Dnyaneshwari Adhyay 2 Part 5
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग ५
ओव्या १०१ ते १२५
परी मूर्खपणें
नेणसी । न चिंतावें तें चिंतिसी ।
आणि तूंचि
नीति सांगसी । आम्हांप्रति ॥ १०१ ॥
१०१) पण मूर्खपणामुळें
तुला समजत नाहीं; मनांत आणूं नये तें तूं आणतोस; आणि ( उलट ) तूंच नीतीच्या गोष्टी
आम्हांला सांगतोस !
देखें विवेकी
जें होती । ते दोहींतेंही न शोचती ।
जे होय जाय हे
भ्रांती । म्हणऊनियां ॥ १०२ ॥
१०२) हें पाहा,
जन्म व मृत्यु ही केवळ भ्रांति असल्यामुळें जें विचारवंत आहेत ते या दोहोंचाहि (
दोहोंबद्दलहि ) शोक करीत नाहींत,
अर्जुना
सांगेन आइक । एथ आम्ही तुम्ही देख ।
आणि हे भूपति
अशेख । आदिकरुनी ॥ १०३ ॥
१०३) अर्जुना,
सांगतों ऐक. पाहा. येथें आम्ही, तुम्ही आणि हे सर्व राजे वगैरे ( जें आहोंत ),
नित्यता ऐसेचि
असोनी । ना तरी निश्र्चित क्षया जाउनि ।
हे भ्रांति
वेगळी करुनी । दोन्हीं नाहीं ॥ १०४ ॥
१०४) ते हल्लीं
आहों, असेच निरंतर राहूं अथवा खात्रीनें नाश पावूं एवढी भ्रांति दूर झाली कीं,
वस्तुतः ( या ) दोन्ही ( गोष्टी ) खर्या नाहींत.
हें उपजे आणि
नाशे । तें मायावशें दिसे ।
येर्हवीं
तत्त्वता वस्तु जे असे । ते अविनाशचि ॥ १०५ ॥
१०५) (
भ्रांतीला वश झाल्यामुळें ) जन्म व मृत्यु हे अनुभवास येतात. एर्हवीं वास्तविक
वस्तु ( आत्मा ) जी आहे, ती अविनाशीच आहे.
जैसें पवनें
तोय हालविलें । आणि तरंगाकार जाहलें ।
तरी कवण कें
जन्मलें । म्हणों ये तेथ ॥ १०६ ॥
१०६) जसें वार्यानें
पाणी हालविलें, त्यामुळें त्याला तरंगांचें रुप आलें; तर या ठिकाणी कोणाला व कुठें
जन्म आला असें म्हणता येईल ?
तेंचि वायूचें
स्फुरण ठेलें । आणि उदक सहज सपाटलें ।
तरी आतां काय
निमालें । विचारीं पां ॥ १०७ ॥
१०७) पुढें तीच
वायूची हालचाल बंद झाली आणि पाणी आपोआप सपाट झालें, तर आतां कशाचा नाश झाला ?
विचार कर.
आइकें शरीर
तरी एक । परी वयस भेद अनेक ।
हें
प्रत्यक्षचि देख । प्रमाण तूं ॥ १०८ ॥
१०८) आणखी असें
पाहा कीं, शरीर तर एकच आहे, पण वयपरत्वें त्यास अनेक दशा प्राप्त होतात; हा
प्रत्यक्ष पुरावा तूं पाहा.
एथ कौमारत्व
दिसे । मग तारुण्यीं तें भ्रंशे ।
परी देहचि न
नाशे । एकेकासवें ॥ १०९ ॥
१०९) याच्या
ठिकाणीं पहिल्यानें बालपण दिसतें, मग तारुण्यांत तें बालपण नाहींसें होतें; पण
शरीराच्या एकेक अवस्थेबरोबर शरीराचा कांहीं नाश होत नाहीं.
तैसीं
चैतन्याचां ठायीं । इयें शरीरांतरें होती जाती पाहीं ।
ऐसें जाणे तया
नाहीं । व्यामोहदुःख ॥ ११० ॥
११०)
त्याचप्रमाणें, हे पाहा, चैतन्याच्या ठिकाणीं निरनिराळीं शरीरें येतात व जातात
असें जो जाणतो, त्याला भ्रांतिजन्म दुःख कधींहि होत नाही.
एथ नेणावया
हेंचि कारण । जे इंद्रियांआधीनपण ।
तिहीं आकळिजे
अंतःकरण । म्हणऊनि भ्रमे ॥ १११ ॥
१११) असें न
जाणण्याला इंद्रियाधीनता हेंच एक कारण आहे. तीं इंद्रियें अंतःकरणावर आपला पगडा
बसवितात, म्हणून त्याला भ्रम होतो.
इंद्रियें
विषय सेविती । तेथ हर्ष शोकु उपजती ।
ते अंतर
आप्लविती । संगें येणें ॥ ११२ ॥
११२) इंद्रियें
विषयांचें सेचन करतात, त्यामुळें सुखदुःखें उत्पन्न होतात. तीं ( मग ) आपल्या
संसर्गानें अंतःकरण ग्रासून टाकतात.
जयां
विषयांचां ठायीं । एकनिष्ठता कहीं नाहीं ।
तेथ दुःख आणि
कांहीं । सुखहि दिसे ॥ ११३ ॥
११३) ज्या (
शब्दादि ) विषयांच्या ठिकाणीं एक स्थिति कधीं नसते, त्या विषयांपासून कधीं सुख तर
कधीं दुःख प्राप्त होतें.
देखें हे
शब्दाची व्याप्ति । निंदा आणि स्तुति ।
तेथ
द्वेषाद्वेष उपजती । श्रवणद्वारें ॥ ११४ ॥
११४) पाहा कीं,
निंदा आणि स्तुति ही शब्दांची व्याप्ति आहे. कर्णद्वारानें जसें निंदेच्या किंवा
स्तुतीच्या शब्दाचें सेवन होईल, तसे क्रोध किंवा लोभ अंतःकरणांत उत्पन्न होतात.
मृदु आणि
कठीण । हे स्पर्शाचे दोन्ही गुण ।
जे वपूचेनि
संगे कारण । संतोषखेदां ॥ ११५ ॥
११५) मृदु आणि
कठीण हे, स्पर्श या विषयाचे दोन प्रकार आहेत; ते त्वचेच्या संयोगानें संतोषाला व
दुःखाला कारण होतात.
भ्यासुर
आणि सुरेख । हें रुपाचें स्वरुप देख ।
जें उपजवी
सुखदुःख । नेत्रद्वारें ॥ ११६ ॥
११६) पाहा,
भेसूर आणि सुरेख ही रुप या विषयाचीं दोन स्वरुपें आहेत; ती नेत्राद्वारें सुखदुःख
उत्पन्न करतात.
सुगंधु आणि
दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु ।
जो
घ्राणसंगें विषादु-। तोषु देता ॥ ११७ ॥
११७) सुगंध आणि
दुर्गंध हे गंध या विषयाचे दोन भेद आहेत. ते नाकाच्या संयोगानें दुःख आणि सुख
उत्पन्न करतात.
तैसाचि
द्विविध रसु । उपजवी प्रीतित्रासु ।
म्हणूनि हा
अपभ्रंशु । विषयसंगु ॥ ११८ ॥
११८)
त्याप्रमाणें ( कडू व गोड असा ) दोन प्रकारचा रस आवड व नावड उत्पन्न करतो. म्हणून
या विषयांची संगति अधोगतीला नेणारी आहे.
देखें
इंद्रियांअधीन होईजे । तैं शीतोष्णांतें पाविजे ।
आणि
सुखदुःखीं आकळिजे । आपणपें ॥ ११९ ॥
११९) पाहा,
जेव्हां ( मनुष्य ) इंद्रियांच्या ताब्यांत जातो, तेव्हां त्याला शीतोष्णाचा अनुभव
घ्यावा लागतो आणि मग तो स्वतः सुखदुःखांच्या ताब्यांत सापडतो.
या
विषयांवांचूनि कांहीं । आणीक सर्वथा रम्य नाहीं ।
ऐसा
स्वभावोचि पाहीं । इंद्रियांचा ॥ १२० ॥
१२०) पाहा, या
इंद्रियांचा हा स्वभावच असा आहे की, त्यांना या विषयांवांचून दुसरें काहींच गोड
वाटत नाहीं.
हे विषय तरी
कैसे । रोहिणीचें जळ जैसें ।
कां
स्वप्नींचा आभासे । भद्रजाति ॥ १२१ ॥
१२१) हे विषय
आहेत तरी कसे ? मृगजल जसें आभासात्मक, किंवा स्वप्नांत पाहिलेला हत्ती जसा केवळ
भासमय असतो;
देखें अनित्य
तियापरी । म्हणऊनि तूं अव्हेरीं ।
हा सर्वथा
संगु न धरीं । धनुर्धरा ॥ १२२ ॥
१२२) पाहा, तसे
( हें विषय ) क्षणभंगुर आहेत; याकरितां धनुर्धरा, तूं त्यांचा त्याग कर; त्यांच्या
नादीं मुळीच लागूं नकोस.
हे विषय
जयातें नाकळिती । तया सुखदुःखें दोन्ही न पचती ।
आणि
गर्भवासुसंगती । नाहीं तया ॥ १२३ ॥
१२३) या
विषयांच्या तावडीत जो सापडत नाहीं, त्याला सुखदुःख हीं दोन्हीं होत नाहीत आणि
गर्भवासाची संगति त्याला कधी घडत नाहीं.
तो नित्यरुपु
पार्था । वोळखावा सर्वथा ।
जो या
इंद्रियार्था । नागवेचि ॥ १२४ ॥
१२४) जो या
इंद्रियांचे जे विषय त्यांच्या कह्यांत सापडत नाही, तो पार्था, पूर्णपणें
ब्रह्मरुप आहे, असें जाणावें.
आतां अर्जुना
आणिक कांहीं एक । सांगेन मी आइक ।
जें विचारें
परलोक । वोळखिती ॥ १२५ ॥
१२५) आतां
अर्जुना, तुला मी आणखी कांहीं एक ( गोष्ट )
सांगतों, ऐक. तें वस्तुस्वरुप ज्ञानी
पुरुष विचारानें
जाणतात.
Custom Search
No comments:
Post a Comment