Monday, November 27, 2017

Samas Aathava Pracit Nirupan समास आठवा प्रचितनिरुपण


Dashak Dahava Samas Aathava Pracit Nirupan 
Samas Aathava Pracit Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Prachiti means Experience. Sadhak gets knowledge that whatever he sees is unreal that is Maya and whatever he doesn’t see that is Brahma is real. He now knows that even if he doesn’t see the Brahma it is real. Swami Samarth here says that this knowledge must be based on the experience.
समास आठवा प्रचितनिरुपण
श्रीराम ॥
ऐका प्रचितीचीं लक्षणें । प्रचित पाहेल तें शाहाणें ।
येर वेडे दैन्यवाणें । प्रचितीविण ॥ १ ॥
१) आतां प्रचितीची लक्षणें ऐकावी. जो प्रचीति पाहातो, जो स्वानुभव घेतो तो खरा शहाणा होय. प्रचीति न घेणारे बाकीचे सगळे लोक वेडे व खालच्या प्रतीचे समजावेत.  
नाना रत्नें नाना नाणीं । परीक्षून न घेतां हानी ।
प्रचित न येतां निरुपणीं । बैसोंच नये ॥ २ ॥
२) अनेक प्रकारची  नाणीं व रत्नें असतात. त्यांची पारख, परिक्षा न करतां ती घेतली तर नुकसान होतें. ज्या निरुपणामध्यें स्वानुभव नाहीं किंवा अनुभव कसा घ्यावा याचे मार्गदर्शन नाहीं, तेथें बसूच नये.  
तुरंग शस्त्र दमून पाहिलें । बरें पाहातां प्रचितीस आले ।
तरी मग पाहिजे घेतलें । जाणते पुरुषीं ॥ ३ ॥
३) घोडा चालवून बघावा. शस्त्र वापरुन बघावें. असें केल्यावर तें उत्तम प्रतीचे ठरलें तरच तें जाणत्या पुरुषानें घ्यावें. 
बीज उगवेलसें पाहावें । तरी मग द्रव्य घालून घ्यावें ।
प्रचित आलियां ऐकावें । निरुपण ॥ ४ ॥
४)  बी चांगलें उगवते असें पाहावें. मग तसें असेल तर पैसें देऊन विकत घ्यावें. निरुपण करणारा जें सांगतो त्याची प्रचिती आली तरच त्याचे निरुपण ऐकावें.  
देहीं आरोग्यता जाली । ऐसी जना प्रचित आली ।
तरी मग आगत्य घेतली । पाहिजे मात्रा ॥ ५ ॥
५) देहाला झलेला विकार एखाद्या मात्रेनें बरा होतो असा इतर लोकांना अनुभव आला असेल तरच आपण ती मात्रा अगत्यानें घेतलीं पाहिजे.  
प्रचितीविण औषध घेणें । तरी मग धडचि विघडणे ।
अनुमानें जें कार्य करणें । तेंचि मूर्खपण ॥ ६ ॥
६) ज्या औषधाचा कोणीही अनुभव घेतलेला नसेल तर तें आपण घेतल्यास चांगली प्रकृति बिघडेल. उगीच अनुमानानें कार्य केलें तर मूर्खपणा होतो.  
प्रचितीस नाहीं आलें । आणी सुवर्ण करविलें । 
तरी मग जाणावें ठकिलें । देखतदेखतां ॥ ७ ॥
७) एखाद्यानें लोखंडाचे सोनें करुन देतो असें म्हटले व आपण त्याच्या विद्येचा अनुभव नसतां त्याला सोनें करुन देण्यास सांगितलें तर तो बघतां बघतां आपल्याला फसवितो. 
शोधून पाहिल्याविण । कांहींतरी येक कारण ।
होणार नाहीं निर्वाण । प्राणास घडे ॥ ८ ॥
८) सुरवातीस चांगली चौकशी न करतां एखदे काम अंगावर घेतलें तर तें काम तडीस जाणार नाहीं उलट आपल्या जीविताला धोका निर्माण होण्याचा संभव असतो.  
म्हणोनी अनुमानाचें कार्य । भल्यांनी कदापि करुं नये ।
उपाय पाहातां अपाये । नेमस्त घडे ॥ ९ ॥
९) म्हणून शहाण्या माणसानें कल्पना करुन अनुमानानें कोणतेंही कार्य करुं नये.  नपेक्षा उपायाऐवजी अपाय मात्र खात्रीनें घडतो. 
पाण्यांतील म्हैसीची साटी । करणें हें बुद्धिच खोटी । 
शोधिल्याविण हिंपुटी । होणें घडे ॥ १० ॥
१०) समजा एक म्हैस पाण्यांत बसली आहे. ती कशी आहे वगैरे न बघतांच तिची खरेदी करणें म्हणजे खोटीच बुद्धि होय. तिला नीट न पाहिल्यानें नंतर कष्टी व्हावें लागतें.
विश्र्वासें घर घेतलें । ऐसें किती नाहीं ऐकिलें ।
मैंदे मैदावें केलें । परी तें शोधिलें पाहिजे ॥ ११ ॥
११) स्वतः न पाहातां दुसर्‍याच्या भरवश्यावर घर घेतलें, असें कधी कोणी ऐकले आहें कां ? जगांत लबाड लोक फसवण्यचा प्रयत्न करणारच पण आपण नीट चौकशी करुन काम केलें पाहीजे.      
शोधल्याविण अन्नवस्त्र घेणें । तेणें प्राणास मुकणें ।
लटिक्याचा विक्ष्वास धरणें । हेंचि मूर्खपण ॥ १२ ॥
१२) नीट तपास केल्यावाचून अन्नवस्त्र घेणें म्हणजे जीव गमावण्याची पाळी आणणे. खोट्याचा विश्र्वास बाळगणें मूर्खपणाच होय.
संगती चोराची धरितां । घात होईल तत्वता ।
ठकु सिंतरु शोधितां । ठाईं पडे ॥ १३ ॥
१३) चोराची संगत धरली तर नक्कीच आपला घात होतो. नीट तपास केला तर चोर, ठक, लबाड लोक तिथल्या तिथे ओळखूं येतात. 
गैरसमज तामगिरी । कोणी नवी मुद्रा करी ।
नाना कपट परोपरीं । शोधून पाहावें ॥ १४ ॥
१४) खोटी नाणीं पाडणारें, तांब्याचें सोनें करतो म्हणणारे, चोरुन सरकारला न कळतां खरीं नाणीं करणारें, वगैरे नाना प्रकारच्या लबाड्या जगांत चालतात. आपण त्या समजून संभाळून असावें.    
दिवाळखोराचा मांड । पाहातां वैभव दिसे उदंड ।
परी तें अवघें थोतांड । भंड पुढें ॥ १५ ॥
१५) एखादा दिवाळखोर असा बडेजाव दाखवतो कीं त्याच्याजवळ पुष्कळ धन आहे असें वाटते. पण त्याचा तो बडेजाव म्हणजे थोतांड असतें. पुढें त्याची फजीति होते.   
तैसें प्रचितीवीण ज्ञान । तेथें नाहीं समाधान । 
करुन बहुतांचा अनुमान । अन्हीत जालें ॥ १६ ॥
१६) त्याचप्रमाणें ज्या पुरुषाला स्वानुभव नाहीं, त्याचें ज्ञान म्हणजें थोतांड होय. त्याच्यापाशीं खरें समाधान नसतें. आपल्या अनुभवरहित व अनुमानप्रधान ज्ञानानें तो अनेक लोकांना आपल्या नादीं लावतो. तसें करुन तो स्वतःचे व लोकांचे अनहीत करण्यास कारण होतो.   
मंत्र यंत्र उपदेसिले । नेणतें प्राणी तें गोविलें ।
जैसें झांकून मारिलें । दुखणाईत ॥ १७ ॥
१७) अनुभवविहीन लोक गुरुपणाचा आव आणून अडाणी लोकांना मंत्र यंत्र चा उपदेश करुन त्यांत त्यांना गुंतवतात. व त्यांचे नुकसान करतात. एखाद्या आजारी माणसाला झांकून ठेवावा व त्याला मारुन टाकावा तसा हा प्रकार होय.  
