Saturday, March 13, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 15 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग १५

 

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 15 
Ovya 421 to 450 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग १५ 
ओव्या ४२१ ते ४५०

मूळ श्र्लोक

असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः ।

वश्यात्मना तु यतता शक्योऽवाप्तुमुपायतः ॥ ३६ ॥

३६) विरक्ति व अभ्यास यांच्या अभावीं ) ज्याचें अंतःकरण स्वाधीन नाहीं, त्याला योग प्राप्त होणें अत्यंत कठीण आहे, हें मलाहि पटतें. परंतु ज्याचें अंतःकरण स्वाधीन आहे, त्यानें ( वर सांगितलेल्या ) उपायांनीं प्रयत्न केला असतां त्याला योग प्राप्त होणें शक्य आहे.  

एर्‍हवीं विरक्ति जयांसि नाहीं । जे अभ्यासीं न रिघती कहीं ।

तयां नाकळे हें आम्हीही । न मनूं कायी ॥ ४२१ ॥

४२१) एर्‍हवीं ज्यांच्या ठिकाणीं वैराग्य नाहीं, जें केव्हांच अभ्यासाकडे वळत नाहींत, त्यांना मन आवरत नाही, ही गोष्ट आम्हांलाहि कबूल नाहीं काय ?   

परि यमनियमांचिया वाटा न वचिजे । कहीं वैराग्याची से न करिजे ।

केवळ विषयजळीं ठाकिजे । बुडी देउनी ॥ ४२२ ॥

४२२) परंतु यमनियमांच्या वाटेनें गेलें नाहीं, वैराग्याची कधींसुद्धां आठवण केली नाहीं व केवळ विषयरुपी पाण्यामध्यें बुडी मारुन राहिले, 

या जालिया मानसा कहीं । युक्तीची कांबी लागली नाहीं ।

तरी निश्र्चल होईल काईं । केसोनि सांगें ॥ ४२३ ॥

४२३) आपल्या मनाला जन्मल्यापासून कधीहि युक्तीचा चिमटा जरा लावला नाहीं, तर तें स्थिर कसें काय होईल, सांग बरें !

म्हणोनि मनाचा निग्रहो होये । ऐसा उपाय जो आहे ।

तो आरंभीं मग नोहे । कैसा पाहों ॥ ४२४ ॥

४२४) म्हणून मनाचा निग्रह होईल असा जो उपाय आहे, तो करण्याला प्रारंभ कर; मग निग्रह कसा होत नाहीं तें पाहूं !

तरी योगसाधन जितुकें । तें अवधेंचि काय लटिकें ।

परि आपणपयां अभ्यास न ठाके । हेंचि म्हणें ॥ ४२५ ॥

४२५) तर योगसाधन जेवढें आहे, तें सर्वच खोटें आहे काय ? परंतु आपल्या हातून अभ्यास होत नाहीं, असें म्हण.

आंगीं योगाचें होय बळ । तरी मन केतुलें चपळ ।

काय महदादि हें सकळ । आपु नोहे ॥ ४२६ ॥

४२६) अंगामध्यें योगाचें जर सामर्थ्य असेल तर त्यापुढें मनाची चपलता ती किती आहे ? हें महत्तत्त्वादि सर्व आपल्या आधीन होणार नाही  काय ?

तेथ अर्जुन म्हणे निकें । देवो बोलती तें न चुके ।

साच योगबळेंसीं न तुके । मनोबळ ॥ ४२७ ॥

४२७) त्या प्रसंगीं अर्जुन म्हणाला, फार चांगलें ! देव म्हणतात त्यांत चूक नाहीं. योगाच्या सामर्थ्याबरोबर मनाच्या सामर्थ्याची खरोखर तुलना होणार नाहीं. 

परि तोचि योगु कैसा केवीं जाणों । आम्ही येतुले दिया मातुही नेणों ।

म्हणोनि मनातें जी म्हणों । अनावर हें ॥ ४२८ ॥

४२८) परंतु तोच योग कसा आहे व त्याचें ज्ञान कसें करुन घ्यावयाचें ह्याची इतके दिवस आम्हांला वार्ताहि नव्हती; म्हणून महाराज, आम्ही म्हणत होतों कीं, हें मन अनावर आहे. 

हा आतां आघवेया जन्मा । तुझेनि प्रसादें पुरुषोत्तमा ।

योगपरिचयो आम्हां । जाहला आजी ॥ ४२९ ॥

४२९) कृष्णा, ह्या सार्‍या जन्मांत तुझ्या प्रसादाच्या योगानें आतां सांप्रत आम्हांला ही योगाची ओळख झाली.

अर्जुन उवाच

अयतिः श्रद्धयोपेतो योगात् चलितमानसः ।

अप्राप्य योगसंसिद्धि कां गतिं कृष्ण गच्छति ॥ ३७ ॥

३७) अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, मनुष्य श्रद्धेनें युक्त असला, पण त्याचें मन ( कांहीं कालानें ) योगापासून चलित झाल्यानें त्याचा प्रयत्न सुटला व ( त्या कारणानें ) त्याला योगसिद्धि प्राप्त झाली नाहीं, तर तो कोणत्या गतीला जातो ? 

कच्चित् नोभयविभ्रष्टश्छिन्ना भ्रमिव नश्यति ।

अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि ॥ ३८ ॥

३८) हे श्रीकृष्णा, ( इंद्रियसुख व मोक्ष या ) दोहोमपासून भ्रष्ट झालेला तो ब्रह्मप्राप्तीच्या मार्गामध्यें आधारहीन व मतिहीन झालेला, इतर ढगांपासून वेगळ्या झालेल्या ढगाप्रमाणें नाश पावत नाहीं ना ?     

एतत् मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्यशेषतः ।

त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्दते ॥ ३९ ॥

३९) हे कृष्णा, ही माझी शंका पूर्णतेनें नाहींशी करण्याला तूं समर्थ आहेस; ही शंका नष्ट करण्यास तुझ्याखेरीज दुसरा कोणी समर्थ आढळत नाहीं.

परि आणिक एक गोसांविया । मज संशयो असे साविया ।

तो तूंवांचूनि फेडावया । समर्थु नाहीं ॥ ४३० ॥

४३०) परंतु महाराज, मला आणखी एक शंका आलेली आहे. ती दूर करण्यास तुझ्यावांचून कोणी समर्थ नाही.

म्हणोनि सांगे गोविंदा । कवण एकु मोक्षपदा ।

झोंबत होताश्रद्धा । उपायेंविण ॥ ४३१ ॥

४३१) म्हणून देवा, सांगा. कोणी एक योग्य परिश्रम केल्याशिवाय केवळ श्रद्धेच्या जोरावर मोक्षपदाला काबीज करावयास पाहात होता; 

इंद्रियग्रामोनि निगाला । आस्थेचिया वाटा लागला ।

आत्मसिद्धीचिया पुढिला । नगरा यावया ॥ ४३२ ॥

४३२) पुढलें गांव जे आत्मसिद्धि त्या गांवाला येण्याकरितां तो इंद्रियरुपी गांवाहून निघून आस्थेच्या वाटेला लागला.

तंव आत्मसिद्धि न ठकेचि । आणि मागुतें न येववेचि ।

ऐसा अस्तु गेला माझारींचि । आयुष्यभानु ॥ ४३३ ॥

४३३) ( पण ) तो आत्मसिद्धीच्या गांवाला पोंचला नाहीं आणि त्यास परतहि येववत नाहीं; असा मध्येंच असतांना त्याचा आयुष्यरुपी सूर्य अस्ताला गेला.

जैसें अकाळीं आभाळ । अळुमाळु सपातळ ।

विपायें आलें केवळ । वसे ना वर्षे ॥ ४३४ ॥

४३४) भलत्यावेळी विरळ असे थोडे नुसते चुकून ढग आले, तर ते टिकत नाहींत व वर्षावहि करीत नाहींत;

तैसीं दोन्ही दुरावलीं । जे प्राप्ति तव अलग ठेली ।

आणि अप्राप्तिही सांडवली । श्रद्धा तया ॥ ४३५ ॥

४३५) त्याप्रमाणें विषयासक्तता व मोक्ष हीं दोन्ही त्यास दूर राहिलीं; अशी कीं, आत्मसिद्धीची प्राप्ति तर दूरच राहिली आणि दुसरें आपल्यास आत्मप्राप्ति होणार नाहीं, अशी आशाहि त्यास श्रद्धा असल्यामुळें सोडतां येत नाहीं.

ऐसा वोलांतरला काजीं । जो श्रद्धेचाचि समाजीं ।

बुडाला तया हो जी । कवण गति ॥ ४३६ ॥

४३६) याप्रमाणें जो पुरुष उशीरामुळे फसला व जो आत्मप्राप्तीविषयीं पूर्ण श्रद्धा असतांनाच मरण पावला, त्यास अहो महाराज, कोणती गति प्राप्त होते ? तें सांगा.

मूळ श्र्लोक

श्रीभगवानुवाच

पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते ।

न हि कल्याणकृत कश्चित् दुर्गतिं तात गच्छति ॥ ४० ॥

४०) श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था, इहलोकीं अथवा परलोकीं ( कोठेंहि ) त्याचा नाश होत नाहीं. कारण, बाबा, शुभ कर्म करणारा कोणीहि दुर्गतीला जात नाहीं.

तंव कृष्ण म्हणती पार्था। जया मोक्षसुखीं आस्था ।

तया मोक्षावांचुनि अन्यथा । गति आहे गा ॥ ४३७ ॥

४३७) तेव्हां कृष्ण म्हणाले, अर्जुना, ज्याला मोक्षसुखाची उत्कट इच्छा आहे, त्याला मोक्षाशिवाय दुसरी गति आहे काय ?

परि एतुलेंचि एक घडे । जें माझारीं विसवावें पडे ।

तेंही परि ऐसेनि सुरवाडें । जो देवां नाहीं ॥ ४३८ ॥

४३८) पण एवढेंच एक होतें कीं, मध्यें विसांवा घ्यावा लागतो; पण तें विसांवा घेणेंहि असें सुखकर असतें कीं, जें इंद्रादि देवांनाहि प्राप्त होत नाहीं.

एर्‍हवीं अभ्यासांचा उचलतां । पाउलीं जरी चालतां ।

तरि दिवसाआधीं ठाकिता । सोऽहंसिद्धीतें ॥ ४३९ ॥

४३९) वास्तविक अभ्यासाच्या जलद पावलानें जर तो चालतां, तर मरणकालापूर्वींच ब्रह्मसिद्धीस येऊन मिळतां;  

परि तेतुला वेगु नव्हेचि । म्हणऊनि विसांवा तरी निकाचि ।

पाठीं मोक्षु तंव तैसाचि । ठेविला असे ॥ ४४० ॥  

४४०) पण तितक्या वेगानें अभ्यास न झाल्यामुळें, विसांवा घेणें भागच पडलें; पण नंतर मोक्ष त्याच्याकरितां ठेवलेलाच आहे. 

मूळ श्रलोक

प्राप्य पुण्यकृतां लोकनुषित्वा शाश्वतीः समाः ।

शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ॥ ४१ ॥

४१) तो योगभ्रष्ट पुण्यकर्म करणार्‍यांच्या लोकाला जाऊन, ( तेथें ) पुष्कळ वर्षे वास केल्यानंतर, शुद्धाचरणी व वैभवशाली अशा कुलामध्यें जन्म पावतो.  

ऐकें कवतिक हें कैसें । शतमखा लोक सायासें ।

तें तो पावे अनायासें । कोवल्यकामु ॥ ४४१ ॥

४४१) ऐक कसा चमत्कार होतो तो ! शंभर यज्ञ करणार्‍यास कष्टानें जी स्थिति प्राप्त होते, ती त्या मोक्षाची इच्छा करणारास श्रनावांचून मिळते. 

मग तेथिंचे जे अमोघ । अलौकिक भोग ।

भोगितांहि सांग । कांटाळे मग ॥ ४४२ ॥

४४२) मग त्या ठिकाणचें जे दिव्य व फलदायी भोग, ते यथास्थित भोगीत असतांहि त्याच्या मनास कंटाळा येतो. 

हा अंतरायो अवचितां । कां वोढवला भगवंता ।

दिविभोग भोगितां । अनुतापी नित्य ॥ ४४३ ॥

४४३) देवा, हें विघ्न मध्येंच कां आलें ? असा, स्वर्गातले भोग भोगीत असतां तो सारखा पश्चात्ताप करीत असतो.  

पाठीं जन्मे संसारीं । परी सकळ धर्माचिया माहेरीं ।

लांबा उगवे आगरीं । विभवश्रियेचां ॥ ४४४ ॥

४४४) नंतर तो मनुष्य, लोकांत जन्मतो; पण सर्व धर्मांचे वसतिस्थान आणि वैभवरुप लक्ष्मीचें जें कुलरुपी शेत, त्यामध्यें तो भातगोट्याच्या रोपाप्रमाणें वाढतो;   

जयातें नीतिपंथें चालिजे । सत्यधूत बोलिजे ।

देखावें तें देखिजे । शास्त्रदृष्टी ॥ ४४५ ॥

४४५) जें कुलनीतीच्या मार्गानें चालतें, सत्यानें पवित्र झालेलें बोलतें आणि जें पाहाणें असेल तें शास्त्रदृष्टीनें पाहातें;

वेद तो जागेश्र्वरु । जया व्यवसाय निजाचारु ।

सारासारविचारु । मंत्री जयातें ॥ ४४६ ॥

४४६) ज्या कुळांत वेद हें जागृत दैवत आहे, शास्त्रविहित आचरण हाच ज्याचा व्यापार आहे व सारासार विचार हाच ज्याचा सल्लामसलत देणारा प्रधान आहे;

जयाचां कुळीं चिंता । जाली ईश्र्वराची पतिव्रता ।

जयातें गृहदेवता । आदि ऋद्धि ॥ ४४७ ॥

४४७) ज्या कुळामध्यें चिंता ईश्र्वराची एकनिष्ठ पत्नी झालेली असते आणि ऋदृध्यादिक या ज्याच्या घरांतील देवता आहेत, 

ऐसी निजपुण्याचिया जोडी । वाढिन्नली सर्वसुखाची कुळवाडी ।

तिये जन्मे तो सुरवाडी । योगुच्युतु ॥ ४४८ ॥

४४८) अशा रीतीनें ज्या कुळांत आपल्या पुण्याईच्या कमाईने सर्व सुखाचा व्यापार वाढला आहे, त्या कुळांत तो योगभ्रष्ट सुखानें जन्म घेतो.   

मूळ श्र्लोक

अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् ।

एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम् ॥ ४२ ॥

४२) अथवा बुद्धिमान् अशा योगी लोकांच्या कुळामध्यें तो जन्म पावतो. अशा तर्‍हेचा हा जन्म या जगामध्यें फार दुर्लभ आहे. 

तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम् ।

यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दन ॥ ४३ ॥

४३) कुरुनंदना, त्या ठिकाणीं पूर्वजन्मींच्या संस्कारानें युक्त असलेल्या बुद्धीचा योग होतो. त्यापुढें तो पुन्हां ( पूर्ण ) योगसिद्धीसाठीं प्रयत्न करतो. 

अथवा ज्ञानाग्निहोत्री । जे परब्रह्मण्य श्रोत्री ।

महासुखक्षेत्रीं । आदिवंत ॥ ४४९ ॥

४४९) अथवा जे ज्ञानाग्निमध्यें हवन करतात आणि जें ब्रह्मसुखरुपी शेताचे मिरासदार असतात.

जे सिद्धांताचां सिंहासनीं । राज्य करिती त्रिभुवनीं ।

जे कूंजते कोळिळ वनीं । संतोषाचां ॥ ४५० ॥

४५०) जें ( एकमेवाद्वितीयं ब्रह्म या ) सिद्धान्ताच्या

 सिंहासनावर बसून त्रैलोक्यांत राज्य करतात व जे

 संतोषाच्या वनांत शब्द करणारे कोकीळ आहेत;



Custom Search

No comments: