Showing posts with label दोहा २८ ते दोहा ३०. Show all posts
Showing posts with label दोहा २८ ते दोहा ३०. Show all posts

Tuesday, December 20, 2022

SunderKanda Part 11 ShriRamCharitManas Doha 28 to Doha 30 सुंदरकाण्ड भाग ११ श्रीरामचरितमानस दोहा २८ ते दोहा ३०

 

SunderKanda Part 11 
ShriRamCharitManas 
Doha 28 to Doha 30 
सुंदरकाण्ड भाग ११ 
श्रीरामचरितमानस 
दोहा २८ ते दोहा ३०

दोहा—जाइ पुकारे ते सब बन उजार जुबराज ।

सुनि सुग्रीव हरष कपि करि आए प्रभु काज ॥ २८ ॥

सर्वांनी जाऊन ओरडून सांगितले की, अंगद मधुवन उध्वस्त करीत आहे. हे ऐकून सुग्रीवाला आनंद झाला की, वानर प्रभुंचे कार्य करुन आले आहेत. ॥ २८ ॥

जौं न होति सीता सुधि पाई । मधुबन के फल सकहिं कि खाई ॥

एहि बिधि मन बिचार कर राजा । आइ गए कपि सहित समाजा ॥

जर सीतेची वार्ता मिळाली नसती, तर त्यांनी मधुवनातील फळे कशी खाल्ली असती ? अशा प्रकारे राजा सुग्रीव मनात विचार करीत होता. एवढ्यात वानर-समूह आला. ॥ १ ॥

आइ सबन्हि नावा पद सीसा । मिलेउ सबन्हि अति प्रेम कपीसा ॥

पूँछी कुसल कुसल पद देखी । राम कृपॉं भा काजु बिसेषी ॥

सर्वांनी सुग्रीवाच्या चरणी मस्तक नमविले. कपिराज सुग्रीव मोठ्या प्रेमाने सर्वांना भेटला. त्याने खुशाली विचारली, तेव्हा वानरांनी सांगितले की, ‘तुमच्या दर्शनाने सर्व कुशल आहे. श्रीरामांच्या कृपेमुळे कार्य यशस्वी झाले. ॥ २ ॥

नाथ काजु कीन्हेउ हनुमाना । राखे सकल कपिन्ह के प्राना ॥

सुनि सुग्रीव बहुरि तेहि मिलेऊ । कपिन्ह सहित रघुपति पहिं चलेऊ ॥

हे नाथ, हनुमानानेच सर्व काम पार पाडले आणि वानरांचे प्राण वाचविले. ‘ हे ऐकून सुग्रीव हनुमानाला पुन्हा भेटला आणि सर्व वानरांसह ते श्रीरघुनाथांच्याजवळ गेले. ॥ ३ ॥

राम कपिन्ह जब आवत देखा । किएँ काजु मन हरष बिसेषा ॥

फटिक सिला बैठे द्वौ भाई । परे सकल कपि चरनन्हि जाई ॥

श्रीरामांनी पाहिले की, वानर काम पुरे करुन येत आहेत, तेव्हा त्यांच्या मनाला खूप आनंद झाला. दोघे बंधू स्फटिकशिळेवर बसले होते. सर्व वानर त्यांच्या पाया पडले. ॥ ४ ॥       

दोहा---प्रिति सहित सब भेटे रघुपति करुना पुंज ।

पूँछी कुसल नाथ अब कुसल देखि पद कंज ॥ २९ ॥

दयेचे राशी असलेले श्रीरघुनाथ मोठ्या प्रेमाने सर्वांना मिठी मारुन भेटले आणि त्यांनी क्षेम-कुशल विचारले. वानर म्हणाले, ‘ हे नाथ, तुमच्या चरण-कमलांच्या दर्शन घडल्याने आता सर्व क्षेम आहे. ‘ ॥ २९ ॥

जामवंत कह सुनु रघुराया । जा पर नाथ करहु तुम्ह दाया ॥

ताहि सदा सुभ कुसल निरंतर । सुर नर मुनि प्रसन्न ता ऊपर ॥

जांबवानाने म्हटले, ‘ हे रघुनाथ, ऐका. हे नाथ, ज्याच्यावर तुम्ही दया करता, त्याचे कल्याण व क्षेम नित्य असते. देव, मनुष्य आणि मुनी सर्वजण त्याच्यावर प्रसन्न असतात. ॥ १ ॥

सोइ बिजई बिनई गुन सागर । तासु सुजसु त्रैलोक उजागर ॥

प्रभु कीं कृपा भयउ सबु काजू । जन्म हमार सुफल भा आजू ॥

तोच विजयी, तोच विनयी आणि तोच गुणांचा समुद्र बनतो. त्याचीच उत्तम कीर्ती त्रैलोक्यात पसरते. प्रभूंच्या कृपेने सर्व कार्य झाले. आज आमचा जन्म सफळ झाला. ॥ २ ॥

नाथ पवनसुत कीन्हि जो करनी । सहसहुँ मुख न जाइ सो बरनी ॥

पवनतनय के चरित सुहाए । जामवंत रघुपतिहि सुनाए  ॥

हे नाथ, पवनपुत्र हनुमानाची जी कामगिरी आहे, तिचे वर्णन हजार मुखांनीही करता येणार नाही.’ मग जांबुवानाने हनुमानाची उत्कृष्ट कामगिरी श्रीरघुनाथांना सांगितली. ॥ ३ ॥

सुनत कृपानिधि मन अति भाए । पुनि हनुमान हरषि हियँ लाए ॥

कहहु तात केहि भॉंति जानकी । रहति करति रच्छा स्वप्रान की ॥

हनामानाची कामगिरी ऐकून कृपानिधी श्रीरामचंद्रांच्या मनाला खूप समाधान वाटले. त्यांनी आनंदाने हनुमानाला पुन्हा आलिंगन दिले आणि म्हटले, ‘ वत्सा, सांग. सीता कशी आहे, आणि ती आपल्या प्राणांचे रक्षण कसे करते ? ॥ ४ ॥    

दोहा—नाम पाहरु दिवस निसि ध्यान तुम्हार कपाट ।

लोचन निज पद जंत्रित जाहिं प्रान केहिं बाट ॥ ३० ॥

हनुमान म्हणाला, ‘ तुमचे नाम रात्रंदिवस तिच्यावर पहारा देते आणि तुमचे ध्यान तिच्यासाठी दरवाजा आहे. ती आपले नेत्र नेहमी आपल्या चरणी लावते, ते कुलूप आहे. मग प्राण जाणार कुठल्या मार्गाने ? ॥ ३० ॥

चलत मोहि चूड़ामनि दीन्ही । रघुपति हृदयँ लाइ सोइ लीन्ही ॥

नाथ जुगल लोचन भरि बारी । बचन कहे कछु जनककुमारी ॥

येताना मला तिने चूडामणी काढून दिला. ‘ तो श्रीरामांनी आपल्या हृदयी धरला. मग हनुमान म्हणाला, ‘ हे नाथ, दोन्ही डोळ्यांत पाणी आणून जानकीने मला सांगितले की, ॥ १ ॥      

अनुज समेत गहेहु प्रभु चरना । दीन बंधु प्रनतारति हरना ॥

मन क्रम बचन चरन अनुरागी । केहिं अपराध नाथ हौं त्यागी ॥

‘ लक्ष्मणासह प्रभूंचे चरण धरुन सांग की, तुम्ही दीनबंधू आहात. शरणागतांचे दुःख हरण करणारे आहात आणि मी कायावाचामनाने तुमच्याच चरणांवर प्रेम करते. मग हे स्वामी, तुम्ही कोणत्या कारणामुळे माझा त्याग केलात ? ॥ २ ॥

अवगुन एक मोर मैं माना । बिछुरत प्रान न कीन्ह पयाना ॥

नाथ सो नयनन्हि को अपराधा । निसरत प्रान करहिं हठि बाधा ॥

मी आपला एक दोष नक्की मानते की, वियोग होताच माझे प्राण गेले नाहीत. परंतु हे नाथ, हा माझ्या नेत्रांचा अपराध आहे. प्राण जाण्यांत ते जबरदस्तीने बाधा आणतात. ॥ ३ ॥     

बिरह अगिनि तनु तूल समीरा । स्वास जरइ छन माहिं सरीरा ॥

नयन स्रवहिं जलु निज हित लागी । जरैं न पाव देह बिरहागी ॥

विरह हा अग्नि आहे, शरीर हा कापूस आहे आणि श्वास हा वारा आहे. म्हणून हे शरीर क्षणात जळू शकते. परंतु नेत्र प्रभूंच्या स्वरुपाचे दर्शन घेण्याच्या स्वार्थासाठी अश्रुजलाचा वर्षाव करतात. त्यामुळे विरहाच्या आगीने देह जळू शकत नाही. ॥ ४ ॥

सीता कै अति बिपति बिसाला । बिनहिं कहें भलि दीनदयाला ॥

सीतेची विपत्ती फार मोठी आहे. हे दीनदयाळा ! ती न

 सांगणेच चांगले. ( सांगितली तर आपल्यालाच क्लेश

 होतील. ) ॥ ५ ॥



Custom Search

Friday, September 9, 2022

KikshindhaKanda Part 10 किष्किन्धाकाण्ड भाग १०

 

KikshindhaKanda Part 10
ShriRamCharitManas 
Doha 28 to Doha 30 
किष्किन्धाकाण्ड भाग १० 
श्रीरामचरितमानस 
दोहा २८ ते दोहा ३०

दोहा—मैं देखउँ तुम्ह नाहीं गीधहि दृष्टि अपार ।

बूढ़ भयउँ न त करतेउँ कछुक सहाय तुम्हार ॥ २८ ॥

मी तिला पाहू शकतो, तुम्ही पाहू शकणार नाही, कारण गिधाडाची नजर फार लांब जाते. काय करु ? मी म्हातारा झालो आहे, नाही तर तुम्हांला थोडीशी तरी मदत नक्की केली असती. ॥ २८ ॥

जो नाघइ सत जोजन सागर । करइ सो राम काज मति आगर ॥

मोहि बिलोकि धरहु मन धीरा । राम कृपॉं कस भयउ सरीरा ॥

जो शंभर योजने- ( चारशे कोस ) विस्तार असलेला समुद्र उल्लंघन करु शकेल आणि बुद्धिमान असेल, तोच श्रीरामांचे कार्य पार पाडू शकेल. निराश न होता माझ्याकडे पाहून धीर धरा. बघा, श्रीरामांच्या कृपेमुळे पाहता पाहता माझे शरीर कसे झाले. ‘ ॥ १ ॥

पापिउ जा कर नाम सुमिरहीं । अति अपार भवसागर तरहीं ॥

तासु दूत तुम्ह तजि कदराई । राम हृदयँ धरि करहु उपाई ॥

पापीसुद्धा ज्तांचे नामस्मरण करताच अत्यंत अपार भवसगर तरुन जातात, त्यांचे तुम्ही दूत आहात. म्हणून भय सोडून श्रीरामांना हृदयात ठेवून काम करा. ॥ २ ॥

अस कहि गरुड़ गीध जब गयऊ । तिन्हकेंमन अति बिसमय भयऊ ॥

निज निज बल सब काहूँ भाषा । पार जाइ कर संसय राखा ॥

काकभुशुंडी म्हणतात, ‘ हे गरुडा, असे सांगून जेव्हा संपाती निघून गेला, तेव्हा वानरांना फार आश्चर्य वाटले. सर्वजणांनी आपापले सामर्थ्य सांगितले परंतु सर्वांनी समुद्र उल्लंघून जाण्याविषयी संशय प्रगट केला.’ ॥ ३ ॥

जरठ भयउँ अब कहइ रिछेसा । नहिं तन रहा प्रथम बल लेसा ॥

जबहिं त्रिबिक्रम भए खरारी । तब मैं तरुन रहेउँ बल भारी ॥

ॠक्षराज जांबवान म्हणू लागला, ‘ मी आता म्हातारा झालो आहे. शरीरामध्ये पूर्वींचे बळ थोडेसुद्धा राहिले नाही. जेव्हा श्रीराम यांनी वामनावतार घेतला होता, तेव्हा मी तरुण होतो व माझ्यामध्ये पुष्कळ बळ होते. ॥ ४ ॥

दोहा—बलि बॉंधत प्रभु बाढ़ेउ सो तनु बरनि न जाइ ।

उभय घरी महँ दीन्हीं सात प्रदच्छिन धाइ ॥ २९ ॥

बळीला बांधून घालताना प्रभू एवढे वाढले की, त्या शरीराचे वर्णन करता येत नाही. परंतु मी दोन घटकातच धावत धावत त्यांच्या देहाला सात प्रदक्षिणा घातल्या. ‘ ॥ २९ ॥

अंगद कहइ जाउँ मैं पारा । जियँ संसय कछु फिरती बारा ।

जामवंत कह तुम्ह सब लायक । पठइअ किमि सबही कर नायक ॥

अंगद म्हणाला, ‘ मी पलीकडे जाईन, परंतु परत येता येईल की नाही, अशी मनात शंका आहे. ‘ जांबवान म्हणाला, ‘ तू सर्व प्रकारे योग्य आहेस, परंतु तू सर्वांचा नेता आहेस. तुला कसे पाठविता येईल ? ॥ १ ॥

कहइ रीछपति सुनु हनुमाना । का चुप साधि रहेहु बलवाना ॥

पवन तनय बल पवन समाना । बुधि बिबेक बिग्यान निधाना ॥

ॠक्षराज जांबवानाने हनुमानाला म्हटले, ‘ हे हनुमाना, हे बलवाना, तू का गप्प आहेस ? तू पवनाचा पुत्र आहेस आणि बळामध्ये पवनासमान आहेस. तू बुद्धी, विवेक व विज्ञानाची खाण आहेस. ॥ २ ॥

कवन सो काज कठिन जग माहीं । जो नहिं होइ तात तुम्ह पाहीं ॥

राम काज लगि तव अवतारा । सुनतहिं भयउ पर्बताकारा ॥    

जगात असे कोणते कठीण काम आहे की, बाबा रे, जे तुझ्याकडून होऊ शकणार नाही ? श्रीरामांच्या कार्यासाठीच तुझा अवतार झाला आहे.’ हे ऐकताच हनुमान पर्वताच्या आकारासारखा विशाल झाला. ॥ ३ ॥

कनक बरन तन तेज बिराजा । मानहुँ अपर गिरिन्ह कर राजा ॥

सिंहनाद करि बारहिं बारा । लीलहिं नाघउँ जलनिधि खारा ॥

त्याचा सोन्यासारखा रंग होता. शरीरावर तेज शोभत होते, जणू दुसरा पर्वतांचा राजा सुमेरु होता. हनुमानाने वारंवार सिंहनाद करुन म्हटले, ‘ मी या खार्‍या समुद्राला लीलया उल्लंघून जाईन. ॥ ४ ॥

सहित सहाय रावनहि मारी । आनउँ इहॉं त्रिकूट उपारी ॥

जामवंत मैं पूँछउँ तोही । उचित सिखावनु दीजहु मोही ॥

मी रावणाला त्याच्या सहाय्यकांसह ठार मारुन त्रिकूट पर्वत उपटून येथे घेऊन येऊ शकतो. हे जांबुवाना, मी तुला विचारतो की, मला काय करायचे आहे, ते सांग.’ ॥ ५ ॥

एतना करहु तात तुम्ह जाई । सीतहि देखि कहहु सुधि आई ॥

तब निज भुज बल राजिवनैना । कौतुक लागि संग कपि सेना ॥

जांबवान म्हणाला, ‘ हे हनुमंता, तू इतकेच कर की, सीतेला पाहून परत ये आणि बातमी सांग. नंतर कमलनयन श्रीराम आपल्या बाहुबलाने राक्षसांचा संहार करुन सीतेला घेऊन येतील. लीला म्हणून ते वानरांची सेना बरोबर घेतील.॥  ६ ॥      

छंद—कपि सेन संग सँघारि निसिचर रामु सीतहि आनिहैं ।

त्रैलोक पावन सुजसु सुर मुनि नारदादि बखानिहैं ॥

जो सुनत गावत कहत समुझत परम पद नर पावई ।

रघुबीर पद पाथोज मधुकर दास तुलसी गावई ॥

वानरांची सेना बरोबर घेऊन, राक्षसांचा संहार करुन श्रीराम सीतेला घेऊन येतील. मग देव आणि नारदादी मुनी तिन्ही लोकांना पवित्र करणार्‍या त्यांच्या सुंदर कीर्तीचे वर्णन करतील. ते ऐकून, गाऊन, सांगून व समजून घेऊन मनुष्य परम पद प्राप्त करतील. श्रीरघुवीरांच्या चरण-कमलांवरील भ्रमर बनून तुलसीदास ती कीर्ती गात आहे.

दोहा—भव भेषज रघुनाथ जसु सुनहिं जे नर अरु नारि ।

तिन्ह कर सकल मनोरथ सिद्ध करहिं त्रिसिरारि ॥ ३० ( क) ॥

श्रीरघुवीरांची कीर्ती ही जन्म-मरणरुप भव-रोगाची अचूक औषधी आहे. जे स्त्री-पुरुष ती ऐकतील, त्यांचे मनोरथ श्रीराम पूर्ण करतील. ॥ ३० ( क ) ॥

सो० नीलोत्पल तन स्याम काम कोटि सोभा अधिक ।

सुनिअ तासु गुन ग्राम जासु नाम अघ खग बधिक ॥ ३० ( ख ) ॥

ज्यांचे नील कमलाप्रमाणे श्यामल शरीर आहे. ज्यांची शोभा कोट्यावधी कामदेवांहून अधिक आहे आणि ज्यांचे नाम हे पापरुपी पक्ष्यांना मारण्यासाठी पारध्यासारखे आहे, त्या श्रीरामांच्या लीलांच्या समूहांचे वर्णन ऐकावे. ॥ ३० ( ख ) ॥

मासपारायण, तेविसावा विश्राम

इति श्रीमत् रामचरितमानसे सकलकलिकलुषविध्वंसने चतुर्थः सोपानः समाप्तः

कलियुगातील समस्त पापांचा नाश करणार्‍या श्रीरामचरितमानसाचा हा चौथा सोपान समाप्त झाला.

॥किष्किन्धाकाण्ड समाप्त ॥ 

      


Custom Search