वैद्य पाहिला परी कच्चा ।  तरी प्राण गेला पोराचा ।
येथें उपाये दुसर्‍याचा । काये चाले ॥ १८ ॥
१८) समजा एखाद्याचा मुलगा फार आजारी आहे. त्याला औषध देण्यासाठीं अनुभव नसलेला व अपरिपक्व वैद्य आणला. त्यामुळें त्या मुलाचा मृत्यु ओढवला. अशावेळीं इतर माणसें कांहीं उपाय करुं शकत नाहींत.  
दुःखें अंतरीं झिजे । आणी वैद्य पुसतां लाजे ।
तरीच मग त्यासी साजे । आत्महत्यारेपण ॥ १९ ॥
१९) एक माणूस दुखण्यानें झिजत चालला आहे. पण वैद्यानें काय होतें म्हणून विचारलें तर मोकळेपणानें सांगण्यास त्याला लाज वाटते. असा माणूस स्वतःचा घात करुन घेतो असें म्हणणें बरोबर आहे.   
जाणत्यावरी गर्व केला । तरी नेणत्याकरितां बुडाला ।
येथें कोणाचा घात जाला । बरें पाहा ॥ २० ॥  
२०) जो जाणता आहे त्याला गर्वानें तुच्छ केलें तर नेणता माणूस आपल्या अज्ञानानें बुडतो, अशारीतीनें तो स्वतःच स्वतःचा घात करुन घेतो.         
पापाची खंडणी जाली । जन्मयातना चुकली ।
ऐसी स्वयें प्रचित आली । म्हणिजे बरें ॥ २१ ॥
२१) पाप संपूर्णपणें नाश पावलें. पुन्हा जन्मास येऊन यातना भोगणें थांबलें, असा प्रत्यक्ष अनुभव स्वतःला आला म्हणजे आत्मज्ञान झालें असें समजावें.  
परमेश्र्वरास वोळखिलें । आपण कोणसें कळलें ।
आत्मनिवेदन जालें । म्हणिजे बरें ॥ २२ ॥
२२) परमेश्र्वराची ओळखण झाली, मी खरा कोण हें कळलें, संपूर्ण शरणागति साधली म्हणजे आत्मज्ञान झालें असें समजावें. 
ब्रह्मांड कोणें केलें । कासयाचें उभारलें ।
मुख्य कर्त्यास वोळखिलें । म्हणिजे बरें ॥ २३ ॥
२३) हें विश्र्व कोणीं केलें हें समजलें, तें कशानें केलें हें कळलें, कर्ता खरा कोण हें ओळखलें म्हणजें आत्मज्ञान झालें असें समजावें.  
येथें अनुमान राहिला । तरी परमार्थ केला तो वायां गेला ।
प्राणी संशईं बुडाला । प्रचितीविण ॥ २४ ॥
२४) वर सांगितलेल्या गोष्टींसंबंधीं थोडा जरी संशय मनांत असेल तर तोपर्यंत केलेला परमार्थ वाया गेला असें समजावें. साक्षात् स्वरुपानुभव नसल्यानें  माणूस संशयानें घेरला जातो.  
हें पमार्थाचें वर्म । लटिकें बोले तो अधम ।
लटिकें मानी तो अधमोद्धम । येथार्थ जाणावा ॥ २५ ॥
२५) परमार्थाचें रहस्य हे आहे. हें खोटे आहे असें जो म्हणेल तो अधम समजावा. हें खोटें असेम जो मानील तो तर अधमाहून अधम निश्र्चितपणें मानावा.  
येथें बोलण्याची जाली सीमा । नेणतां न कळे परमात्मा ।
असत्य नाहीं सर्वोत्तमा । तूं जाणसी ॥ २६ ॥
२६) यापुढें सांगण्याची सोय उरली नाहीं. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत परमात्मस्वरुप कळणार नाहीं. ही गोष्ट खोटी नाहीं. सर्वोत्तम रामराया, माझ्या म्हणण्याचा भावार्थ तूं बरोबर जाणतोस.   
माझे उपासनेचा बडिवार । ज्ञान सांगावें साचार ।
मिथ्या बोलला उत्तर । प्रभूस लागे ॥ २७ ॥
२७) माझ्या उपासनेचें थोर वैशिष्ट्य असें आहें कीं, अगदी खरें आत्मज्ञान सांगावें. मी जर खोटे व वावगे बोलेन तर त्याचा दोष रामरायास लागेल.  
म्हणोनि सत्यचि बोलिलें । कर्त्यास पाहिजे वोळखिलें ।
मायोद्भवाचें शोधिलें । पाहिजे मूळ ॥ २८ ॥
२८) म्हणून जें सांगतों तें संपूर्ण सत्य आहे. खरा कर्ता कोण हें साधकानें ओळखलें पाहिजे. माया कोठे व कशी उत्पन्न झाली याचें मूळ शोधून काढलें पाहिजे.  
तेंचि पुढें निरुपण । बोलिलेंचि बोलिलें प्रमाण ।
श्रोतीं सावध अंतःकर्ण । घातलेंचि घालावें ॥ २९ ॥
२९) या विषयाचेच विवेचन पुढें केलेलें आहे. मागें जे सांगितलें तेंच पुन्हा वर्णन केलेले आढळेल. श्रोत्यामनी तें एकदा ऐकलेले आहे पण परत त्यांनीं सावधवरुत्तीनें ऐकावें. 
सूक्ष्म निरुपण लागलें । तेथें बोलिलेंचि मागुतें बोलिलें ।
श्रोत्यांस पाहिजे उमजलें । म्हणौनियां ॥ ३० ॥
३०) हा विषय सूक्ष्म आहे. त्याचें विवेचन चटकन ध्यानांत येत नाहीं. श्रोत्यांना तो नीट समजावा म्हणून तें परत सांगावें लागतें.   
प्रचित पाहातां निकट । उडोन जाती परिपाठ ।
म्हणोनि हे खटपट । करणें लागे ॥ ३१ ॥
३१) सूक्ष्म अनुभव घेऊन बघितलें तर परंपरेनें चालत आलेल्या लोकांच्या कल्पना खोट्या ठरतात. म्हणून परमार्थ पुनः पुनः सांगणें जरुर पडतें.
परिपाठेंचि जरी बोलिलें । तरी प्रचित समाधान बुडालें ।
प्रचितसमाधान राखिलें । तरी परिपाठ उडे ॥ ३२ ॥
३२) येथें पेच असा येतो कीं, परंपरागत जनसमजुतीप्रमाणें सांगायचे म्हटलें तर स्वानुभवाचें समाधान राहात नाहीं. आणि स्वानुभवाप्रमाणें बोलायचे म्हटलें तर परंपरागत लोककल्पना उडवल्यावाचून चालत नाहीं.  
ऐसी सांकडी दोहींकडे । म्हणौन बोलिलेंचि बोलणें घडे ।
दोनी राखोनियां कोडें । उकलून दाऊं ॥ ३३ ॥
३३) अशी दोन्हीकडून अडचण येते. म्हणून पूर्वीं जें सांगितलें तें पुनः पुनः सांगावें लागतें. आतां पूर्वपरंपरागत लोकसमजुती आणि स्वानुभव या दोन्हींचा समन्वय साधून हें कोडें उलगडून दाखवूं.    
परिपाठ आणी प्रचित प्रमाण । दोनी राखोन निरुपण । 
श्रोते परम विचक्षण । विवरोत पुढें ॥ ३४ ॥
३४) पूर्वपरंपरा व आत्मप्रचिती या दोन्हींचे प्रामाण्य भंग होणार नाहीं असें विवेचन करुं. बुद्धिमान श्रोत्यांनी त्या विवेचनाचें खोलवर मनन करावें. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे प्रचितनिरुपणनाम समास आठवा ॥
Samas Aathava  Pracit  Nirupan
समास आठवा प्रचितनिरुपण


Custom Search

No comments: