Dashak Navava Samas Navava Sandeha Varan
Samas Navava Sandeha Varan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Brahma. The listeners have some doubts about Brahma. Here Swami Samarth is answering their doubts about Brahma.
समास नववा संदेहवारण
श्रीराम ॥
ब्रह्म वारितां वारेना । ब्रह्म सारिता सरेना ।
ब्रह्म कांहीं वोसरेना । येकीकडे ॥ १ ॥
१) श्रोता म्हणतो कीं, ब्रह्माचें निवारण करुं म्हटलें तरी करतां येत नाहीं. त्यास बाजूससारावें म्हटलें तर सारता येत नाहीं. ब्रह्म एका बाजूस साठवावें म्हटलें तर तसेही करतां येत नाहीं.
ब्रह्म भेदितां भेदेना । ब्रह्म छेदितां छेदेना ।
ब्रह्म परतें होयेना । केलें तरी ॥ २ ॥
२) ब्रह्म मोडावे तर तें मोडता येत नाहीं. ब्रह्म छेदावें तर तें छेदतां येत नाहीं. ब्रह्माला मागें ढकलावें म्हटलें तर ढकलता येत नाहीं.
ब्रह्म खंडेना अखंड । ब्रह्मीं नाहीं दुसरें बंड ।
तरी कैसें हें ब्रह्मांड । सिरकलें मधें ॥ ३ ॥
३) ब्रह्म अखंड आहे त्याचे तुकडे पाडता येत नाहीत. ब्रह्म एकजिनसी आहे. त्याच्यात त्याच्यावाचून दुसरें कांहीं नाहीं. असें असून त्यांत हे ब्रह्मांड शिरले कसें ?
पर्वत पाषाण सिळा सिखरें । नाना स्थळें स्थळांतरें ।
भूगोळरचना कोण्या प्रकारें । जालीं परब्रह्मीं ॥ ४ ॥
४) पर्वत, पाषाण, शिला, शिखरें, नाना प्रकारची स्थानें असलेली ही जड पृथ्वी; सूक्ष्म परब्रह्मामधें झाली कशी ?
भूगोळ आहे ब्रह्मामधें । ब्रह्म आहे भूगोळामधें ।
पाहाता येक येकामधें । प्रत्यक्ष दिसे ॥ ५ ॥
५) पृथ्वी ब्रह्मामधें आहे व तसेंच ब्रह्म पृथ्वीमधें आहे. नीट पाहीलें तर पृथ्वी आणी ब्रह्म एकमेकांमध्यें आहेत. असे आढळते.
ब्रह्मीं भूगोळें पैस केला । आणि भूगोळ ब्रह्में भेदिला ।
विचार पाहातां प्रत्यय आला । प्रत्यक्ष आतां ॥ ६ ॥
६) ब्रह्मामधें पृथ्वीनें जागा व्यापली आहे. व पृथ्वीच्या अंतर्यामीं ब्रह्म आहे. विचार केला तर पृथ्वी आणी ब्रह्म यांचा हा परस्परसंबंध प्रत्यक्ष अनुभवास येतो.
ब्रह्में ब्रह्मांड भीदिलें । हें तों पाहातां नीटचि जालें ।
परी ब्रह्मांस ब्रह्मांडें भेदिलें । हे विपरीत दिसे ॥ ७ ॥
७) ब्रह्म सूक्ष्म आहे. म्हणून ब्रह्म ब्रह्मांडाचा भेद करुन त्याच्या अंतर्यामीं राहते हें बरोबर आहे. पण ब्रह्मांड स्थूल आहे जड आहे, त्यानें ब्रह्मांडाचा भेद करुन त्यांत जागा व्यापावी हें चूकीचे वाटतें.
भेदिलें नाहीं म्हणावें । तरी ब्रह्मीं ब्रह्मांड स्वभावें ।
हें सकळांस अनुभवें । दिसत आहे ॥ ८ ॥
८) ब्रह्मांडानें ब्रह्माचा भेद केला नाहीं म्हणावें तर तें ब्रह्मामधें सहजपणें आहे हे सगळ्यांना प्रत्यक्ष अनुभवानें दिसते.
तरी हें आतां कैसें जालें । विचारुन पाहिजे बोलिलें ।
ऐसें श्रोतीं आक्षेपिलें । आक्षेपवचन ॥ ९ ॥
९) तर हें असें घडलें कसें ? या प्रश्र्णाचे उत्तर विचार करुन दिले पाहिजे. श्रोत्यांनी हा असा आक्षेप काढला.
आतां याचें प्रत्योत्तर । सावध ऐका निरोत्तर ।
येथें पडिले कीं विचार । संदेहाचे ॥ १० ॥
१०) आतां या प्रश्र्नाचे उत्तर लक्षपूर्वक ऐकावें. तें उत्तर तुम्हांला निरुत्तर करील. हा प्रश्र्ण सोडवितांना कांहीं शंका येतात.
ब्रह्मांड नाहीं म्हणों तरी दिसे । आणी दिसे म्हणों तरी नासे ।
आतां हें समजती कैसें । श्रोतेजन ॥ ११ ॥
११) ब्रह्मांड नाहीं असें म्हणावें तर तें डोळ्यांना प्रत्यक्ष दिसते. बरें तें दिसतें म्हणून आहे म्हणावें तर नाश पावतें. श्रोत्यांनी ब्रह्मांडाचे हें स्वरुप आधीं नीट समजून घ्यावें.
तंव श्रोते जाले उद्दित । आहों म्हणती सावचित्त ।
प्रसंगे बोलों उचित । प्रत्योत्तर ॥ १२ ॥
१२) तेव्हां श्रोते म्हणालें कीं, आम्ही उत्तर समजून घेण्यास तयार आहोत. व लक्षपूर्वक तें ऐकतों. यावर वक्ता म्हणाला कीं, या प्रश्र्नाला उचित असें उत्तर देतो.
आकाशीं दीपास लाविलें । दीपें आकाश परतें केलें ।
हें तों घडेना पाहिलें । पाहिजे श्रोतीं ॥ १३ ॥
१३) आपण आकाशांत दिवा लावला. तर त्या दिव्यानें आकाश बाजूला सारलें असें होत नाहीं. हे श्रोत्यांनी ध्यानांत ठेवावे.
आप तेज अथवा पवन । सारुं न सकती गगन ।
गगन पाहातां सघन । चळेल कैसें ॥ १४ ॥
१४) पाणी, अग्नि आणि वायु या तीन भूतांपैकीं एकही आकाशाला बाजूला सारुं शकत नाहीं. आकाश दाटपणें, गच्चपणें भरलेलें असून तें स्थिर आहे. त्याच्यामध्यें हालचाल होऊं शकत नाहीं. म्हणून त्यास बाजूला सारता येत नाहीं.
अथवा कठीण जाली मेदनी । तरी गगनें केली चाळणी ।
पृथ्वीचें सर्वांग भेदुनी । राहिलें गगन ॥ १५ ॥
१५) पृथ्वी कठिण आहे. पण आकाश अत्यंत सूक्ष्म, मृदु व बारीक आहे. त्यामुळें तें पृथ्वीच्या अणुपरमाणुमधें भरुन आहे. त्यानें जणूं पृथ्वीची चाळण केली आहे.
याची प्रचित ऐसी असे । जें जडत्वा आलें तितुकें नासे ।
आकाश जैसें तैसें असे चळणार नाहीं ॥ १६ ॥
१६) जें जें स्थूल असतें तें तें नाश पावतें. जें सूक्ष्म असतें ते अविनाशी असते. आकाश सूक्ष्म आहे व उरवरीत चारी भूतें जड आहेत. ती नाश पावली तरीं आकाश आहे तसेंच राहतें. तें चळत नाहीं.
वेगळेपणें पाहावें । तयास आकाश म्हणावें ।
अभिन्न होतां स्वभावें । आकाश ब्रह्म ॥ १७ ॥
१७) आकाशाला आपण वेगळेपणानें पाहूं शकतो. म्हणून त्यास महाभूत म्हणायचे. त्याच्याशी तदाकार किंवा अभिन्न होऊन बघितलें तर आकाशाला ब्रह्म म्हणायला हरकत नाहीं.
