ४९ 
दोहा २३४ ते २३६ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा--देखन मिस मृग बिहग तरु फिरइ बहोरि बहोरि ।
निरखि निरखि रघुबीर छबि बाढ़इ प्रीति न थोरि ॥ २३४ ॥
मृग, पक्षी व वृक्ष यांना पाहण्याच्या बहाण्याने सीता वारंवार वळून पाहात होती. श्रीरामांचे सौंदर्य पाहून तिचे प्रेम अधिकच उचंबळले होते. ॥ २३४ ॥
जानि कठिन सिवचाप बिसूरति । चली राखि उर स्यामल मूरति ॥
प्रभु जब जात जानकी जानी । सुख सनेह सोभा गुन खानी ॥
शिव-धनुष्य खूप जड आहे. याची आठवण झाल्यावर सीता खिन्न होऊन पण हृदयात श्रीरामांची सावळी मूर्ती धारण करुन निघाली. प्रभू श्रीरामांनी जेव्हा सुख, स्नेह, शोभा व गुणांची खाण असलेल्या सीतेला जाताना पाहिले, ॥ १ ॥
परम प्रेममय मृदु मसि कीन्ही । चारु चित्त भीतीं लिखि लीन्ही ॥
गई भवानी भवन बहोरी । बंदि चरन बोली कर जोरी ॥
तेव्हा त्यांनी परम प्रेमाच्या कोमल शाईने तिचे स्वरुप आपल्या सुंदर चित्ताच्या पटलावर अंकित केले. सीता पुन्हा भवानीच्या मंदिरात गेली आणि तिच्या चरणी वंदन करुन हात जोडून म्हणाली, ॥ २ ॥
जय जय गिरिबरराज किसोरी । जय महेस मुख चंद चकोरी ॥
जय गजबदन षडानन माता । जगत जननि दामिनि दुति गाता ॥
' हे श्रेष्ठ पर्वतराज हिमालयाच्या कन्ये पार्वती, तुमचा विजय असो, विजय असो. हे महादेवाच्या मुख-चंद्राकडे ( एकटक पाहणार्‍या ) चकोरी, तुमचा विजय असो. हे हत्तीचे मुख असलेल्या गणेशाच्या व षणमुख स्वामी कार्तिकेयाच्या माते, हे जगज्जननी, हे विद्दुतकांतियुक्त शरीराच्या पार्वतीदेवी, तुमचा विजय असो. ॥ ३ ॥
नहिं तव आदि मध्य अवसाना । अमित प्रभाउ बेदु नहिं जाना ॥
भव भव बिभव पराभव कारिनि । बिस्व बिमोहनि स्वबस बिहारिनि ॥
तुम्हांला आदी, मध्य व अंत नाही. तुमचा असीम प्रभाव वेदांनाही माहीत नाही. तुम्ही सृष्टीला उत्पन्न, पालन व नाश करणार्‍या आहात. विश्वाला मोहून टाकणार्‍या आणि स्वतंत्रपणे विहार करणार्‍या आहात. ॥ ४ ॥
दोहा--पतिदेवता सुतीय महुँ मातु प्रथम तव रेखा ।
महिमा अमित न सकहिं कहि सहस सारदा सेष ॥ २३५ ॥
पतीला इष्टदेव मानणार्‍या स्त्रियांमध्ये हे माते, तुमची प्रथम गणना आहे. तुमचा अपार महिमा हजारो सरस्वती आणि शेषनागसुद्धा सांगू शकत नाहीत. ॥ २३५ ॥
सेवत तोहि सुलभ फल चारी । बरदायनी पुरारि पिआरी ॥
देबि पूजि पद कमल तुम्हारे । सुर नर मुनि सब होहिं सुखारे ॥
हे भक्तांना मनोवांछित वर देणार्‍या भवानी ! तुमची सेवा केल्याने चारी पुरुषार्थ सुलभ होतात. हे देवि, तुमच्या चरणकमलांची पूजा केल्याने देव, मनुष्य व मुनी हे सर्व सुखी होतात. ॥ १ ॥
मोर मनोरथु जानहु नीकें । बसहु सदा उर पुर सबही कें ॥
कीन्हेउँ प्रगट न कारन तेहीं । अस कहि चरन गहे बैदेहीं ॥
माझे मनोरथ तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता, कारण तुम्ही नेहमी सर्वांच्या हृदयरुपी नगरीमध्ये निवास करता. म्हणून मी ते उघड केले नाही ' असे म्हणत जानकीने देवीचे चरण धरले. ॥ २ ॥
बिनय प्रेम बस भई भवानी । खसी माल मूरति मुसुकानी ॥
सादर सियँ प्रसादु सिर धरेऊ । बोली गौरि हरषु हियँ भरेऊ ॥
गिरिजादेवी सीतेचा विनय आणि प्रेम पाहून प्रसन्न झाली. तिच्या गळ्यातली माळ खाली पडली आणि मूर्तीने स्मित हास्य केले. सीतेने मोठ्या आदराने तो प्रसाद शिरावर धारण केला. गौरीचे मन आनंदाने भरुन गेले आणि ती म्हणाली, ॥ ३ ॥
सुनु सिय सत्य असीस हमारी । पूजिहि मन कामना तुम्हारी ॥
नारद बचन सदा सुचि साचा । सो बरु मिलिहि जाहिं मनु राचा ॥
' हे सीते, मी मनःपूर्वक देत असलेला आशीर्वाद ऐक. तुझी मनोकामना पुर्ण होईल. नारदांचे वचन नित्य पवित्र आणि सत्य असते. ज्याच्यावर तुझे मन अनुरुक्त झाले आहे, तोच वर तुला मिळेल. ॥ ४ ॥
छं.--मनु जाहिं राचेउ मिलिहि सो बरु सहज सुंदर सॉंवरो ।
करुना निधान सुजान सीलु सनेहु जानत रावरो ॥
एहि भाँति गौरि असीस सुनि सिय सहित हियँ हरषीं अली ।
तुलसी भवानिहि पूजि पुनि पुनि मुदित मन मंदिर चली ॥
ज्याच्यावर तुझे मन अनुरक्त झालेले आहे, तोच स्वभावतः सुंदर सावळा वर श्रीराम तुला मिळेल. तो दयेचे भांडार आहे, सर्वज्ञ आहे, तुझे शील व प्रेम जाणणारा आहे. ' अशा प्रकारे श्रीगौरीचा आशीर्वाद ऐकून जानकीसह सर्व सख्यांना मनापासून आनंद झाला. तुलसीदास म्हणतात, भवानीदेवीची वारंवार पूजा करुन सीता प्रसन्न मनाने राजमहालाकडे निघाली.
सो०--जानि गौरि अनुकूल सिय हिय हरषु न जाइ कहि ।
मंजुल मंगल मूल बाम अंग फरकन लगे ॥ २३६ ॥
श्रीगौरी अनुकूल आहे, हे कळल्यामुळे सीतेच्या मनाला जो हर्ष झाला, तो अवर्णनीय होता. कल्याणाचे मूळ असलेले तिचे डावे अंग स्फुरु लागले. ॥ २३६ ॥
हृदयँ सराहत सीय लोनाई । गुर समीप गवने दोउ भाई ॥
राम कहा सबु कौसिक पाहीं । सरल सुभाउ छुअत छल नाहीं ॥
मनामध्ये सीतेच्या लावण्याची वाखाणणी करीत दोन्ही भाऊ गुरुंच्याजवळ आले. श्रीरामचंद्रांनी विश्वामित्रांना सर्व काही सांगून टाकले. कारण त्यांचा स्वभाव सरळ होता आणि कपट त्यांना शिवतसुद्धा नसे. ॥ १ ॥
सुमन पाइ मुनि पूजा कीन्ही । पुनि असीस दुहु भाइन्ह दीन्ही ॥
सुफल मनोरथ होहुँ तुम्हारे । रामु लखनु सुनि भए सुखारे ॥
फुले मिळाल्यावर मुनींनी पूजा केली. नंतर दोन्ही भावांना आशिर्वाद दिला की, ' तुमचे मनोरथ पूर्ण होवोत .' तो ऐकून श्रीरामलक्ष्मणांना आनंद झाला. ॥ २ ॥
करि भोजनु मुनिबर बिग्यानी । लगे कहन कछु कथा पुरानी ॥
बिगत दिवसु गुरु आयसु पाई । संध्या करन चले दोउ भाई ॥
ज्ञानी मुनी विश्वामित्र हे भोजनानंतर काही प्राचीन कथा सांगू लागले. एवढ्यात दिवस मावळला आणि गुरुंच्या आज्ञेने दोघे बंधू संध्या करण्यासाठी गेले. ॥ ३ ॥
प्राची दिसि ससि उयउ सुहावा । सिय मुख सरिस देखि सुखु पावा ॥
बहुरि बिचारु कीन्ह मन माहीं । सीय बदन सम हिमकर नाहीं ॥
इकडे पूर्व दिशेला सुंदर चंद्रमा उदय पावला. तो सीतेच्या मुखा-सारखा पाहून श्रीरामचंद्रांना आनंद झाला. नंतर त्यांच्या मनात विचार आला की, चंद्र हा काही सीतेच्या मुखासारखा नाही. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: