Saturday, March 13, 2021

AyodhyaKanda Part 10 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग १०

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 10 
Doha 53 to 58 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग १० 
दोहा ५३ ते ५८

दोहा—बरष चारिदस बिपिन बसि करि पितु बचन प्रमान ।

आइ पाय पुनि देखिहउँ मनु जनि करसि मलान ॥ ५३ ॥

चौदा वर्षे वनात राहून आणि वडिलांची प्रतिज्ञा खरी करुन मी परत येईन व तुझ्या चरणांचे दर्शन घेईन. तू मला दीनवाणे करुन घेऊ नकोस. ‘ ॥ ५३ ॥

बचन बिनीत मधुर रघुबर के । सर सम लगे मातु उर करके ॥

सहमि सूखि सुनि सीतलि बानी । जिमि जवास परें पावस पानी ॥

रघुकुलातील श्रेष्ठ श्रीरामचंद्रांचे हे अत्यंत नम्र व गोड बोलणे मातेच्या हृदयाला बाणाप्रमाणे रुतू लागले. ती शीतल वाणी ऐकून कौसल्या घाबरुन अशी गर्भगळित झाली की, ज्याप्रमाणे पावसाचे पाणी पडताच जवास वाळून जाते. ॥ १ ॥

कहि न जाइ कछु हृदय बिषादू । मनहुँ मृगी सुनि केहरि नादू ॥

नयन सजल तन थर थर कॉंपी । माजहि खाइ मीन जनु मापी ॥

तिच्या हृदयातील विषादाचे वर्णन करणे अशक्य होते. जणू सिंहाची गर्जना ऐकून हरिणी बावरुन जावी. डोळ्यांत पाणी आले. शरीर थरथरु लागले. जणू मासोळी पहिल्या पावसाचा फेस खाल्ल्यामुळे बेशुद्ध झाली होती. ॥ २ ॥

धरि धीरजु सुत बदनु निहारी । गदगद बचन कहति महतारी ॥

तात पितहि तुम्ह प्रान पिआरे । देखि मुदित नित चरित तुम्हारे ॥

धीर धरुन व पुत्राच्या मुखाकडे पाहात सद्गदित वाणीने ती म्हणू लागली, ‘ बाळा ! तू तर पित्याला प्राणांसारखा प्रिय आहेस. तुझे वागणे पाहून ते नित्य प्रसन्न असतात. ॥ ३ ॥

राजु देन कहुँ सुभ दिन साधा । कहेउ जान बन केहिं अपराधा ॥

तात सुनावहु मोहि निदानू । को दिनकर कुल भयउ कृसानू ॥

तुला राज्य देण्यासाठी त्यांनीच शुभ दिवस शोधला होता. मग आता कोणत्या अपराधासाठी वनात जाण्यास सांगितले आहे ? बाळा ! मला कारण सांग. सूर्यवंशरुपी वनाला जाळण्यासाठी आग कोण ठरले ? ॥ ४ ॥

दोहा—निरखि राम रुख सचिवसुत कारनु कहेउ बुझाइ ।

सुनि प्रसंगु रहि मूक जिमि दसा बरनि नहिं जाइ ॥ ५४ ॥

तेव्हा रामचंद्रांचे मनोगत ओळखून मंत्र्यांच्या पुत्राने सर्व कारण समजावून सांगितले. तो प्रसंग ऐकून कौसल्या मुकी होऊन गेली. तिची अवस्था काही सांगता येण्यासारखी नव्हती. ॥ ५४ ॥

राखि न सकइ न कहि सक जाहू । दुहूँ भॉंति उर दारुन दाहू ॥

लिखत सुधाकर गा लिखि राहू । बिधि गति बाम सदा सब काहू ॥

ती श्रीरामांना ठेवूनही घेऊ शकत नव्हती आणि वनात जाण्यास सांगूही शकत नव्हती. दोन्ही प्रकारे फार मोठा मनस्ताप होत होता. ती मनात विचार करु लागली की, ‘ बघा, विधात्याची चाल नेहमी सर्वांसाठी वाकडीच असते. ते लिहीत होते चंद्रमा, परंतु त्याऐवजी लिहिले गेले राहू.’ ॥ १ ॥

धरम सनेह उभयँ मति घेरी । भइ गति सॉंप छुछुंदरि केरी ॥

राखउँ सुतहि करउँ अनुरोधू । धरमु जाइ अरु बंधु बिरोधू ॥

धर्म व स्नेह दोन्हींनी कौसल्येच्या बुद्धीला घेरुन टाकले. इकडे आड, तिकडे विहीर अशी तिची स्थिती झाली. साप व चिचुंद्री यांच्या गोष्टीसारखी तिची अवस्था झाली. ती विचार करु लागली की, जर मी हट्टाने मुलाला ठेवून घेतले तर धर्माला बाध येतो आणि भावांमध्ये वितुष्ट येते, ॥ २ ॥

कहउँ जान बन तौ बड़ि हानी । संकट सोच बिबस भइ रानी ॥

बहुरि समुझि तिय धरमु सयानी । रामु भरतु दोउ सुत सम जानी ॥

आणि वनात जाण्यास सांगितले, तर फार मोठी हानी घडते. अशा प्रकारे धर्मसंकटात सापडून राणी फार काळजीत पडली. मग बुद्धिमती कौसल्येने पातिव्रत्यधर्म श्रेष्ठ जाणून आणि राम व भरत या दोन्ही पुत्रांना समान मानून, ॥ ३ ॥

सरल सुभाउ राम महतारी । बोली बचन धीर धरि भारी ॥

तात जाउँ बलि कीन्हेहु नीका । पितु आयसु सब धरमका टीका ॥

सरळ स्वभावाची श्रीरामांची माता कौसल्या हिने अत्यंत धीर धरुन म्हटले, ‘ हे पुत्रा ! माझ्या कायेची तुझ्या धर्मनिष्ठेवरुन कुरवंडी उतरावी. तू चांगले केलेस. पित्याच्या आज्ञेचे पालन करणे हेच सर्व धर्मांत श्रेष्ठ आहे. ॥ ४ ॥         

दोहा—राजु देन कहि दीन्ह बनु मोहि न सो दुख लेसु ।

तुम्ह बिनु भरतहि भूपतिहि प्रजहि प्रचंड कलेसु ॥ ५५ ॥

त्यांनी तुला राज्य देण्याचे सांगून वन दिले, याचे मला लेशमात्र दुःख नाही, दुःख एवढेच आहे की, तुझ्याविना भरताला, महाराजांना व प्रजेला फार मोठे दुःख होईल. ॥ ५५ ॥

जौं केवल पितु आयसु ताता । तौ जनि जाहु जानि बड़ि माता ॥

जौं पितु मातु कहेउ बन जाना । तौ कानन सत अवध समाना ॥

बाळ ! जर फक्त पित्याची आज्ञा असेल, तर माता ही पित्यापेक्षा मोठी आहे असे मानून वनात जाऊ नकोस. परंतु माता-पिता या दोघांनी वनात जाण्यास सांगितले असेल, तर वन हे तुझ्यासाठी शेकडो अयोध्येच्या राज्यांच्या बरोबरीचे आहे. ॥ १ ॥

पितु बनदेव मातु बनदेवी । खग मृग चरन सरोरुह सेवी ॥

अंतहुँ उचित नृपहि बनबासू । बय बिलोकि हियँ होइ हरॉंसू ॥

वनातील देव हे तुझे पिता असतील आणि वनदेवी या माता असतील. तेथील पशु-पक्षी तुझ्या चरण-कमलांचे सेवक होतील. राजाने वृद्धावस्थेत वनवास करावा, हे योग्यच आहे. फक्त तुझी सुकुमार अवस्था पाहून मनात दुःख वाटते. ॥ २ ॥

बड़भागी बनु अवध अभागी । जो रघुबंसतिलक तुम्ह त्यागी ॥

जौं सुत कहौं संग मोहि लेहू । तुम्हरे हृदयँ होइ संदेहू ॥

हे रघुवंशाच्या तिलका, वन हे मोठे भाग्यशाली आहे आणि जिने तुझा त्याग केला ती अयोध्या अभागी होय. हे पुत्रा, जर मी तुला म्हटले की, मलाही बरोबर घेऊन चल, तर तुला संशय येईल की, आई मला या निमित्ताने थांबवू इच्छिते. ॥ ३ ॥

पूत परम प्रिय तुम्ह सबही के । प्रान प्रान के जीवन जी के ॥

ते तुम्ह कहहु मातु बन जाऊँ । मैं सुनि बचन बैठि पछिताऊँ ॥

हे पुत्रा, तू सर्वांनाच प्रिय आहेस, प्राणांचा प्राण आणि हृदयाचे जीवन आहेस. तोच तू प्राणाधार म्हणत आहेस की माते, मी वनात जातो आणि मी तुझे बोलणे ऐकून पश्चात्ताप करीत बसली आहे. ॥ ४ ॥

दोहा—यह बिचारि नहिं करउँ हठ झूठ सनेहु बढ़ाइ ।

मानि मातु कर नात बलि सुरति बिसरि जनि जाइ ॥ ५६ ॥

असा विचार करुन व खोटे प्रेम दाखवून मी काही हट्ट करीत नाही. मुला, तुझ्यावरुन जीव ओवाळून टाकते. मातेचे नाते मानून मला विसरुन जाऊ नकोस. ॥ ५६ ॥

देव पितर सब तुम्हहि गोसिईं । राखहुँ पलक नयन की नाईं ॥

अवधि अंबु प्रिय परिजन मीना । तुम्ह करुनाकर धरम धुरीना ॥

हे लाडक्या, पापण्या जशा डोळ्यांचे रक्षण करतात, त्याप्रमाणे देव व पितर तुझे रक्षण करोत. तुझ्या वनवासाचा चौदा वर्षांचा काळ हा जणू जल आहे आणि प्रियजन व कुटुंबीय मासे आहेत. तू दयेची खाण आहेस व धर्माची धुरा धारण करणारा आहेस. ॥ १ ॥

अस बिचारि सोइ करहु उपाई । सबहि जिअत जेहिं भेंटहु आई ॥

जाहु सुखेन बनहि बलि जाऊँ । करि अनाथ जन परिजन गाऊँ ॥

असा विचार करुन आम्ही सर्वजण जिवंत असेतोपर्यंत भेटण्याचा उपाय कर. मी जीव ओवाळून सांगते, तू सेवकांना, आप्तांना व नगरवासीयांना अनाथ करुन सुखाने वनात जा. ॥ २ ॥

सब कर आजु सुकृत फल बीता । भयउ कराल कालु बिपरीता ॥

बहुबिधि बिलपि चरन लपटानी । परम अभागिनि आपुहि जानी ॥

आज सर्वांची पुण्याई संपली. हा कठीण काळ आमच्यावर ओढवला .’ अशा प्रकारे पुष्कळ विलाप करीत आणि स्वतःला दुर्दैवी मानून माता कौसल्येने श्रीरामांचे चरण घट्ट धरले. ॥ ३ ॥

दारुन दुसह दाहु उर ब्यापा । बरनि न जाहिं बिलाप कलापा ॥

राम उठाइ मातु उर लाई । कहि मृदु बचन बहुरि समुझाई ॥

हृदयामध्ये भयानक असह्य दुःख भरले होते. त्यावेळी तिने केलेल्या विलापाचे वर्णन करणे शक्य नाही. श्रीरामांनी मातेला उठवून हृदयाशी धरले आणि कोमल शब्दांनी तिची समजूत घातली. ॥ ४ ॥

दोहा—समाचार तेहि समय सुनि सीय उठी अकुलाइ ।

जाइ सासु पद कमल जुग बंदि बैठि सिरु नाइ ॥ ५७ ॥

ही वार्ता ऐकताच सीता व्याकूळ झाली आणि सासूजवळ येऊन तिच्या चरण-कमलांना वंदन करुन मान खाली घालून बसली. ॥ ५७ ॥

दीन्हि असीस सासू मृदु बानी । अति सुकुमारि देखि अकुलानी ॥

बैठि नमितमुख सोचति सीता । रुप रासि पति प्रेम पुनीता ॥

सासूने कोमल वाणीने तिला आशीर्वाद दिला. सीतेची अत्यंत सुकुमार अवस्था पाहून ती व्याकूळ झाली. रुपाची खाण असलेली आणि पतीवर पवित्र प्रेम करणारी सीता ही मान खाली घालून बसून विचार करीत होती. ॥ १ ॥

चलन चहत बन जीवननाथू । केहि सुकृती सन होइहि साथू ॥

की तनु प्रान कि केवल प्राना । बिधि करतबु कछु जाइ न जाना ॥

प्राणनाथ श्रीराम वनात जाऊ इच्छितात. पाहूया, कोणत्या पुण्यवानाची त्यांना सोबत घडेल ? शरीर व प्राण दोन्ही बरोबर जाणार की फक्त प्राणानेच यांची सोबत होईल ? विधात्याची करणी काही कळत नाही. ॥ २ ॥

चारु चरन नख लेखनि धरनी । नूपुर मुखर मधुर कबि बरनी ॥

मनहुँ प्रेम बस बिनती करहीं । हमहि सीय पद जनि परिहरहीं ॥

सीता आपल्या सुंदर चरणांच्या नखांनी जमीन कुरतडत होती. असे करताना तिच्या नूपुरांचा मधुर ध्वनी होत होता. कवी त्याचे वर्णन असे करतो की, जणू प्रेम-वश होऊन नूपुर विनंती करीत होते की, सीतेच्या चरणांनी आम्हांला कधी सोडून देऊ नये. ॥ ३ ॥

मंजु बिलोचन मोचति बारी । बोली देखि राम महतारी ॥

तात सुनहु सिय अति सुकुमारी । सास ससुर परिजनहि पिआरी ॥

सीतेच्या सुंदर नेत्रांतून पाणी वाहात होते. तिची दशा पाहून श्रीराम-माता कौसल्या श्रीरामांना म्हणाली, ‘ पुत्रा ! सीता ही अत्यंत सुकुमार आहे आणि सासू, सासरे आणि कुटुंबीयांची आवडती आहे. ॥ ४ ॥

दोहा—पिता जनक भूपाल मनि ससुर भानुकुल भानु ।

पति रबिकुल कैरव बिपिन बिधु गुन रुप निधानु ॥ ५८ ॥

हिचे वडील जनक हे राजांचे शिरोमणी आहेत. सासरे सूर्यकुलाचे सूर्य आहेत आणि पती सूर्यकुलरुपी कुमुदवनास प्रफुल्लित करणारे चंद्र व गुण आणि रुपाचे भांडार आहेत. ॥ ५८ ॥       

मैं पुनि पुत्रबधू प्रिय पाई । रुप रासि गुन सील सुहाई ॥

नयन पुतरि करि प्रीति बढ़ाई । राखेउँ प्रान जानकिहिं लाई ॥

शिवाय रुपराशी, सुंदर गुण आणि शीलसंपन्न लाडकी सून मला लाभली आहे. मी हिला आपल्या डोळ्यांच्या बाहुलीप्रमाणे जतन करुन हिच्यावर प्रेम केले आहे. माझे प्राण हिच्यामध्ये गुंतले आहेत. ॥ १ ॥

कलपबेलि जिमि बहुबिधि लाली । सींचि सनेह सलिल प्रतिपाली ॥

फूलत फलत भयउ बिधि बामा । जानि न जाइ काह परिनामा ॥

कल्पलतेसारखे मी हिला मोठ्या लाडाने स्नेहरुपी जलाने शिंपून पाळले आहे. आता या लतेच्या फुलण्या-फळण्याचा काळ आला, तर विधाता प्रतिकूल झाला. याचा काय परिणाम होणार आहे, हे कुणास ठाऊक ? ॥ २ ॥

पलँग पीठ तजि गोद हिंडोरा । सियँ न दीन्ह पगु अवनि कठोरा ॥

जिअनमूरि जिमि जोगवत रहऊँ । दीप बाति नहिं टारन कहऊँ ॥

सीतेने पलंग, मांडी आणि झोपाळा सोडून कधी कठीण भूमीवर पाय ठेवला नाही. मी नेहमी संजीवनी मुळीप्रमाणे अत्यंत काळजीने हिची राखण केली. मी हिला कधी दिव्याची वात विझवायलासुद्धा सांगत नसे. ॥ ३ ॥

सोइ सिय चलन चहति बन साथा । आयसु काह होइ रघुनाथा ॥

चंद किरन रस रसिक चकोरी । रबि रुख नयन सकइ किमि जोरी ॥

तीच सीता आता तुझ्याबरोबर वनात जाऊ पाहाते. हे रघुनाथा, तिला काय आज्ञा आहे ? चंद्रम्याच्या किरणांतील अमृत इच्छिणारी चकोरी सूर्याकडे कसे पाहू शकेल ? ॥ ४ ॥



Custom Search

No comments: