Sunday, November 12, 2017

Samas Aathava Dehanta Nirupan समास आठवा देहान्त निरुपण


Dashak Navava Samas Aathava Dehanta Nirupan 
Samas Aathava Dehanta Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about why common people have a Birth- Death Cycle. Why Dnyani Santa have Mukti.
समास आठवा देहान्त निरुपण 
श्रीराम ॥
ज्ञाता सुटला ज्ञानमतें । परंतु जन्म कैसा बद्धातें ।
बद्धाचें काये जन्मतें । अंतकाळीं ॥ १ ॥
१) ज्ञानी पुरुष आत्मज्ञानामुळें जन्माच्या तडाख्यांतून सुटतो हें अगदी खरें. पण अज्ञानी माणसाला जन्म कसा येतो? बद्ध माणूस मेल्यानंतर त्याचें काय उरतें व तें त्याला पुनः जन्माला घालते ? 
बद्ध प्राणी मरोन गेले । तेथें कांहींच नाहीं उरलें ।
जाणीवेचें विस्मरण जालें । मरणापूर्वीं ॥ २ ॥
२) वरवर पाहिलें तर बद्ध माणूस मेल्यानंतर त्याचें कांहींच शिल्लक उरत नाहीं. मरणाच्या अगोदर त्याची जाणीवसुद्धां संपूर्ण नाहींशी होतें 
ऐसी घेतली आशंका । याचें उत्तर ऐका ।
आतां दुश्र्चीत होऊं नका । म्हणे वक्ता ॥ ३ ॥
३) श्रोत्यानें अशी शंका काढली. वक्ता म्हणाला त्या शंकेचें निरसन ऐकावें. मनाला व्यग्रता येऊं देऊं नये.  
पंचप्राण स्थळें सोडिती । प्राणरुप वासनावृत्ती ।
वासनामिश्रीत प्राण जाती । देह सोडुनियां ॥ ४ ॥
४) पांचही प्राण शरीरांतील आपलीं स्थानें सोडतात. त्यावेळीं वासना त्यांच्या मागोमाग जाते. कारण वासना प्राणरुप आहे. मृत्युच्यावेळीं वासना कालवलेला प्राण देह सोडून जाते. 
वायोसरिसी वासना गेली । ते वायोरुपेंचि राहिली ।
पुन्हां जन्म घेऊन आली । हेतुपरत्वें ॥ ५ ॥
५) प्राण वायुरुप असतो. वायूबरोबर वासना देह सोडते. ती वायुरुपच शिल्लक राहाते. आणि मरतांना जसा हेतु असेल त्याप्रमाणें ती पुनः जन्म घेऊन येते. 
कित्येक प्राणी निःशेष मरती । पुन्हां मागुते जीव येती ।
ढकलून दिल्हें तेणें दुखवती । हस्तपादादिक ॥ ६ ॥
६) कांहीं वेळीं एखादा माणूस संपूर्ण मरतो. त्याचा देह प्रेत होतो. पण पुनः त्याचा जीव देहांत परत येतो. प्रेत म्हणून त्यास ढकलून दिलें तर त्याच्या हातापायांना मार लागतो.   
सर्पदृष्टी जालियांवरी । तीं दिवसां उठवी धन्वंतरी ।
तेव्हां ते माघारी । वासना येते कीं ॥ ७ ॥
७) एखाद्यला सर्पाच्या नजरेचें विष बाधतें. त्यामुळें तो मरतो. तीन दिवसानंतर मांत्रिक त्याचें विष उतरवून त्यास उठवितो. मरतांना देहाबाहेर पडलेली वासना परत देहामध्यें येते म्हणूनच तो जिवंत होऊन उठतो.   
कित्येक सेवें होऊन पडती । कित्येक तयांस उठविती ।
येमलोकींहून आणिती । माघारे प्राणी ॥ ८ ॥
८) कांहीं माणसें प्राण निघून गेल्यानें प्रेत होऊन पडतात. त्यांना कांहीं लोक जिवंत करतात. म्हणजे त्यांना यमलोकाहून परत घेऊन येतात. 
कित्येक पूर्वीं श्रापिले । ते शापें देह पावले ।
उश्रापकाळीं पुन्हां आले । पूर्वदेहीं ॥ ९ ॥
९) पूर्वीं कांहीं लोकांना शाप दिलें. शापामुळें त्यांना नविन देह घ्यावें लागले. पण उःशापाच्या योगानें योग्य काळीं ते परत पहिल्या देहांत आलें. 
कित्येकीं बहु जन्म घेतले । कित्येक परकाया प्रवेशले ।
ऐसे आले आणी गेले । बहुत लोक ॥ १० ॥
१०) कांहीं लोकांनी पुष्कळ जन्म घेतलें. कांहीं लोकांनी परकाया प्रवेश केला. अशा रीतीनें कितीतरी लोक जन्मास आले आणि मरण पावले. 
फुंकिल्यासारिसा वायो गेला । तेथें वायोसूत निर्माण जाला ।
म्हणोन वायोरुप वासनेला । जन्म आहे ॥ ११ ॥
११) मूळ वायु स्तब्ध असतो. फुंकलें कीं त्यास गति मिळते. तो हालचाल करतो. वायु हालचाल करुं लागला कीं प्राण निर्माण होतो. प्राण वासनारुप असतो आणि वासना जन्म घ्यायला लावते.   
मनाच्या वृत्ती नाना । त्यांत जन्म घेते वासना ।
वासना पाहातां दिसेना । परंतु आहे ॥ १२ ॥
१२) मूळ वासना अति सूक्ष्म असते. बघावयास गेले तर ती आढळत नाही. परंतु ती असते यांत शंका नाहीं. आपल्या मनामध्यें ज्या अनेक वृत्ती निर्माण होतात त्यांचे मूळ वासमेंत असतें. वासनेंतून वृत्ती निर्माण होतात. आणि वृत्तीमधून वासना पोसली जाते.   
वासना जाणिजे जाणीवहेत । जाणीव मुळींच मूळतंत ।
मूळमायेंत असे मिश्रित । कारणरुपें ॥ १३ ॥
१३) देहबुद्धीमध्यें वावरणारी जाणीव हेतुसहित असते. ही हेतुसहित असणारे जाणीवेचे स्वरुप म्हणजेच वासना होय. या जाणीवेचा संबंध मूळमायेपर्यंत पोहोचतो. मूळमायेमध्यें वायु जाणिवेसहित असतो. वासना जाणीवयुक्त असते. याकारणानें जानीवेचा धागा अगदी मूळमायेपर्यंत पोहोचतो.   
कारणरुप आहे ब्रह्मांडीं । कार्यरुपें वर्ते पिंडीं ।
अनुमानितां तांतडीं । अनुमानेना ॥ १४ ॥
१४) ब्रह्मांडामध्यें असणारी जाणीव कारणरुप आहे. पिंडामध्यें ती कार्यरुपानें वावरते. तिचें स्वरुप एकदम आकलन होत नाहीं. 
परंतु आहे सूक्ष्म रुप । जैसें वायोचें स्वरुप ।
सकळ देव वायोरुप । आणी भूतसृष्टि ॥ १५ ॥
१५) परंतु वासना आहे आणि ती वायूसारखी सूक्ष्म आहे. सगळे देवदेखील वायुरुप आहेत. पंचभूतात्मक सृष्टीचाच ते भाग आहेत. 
वायोमधें विकार नाना । वायो तरी पाहातां दिसेना ।
तैसी जाणीववासना । अति सूक्ष्म ॥ १६ ॥
१६) वायूमध्यें कितीतरी नाना प्रकार होतात. असें असून तो दिसत नाहीं. त्याचप्रमाणें जाणीवरुपीप वासना अति सूक्ष्म आहे. तिच्यामधें निरनिराळे बदल होतात. पण ती दिसत नाहीं.
त्रिगुण आणी पंचभूतें । हे वायोमध्यें मिश्रिते ।
अनुमानेना म्हणोन त्यातें । मिथ्या म्हणों नये ॥ १७ ॥
१७) तीन गुण आणि पंचभूतें अशीं आठ तत्त्वें वायूमधें मिसळलेली आहेत. त्यांची कल्पना येत नाहीं म्हणून तें तसें नाहीं असें मानूं नये.  
सहज वायो चाले । तरी सुगंध दुर्गंध कळों आले ।
उष्ण सीतळ तप्त निवाले । प्रत्यक्ष प्राणी ॥ १८ ॥ 
१८) वारा सहज वाहूं लागला कीं, सुगंध व दुर्गंध समजतो. गरम पदार्थ थंड होतात. आणि उष्णतेनें त्रस्त झालेले प्राणी थंड होतात. असा प्रत्यक्ष अनुभव येतो. 
वायोचेनि मेघ वोळती । वायोचेनि नक्षत्रें चालती ।
सकळ सृष्टीची वर्तती गती । सकळ तो वायो ॥ १९ ॥
१९) वायूनें ढग हालचाल करतात. व वर्षाव करतात. वायूनें नक्षत्रें फिरतात. विश्वामधें सगळीकडे वायुमुळें गति मिळते. अशा रीतीनें वायुच सर्व जगांत कार्य करतो.   
वायोरुपें देवतें भूतें । आंगीं भरती अकस्मातें ।
वीघ केलियां प्रेतें । सावध होतीं ॥ २० ॥
२०) भुतें व दैवतें किंवा हलक्या देवता वायुरुप असतात. त्या एकाएकीं अंगांत संचरतात. मंत्रतंत्राचें काहीं प्रकार केल्यानें प्रेतेंसुद्धा जिवंत होतात.  
वारें निराळें न बोले । देहामधें भरोन डोले ।
आळी घेऊन जन्मा आले । कित्येक प्राणी ॥ २१ ॥
२१) अंगांत संचरणारें वारे देहावाचून बोलूं शकत नाहीं. कोणत्या तरी देहांत संचार करुन तें प्रकट होते. अशा तर्‍हेची वासना घेऊन कित्येक जीव जन्मास येतात.     
राहाणें ब्राह्मणसमंध जाती । राहाणें ठेवणीं सांपडती ।
नाना गुंतले उगवती । प्रत्यक्ष राहाणें ॥ २२ ॥
२२) राहाणें म्हणजें मंत्र वापरुन अंगांत देवतेचा संचार करणें. अशा संचारानें ब्रह्मसंमधाला काढून लावतात.  जमिनींत पुरुन ठेवलेला धनाचा साठा शोधून देतात. आणि नाना प्रकारच्या संकटांत अडकलेल्यां लोकांची त्यातून सुटका करतात.    
ऐसा वायोचा विकार । येवंचे कळेना विस्तार ।
सकळ कांहीं चराचर । वायोमुळें ॥ २३ ॥
२३) वायूचें असें हें प्रकार आहेत. सांगण्याचें तात्पर्य असें कीं, वायूचा विस्तार कळणें फार कठिण आहे. सगळें चराचर ,विश्वामधिल सर्व व्यवहार वायुमुळें चालतात.  
वायो स्तद्धरुपें सृष्टीधर्ता । वायो चंचळरुपें सृष्टीकर्ता ।
न कळे तरी विचारीं प्रवर्ता । म्हणिजे कळे ॥ २४ ॥
२४) वायूचें जें स्थिर रुप आहे तें विश्व धारण करते व टिकवते. वायूचें जें गतिमान रुप आहे, तें विश्व निर्माण करतें. माझें हें म्हणणें कळलें नसेल तर खोल विचार करावा. म्हणजे मग तें कळेल.  
मुळापासून सेवटवरी । वायोचि सकळ कांहीं करी ।
वायोवेगळें कर्तुत्व चतुरीं । मज निरोपावें ॥ २५ ॥
२५) विश्वाच्या आरंभापासून तें अखेरपर्यंत वायु घडवून आणतो. येतहें वायुशिवाय आणखी कोणाचे कर्तृत्व आहे तें शहाण्या माणसानें मला दाखवून द्यावें.  
जाणीव मूळमाया । जाणीव जाते आपल्या ठाया ।
गुप्त प्रगट होऊनियां । विश्र्वीं वर्ते ॥ २६ ॥
२६) मूळमाया जाणीवरुप आहे. स्वस्वरुप हें जाणीवेचें मूळ ठिकाण असोोन तेथें ती सहज जाते. स्वरुपीं लिन असणारी जाणीव स्तब्ध असते. विश्वामधें गतिमान होऊन ती कर्तृत्व गाजवते. कोठें प्रगटपणें तर कोठें अप्रगटपणें तिचे कार्य चालू असते.  
कोठे गुप्त कोठे प्रगटे । जैसें जीवन उफाळे आटे ।
पुढें मागुता बोध लोटे । भूमंडळीं ॥ २७ ॥
२७) ज्याप्रमाणें पाणी जमिनींतून कधीं उफाळून वर येतें, कधीं आटून जाते, आटल्यानंतर कांहीं दिवसांनीं तो प्रवाह पुन्हा जोरानें जमिनीवर वाहु लागतो, त्याचप्रमाणें जाणीव कोठें गुप्त असतें तर कोठे प्रगटपणें दिसतेतर कोठे प्रगट असलेली गुप्त होते.    
तैसाच वायोमधें जाणीवप्रकार । उमटे आटे निरंतर ।
कोठें विकारें कोठें समीर । उगाच वाजे ॥ २८ ॥ 
२८) वायूमधें असणार्‍या जाणिवेचा प्रकार असाच आहे. कोठें ती प्रगटपणें दिसते तर कोठें ती गुप्त होते. कोठें तिच्यामधें बदल घडलेला दिसतो तर कोठें वायु नुसताच कार्य करतो.      
वारीं आंगावरुन जाती । तेणें हातपायें वाळती ।
वारा वाजताम करपती । आलीं पिकें ॥ २९ ॥
२९) वारें अंगावरुन गेल्यावर हातपाय सुकतात. वारा वाहिल्यानें कित्येक वेळां भरांत आलेली पिकें करपून जातात. 
नाना रोगांची नाना वारीं । पीडा करिती पृथ्वीवरी ।
वीज कडाडी अंबरीं । वायोमुळें ॥ ३० ॥
३०) अनेक प्रकारच्या वार्‍यांनीं अनेक प्रकारचे रोग होतात. पृथ्वीवरील लोकांना त्यांच्यापासून पीडा होते. वायूमुळें आकाशांत वीज चमकते.  
वायोकरितां रागोद्धार । कळे वोळखीचा निर्धार ।
दीप लागे मेघ पडे हा चमत्कार । रागोद्धारीं ॥ ३१ ॥
३१) वायूमुळें राग गाता येतात. श्रोत्यांना वायुमुळें राग निश्र्चितपणें कळतो. दीपरागानें दिवे लागणें. मेघमल्हार रागानें पाऊस पडणें हें रागांचे चमत्कार वायूमुळेंच घडतात.  
वायो फुंकितां भुली पडली । वायो फुंकितां खांडकें करपती ।
वायोकरितां चालती । नाना मंत्र ॥ ३२ ॥
३२) वायु फुंकल्यानें माणसांना भुरळ पडते. वायु फुंकल्यानें अंगावरील गळवें कोरडी पडतात. वायूमुळेंच अनेक प्रकारचे मंत्र परिणाम करतात.   
मंत्रें देव प्रगटती । मंत्रें भूतें अखरकिती ।
बाजीगरी वोडंबरी करिती । मंत्रसामर्थ्यें ॥ ३३ ॥
३३) मंत्राानें देवता प्रगट होतात. मंत्रानें भुतें समोर आणता येतात. एका वस्तुची दुसरी वस्तु करणें. निरनिराळें रुपें घेऊन लोकांना चकित करणें. अशा जादूच्या करामती मंत्रसामर्थ्यानें करतां येतात. 
राक्षसांची मावरचना । ते हे देवांदिका कळेना ।
विचित्र सामर्थ्यें नाना । स्तंबनमोहनादिकें ॥ ३४ ॥
३४) देवांना देखील न कळणारी राक्षसांची मायामय रचना मंत्रसामर्थ्यानें करतां येते. अशा विचित्र प्रकारची सामर्थ्यें मंत्रांच्या ठिकणीं असतात.  
धशचि पिसें करावें । पिसेंच उमजवावें ।
नाना विकार सांगावें । किती म्हणोनी ॥ ३५ ॥
३५) चांगल्या धड व नीट माणसाला वेडें करावें आणी वेड्या माणसाला नीट व धड करावें असेम वायुचें अनेक विकार आहेत. ते सांगावें तेवढें कमीच. 
मंत्रीं संग्राम देवाचा । मंत्रीं साभिमान ऋषीचा। 
महिमा मंत्रसामर्थ्याचा । कोण जाणे ॥ ३६ ॥
३६) मंत्रांच्या सामर्थ्यानें देवांच्या लधाया चालतात. ऋषींचा दरारा त्यांच्या मंत्रसामर्थ्यावरच चालतो. मंत्रसामर्थ्याचा महिमा कोणासही संपूर्ण सांगता येत नाही. 
मंत्री पक्षी आटोपिती । मूशकें स्वापदें बांधती ।
मंत्रीं माहांसर्प खिळीती । आणी धनलाभ ॥ ३७ ॥
३७) मंत्रांनी पक्षी ताब्यांत ठेवता येतात. उंदीर व जनावरें बांधून ठेवता येतात. मंत्रानें मोठालें सर्प एका जागीं खिळवून ठेवता येतात. मंत्रानें धनलाभही करुन घेता येतो. 
आतां असो हा प्रश्र्ण जाला । बद्धाचा जन्म प्रत्यया आला ।
मागील प्रश्र्ण फिटला । श्रोतयाचा ॥ ३८ ॥  
३८) आतां हा विषय पुरे. श्रोत्याच्या प्रश्र्णाला उत्तर दिलें. बद्धाला जन्म कसा येतो. या श्रोत्यांच्या प्रश्र्णाला उत्तर मिळाले.    
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे देहांतनिरुपणनाम समास आठवा ॥
Samas Aathava  Dehanta Nirupan
समास आठवा देहान्त निरुपण 


Custom Search

No comments: