Dashak Dahava Samas Pahila Antahakarnayek
Samas Pahila Antahakarnayek, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Antahakarna. The listener asked whether all the living beings are having different Antakarna or all have a single, common Antakaran.
समास पहिला अंतःकर्णयेक
श्रीराम ॥
सकळांचे अंतःकारण येक । किंवा येक नव्हे अनेक ।
ऐसें हे निश्र्चयात्मक । मज निरोपावें ॥ १ ॥
१) सर्वांचें अंतःकरण एकच आहे, का तें वेगवेगळें आहे ? याचे निःसंशय उत्तर मला सांगावें.
ऐसें श्रोतयानें पुसिलें । अंतःकरण येक किं वेगळालें ।
याचें उत्तर ऐकिलें । पाहिजे श्रोतीं ॥ २ ॥
२) सगळ्यांचे अंतःकरण एकच आहे कां वेगवेगळें आहे असा प्रश्र्ण श्रोत्यानें मला विचारला. त्याचें उत्तर श्रोत्यांनीं ऐकावें.
समस्तांचें अंतःकर्ण येक । निश्र्चयो जाणावा नेमक ।
हा प्रत्ययाचा विवेक । तुज निरोपिला ॥ ३ ॥
३) तुम्ही निःसंशय असें समजा कीं, सर्वांचें अंतःकरण एकच आहे. हा माझा अनुभव आहे आणि तो तुला मी सांगतो.
श्रोता म्हणे वक्तयासी । अंतःकर्ण येक समस्तांसी ।
तरी मिळेना येकयेकासी । काये निमित्य ॥ ४ ॥
४) असें ऐकल्यावर श्रोता वक्त्याला विचारतो कीं, सर्वांचें अंतःकरण एकच आहे तर एकाचें अंतःकरण दुसर्याच्या अंतःकरणाशी समरस होत नाहीं यांचे कारण काय?
येक जोवितां अवघे धाले । येक निवता अवघे ।
येक मरतां अवघे मेले । पाहिजेत कीं ॥ ५ ॥
५) तसेंच असेल तर एक जेवल्यावर सर्वांचे पोट भरलें पाहिजे. एक शांत झाला तर सगळे शांत झाले पाहिजेत. एक मेल्यावर सगळे मेले पाहिजेत. नाहीं कां ?
येक सुखी येक दुःखी । ऐसें वर्ततें लोकिकीं ।
येका अंतःकरणाची वोळखी । कैसी जाणावी ॥ ६ ॥
६) जगामधें एक सुखी तर एक दुःखी असें आढळते, असें दिसत असल्यानें सर्वांचे अंतःकरण एक आहे, हे कसें समजावे.
जनीं वेगळाली भावना । कोणास कोणीच मिळेना ।
म्हणौन हें अनुमाना । येत नाहीं ॥ ७ ॥
७) प्रत्येक माणसाची भावना वेगळी असते. एका माणसाचे दुसर्याशी एकमत आढळत नाहीं. म्हणून सर्वांचें अंतःकरण एक आहे असें मनाला पटत नाहीं.
अंतःकर्ण येक असतें । तरी येकाचें येका कळों येतें ।
कांहीं चोरितांच न येतें । गौप्य गुह्य ॥ ८ ॥
८) अंतःकरण एकच असते तर एकाच्या मनांत काय आहे, हें दुसर्यास कळलें असते. मग कांहींच गुप्त राहिले नसते.
याकारणें अनुमानेना । अंतःकर्ण येक हे घडेना ।
विरोध लागला जना । काये निमित्य ॥ ९ ॥
९) असा अनुभव येत नाहीं म्हणून हें कांहीं तर्काला बरोबर वाटत नाहीं. सर्वांचे अंतःकरण एक असणें शक्य नाहीं. तसें जर असतें तर लोकांत जो परस्परांत विरोध निर्माण होतो तो झाला नसता. लोकांत विरोध व संघर्ष आढळतात त्याचे कारण काय ?
सर्प डसाया येतो । प्राणी भेऊन पळतो ।
येक अंतःकर्ण तरी तो । विरोध नसावा ॥ १० ॥
१०) सर्प दंश करावयास येतो तर प्राणी घाबरुन दूर पळतो. जर अंतःकरण एक असतें तर असा विरोध परस्परांत आढळला नसता.
ऐसी श्रोतयाची आशंका । वक्ता म्हणे चळो नका ।
सावध होऊन ऐका । निरुपण ॥ ११ ॥
११) अशी श्रोत्याची शंका ऐकून तिचे निरसन करतांना वक्त्ता म्हणाला, श्रोत्यांनी गोंधळून जाऊं नये. याचे उत्तर लक्षपूर्वक ऐकावे.
अंतःकर्ण म्हणिजे जाणीव । जाणीव जाणता स्वभाव ।
देहरक्षणाचा उपाव । जाणती कळा ॥ १२ ॥
१२) अंतःकरण म्हणजे जाणीव. जाणीव म्हणजे जाणण्याची स्वाभाविक शक्ति. या जाणण्याच्या शक्तीनेंच प्राण्याला देहरक्षणाचा उपाय सुचतो.
सर्प जाणोन डंखूं आला । प्राणी जाणोन पळाला ।
दोहींकडे जाणीवेला । बरें पाहा ॥ १३ ॥
१३) एकीकडे जाणिवेच्या प्रेरणेंने सर्प दंश करायला येतो व त्याच जाणिवेच्या प्रेरणेनें प्राणी सर्पापासून दूर पळतो. म्हणजे सर्प व प्राणी या दोघांमध्यें जाणिवच कार्य करते.
दोहींकडे जाणीवेसी पाहिलें । तरी अंतःकर्ण येकचि जालें ।
विचारितां प्रत्यया आलें । जाणीवरुपें ॥ १४ ॥
१४) दोघांमध्यें जाणीव आहे. तिची प्रेरणा एकच आहे. म्हणून दोघांचें अंतःकरण एकरुप असलेंच पाहिजे. अशा रीतीनें विचार करतां जाणिवेच्या दृष्टीनें सर्व प्राण्यांचें अंतःकरण समान असतें हा प्रत्यक्ष अनुभव येतो.
जाणीवरुपें अंतःकर्ण । सकळांचे येक हें प्रमाण ।
जीवमात्रास जाणपण । येकचि असे ॥ १५ ॥
१५) जाणीवरुपानें सर्व जीवांचें अंतःकरण एकच असतें. ही गोष्ट सिद्ध झाली. जेवढें जीवप्राणी आहेत त्यांची जाणण्याची कला त्यांच्या अंतर्यामी एकच आहे.
येके दृष्टीचें देखणें । येके जिव्हेचें चाखणें ।
ऐकणें स्पर्शणें वास घेणें । सर्वत्रास एक ॥ १६ ॥
१६) उदा. डोळ्यांनी पाहणें, जिभेनें चाखणें, कानानें ऐकणें, अंगानें स्पर्श करणें, नाकानें वास घेणें या इंद्रियांच्या अनुभवामध्यें सर्वांना प्रचिती येते. कारण अनुभव घेणारी जाणीव सर्वांच्या ठिकाणीं सारखीच असते.
पशु पक्षी किडा मुंगी । जीवमात्र निर्माण जगीं ।
जाणीवकळा सर्वांलागीं । येकचि आहे ॥ १७ ॥
१७) पशु, पक्षी, किडे, मुंग्या असें अनंत प्रकारचे प्राणी जगांत निर्माण होतात. पण त्यांच्यांत इतर बाबतींत विविधता असली तरी सर्वांच्या ठिकाणीं जाणण्याची कला मात्र एकच असते.
सर्वांस जळ तें सीतळ । सर्वांस अग्नि तेजाळ ।
सर्वांस अंतःकर्ण केवळ । जाणती कळा ॥ १८ ॥
१८) पाणी सर्वांना गारच लागतें. अग्नि सर्वांना उष्णच लागतो. याचा अर्थ असा कीं अंतःकरण म्हणजे जाणण्याची कला एकच आहे.
आवडे नावडे ऐसें जालें । तरी हें देहस्वभावावरी गेलें ।
परंतु हें कळों आलें । अंतःकर्णयोगें ॥ १९ ॥
१९) एखाद्याला एखादी वस्तु आवडते, एखाद्याला ती आवडत नाहीं. ही आवड किंवा नावड माणसाच्या देहस्वभावावर अवलंबून आहे. पण वस्तूची आवड किंवा नावड ही अंतःकरणाच्या योगानेंच कळते.
सर्वांचें अंतःकर्ण येक । ऐसा निश्र्चयो निश्र्चयात्मक ।
जाणती याचें कौतुक । चहुंकडे ॥ २० ॥
२०) सर्व प्रान्यांचे अंतःकरण एकच एकआहे ही गोष्ट निःसंशय व निश्र्चयात्मक आहे. नवल वाटण्यासारखी याची लीला जगांत चहूकडे पाहातां येते.
इतुकेन फिटली आशंका । आतां अनुमान करुं नका ।
जाणणें तितुकें येका । अंतःकर्णाचें ॥ २१ ॥
२१) इतकें सांगितल्यानें श्रोत्यांची शंका फिटली. श्रोत्यांनी आतां उगीच तर्क काढूं नयेत. जेथें जेथें जाणणें आढळतें, तें एका अंतःकरणाचे असते हें ओळखावें.
जाणोन जीव चारा घेती । जाणोन भिती लपती ।
जाणोनियां पळोन जाती । प्राणीमात्र ॥ २२ ॥
२२) या जाणिवेच्या प्रेरणेनें प्राणी चारा खातात, तिच्या प्रेरणेनें प्राणी भितात आणि लपतात. तिच्याच प्रेरणेनें प्राणी पळून जातात.
किडामुंगीपासून ब्रह्मादिक । समस्तांस अंतःकर्ण येक ।
ये गोष्टीचें कौतुक । प्रत्यें जाणावें ॥ २३ ॥
२३) अगदी किडामुंगीपासून तें ब्रह्मादिकांपर्यंत सर्वांचें अंतःकरण एकच असते. आणि या गोष्टीचे प्रमाण आपण प्रत्यक्ष अनुभवावें.
थोर लहान तरी अग्नी । थोडें बहु तरी पाणी ।
न्यून पूर्ण तरी प्राणी । अंतःकर्णे जाणती ॥ २४ ॥
२४) अग्नि लहान असों कीं मोठा असो अग्नि तो अग्निच. पाणी थोंडे असो कीं पुष्कळ तेम पाणीच असतें. त्याचप्रमाणें जाणीव पूर्ण असो कीं कमी असो सर्व प्राणी अंतःकरणानेंच जाणतात.
कोठें उणें कोठें अधीक । परंतु जिनसमासला येक ।
जंगम प्राणी कोणीयेक । जाटिल्याविण नाहीं ॥ २५ ॥
२५) जाणीव कांहीं प्राण्यांत कमी तर कांहीं प्राण्यांत पुष्कळ आढळते. परंतु सगळीकडे तिचे मूळस्वरुप एकच असते. कोणीही हालचाल करणारा जिवंत प्राणी जाणिवेवांचून असूच शकत नाहीं.
जाणीव म्हणिजे अंतःकर्ण । अंतःकर्ण विष्णूचा अंश जाण ।
विष्णू करितो पाळण । येणें प्रकारें ॥ २६ ॥
२६) जाणीव म्हणजे अंतःकरण व अंतःकरण विष्णुचा अंश आहे. अशा रीतीनें विष्णु जगाचें पालन करतो.
नेणतां प्राणी संव्हारतो । नेणीव तमोगुण बोलिजेतो ।
तमोगुणें रुद्र संव्हारितो । येणें प्रकारें ॥ २७ ॥
२७) ज्याच्या ठिकाणीं जाणीव नसतें किंवा जाणीव नाश पावते तो प्राणी नाश पावतो. नेणीव हें तमोगुणाचें लक्षण आहे. अशा रीतीनें तमोगुणानें रुद्र संहार करतो.
कांहीं जाणीव कांहीं नेणीव । हा रजोगुणाचा स्वभाव ।
जाणतां नेणतां जीव । जन्मास येती ॥ २८ ॥
२८) थोडी जाणीव व थोडी नेणीव यांचें मिश्रण असणें हें रजोगुणाचें लक्षण आहे. असें जाणीव नेणीव मिश्रित असणारे जीव पुन्हा जन्म घेतात.
जाणीवेनें होतें सुख । नेणीवेनें होतें दुःख ।
सुखदुःख अवश्यक । उत्पत्तिगुणें ॥ २९ ॥
२९) जाणिवेंनें जीवास सुख होतें. नेणीवेनें जीवास दुःख होतें. म्हणून जन्मास आल्यावर जीवाला सुख आणि दुःख दोन्हीआवश्यकपणें भोगावीं लागतात.
जाणण्यानेणण्याची बुद्धि । तोचि देही जाणावा विधी ।
स्थूळ देहीं ब्रह्मा त्रिशुद्धि । उत्पत्तिकर्ता ॥ ३० ॥
३०) रजोगुणांच्या पोटीं असणारी जाणीवनेणीव मिश्रण असणारी जी बुद्धि तोच देहामधील ब्रह्मदेवाचा अंश ओळखावा. निर्माण करणारा ब्रह्मा अशा रीतीनें खरोखर स्थूल देहांत आढळतो.
ऐसा उत्पत्ति स्थिति संहार । प्रसंगें बोलिला विचार ।
परंतु याचा निर्धार । प्रत्यें पाहावा ॥ ३१ ॥
३१) विषय निघाला म्हणून या प्रसंगानें उत्तप्ती, स्थिति व संहार यांचें विवेचन केलें. परंतु प्रत्यक्ष प्रचीति पाहून याबद्दल निश्र्चित मत बनवावें.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अंतःकर्णयेकनाम समास पहिला ॥
Samas Pahila Antahakarnayek
समास पहिला अंतःकर्णयेक
Custom Search
No comments:
Post a Comment