Saturday, March 13, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 14 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग १४

 

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 14 
Ovya 391 to 420 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग १४ 
ओव्या ३९१ ते ४२०

मूळ श्र्लोक

सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।

ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः ॥ २९ ॥

२९) ज्याचें मन योगयुक्त झालें आहे, तो प्राणिमात्रांच्या ठिकाणीं आत्म्यास पाहातो व आत्म्याच्या ठिकाणीं प्राणिमात्र आहेत असें पाहातो, तो सर्व ठिकाणीं समदृष्टि होतो.

यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति ।

तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति ॥ ३० ॥

३०) जो मला सर्वत्र पाहातो आणि माझ्या ठिकाणीं सर्व पाहातो, त्याला मी कधी दृष्टिआड होत नाहीं व तो मला कधीं दृष्टिआड होत नाहीं.

तरि मी तंव सकळ देहीं । असें एथ विचारु नाहीं ।

आणि तैसेंचि माझां ठायीं । सकळ असे ॥ ३९१ ॥

३९१) आणि मी तर सर्व देहांमध्यें आहे, यांत विचार करण्यासारखें कांहीं नाहीं आणि त्याचप्रमाणें माझ्या ठिकाणीं हें सर्व आहे.

हें ऐसेंचि संचलें । परस्परें मिसळलें ।

बुद्धी घेपे एतुलें । होआवें गा ॥ ३९२ ॥

३९२) हें असेंच बनलेलें आहे व परस्पर मिसळलेलें आहे, पण अरे, बुद्धीनें एवढें ग्रहण मात्र केलें पाहिजे, 

एर्‍हवीं तरी अर्जुना । जो एकवटलिया भावना ।

सर्वभूतीं अभिन्ना । मातें भजे ॥ ३९३ ॥

३९३) एर्‍हवीं तरी अर्जुना, जो ऐक्याच्या समजुतीनें मी सर्व भूतांत सारखा व्यापून राहिलेलों आहे, असें जाणून मला भजतो.

भूतांचेनि अनेकपणें । अनेक नोहे अंतःकरणें ।

केवल एकत्वचि माझें जाणे । सर्वत्र जो ॥ ३९४ ॥

३९४) प्राण्यांच्या भेदानें ज्याच्या अंतःकरणांत द्वैत उत्पन्न होत नाहीं आणि जो सर्व ठिकाणीं माझें केवळ एकत्वच जाणतो.   

मग तो एक हा मियां । बोलतां दिसतसे वायां ।

एर्‍हवीं न बोलिजे तरि धनंजया । तो मीचि आहे ॥ ३९५ ॥

३९५) अर्जुना, मग तो माझ्याशीं एकच आहे असे बोलणे व्यर्थ आहे. कारण असें जरी बोललें नाहीं, तरी तो मीच आहे.

दिपा आणि प्रकाशा । एकवंचीचा पाडु जैसा ।

तो माझां ठायीं तैसा । मी तयामाजीं ॥ ३९६ ॥

३९६) दिवा व त्याचा प्रकाश, हे जसे दोन्ही एकच आहेत, त्याप्रमाणें, तो माझ्या ठिकाणीं आणि मी त्याच्या ठिकाणीं ऐक्यतेनें आहोंत.  

जैसा उदकाचेनि आयुष्यें रसु । कां गगनाचेनि मानें अवकाशु ।

तैसा माझेनि रुपें रुपसु । पुरुष तो गा ॥ ३९७ ॥

३९७) ज्याप्रमाणें जेथपर्यंत पाणी आहे, तेथपर्यंत ओलावा आहे, अथवा आकाशाच्या बरोबरीनें पोकळी आहे, त्याप्रमाणें माझ्या रुपानें तो पुरुष रुपवान आहे.

मूळ श्र्लोक

सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः ।

सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते ॥ ३१ ॥

३१) ( माझें ) एकत्व जाणून राहाणारा जो योगी सर्व भूतांच्या ठायी असलेल्या मला सेवितो, तो ( देह, नाम इत्यादि ) सर्व उपाधींनीं युक्त असला तरी मत्स्वरुप झालेला असतो.

जेणें ऐक्याचिये दिठी । सर्वत्र मातेंचि किरीटी ।

देखिला जैसा पटीं । तंतु एकु ॥ ३९८ ॥

३९८) अर्जुना, ज्याप्रमाणें वस्त्रामध्यें केवळ एक सूतच असतें, त्याप्रमाणें ज्यानें अद्वैतबोधानें सर्व ठिकाणीं केवळ मलाच पाहिलें आहे;       

कां स्वरुपें तरी बहुतें आहाती । परी तैसीं सोनीं बहुवें न होती ।

ऐसी ऐक्याचळाची स्थिती । केली जेणें ॥ ३९९ ॥

३९९) अथवा अलंकारांचें आकार जरी पुष्कळ आहेत, तरी त्याप्रमाणें सोनीं पुष्कळ नाहींत, अशी अचल पर्वताप्रमाणें ज्यानें ऐक्यस्थिति केली आहे; 

ना तरी वृक्षाची पानें जेतुलीं । तेतुलीं रोपें नाहीं लाविलीं ।

ऐसी अद्वैतदिवसें पाहली । रात्री जया ॥ ४०० ॥

४००) अथवा झाडाची जितकी पानें आहेत, तितकीं रोपें लावलेली नाहींत, अशा अद्वैत दिवसानें ज्यास द्वैताची रात्र उजाडली;

तो पंचात्मकीं सांपडे । मग सांग पां कैसेनि अडे ।

जो प्रतीतीचेनि पाडें । मजसीं तुके ॥ ४०१ ॥

४०१) ( अशा रीतीनें ) जो अनुभवाच्या योग्यतेनें माझ्या बरोबरीचा ठरतो, तो पंचमहाभूतात्मक शरीरांत जरी असला तरी, मग सांग बरें, तो देहतादात्म्य घेऊन ( देहांत ) कसा अडकून राहील ?   

माझें व्यापकपण आघवें । गवसलें तयाचेनि अनुभवें ।

तरी न म्हणतां स्वभावें । व्यापाकु जाहला ॥ ४०२ ॥

४०२) माझें सर्व व्यापकपण त्याच्या अनुभवानें कवटाळलें आहे, म्हणून त्याला व्यापक असें जरी म्हटलें नाहीं, तरी तो सहज व्यापक आहे.

आतां शरीरीं तरी आहे । परि शरीराचा तो नोहे ।

ऐसे बोलवरी होये । तें करुं ये काई ॥ ४०३ ॥

४०३) आतां तो देहधारी जरी असला तरी तो देहाचें तादात्म्य घेत नाहीं, अशी ही त्याची स्थिति शब्दांनी सांगण्याजोगी करतां येईल काय ?

मूळ श्र्लोक

आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन ।

सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः ॥ ३२ ॥

३२) हे अर्जुना, सर्व ठिकाणीं जो आपल्यासारखें पाहातो, सुख अथवा दुःख हेंहि जो आपल्यासारखें पाहातो, ( आपल्याहून भिन्न जाणत नाहीं ) तो योगी अत्यंत श्रेष्ठ अशा ( अवस्थेला पोंचलेला ) आहे असें जाणावें.  

म्हणोनि असो तें विशेषें । आपणपयासारिखें ।

जो चराचर देखे । अखंडित ॥ ४०४ ॥

४०४) म्हणून त्याचें विशेष वर्णन करणें राहूं दे. जो तत्त्ववेत्ता सर्व चराचर आपणासारखेंच निरंतर पाहातो,    

सुखदुःखादि वर्में । कां शुभाशुभें कर्में ।

दोनी ऐसीं मनोधर्में । नेणेचि जो ॥ ४०५ ॥ 

४०५) सुखदुःखादि कर्मे अथवा पुण्यपापादि कर्में अशी हीं द्वंद्वें जो मनानें जाणतच नाहीं;     

हे समविषम भाव । आणिकही विचित्र जें सर्व ।

तें मानी जैसे अवयव । आपुले होती ॥ ४०६ ॥

४०६) हे समविषमभाव ( बरें-वाईट ), आणखीहि सर्व निरनिराळ्या प्रकारच्या वस्तु, ह्या जसे कांहीं आपलें अवयव आहेत, असें जो समजतो;  

हें एकैक काय सांगावें । जया त्रैलोक्यचि आघवें ।

मी ऐसें स्वभावें । बोधा आलें ॥ ४०७ ॥

४०७) हें वेगवेगळें काय सांगावें ? ज्याला सर्व त्रैलोक्यच आपण आहोंत असें ज्ञान सहजच प्राप्त झालें आहे.

तयाही देह एकु कीर आथी । लौकिकीं सुखदुःखी तयातें म्हणती ।

परी आम्हांतें ऐसीचि प्रतीती । परब्रह्मचि हा ॥ ४०८ ॥

४०८) त्यालाहि एक देह आहे आणि लोकांत त्याला सुखीदुःखीहि म्हणतात, हें खरें आहे. परंतु आमचा अनुभव असाच आहे कीं, तो परब्रह्म आहे.

म्हणोनि आपणपां विश्र्व देखिजे । आणि आपण विश्र्व होईजे ।

ऐसें साम्यचि एक उपासिजे । पांडवा गा ॥ ४०९ ॥  

४०९) म्हणून आपल्या ठिकाणीं जगत् पाहावें आणि आपण जगत् व्हावें, अशा एका साम्याचीच, हे अर्जुना, तूम उपासना कर.     

हें तूतें बहुतीं प्रसंगीं । आम्ही म्हणों याचिलागीं ।

जे साम्यापरौती जगीं । प्राप्ति नाहीं ॥ ४१० ॥

४१०) तूं समदृष्टि ठेव, असें आम्हीं एवढ्याचकरितां तुला पुष्कळ प्रसंगीं म्हणत आलों; कारण साम्यापलीकडे या जगांत दुसरा लाभ नाहीं.  

मूळ श्र्लोक

अर्जुन उवाच

योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन ।

एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात् स्थितिं स्थिराम् ॥ ३३ ॥

३३) अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, तूं जो हा समदर्शनाचा योग सांगितलास तो, मन हें चंचल असल्यामुळें ( माझ्या ठिकाणीं ) स्थिर राहील असें मला वाटत नाहीं. 

चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद् दृढम् ।

तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिवि सुदुष्करम् ॥ ३४ ॥

३४) हे कृष्णा, मन चंचल, क्षोभक, बलयुक्त व वळविण्यास कठीण आहे, त्याचा निग्रह करणें, वायूच्या निग्रहाप्रमाणेंच अत्यंत कठीण आहे, असे मला वाटतें.   

अर्जुन म्हणे देवा । तुम्ही सांगा कीर आमुचिया कणवा ।

परी न पुरों जी स्वभावा । मनाचिया ॥ ४११ ॥

४११) ( यावर ) अर्जुन म्हणाला, देवा, तुम्हीं आमच्या विषयींच्या कळकळीनें खरोखर सांगत आहांत. परंतु महाराज, या मनाच्या स्वभावापुढें ( आमचा ) टिकाव लागत नाहीं.

हें मन कैसें केवढें । ऐसें पाहों म्हणों तरी न सांपडे ।

एर्‍हवीं राहाटावया थोडें । त्रैलोक्य यया ॥ ४१२ ॥

४१२) हें मन कसें व केवढें आहे, याचा पत्ता लावूं असें म्हटलें तर सांपडत नाहीं. एर्‍हवीं या मनाला वावरण्याला हें सर्व त्रैलोक्य अपुरें पडतें.

म्हणोनि ऐसें कैसें घडेल । जे मर्कट समाधी येईल ।

कां राहे म्हणतलिया राहेल । महावातु ॥ ४१३ ॥

४१३) म्हणून हें असें होईल कीं, माकडाला समाधि लागेल ! किंवा सोसाट्याचा वारा ‘ थांब ‘ म्हटल्याबरोबर थांबेल काय ?

जें बुद्धीतें सळी । निश्र्चयातें टाळी ।

धैर्येंसी हातफळी । मिळऊनि जाय ॥ ४१४ ॥

४१४) जें मन बुद्धीला छळतें, तें ( तिनें ) केलेला निश्र्चय सिद्धीस जाऊं देत नाहीं आणि सात्त्विक धैर्याच्या हातावर हात मारुन पळून जातें.

जें विवेकातें भुलवी । संतोषासी चाड लावी ।

बैसिजे तरी हिंडवी । दाही दिशा ॥ ४१५ ॥

४१५) जें सारासार बुद्धीला भ्रमांत पाडतें, संतोषाला आशा उत्पन्न करतें आणि आपण एकें ठिकाणीं राहिलों तरी आपणाला दाही दिशांना फिरवितें.

जें निरोधलें घे उवावो । जया संयमुचि होय सावावो ।

तें मन आपुला स्वभावो । सांडील काई ॥ ४१६ ॥

४१६) ज्याला आवरुं गेलें असतां तें जास्त उसळतें, ज्याला निरोधच साहाय्य होतो, ( असें ) तें मन आपला स्वभाव टाकील काय ?           

म्हणोनि मन एक निश्र्चळ राहेल । मग आम्हांसी साम्य येईल ।

हें विशेषेंहि न घडेल । तयालागीं ॥ ४१७ ॥

४१७) म्हणून हें मन एक निश्र्चल राहील, आणि मग आम्हांला साम्यावस्था प्राप्त होईल, हें एवढ्याकरितां फार करुन घडणार नाहीं.

मूळ श्र्लोक

श्रीभगवान उवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् ।

अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ॥ ३५ ॥

३५) श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, मन हें निःसंशय चंचल असून निग्रह करण्यास अत्यंत कठीण आहे. परंतु अर्जुना, ( सतत ) अभ्यासानें व वैराग्यानें याचा निग्रह करतां येतो.

तंव कृष्ण म्हणती साचचि । बोलत आहासि तें तैसेंचि ।

यया मनाचा कीर चपळचि । स्वभावो गा ॥ ४१८ ॥

४१८) तेव्हां श्रीकृष्ण म्हणाले, तूं म्हणत आहेस, तें खरोखर तसेंच आहे. या मनाचा स्वभाव खरोखर चपलच आहे. 

परि वैराग्याचेनि आधारें । जरि लाविलें अभ्यासाचिये मोहरे ।

तरि केतुलेनि एकें अवसरें । स्थिरावेल ॥ ४१९ ॥

४१९) परंतु वैराग्याच्या जोरावर मन जर अभ्यासाकडे वळविलें, तर कांहीं एका वेळानें तें स्थिर होईल.

कां जें यया मनाचे एक निकें । जे हें देखिले गोडीचिया ठाया सोके ।

म्हणोनि अनुभवसुखचि कवतिकें । दावीत जाइजे ॥ ४२० ॥

४२०) कारण कीं, या मनाची एक गोष्ट चांगली आहे; ती

 ही कीं, तें ( त्याला एकदा गोडी लागली कीं )

 अनुभवलेल्या गोडीच्या ठिकाणीं सवकतें. म्हणून त्याला

 कौतुकानें आत्मानुभवसुखच वारंवार दाखवीत जावें.



Custom Search

No comments: