Dashak Dahava Samas Chavatha BijLakshan
Samas Chavatha BijLakshan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Deha of a man how it was formed. The listener asked many questions.
समास चवथा बीजलक्षण
श्रीराम ॥
आतां पाहों जातां उत्पत्ती । मनुष्यांपासून मनुष्यें होती ।
पशुपासून पशु निपजती । प्रत्यक्ष आतां ॥ १ ॥
१) माणूस कसा निर्माण होतो, हे बघितलें तर माणूस माणसापासून जन्मतो , व पशुपासून पशु निपजतो. असें प्रत्यक्ष दिसते.
खेचरें आणी भूचरें । वनचरें आणी जळचरें ।
नाना प्रकारीचीं शरीरें । शेरीरांपासून होती ॥ २ ॥
२) आकाशांत उडणारे पक्षी, पृथ्वीवर चालणारे प्राणी, जंगलांतील प्राणी, पाण्यांतील जलचर, अशीं नाना प्रकारची शरीरें आहेत. परंतु ती सगळीं दुसर्या शरीरापासूनच निर्माण होतात.
प्रत्यक्षास आणी प्रमाण । निश्र्चयास आणि अनुमान ।
मार्ग देखोन आडरान । घेऊंच नये ॥ ३ ॥
३) जें प्रत्यक्ष आहे त्यास आणखीं पुरावा लागत नाहीं. जी गोष्ट निश्र्चित असते तेथें तर्क चालत नाहीं. अर्थात समोर सरळ रस्ता दिसत असतां माणसांनीं आडरानांत शिरु नये.
विपरीतापासून विपरीतें होती । परी शरीरेंच बोलिजेती ।
शरीरावांचून उत्पत्ती । होणार नाहीं ॥ ४ ॥
४) विचित्र व विलक्षण शरीरापासून तशीच विचित्र व विलक्षण शरीरें निर्माण होतात. पण त्यांना शरीरच म्हणतात. तात्पर्य शरीराशिवाय शरीराची उत्पत्ती होणें शक्य नाहीं.
तरी हे उत्पत्ति कैसी जाली । कासयाची कोणें केली ।
जेणें केली त्याची निर्मिली । काया कोणें ॥ ५ ॥
५) येथें असें प्रश्र्ण निर्माण होतात कीं, शरीराची उत्पत्ती कशी झाली ? ती कोणी केली ? कशापासून केली ? ज्यानें शरीराची उत्पत्ती केली त्याचे शरीर कोणी निर्माण केले ?
ऐसें पाहातां उदंड लांबलें । परी मुळीं शेरीर कैसें जालें ।
कासयाचें उभारिलें । कोणें कैसें ॥ ६ ॥
६) या प्रश्र्नाचे उत्तर देतांना एकानें दुसर्याचें व दुसर्यानें तिसर्याचें असें म्हटलें व कितीही मागें गेलें तरी पहिलें शरीर कसें निर्माण झालें हा प्रश्र्ण राहतोच. तसेंच तेम कसहाचें बनवलें व कोणी निर्माण केलें हें प्रश्र्ण अनुत्तरींतच राहतात.
ऐसी हे मागील आशंका । राहात गेली ते ऐका ।
कदापी जाजु घेऊं नका । प्रत्ययो आलियानें ॥ ७ ॥
७) मागील शंका ही अशी आहे. तिला ुत्तर देण्याचें राहून गेलें. असो. प्रत्यक्ष अनुभव आल्यावर मात्र उगाच भलताच तर्क करुं नये.
प्रत्ययोचि आहे प्रमाण । मूर्खास वाटे अप्रमाण ।
पिंडें प्रमायचितशब्दें जाण । विश्र्वासासी ॥ ८ ॥
८) प्रत्यक्ष अनुभव हाच खरा पुरावा समजावा. मूर्खाला तो पटत नाहीं. प्रचीति म्हटली म्हणजे सामान्य माणसाला विश्र्वास उत्पन्न होतो.
ब्रह्मीं मूळमाया जाली । तेचि अष्टधा प्रकृति बोलिली ।
भूतीं त्रिगुणीं कालवली । मूळमाया ॥ ९ ॥
९) परब्रह्माच्या ठिकाणीं मूळमाया निर्माण झाली. तिलाच पुढें अष्टधा प्रकृति असें नांव दिलें. पांच भूतें व तीन गुण अशी आठ तत्वें मूळमायेमध्यें कालवलेली असतात.
ते मूळमाया वायोस्वरुप । वायोमध्यें जाणीवेचें रुप ।
तेचि इच्छा परी आरोप । ब्रह्मीं न घडे ॥ १० ॥
१०) मूळमाया वायुस्वरुप आहे. शक्तिमय आहे. वायूमध्यें जाणिवेचें जें रुप असतें तीच इच्छा होय. परंतु परब्रह्मावर तीला लादता येत नाही.
तथापि ब्रह्मीं कल्पिला । तरी तो शब्द वायां गेला ।
आत्मा निर्गुण संचला । शब्दातीत ॥ ११ ॥
११) शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणीं इच्छेची कल्पना केली तर ती वाया जाते, कारण ब्रह्म निर्विकल्प आहे. आत्मरुपानें तें निर्गुण व शब्दातीत स्वरुप सगळीकडे भरुन राहीले आहे.
आत्मा निर्गुण वस्तु ब्रह्म । नाममात्र तितुका भ्रम ।
कल्पून लाविला संभ्रम । तरी तो लागणार नाहीं ॥ १२ ॥
१२) वास्तविक सद्वस्तु मानवी कल्पना व भाषा यांच्या आवाक्याबाहेर आहे. आत्मा, निर्गुण, वस्तु, ब्रह्म अशी नांवें भ्रमात्मक आहेत. आपण आपल्या कल्पनेनें त्यांच्यावर नावें लादली तरी ती भ्रामक नावें सद्वस्तुच्या स्वरुपाला स्पर्श करणार नाहीत.
तथापि आग्रहें लाविला । जरी धोंडा मारिला आकाशाला ।
आकाशावरी कुंथिला । तरी तें तुटेना ॥ १३ ॥
१३) समजा एखाद्या माणसानें आकाशांत धोंडा मारला किंवा तो आकाशावर थुंकला तरी त्यांचा स्पर्श आकाशाला होणार नाहीं. त्याचप्रमाणें एखाद्यानें आग्रहानें अगर हट्टानें ब्रह्मास नांव दिलें तरी तें त्यास चिकटणार नाहीं.
तैसें ब्रह्म निर्विकार । निर्विकारीं लाविती विकार ।
विकार नामे निर्विकार । जैसें तैसें ॥ १४ ॥
१४) तसें ब्रह्म अत्यंत विकारमुक्त आहे. जें विकाररहित आहे त्यास विकार चिकटवण्याचा प्रयत्न केला तर विकार गळून पडतात. व मूळ ब्रह्म मात्र जसेंच्या तसें राहते.
आतां ऐका प्रत्ययो । जाणोनि धरावा निश्र्चयो ।
तरीच पाविजे जयो । अनुभवाचा ॥ १५ ॥
१५) आतां ऐकावें. अनुभव समजुन घ्यावा. मगआपलें मत निश्र्चित करावें. असें केलें तरच साक्षात् अनुभव येईल.
मायाब्रह्मीं जो समीर । त्यांत जाणता तो ईश्र्वर ।
ईश्र्वर आणि सर्वेश्र्वर । तयासीच बोलिजे ॥ १६ ॥
१६) मूळमाया निर्माण झाली म्हणजे परब्रह्माच्या एका भागावर ती वावरते. तेथें " मी ब्रह्म आहे " असें ज्ञानमय भान किंवा शुद्ध जाणीव प्रगट होते. त्या जाणिवेच्या अधिष्ठान ब्रह्माला ईश्र्वर असें म्हणतात. ईश्र्वर आणी परमेश्र्वर ही दोन्ही त्याचीच नांवें आहेत.
तोचि ईश्र्वर गुणासी आला । त्याचा त्रिगुणभेद जाला ।
ब्रह्मा विष्णु महेश उपजला । तये ठाईं ॥ १७ ॥
१७) त्या ईश्र्वराचा गुणांशी संबंध येतो. मग त्रिगुण भेदानें त्याला तीन अंगें दिसतात. सत्त्वाचे अंग विष्णु, रजाचे अंग ब्रह्मदेव व तमाचें अंग महेश होय. ईश्र्वराचे ठिकाणीं ही तीन अंगें दिसली तरी अखेर ईश्र्वर एकच राहतो.
सत्व रज आणि तम । हे त्रिगुण उत्तमोत्तम ।
यांच्या स्वरुपाचा अनुक्रम । मागां निरोपिला ॥ १८ ॥
१८) सत्त्व, रज व तम हे तीन गुण उत्तमांत उत्तम गुण आहेत. त्यांच्या स्वरुपाचें वर्णन मागें सांगून झालें आहे.
जाणता विष्णू भगवान । जाणतानेणता चतुरानन ।
नेणता महेश पंचानन । अत्यंत भोळा ॥ १९ ॥
१९) जाणता सत्त्वमय तो विष्णु, जाणतानेणता रजोमय तो चार तोंडांचा ब्रह्मदेव, आणि नेणता तमोमय तो पांच तोंडांचा अत्यंत भोळा शंकर होय.
त्रिगुण त्रिगुणीं कालवले । कैसे होती वेगळाले ।
परी विशेष न्यून भासले । ते बोलावे लागती ॥ २० ॥
२०) तीन गुण एकमेकांत कालवलेले असतात. ते वेगळे करतां येत नाहीत. पण जेव्हां एखादा गुण अधिक आढळतो किंवा कमी दिसतो तेव्हां त्या दृष्टीनें गुणांच्याबद्दल सांगावें लागतें.
वायोमध्यें विष्णू होता । तो वायोस्वरुपचि तत्वता ।
पुढें जाला देहधर्ता । चतुर्भुजु ॥ २१ ॥
२१) उदा. मूळमायेमधील जाणीवेमध्यें सत्त्वमय विष्णु होता. खरें म्हणजे तो जाणीवस्वरुप होता. नंतर त्यानें चार हात असलेला देह धारण केला.
तैसाच ब्रह्मा आणि महेश । देह धरिती सावकास ।
गुप्त प्रगट होतां तयांस । वेळ नाहीं ॥ २२ ॥
२२) त्याचप्रमाणें ब्रह्मदेव आणि शंकर मूळ जाणीवेमध्यें असतात. नंतर योग्य काळीं तें दोघे देह धारण करतात. देहानें प्रगट होण्यास व देह सोडून गुप्त होण्यास त्यांना वेळ लागत नाही.
आतां रोकडी प्रचिती । मनुष्यें गुप्त प्रगटती ।
मां त्या देवांच्याच मूर्ती । सामर्थ्यवंत ॥ २३ ॥
२३) माणसेंसुद्धा गुप्त होतात व प्रगट होतात. असा प्रत्यक्ष अनुभव आपणांस येतो. मगब्रह्मा, विष्णु व महेश या तर देवांच्या मूर्ति आहेत. त्यांच्या अंगी सामर्थ्य असणारच.
देव देवता भूतें देवतें । चढतें सामर्थ्य आहे तेथें ।
येणेंचि न्यायें राक्षसांतें । सामर्थ्यकळा ॥ २४ ॥
२४) देव, देवता, भुतें आणि दैवतें यांच्या ठिकाणी अधिकाधिक असें चढतें सामर्थ्य असतें. याच न्यायानें राक्षसांच्या सामर्थ्याचा देखील एखादा काळ असतो.
झोटिंग वायोस्वरुप असती । सवेंच खुळखुळां चालती ।
खोबरीं खारिका टाकून देती । अकस्मात ॥ २५ ॥
२५) झोटिंग ही योनी वायुस्वरुप असतें. तो दिसत नाहीं पण त्याचा चालण्याचा खुळखुळ असा आवाज येतो. झोटिंग अकस्मात आपल्या पुढ्यांत खोबरें, खारीक टाकून देतो.
अवघेंचि न्याल अभावें । तरी हें बहुतेकांस ठावें ।
आपुल्याला अनुभवें । विश्र्वलोक जाणती ॥ २६ ॥
२६) यावर विक्ष्वास न ठेवतां हें सारें खोटें आहे असें कोणी म्हणेल. पण हें घडतें ही गोष्ट पुष्कळांना माहित आहे. पुष्कळांना असें अनुभव आलेलें असल्यानें सगळ्या लोकांना हें प्रकार माहीत आहेत.
मनुष्यें धरिती शरीरवेष । नाना परकाया प्रवेश ।
मां तो परमात्मा जगदीश । कैसा न धरी ॥ २७ ॥
२७) माणसें वेगवेगळीं शरीरें व वेष धारण करतात. परकायाप्रवेश करतात. मग तो जगाचा नियंता परमेश्र्वर शरीर धारण कां करणार नाहीं.
म्हणोनि वायोस्वरुपें देह धरिलें । ब्रह्मा विष्णु महेश जाले ।
पुढें तेचि विस्तारलें । पुत्रपौत्रीं ॥ २८ ॥
२८) म्हणून वायुस्वरुप जाणीवेनें जे देह धरले तेच ब्रह्मा विष्णु आणि महेश झाले. पुढें मुलें, नातवंडे असा त्यांचा विस्तार होत गेला.
अंतरींच स्त्रिया कल्पिल्या । तों त्या कल्पितंच निर्माण जाल्या ।
परी तयापासून प्रजा निर्मिल्या । नाहींत कदा ॥ २९ ॥
२९) त्यांनीं मनांत स्त्रियांची कल्पना केली. त्याबरोबर स्त्रिया निर्माण झाल्या. पण त्या ब्रह्मा, विष्णु, महेश यांनीं त्या स्त्रिायांपासून प्रजा निर्माण केली नाहीं.
इछून पुत्र कल्पिले । ते ते प्रसंगीं निर्माण जाले ।
येणें प्रकारें वर्तले । हरिहरादिक ॥ ३० ॥
३०) पुत्र असावा अशा इच्छेनें पुत्राची कल्पना करतांच निरनिराळ्या प्रसंगीं पुत्र निर्माण झाले. याप्रमाणें ब्रह्मा, विष्णु व महेश वागले.
पुढें ब्रह्मयानें सृष्टी कल्पिली । इछेसरिसी सृष्टी जाली ।
जीवसृष्टि निर्माण केली । ब्रह्मदेवें ॥ ३१ ॥
३१) नंतर ब्रह्मदेवानें विश्वाची कल्पना केली लगेच इच्छेप्रमाणें विश्व निर्माण झालें. या विश्वांतील सर्व प्राणी ब्रह्मदेवानेंच निर्माण केलें.
नाना प्रकारीचे प्राणी कल्पिले । इछेसरिसे निर्माण जाले ।
अवघे जोडेचि उदेले । अंडजजारजादिक ॥ ३२ ॥
३२) त्यानें अनेक प्रकारच्या प्राण्यांची कल्पना करतांच तें प्राणी ताबडतोप निर्माण झालें. अंडज, जारज असें प्राणी नरमादी अशा जोडीनें प्रगट झालें.
येक जळस्वेदापासून जाले । ते प्राणी स्वेदज बोलिले ।
येक वायोकरितां जाले । अकस्मात उद्बिज ॥ ३३ ॥
३३) अशा प्रकारे जे प्राणी घाम व पाणी यापासून निर्माण झालें त्यांना स्वेदज म्हणतात. जे जीवप्राणी वायूपासून निर्माण झालें त्यांना उद्भिज म्हणतात.
मनुष्याची गौडविद्या । राक्षसांची वोडंबरीविद्या ।
ब्रह्मयाची सृष्टिविद्या । येणें प्रकारें ॥ ३४ ॥
३४) माणसें जादुनें वस्तु निर्माण करतात.तेव्हां तिला गौडविद्या म्हणतात. राक्षसांच्या वस्तु निर्माण करण्याच्या विद्येला वोडंबरी म्हणतात. तर ब्रह्मदेवाच्या निर्माण करण्याच्या विद्येला सृष्टिविद्या म्हणतात.
कांहींयेक मनुष्यांची । त्याहून विशेष राक्षेसांची ।
त्याहून विशेष ब्रह्मयाची । सृष्टिविद्या ॥ ३५ ॥
३५) माणसांची गौडविद्या कांहीं थोड्या वस्तु निर्माण करते, तर राक्षसांची वोडंबरीविद्या त्याहून थोड्याअधिक वस्तु निर्माण कते. पण ब्रह्मदेवांची सृष्टिविद्या त्या दोन्हीविद्यांहून अधिक वस्तु निर्माण करते. विश्वामधील सर्व वस्तु ती निर्माण करते.
जाणते नेणते प्राणी निर्मिले । वेद वदोन मार्ग लाविले ।
ब्रह्मयानें निर्माण केले । येणें प्रकारें ॥ ३६ ॥
३६) ब्रह्मदेवानें जाणते व नेणते दोन्ही प्रकारचे प्राणी निर्माण केले. वेद निर्माण करुन जीवनांत वागण्याचा मार्ग दाखवून दिल. ब्रह्मदेवानें अशाप्रकारें प्राणी निर्माण केले.
मग शरीरांपासून शरीरें । सृष्टि वाढली विकारें ।
सकळ शरीरें येणें प्रकारें । निर्माण जालीं ॥ ३७ ॥
३७) सृष्टि निर्माण झाल्यावर मग शरीरापासून शरीरें निर्माण झाली. आणि सृष्टिचा विस्तार झाला. अशाप्रकारें सगळीं शरीरें निर्माण झाली.
येथें आशंका फिटली । सकळ सृष्टि विस्तारली ।
विचार पाहातां प्रत्यया आली । येथान्वयें ॥ ३८ ॥
३८) येथें शंका फिटली. सगळीकडे सृष्टि विस्तार पावली ती कशी यावर तिच्या विस्ताराचा क्रम प्रत्यक्ष अनुभवास आला.
ऐसी सृष्टि निर्माण केली । पुढें विष्णूनें कैसी प्रतिपाळिली ।
हेहि विवंचना पाहिली । पाहिजे श्रोतीं ॥ ३९ ॥
३९) ब्रह्मदेवानें सृष्ति निर्माण केली पण ती विष्णुनें सांभाळली कशी, त्यानें तिचे प्रतिपालन कसें केलें ह्याचेही विवेचन श्रोत्यांनी समजलें पाहिजे.
सकळ प्राणी निर्माण जाले । ते मूळरुपें जाणोन पाळिले ।
शरीरें दैत्य निर्दाळिले । नाना प्रकारींचें ॥ ४० ॥
४०) सर्व प्राणी निर्माण झाले, त्यांच्याजवळ जणीव आहे. जाणीव विष्णूचें मूळरुप आहे. त्या शुद्ध जाणिवेनें सर्व प्राण्यांचें पालन होतें. त्या जाणीवेनें प्रत्यक्ष शरीर धारण करुन अनेक राक्षसांना मारुन टाकलें.
नाना अवतार धरणें । दुष्टांचा संहार करणें ।
धर्म स्थापयाकारणें । विष्णूस जन्म ॥ ४१ ॥
४१) दुष्टांचा संहार करण्यासाठीं ती विष्णूरुप मूळची शुद्ध जाणीव अनेक अवतार धारण करतें. धर्माची स्थापना करण्यासाठीं विष्णूला जन्म घ्यावें लागतात.
म्हणोन धर्मस्थापनेचे नर । तेंहि विष्णूचे अवतार ।
अभक्त दुर्जन रजनीचर । सहजचि जाले ॥ ४२ ॥
४२) या दृष्टिनें धर्माची स्थापना करणारे सुद्धां विष्णुचे अवतार होत. अर्थात जे अभक्त व दुर्जन असतात ते राक्षस समजावेत.
आतां प्राणी जे जन्मले । ते नेणोन संव्हारले ।
मूळरुपें संव्हारिलें । येणें प्रकारें ॥ ४३ ॥
४३) आतां जे प्राणी जन्माला येतात. त्यांचा नेणीवेनें संव्हार होतो. ज्याप्रमाणें मूळ विष्णुरुप जाणीव प्राण्यांचे पालन करते. त्याचप्रमाणें मूळ रुद्ररुप नेणीव प्राण्यांचा संहार करते.
शरीरें रुद्र खवळेल । तैं जीवसृष्टि संव्हारेल ।
अवघें ब्रह्मांडचि जळेल । संव्हारकाळीं ॥ ४४ ॥
४४) सर्व प्राण्यांच्या शरीरांतील रुद्र जेव्हां खवळतो त्यावेळीं सारी जीवसृष्टि नाश पावते. यावेळीं सर्व विश्व जळून जाते.
एवं उत्पत्ती संव्हार । याचा ऐसा आहे विचार ।
श्रोतीं होऊन ततपर । अवधान द्यावें ॥ ४५ ॥
४५) उत्पत्ति, स्थिति व संहार यांचें विवेचन याप्रमाणें सांगून झालें. श्रोत्यांनी पुढें लक्ष देऊन ऐकावें.
कल्पांतीं संव्हार घडेल । तोचि पुढे सांगिजेल ।
पंचप्रळय वोळखेल । तोचि ज्ञानी ॥ ४६ ॥
४६) कल्पान्ती जो संहार होतो तो पुढील समासांत सांगणार आहे. पांच प्रकारचे प्रलय जो ओळखतो तोच खरा ज्ञानी होय.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे बीजलक्षणनाम समास चवथा ॥
Samas Chavatha BijLakshan
समास चवथा बीजलक्षण
Custom Search
No comments:
Post a Comment