तस्मात आकाश चळेना । भेद गगनाचा कळेना ।
भासलें ब्रह्म तयास जाणा । आकाश म्हणावें ॥ १८ ॥
१८) आकाश ब्रह्मासारखें निश्चळ व अविनाश आहे. आकाशाचे खरें स्वरुप आपल्याला आकलन होत नाहीं. परब्रह्मास वेगळेंपणाने पाहिलें म्हणजे त्यास आकाश म्हणतात.
निर्गुण ब्रह्मसें भासलें । कल्पूं जातां अनुमानलें ।
म्हणोन आकाश बोलिलें । कल्पनेंसाठीं ॥ १९ ॥
१९) आकाशाकडे पाहिले तर तें निर्गुण ब्रह्मच आहे कीं काय असें वाटतें. पण तें निर्गुण ब्रह्म नाहीं. कारण आपण बुद्धीनें त्याची कल्पना करुं शकतो. त्याची कल्पना करता येते म्हणून त्यास आकाश म्हणतात.
कल्पनेसि भासे भास । तितुकें जाणावें आकाश ।
परब्रह्म निराभास । निर्विकल्प ॥ २० ॥
२०) वस्तु वेगळेपणानें भासतें तोपर्यंत आपण जें पाहतो तें आकाश समजावें. कारण परब्रह्माच्या ठिकाणी वेगळेपणानें पाहणें नाहीं, त्यामुळें त्याची कल्पनाही करतां येत नाही. ब्रह्म निराभास व निर्विकल्प आहे.
पंचभूतांमधें वास । म्हणौन बोलिजे आकाश ।
भूतांतरीं जो ब्रह्मांश । तेंचि गगन ॥ २१ ॥
२१) आकाश पांच भूतांमध्यें गणले जाते म्हणून त्यास आकाश म्हणायचे. भूतांच्या अंतर्यामीं जो ब्रह्मांश असतो तेंच खरें आकाश होय.
प्रत्यक्ष होतें जातें । अचळ कैसें म्हणावें त्यातें ।
म्हणोनियां गगनातें । भेदिलें नाहीं ॥ २२ ॥
२२) इतर चारही भूतें आकाशांत उत्पन्न होतात व त्यांतच पुन्हा विलीन होतात. म्हणून त्यांना निश्चल म्हणता येत नाहीं. तीं आकाशांत आली आणि गेली तरी आकाश जसेंच्या तसें राहतें. त्याचा भेद होत नाहीं.
पृथ्वी विरोन उरे जीवन । जीवन नस्तां उरे अग्न ।
अग्न विझतां उरे पवन । तोहि नासे ॥ २३ ॥
२३) पृथ्वी विरुन पाणी राहते. पाणी आटून अग्नि उरतो. अग्नि विझून वायु उरतो. अखेर वायुदेखील नाहींसा होतो.
मिथ्या आलें आणी गेलें । तेणें खरें तें भंगलें ।
ऐसें हें प्रचितीस आलें । कोणेंपरी ॥ २४ ॥
२४) जें दिसतें व नासतें तें खोटे असतें. जें खोटे आहे ते आले आणी गेले. त्यामुळें जें खरें आहे तें भंगल्यासारखें दिसते. असा जो अनुभव त्याचे कारण काय हें पाहणें अवश्य आहे.
भ्रमें प्रत्यक्ष दिसतें । विचार पाहातां काये तेथें ।
भ्रममूळ या जगातें । खरें कैसें म्हणावें ॥ २५ ॥
२५) भ्रम झालेल्या माणसाला कांहींतरी दिसते. पण विचारानें शोध घेतला तर तेथें कांहींच आढळत नाही. जगसुद्धां असेंच भ्रममूळक आहे. म्हणून जगाला खरें म्हणतां येत नाहीं.
भ्रम शोधितां कांहींच नाहीं । तेथें भेदिलें कोणें काई ।
भ्रमें भेदिलें म्हणतां ठाईं । भ्रमचि मिथ्या ॥ २६ ॥
२६) भ्रमानें जें दिसतें त्याचा शोध घेतला. तेथें कांहींच नसतें. असा अनुभव आला. मग जें मुळांत नाहींच त्यानें कशाचा तरी भेद केला हेही शक्य नाहीं. अमक्यानें तमक्याचा भेद केला असें भ्रमानें म्हटलें तर भ्रमच खोटा होतो.
भ्रमाचें रुप मिथ्या जालें । मग सुखें म्हणावें भेदिलें ।
मुळीं लटिकें त्यानें केलें । तेंहि तैसें ॥ २७ ॥
२७) भ्रमानें जें दिसतें तें खरें नाहीं असें एकदां निश्र्चित केल्यावर मगअमक्यानें तमक्याचा भेद केला असें खुशाल बोलावें. जें मुळांतच खरें नाहीं त्यानें अमुक एक केलें असें म्हटलें तर तें करणें देखील खरें नसतें.
लटिक्यानें उदंड केलें । तरी आमुचें काये गेलें ।
केलें म्हणतांच नाथिलें । शाहाणे जाणती ॥ २८ ॥
२८) जें नाहींच नाहीं, ज्याला अस्तित्व नाहीं, त्यानें खूप कांहीं केलें असें बोलल्यानें कोणाचें कांहीं जात नाहीं. त्यानें केले असें म्हणत असतां तें घडलेंच नाहीं ही वस्तुस्थिति शहाणीं माणसें जाणतात.
सागरामधें खसखस । तैसें परब्रहमीं दृश्य ।
मतीसारिखा मतिप्रकाश । अंतरीं वाढे ॥ २९ ॥
२९) दर्यामें खसखस अशीं म्हण आहे. विशाळ सागरांत खसखसीच्या दाण्याचा पत्ताही लागत नाहीं. त्याचप्रमाणें अनंत व अपार परब्रह्मामधें हें दृश्य विश्व फारच अल्प आहे. माणसाच्या बुद्धीच्या प्रमाणांत त्याच्या ठिकाणीं ज्ञानाचा प्रकाश आढळतो. पण बुद्धीला विशाल करतां येते.
मती करितां विशाळ । कवळो लागे अंतराळ ।
पाहातां भासे ब्रह्मगोळ । कवीठ जैसें ॥ ३० ॥
३०) सध्याच्या अवस्थेंत आपल्याला हें विश्व केवढें तरी मोठे वाटते. पण बुद्धि विशाल केली तर ती आकाशाला कवटाळते, मगहें विश्व एखाद्या कवठाएवढें लहान दिसतें.
वृत्ति त्याहून विशाळ । करितां ब्रह्मांड बद्रिफळ ।
ब्रह्माकार होतां केवळ । कांहींच नाहीं ॥ ३१ ॥
३१) आपण आपली वृत्ति त्याहून विशाल केलीं तर तेंच विश्व एखाद्या बोराएवढें दिसूं लागतें. अखेर वृत्ति ब्रह्माशी तदाकार झालीं कीं मग विश्व मुळीं दिसायलाच उरत नाहीं.
आपण विवेकें विशाळला । मर्यादेवेगळा जाला ।
मग ब्रह्मगोळ देखिला । वटबीजन्यायें ॥ ३२ ॥
३२) देहबुद्धि नाहींशी करुन आपण विवेकानें विशाल झालो तर आपल्या स्थळकाळाच्या मर्यादा गळून पडतात. त्या अमर्याद विशाल अवस्थेंमध्यें हें विश्व एखाद्या वडाच्या बीजाएवढें छोटेसें दिसेल.
होतां त्याहून विस्तीर्ण । वटबीज कोतिप्रमाण ।
आपण होतां परिपूर्ण । कांहींच नाहीं ॥ ३३ ॥
३३) आपण त्याहून विशाल बनलों तर हें विश्व वटबीजापेक्षांहीअतिशय लहान दिसेल. आपण ब्रह्मरुप झालो कीं मग विश्व दिसायला मुळीं शिल्लकच उरत नाहीं.
आपण भ्रमें लाहानाळला । केवळ देहधारी जाला ।
तरी मग ब्रह्मांड त्याला । कवळेल कैसें ॥ ३४ ॥
३४) सध्या देहबुद्धीमुळें आपण आकुंचित झालो आहोत. स्वतःला देह समजू लागलो आहोत. अशा आकुंचित वृत्तीच्या माणसाच्या बुद्धीला विश्वास गवसणी घालणें शक्य नाहीं.
वृत्ती ऐसी वाढवावी । पसरुन नाहींच करावी ।
पूर्णब्रह्मास पुरवावी । चहूंकडे ॥ ३५ ॥
३५) आपण आपली वृत्ती विशाल करावी. ती इतकी पसरावी कीं ती अखेर नाहीशींच होऊन जाईल. पूर्णब्रह्माला चहुंकडून पुरेल इतकी तिला पसरावी, विशाल करावी.
जंव एक सुवर्ण आणितां । तेणें ब्रह्मांड मढवितां ।
कैसें होईल तें तत्वतां । बरें पाहा ॥ ३६ ॥
३६) समजा आपण थोडें सोनें आणलें आणि त्यानें सर्व विश्व मढविण्याचा प्रयत्न केला. तर काय होईल ? आपण कितीही प्रयत्न केला तरी सोनें शेवटी अपुरेंच पडेल. तसाच प्रकार वृत्तीच्याबाबतींत घडतो.
वस्तु वृत्तिस कवळे । तेणें वृत्ति फाटोन वितुळे ।
निर्गुण आत्माच निवळे । जैसा तैसा ॥ ३७ ॥
३७) आपली वृत्ती परब्रह्नाचे आकलन करावयास निघालीं कीं तीं मोठी मोठी होऊ लागतें. तसें करतां करतां तीची मर्यादा संपते व ती फाटते. व परब्रह्मीं लीन होऊन जातें. मग मूळचें निर्गुण आत्मस्वरुप जसेंच्या तसें स्पष्टपणें प्रत्ययास येतें.
येणें फिटली आशंका । श्रोते हो संदेह धरुं नका ।
अनुमान असेल तरी विवेका । अवलोकावें ॥ ३८ ॥
३८) आतां शंकेचे निरसन झालें असें मी समजतो. श्रोतेहो आतांपर्यंत जें सांगितलें त्याबद्दल मनांत शंका धरुं नका. मनांत शंका असेल तर नीट विचार करुन पाहा.
विवेकें तुटे अनुमान । विवेकें होये समाधान ।
विवेकें आत्मनिवेदन । मोक्ष लाभे ॥ ३९ ॥
३९) मनुष्य विवेक करील तर त्याच्या शंकेचे निरसन होईल.विवेकानें त्यास समाधान मिळेल. आणि विवेकानेच शरणागती साधून मोक्ष मिळेल.
केली मोक्षाची उपेक्षा । विवेकें सारिलें पूर्वपक्षा ।
सिद्धांत आत्मा प्रत्यक्षा । प्रमाण नलगे ॥ ४० ॥
४०) मोक्षाच्या मागें जाण्याचें कारण नाहीं. मोक्ष बाजूला ठेवावा. पण विवेकानें खरें वाटणारें पण खरें नसणारें दृश्य बाजूस सारावे. म्हणजे मग आत्माचा प्रत्यक्ष साक्षात्कार होतो. त्यास आणखी पुरावा कशाला हवा ? दृश्य खरें वाटणें हा पूर्वपक्ष आणि अतींद्रिय आत्मस्वरुप हा सिद्धांतपक्ष होय.
हें प्रचितीचीं उत्तरें । कळती सारासारविचारें ।
मननध्यासें साक्षात्कारें । पावन होईजे ॥ ४१ ॥
४१) हा जो विषय सांगितला तो माझा अनुभव आहे. सारासार विचार केला तर माझा अभिप्राय ध्यानांत येईल. हें झालें श्रवण. त्यावर मनन करावें. त्यांतून निदिध्यास लागला कीं आत्मसाक्षात्कार होईल. साक्षात्कारानें पवित्र होऊन जावें.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे संदेहवारणनाम समास नववा ॥
Samas Navava Sandeha Varan
समास नववा संदेहवारण
Custom Search
No comments:
Post a Comment