Dashak Dahava Samas Tisara Deha Aashanka Shodhan
Samas Tisara Deha Aashanka Shodhan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Deha (body) Aashanka. The listener asked many questions.
समास तिसरा देहआशंका शोधन
श्रीराम ॥
उपाधीवीण जे आकाश । तेंचि ब्रह्म निराभास ।
तें निराभासीं मूळमायेस । जन्म जाला ॥ १ ॥
१) आकाशाला मर्यादा असते. ते वेगळेपणानें भासतें. मर्यादा व वेगळेपाणाचा भास बाजूस टाकला तर तेंच आकाश ब्रह्म बनतें. अशा अमर्याद व भासहीन ब्रह्मामध्यें मूळ माया जन्मली.
तें मूळमायेचें लक्षण । वायोस्वरुपचि जाण ।
पंचभूतें आणि त्रिगुण । वायोअआंगीं ॥ २ ॥
२) वायुस्वरुप असणें हें मूळमायेचें लक्षण होय. पांच भूतें व तीन गुण वायुमध्यें अंतर्भूत असतात.
आकाशापासून वायो जाला । तो वायोदेव बोलिला ।
वायोपासून अग्नी जाला । तो अग्निदेव ॥ ३ ॥
३) आकाशापासून वायु निर्माण झाला. त्यास वायुदेव म्हणतात. वायूपासून अग्नि झाला. त्यास अग्निदेव म्हणतात.
अग्नीपासून जालें आप । तें नारायेणाचें स्वरुप ।
आपापासून पृथ्वीचें रुप । तें बीजाकारें ॥ ४ ॥
४) अग्नीपासून आप निर्माण झालें. तें नारायणाचे स्वरुप आहे. आपापासून पृथ्वी निर्माण झालीं. तिचें रुप बीजाकार आहे. बीजामध्यें ज्याप्रमाणें संपूर्ण वृक्ष सामावलेला असतो, त्याचप्रमाणें पृथ्वीमध्यें शक्ति गुप्तपणें असतें.
ते पृथ्वीचे पोटी पाषाण । बहु देवांचे लक्षण ।
नाना प्रचित प्रमाण । पाषाणदेवीं ॥ ५ ॥
५) पृथ्वीच्या पोटांत पुष्कळ पाषाण आहेत. त्यपैकीं कांहीं पाषाणांमध्यें देबाचे रुप मानतात. अशा पाषाणांमध्यें देव वास्तव करतात याची प्रचीती येते. पाषाणांमध्यें देव असण्याचें हेंच प्रमाण समजावें.
नाना वृक्ष मृत्तिका । प्रचित रोकडी विश्र्वलोकां ।
समस्त देवांचा थारा येका । वायोमध्यें ॥ ६ ॥
६) अनेक वृक्षांमध्यें आणि मातीच्या मूर्तिंमध्यें देव आहे असा रोकडा अनुभव या विश्र्वांतील पुष्कळ लोकांना येतो. या सर्व देवांना एका वायूचा आश्रय असतो. हे सर्व देव शक्तीचीं विविध रुपें आहेत.
देव यक्षिणी कात्यायेणी । चामुंडा जखिणी मानविणी ।
नाना शक्ति नाना स्थानीं । देशपरत्वें ॥ ७ ॥
७) देव, यक्षिणी, कात्यायणी, चामुंडा, जाखिणी, मानविंणी वगैरे अनेक प्रकारच्या शक्ति निरनिराळ्या देशांमध्यें वेगवेगळ्या ठिकाणीं आढळतात.
पुरुषनामें कि्येक । देव असती अनेक ।
भूतें देवतें नपुषक । नामें बोलिजेती ॥ ८ ॥
८) पुल्लिंगी नावें असणारें कितीतरी देव आहेत. त्याचप्रमाणें दैवतें, भूतें अशी नपुसंक नामें असणारें देव आहेत.
देव देवता देवतें भूतें । पृथ्वीमध्यें असंख्यातें ।
परंतु या समस्तांतें । वायोस्वरुप बोलिजे ॥ ९ ॥
९) जगामध्यें देव, देवता, दैवतें आणी भूतें खरोखर असंख्य आहेत. परंतु ही सर्व वायुस्वरुप आहेत. हीं सगळीं शक्तीचीं रुपें आहेत.
वायोस्वरुप सदा असणें । प्रसंगें नाना देह धरणें ।
गुप्त प्रगट होणें जाणें । समस्तांसी ॥ १० ॥
१०) या सर्व देवता नेहमीं वायुरुपानें राहतात. प्रसंगीं त्या निरनिराळे देह धारण करतात. गुप्त असलेले प्रगट व्हायचे व प्रगट असलेले गुप्त व्हायचे अशारीतीनें या सगळ्या देवता वास करतात.
वायोस्वरुपें विचरती । वायोमध्यें जगज्ज्योती ।
जाणतीकळा वासना वृत्ति । नाना भेदें ॥ ११ ॥
११) या देव देवता वायुरुपानें सगळीकडे संचार करतात. वायूमध्यें जगत् ज्योती आहे. ती जाणीवरुप आहे. ही जी जाणीव आहे तिच्यामध्यें वासनेमुळें नाना प्रकारचे भेद निर्माण होतात.
आकाशापासून वायो जाला । तो दों प्रकारें विभागला ।
सावधपणें विचार केला । पाहिजे श्रोतीं ॥ १२ ॥
१२) आकाशापासून वायु निर्माण झाला तेव्हां त्याचे दोन विभाग झाले. श्रोत्यांनी त्याचा लक्षपूर्वक विचार केला पाहिजे.
येक वारा सकळ जाणती । येक वायो मधील जगज्ज्योती ।
जगज्ज्योतीच्या अनंत मूर्ती । देवदेवतांच्या ॥ १३ ॥
१३) आपण ज्याला वारा म्हणतो तो वायूचा एक प्रकार आहे. तो सर्वांना माहीत आहे. ज्यास जगत् ज्योति म्हणतात तो दुसरा प्रकार होय. सर्व देव-देवता जगत्-ज्योतिच्या अनंत मूर्ति आहेत.
वायो बहुत विकारला । परंतु दों प्रकारें विभागला ।
आतां विचार ऐकिला । पाहिजे तेजाचा ॥ १४ ॥
१४) वायूचे विकार पुष्कळ आढळले तरी त्याचे मुख्य प्रकार देनच आहेत. यानंतर तेजाचे प्रकार ऐकावे.
वायोपासून तेज जालें । उष्ण सीतळ प्रकाशलें ।
द्विविध रुप ऐकिलें । पाहिजे तेजाचें ॥ १५ ॥
१५) वायूपासून तेज निर्माण झाले. उष्ण व थंड अशा दोन प्रकारांनी तें अनुभवास येतें. तेजाचे हे दोन प्रकार आतां ऐकावें.
उष्णापासून जाला भानु । प्रकाशरुप दैदीप्यमानु ।
सर्वभक्षक हुताशनु । आणी विद्युल्यता ॥ १६ ॥
१६) प्रकाशरुप व अत्यंत तेजोमय असा सूर्य उष्णापासून झाला. त्याचप्रमाणें सर्व भक्षण करणारा अग्नि आणि वीज दोन्ही उष्णापासून निे्माण झाली.
सीतळापासून आप अमृत । चंद्र तारा आणी सीत ।
आतां परिसा सावचित्त । होऊन श्रोते ॥ १७ ॥
१७) थंड किंवा शीतल तेजापासून पाणी, अमृत,चंद्रमा, तारका आणि थंडी हे निर्माण झाले. आतां श्रोत्यांनीं लक्ष देऊन ऐकावें.
तेज बहुत विकारलें । परंतु द्विविधान बोलिलें ।
आपहि द्विविधाच निरोपिलें । आप आणि अमृत ॥ १८ ॥
१८) तेजाचे विकार बरेच असले तरी त्याचे मुख्य प्रकार दोनच आहेत. पाण्याचे प्रकार देखील मुख्यतः दोनच आहेत. ते म्हणजे पाणी व अमृत होय. ते सांगून झालेच आहेत.
ऐकें पृथ्वीचा विचार । पाषाण मृत्तिका निरंतर ।
आणीक दुसरा प्रकार । सुवर्ण परीस नाना रत्नें ॥ १९ ॥
१९) आतां पृथ्वीचे प्रकार ऐकावे. दगड व माती हा नेहमीच्या अनुभवाचा प्रकार आणि सोनें, परीस व अनेक प्रकारची रत्नें हा दुसरा प्रकार होय.
बहुरत्ना वसुंधरा । कोण खोटा कोण खरा ।
अवघें कळे विचारा-। रुढ होतां ॥ २० ॥
२०) बहुरत्ना वसुंधरा असें म्हणतात. रत्न खरें कोणतें व खोटें कोणतें हें समजलें पाहिजेम. माणसानें विचार केला म्हणजे ते त्यास समजते.
मनुष्यें कोठून जालीं । हे मुख्य आशंका राहिली ।
पुढें वृत्ति सावध केली । पाहिजे श्रोतीं ॥ २१ ॥
२१) असो. माणसें कोठून आली ? ही मुख्य शंका अजून तशीच राहिली आहे. तिचे निरसन ऐकण्यास श्रोत्यांनी मन सावध करावें.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे देहआशंकाशोधननाम समास तिसरा ॥
Samas Tisara Deha Aashanka Shodhan
समास तिसरा देहआशंका शोधन
Custom Search
No comments:
Post a Comment