Saturday, March 13, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 16 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग १६

 

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 16 
Ovya 451 to 480 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग १६ 
ओव्या ४५१ ते ४८०

जे विवेकग्रामींचां मुळीं । बैसले आहाति नित्य फळीं ।

तया योगियांचां कुळीं । जन्म पावे ॥ ४५१ ॥

४५१) जे विवेकरुप गांवच्या मुख्य ठिकाणीं असलेल्या ब्रह्मरुप फळाचें नित्य सेवन करीत राहिले आहेत, त्या योग्यांच्या कुळांत त्यास जन्म मिळतो.

मोटकी देहाकृति उमटे । आणि निजज्ञानाची पाहांट फुटे ।

सूर्यापुढां प्रगटे । प्रकाशु जैसा ॥ ४५२ ॥

४५२) अल्प वयांतच त्याच्या ठिकाणीं स्वरुपज्ञानाचा उदय होतो. ज्याप्रमाणें सूर्य उगवण्याच्या पूर्वी अरुणोदयाचा प्रकाश होतो;

तैशी दशेची वाट न पाहतां । वयसेचिया गांवा न येतां ।

बाळपणींच सर्वज्ञाता । वरी तयातें ॥ ४५३ ॥  

४५३) त्याप्रमाणें योग्य अवस्थेची वाट न पाहातां प्रौढवयरुपी गांवाला पोंचण्यच्या अगोदर लहानपणींच, सर्वज्ञता त्यास माळ घालतें.

तिये सिद्धप्रज्ञेचेनि लाभे । मनचि सारस्वतें दुभे ।

मग सकळ शास्त्रें स्वयंभें । निघती मुखें ॥ ४५४ ॥

४५४) पूर्वजन्मांत तयार झालेली बुद्धि त्याला अनुकूल असल्यामुळें त्याचें मनच सर्व विद्यांना प्रसवतें आणि मग सर्व शास्त्रें आपोआप त्याच्या मुखांतून निघतात.  

ऐसें जे जन्म । जयालागीं देव सकाम ।

स्वर्गीं ठेले जप होम । करिती सदा ॥ ४५५ ॥

४५५) त्याकरितां देव कामनयुक्त होऊन स्वर्गांत नेहमी जप, होम इत्यादि करीत राहिले आहेत, असा जो जन्म

अमरी भाट होईजे । मग मृत्युलोकातें वानिजे ।

ऐसें जन्म पार्था गा जें । तें तो पावे ॥ ४५६ ॥

४५६) व देवांनीं भाट होऊन मृत्युलोकाचें वर्णन करावें असा जो जन्म, अर्जुना, तो त्याला प्राप्त होतो.

मूळ श्र्लोक

पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः ।

जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मातिवर्तते ॥ ४४ ॥

४४) जरी तो परतंत्र असला तरी पूर्वजन्मींचा योगाभ्यास त्याला आपल्याकडे ओढतो. ( फार कशाला ? ) योगासंबंधी ( केवळ ) जिज्ञासु असूनहि शब्दब्रह्माचें तो अतिक्रमण करतो. ( वेदरहस्यासारखे गूढ अभिप्राय अथवा समाधीचा अनुभव हे याच स्थितींत त्याला सहज साध्य होतात. )  

आणि मागील जे सद्बुद्धि । जेथ जीविता जाहाली होती अवघि ।

मग तेचि पुढती निरवधि । नवी लाहे ॥ ४५७ ॥

४५७) आणि मागच्या जन्माची चांगली बुद्धि, जी त्याला मागील जन्माचा शेवट होण्याच्या वेळीं प्राप्त झाली होती, तीच चांगली बुद्धि मग ( या जन्मीं ) त्याला सतत नवी प्राप्त होते.

तेथ सदैवा आणि पायाळा । वरि दिव्यांजन होय डोळां ।

मग देखे जैसीं अवलीळा । पाताळधनें ॥ ४५८ ॥

४५८) एखादा भाग्यवान पुरुष पायाळू असून, त्याला डोळ्यांत घालण्याला दिव्यांजन मिळाल्यानंतर तो जसा पाताळांतील द्रव्य सहज पाहातो,

तैसे दुर्भेद जे अभिप्राय । कां गुरुगम्य हन ठाय ।

तेथे सौरसेंवीण जाय । बुद्धि तयांची ॥ ४५९ ॥

४५९) त्याप्रमाणें ज्या सिद्धान्तांत बुद्धीचा प्रवेश होत नाहीं अथवा जे सिद्धान्त केवळ गुरुकडून खरोखर कळावयाचे असतात, त्या सिद्धांतात त्याची बुद्धि प्रयत्नावांचून प्रवेश करते.

बळियें इंद्रियें येती मना । मन एकवटे पवना ।

पवन सहजें गगना । मिळोंचि लागे ॥ ४६० ॥

४६०) बलवान इंद्रियें मनाच्या आधीन होतात, मन प्राणवायूशी  एक होतें आणि प्राणवायू अनायासें मूर्ध्निआकाशास मिळूं लागतो.

ऐसें नेणों काय आपैसें । तयातेंचि कीजे अभ्यासें ।

समाधि घर पुसे । मानसाचें ॥ ४६१ ॥

४६१) असें सहजच कसें काय होतें, हें समजत नाहीं. अभ्यास त्याला आपोआप येतो व समाधि त्याच्या मनाचे घर विचारित येते.

जाणिजे योगपीठीचा भैरवु । काय हा आरंभरंभेचा गौरवु ।

कीं वैराग्यसिद्धीचा अनुभवु । रुपा आला ॥ ४६२ ॥

४६२) हा योगभ्रष्ट पुरुष योगरुपी आसनावरील जणूं काय भैरवदेवच, अथवा यागारंभरुपी केळीची शोभाच किंवा जणूं काय वैराग्याच्या पूर्णतेचा मूर्तिमंत अनुभवच आकाराला आलेला आहे !  

हा संसार उमाणितें माप । कां अष्टांगसामग्रीचे दीप ।

जैसे परिमळेंचि धरिजे रुप । चंदनाचें ॥ ४६३ ॥

४६३) हा पुरुष म्हणजे संसार मोजण्याचें मापच किंवा अष्टांग योगाची सामग्री दाखविणारा जणूं दिवाच होय ! ज्याप्रमाणें सुवासानें चंदनाचे रुप धरावें,

तैसा संतोषाचा काय घडिला । कीं सिद्धभांडारींहूनि काढिला ।

दिसे तेणें मानें रुढला । साधकादशे ॥ ४६४ ॥

४६४) त्याप्रमाणें हा पुरुष जसा कांहीं संतोषाचाच बनविलेला, अथवा सिद्धांच्या समुदायांतून काढलेला असावा, इतक्या योग्यतेचा साधकदशेंतच तयार झालेला दिसतो. 

मूळ श्र्लोक

प्रयत्नाद् यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः ।

अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम्  ॥ ४५ ॥

४५) आणि योगमार्गाचें प्रयत्नपूर्वक आचरण करणारा तो योगी पापापासून शुद्ध होऊन, अनेक जन्मांनीं योगसिद्धि मिळवितो; नंतर अत्यंत श्रेष्ठ अशा गतीला म्हणजे मोक्षाला जातो.

जे वर्षशतांचियां कोडी । जन्मसहस्त्रांचिया आडी ।

लंघितां पातला थडी । आत्मसिद्धीची ॥ ४६५ ॥

४६५) कारण कीं, कोट्यवधि शतवर्षांत हजारो जन्मांचें प्रतिबंध उल्लंघन करुन तो आत्मसिद्धीच्या किनार्‍याला येऊन पोहोंचला;

म्हणोनि साधनजात आघवें । अनुसरे तया स्वभावें ।

मग आयतिये बैसे राणिवे । विवेकाचिये ॥ ४६६ ॥

४६६) म्हणून जेवढी साधनें आहेत तेवढी सर्व साधनें आपोआप त्याच्या मागें येतात; नंतर तो आयताच विवेकाच्या राज्यावर बसतो.

पाठीं विचारितया वेगा । तो विवेकुही ठाके मागां ।

मग अविचारणीया तें आंगा । घडोनि जाय ॥ ४६७ ॥

४६७) नंतर विचाराच्या वेगामुळें तो विवेकहि मागें राहतो आणि मग विचारांच्या पलीकडचें जें स्वरुप तें तो स्वतः बनतो.

तेथ मनाचें मेहुडें विरे । पवनाचें पवनपण सरे ।

आपणपां आपण मुरे । आकाशही ॥ ४६८ ॥

४६८) त्या ठिकाणी मनरुपी मेघ नाहींसा होतो व वार्‍याचा चंचलपणा संपतो आणि त्याचप्रमाणें आकाशदेखील आपण आपल्यांतच मुरतें. 

प्रणवाच माथा बुडे । येतुलेनि अनिर्वाच्य सुख जोडे ।

म्हणोनि आधींचि बोलु बहुडे । तयालागीं ॥ ४६९ ॥

४६९) तो ॐकाराच्या अर्धमात्रेंत लीन व्हावा, इतकें त्याला शब्दातील सुख मिळतें. म्हणून त्याच्याविषयीं शब्द अगोदरच परत फिरतो. 

ऐसी ब्रह्माची स्थिती । जे सकळां गतींसी गती ।

तया अमूर्ताची मूर्ती । होऊनि ठाके ॥ ४७० ॥

४७०) अशी जी ब्रह्माची स्थिति, जी सगळ्या गतींची गति आहे, त्या निराकार ब्रह्मस्थितीची हा मूर्ति होऊन राहतो.

तेणें बहुतीं जन्मीं मागिलीं । विक्षेपांचीं पाणिवळें झाडिलीं ।

म्हणोनि उपजतखेंवो बुडाली । लग्नघटिका ॥ ४७१ ॥

४७१) त्यानें मागील अनेक जन्मांत विक्षेपरुपी केकचरा काढून टाकला म्हणून या जन्मीं उपजतांक्षणींच लग्नघटका बुडाली. ( त्याचा कर्मक्षय होऊन ब्रह्माशीं ऐक्य होण्याची वेळ प्राप्त झाली. )   

आणि तद्रूपतेसीं लग्न । लागोनि ठेलें अभुन्न ।

जैसें लोपलें अभ्र गगन । होऊनि ठाके ॥ ४७२ ॥

४७२) आणि ज्याप्रमाणें ढग नाहींसा झाला म्हणजे तो आकाशाशी एकरुप होतो; त्याप्रमाणें ब्रह्मरुपाशीं त्याचें अभिन्नतेनें लग्न लागतें.  

तैसें विश्र्व जेथ होये । मागौतें जेथ लया जाये ।

तें विद्यमानेंचि देहें । जाहला तो गा ॥ ४७३ ॥

४७३) ज्याप्रमाणें अर्जुना, ज्या स्वरुपापासून विश्व उत्पन्न होतें व फिरुन ज्या स्वरुपीं तें विश्व लीन होतें, ते स्वरुप तो याच देहानें होतो.

मूळ श्र्लोक

तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः ।

कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भवार्जुन ॥ ४६ ॥

४६) तपी, ज्ञानी व कर्मी ह्यांपेक्षां योगी श्रेष्ठ आहे, असें माझें मत आहे. म्हणून हें अर्जुना, तूं योगी हो. 

जयां लाभाचिया आशा । करुनि धैर्यबाहूंचा भरंवसा ।

घालीत पटकर्मांचा धारसा । कर्मनिष्ठ ॥ ४७४ ॥

४७४) ज्या वस्तूच्या प्राप्तीच्या आशेनें, धैर्यरुपी बाहूंचा विश्वास धरुन कर्मनिष्ठ लोक षट्कर्मांच्या प्रवाहामध्यें उडी टाकतात;  

कां जिये एकी वस्तूलागीं । बाणोनि ज्ञानाची वज्रांगी ।

झुंजत प्रपंचेशीं समरंगीं । ज्ञानिये गा ॥ ४७५ ॥

४७५) अथवा ज्या एका वस्तूकरितां ज्ञानी लोक ज्ञानाचें चिलखत अंगात घालून समरांगणामध्यें संसाराशी लढतात;

अथवा निलागे निसरडा । तपोदुर्गाचा आडकडा ।

झोंबती तपिये चाडा । जयाचिया ॥ ४७६ ॥

४७६) अथवा तपी लोक ज्या स्वरुपप्राप्तीच्या इच्छेनें तपरुपी तुटलेल्या निराधार व निसरड्या कड्यावर चढण्याचा प्रयत्न करतात;   

जें भजतियांसी भज्य । याज्ञिकांचें याज्य ।

एवं जें पूज्य । सकळां सदा ॥ ४७७ ॥

४७७) जें स्वरुप भजन करणार्‍या लोकांच्या भजनाचा विषय आहे, जें स्वरुप यज्ञ करणार्‍या लोकांच्या यज्ञाचा विषय आहे; याप्रमाणें जें स्वरुप सर्वांना सर्व काळीं पूज्य आहे;

तेंचि तो आपण । स्वयें जाहला निर्वाण ।

जें साधकांचें कारण । सिद्ध तत्त्व ॥ ४७८ ॥

४७८) जें स्वरुप शेवटची गति आहे, साधकांचे साध्य आहेव जें एकच सिद्ध तत्त्व आहे, तें स्वरुप तो योगी आपण स्वतः झाला.

म्हणोनि कर्मनिष्ठां वंद्यु । तो ज्ञानियांसि वेद्यु ।

तापसांचा आद्यु । तपोनाथु ॥ ४७९ ॥

४७९) म्हणून जो पुरुष कर्मनिष्ठांना पूज्य आहे, ज्ञानी पुरुषास जाणण्यास तो योग्य आहे, आणि तपस्वी लोकांमध्यें तो मूळ तपोनाथ आहे.

पैं जीवपरमात्मसंगमा । जयाचें येणें जाहलें मनोधर्मा ।

तो शरीरीचि परी महिमा । ऐसी पावे ॥ ४८० ॥

४८०) जीव-परमात्म्याच्या ऐक्याच्या ठिकाणीं ज्याच्या मनाच्या वृत्तीचे येणें झालें, तो जरी देहधारी असला तरी त्याला असला महिमा प्राप्त होतो.  

  


Custom Search

No comments: