Tuesday, June 30, 2020

ShriRamCharitManas Part 21 श्रीरामचरितमानस भाग २१


ShriRamCharitManas Pratham Sopan Balkand Part 21 
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड भाग २१ 
दोहा १३१ ते १४०

 दोहा—एहि अवसर चाहिअ परम सोभा रुप बिसाल ।
जो बिलोकि रीझै कुअँरि तब मेलै जयमाला ॥ १३१ ॥
या वेळी मला खूप लावण्य आणि अत्यंत सुंदर रुप हवे. ते पाहून राजकुमारी माझ्यावर भाळून जाईल आणि वरमाला मला घालील. ॥ १३१ ॥
हरि सन मागौं सुंदरताई । होइहि जात गहरु अति भाई ॥
मोरें हित हरि सम नहिं कोऊ । एहि अवसर सहाय सोइ होऊ ॥
( आता असे करावे. ) भगवंताकडे सौंदर्य मागावे. परंतु त्यांच्याकडे जाण्यास फार वेळ होईल. परंतु श्रीहरींच्याशिवाय माझा हिरचिंतक कोणी नाही, म्हणून या वेळी तेच मला साह्य करोत म्हणजे झाले. ॥ १ ॥
बहुबिधि बिनय कीन्हि तेहि काला । प्रगटेउ प्रभु कौतुकी कृपाला ॥
प्रभु बिलोकि मुनि नयन जुडाने । होइहि काजु हिएँ हरषाने ॥
त्यावेळी नारदांनी भगवंतांना पुष्कळ प्रार्थना केली, तेव्हा लीलामय कृपाळू प्रभू तेथे प्रगट झाले. स्वामींना पाहाताच नारदांचे नेत्र प्रफुल्लित झाले. आणि ते मनात आनंदित होऊन म्हणाले की, आता काम झालेच. ॥ २ ॥
अति आरति कहि कथा सुनाई । करहु कृपा करि होहु सहाई ॥
आपन रुप देहु प्रभु मोही । आन भाँति नहिं पावौं ओही ॥
नारदांनी काकुळतीला येऊन सर्व कथा सांगितली ( आणि प्रार्थना केली की, ) कृपा करा आणि मला मदत करा. हे प्रभो, तुम्ही मला आपले रुप द्या. याखेरीज दुसर्‍या कशामुळेही मी त्या राजकन्येस मिळवू शकणार नाही. ॥ ३ ॥
जेहि बिधि नाथ होइ हित मोरा । करहु सो बेगि दास मैं तोरा ॥
निज माया बल देखि बिसाला । हियँ हँसि बोले दीनदयाला ॥
हे नाथ, माझे कल्याण होईल, असे लवकर करा. मी तुमचा दास आहे. ‘ आपल्या मायेचे प्रचंड बळ पाहून दीनदयाळ भगवान मनात हसत म्हणाले, ॥ ४ ॥
दोहा—जेहि बिधि होइहि परम हित नारद सुनहु तुम्हार ।
सोइ हम करब न आन कछु बचन न मृषा हमार ॥ १३२ ॥
‘ हे नारद, ज्यामुळे तुमचे परम हित होईल, तेच आम्ही करु. दुसरे काही नाही. आमचे वचन असत्य ठरत नसते. ॥ १३२ ॥
कुपथ माग रुज ब्याकुल रोगी । बैद न देइ सुनहु मुनि जोगी ॥
एहि बिधि हित तुम्हार मैं ठयऊ । कहि अस अंतरहित प्रभु भयऊ ॥
हे योगी मुनी, ऐका. रोगाने व्याकुळ झालेल्या रोग्याने कुपथ्य मागितले, तरी वैद्य ते देत नाही. तशा प्रकारे मीही तुमचे कल्याण करण्याचा निश्चय केलेला आहे. ‘ असे म्हणून भगवंत अंतर्धान पावले. ॥ १ ॥
माया बिबस भए मुनि मूढा । समुझी नहिं हरि गिरा निगूढा ॥
गवने तुरत तहाँ रिषिराई । जहाँ स्वयंबर भूमि बनाई ॥
( भगवंताच्या ) मायेच्या अधीन झालेले मुनी इतके बुद्धिहीन झाले होते की, ते भगवंतांची रहस्यमय वाणी समजू शकले नाहीत. ऋषिराज नारद स्वयंवरासाठी बनविलेल्या मंडपाकडे गेले. ॥ २ ॥
निज निज आसन बैठे राजा । बहु बनाव करि सहित समाजा ॥
मुनि मन हरष रुप अति मोरें । मोहि तजि आनहि बरिहि न भोरें ॥
राजे मोठे नटून-थटून आपल्या परिवारासह आपापल्या आसनावर बसले होते. नारद मुनी मनातून आनंदित होते की, माझे रुप फार सुंदर आहे. राजकन्या मला सोडून दुसर्‍या कुणालाही वरणार नाही. ॥ ३ ॥
मुनि हित कारन कृपानिधाना । दीन्ह कुरुप न जाइ बखाना ॥
सो चरित्र लखि काहुँ न पावा । नारद जानि सबहिं सिर नावा ॥
कृपानिधान भगवंतांनी मुनींच्या कल्याणासाठी त्यांना इतके कुरुप बनविले होते की, सांगून सोय नाही. परंतु भगवंतांची ही लिला कुणाला कळू शकली नाही. त्यांना नारद समजूनच सर्वांनी प्रणाम केला. ॥ ४ ॥
दोहा—रहे तहाँ दुइ रुद्र गन ते जानहिं सब भेउ ।
बिप्रबेष देखत फिरहिं परम कौतुकी तेउ ॥ १३३ ॥
तेथे शिवांचे दोन गण होते. त्यांना सर्व रहस्य समजले होते. ते ब्राह्मणांचा वेष धारण करुन सर्व लीला पाहात फिरत होते. तेही मोठे थट्टेखोर होते. ॥ १३३ ॥
जेहिं समाज बैठे मुनि जाई । हृदयँ रुप अहमिति अधिकाई ॥
तहँ बैठे महेस गन दोऊ । बिप्रबेष गति लखइ न कोऊ ॥
नारद आपल्या मनात रुपाचा मोठा अभिमान बाळगूज ज्या समुदायात बसले होते, तेथेच ते दोन्ही गणही बसले होते. ब्राह्मणवेषात असल्यामुळे त्यांचे हे कपट कुणाच्याही लक्षात आले नाही. ॥ १ ॥
करहिं कूटि नारदहि सुनाई । नीकि दीन्हि हरि सुंदरताई ॥
रीझिहि राजकुअँरि छबि देखी । इन्हहि बरिहि हरि जानि बिसेषी ॥
ते नारदांना ऐकू जाईल, अशा तर्‍हेने नातदांची टर उडवू लागले, “ भगवंतांनी यांना काय सौंदर्य बहाल केले आहे. यांची शोभा पाहून राजकुमारी भाळून जाईल आणि ‘ हरी ‘ ( वानर ) समजून यानांच वरेल. ‘ ॥ २ ॥
मुनिहि मोह मन हाथ पराएँ । हँसहिं संभु गन अति सचु पाएँ ॥
जदपि सुनहिं मुनि अटपटि बानी । समुझि न परइ बुद्धि भ्रम सानी ॥
नारदांना मोह झाला होता, कारण त्यांचे मन मायेच्या अधीन झाले होते. शिवांचे गण ते पाहून मोठ्या आनंदाने हसत होते. त्यांची टवाळी मुनी ऐकत होते, परंतु बुद्धी भ्रमात पडल्यामुळे ती त्यांना समजत नव्हती. ( त्या गोष्टी त्यांना स्वतःच्या प्रशंसेच्या वाटत होत्या. ) ॥ ३ ॥
काहुँ न लखा सो चरित बिसेषा । सो सरुप नृपकन्याँ देखा ॥
मर्कट बदन भयंकर देही । देखत हृदयँ क्रोध भा तेही ॥
ही बाब इतर कुणालाही समजली नाही. फक्त राजकन्येने नारदांचे ते रुप पाहिले. त्यांचे तोंड माकडासारखे होते आणि ते भयंकर शरीर पाहताच राजकन्येला राग आला. ॥ ४ ॥
दोहा—सखीं संग लै कुअँरि तब चलि जनु राजमराल ।
देखत फिरइ महीप सब कर सरोज जयमाल ॥ १३४ ॥
मग राजकुमारी सख्यांबरोबर जणू राजहंसीसारखी चालत निघाली. ती आपल्या करकमलांमध्ये जयमाला घेऊन सर्व राजे लोकांना पाहात फिरु लागली. ॥ १३४ ॥
जेहि दिसि बैठे नारद फूली । सो दिसि तेहिं न बिलोकीं भूली ॥
पुनि पुनि मुनि उकसहिं अकुलाहीं । देखि दसा हर गन मुसुकाहीं ॥
जिकडे नारद ( रुपाच्या घमेंडीमध्यें ) फुगून बसले होते, तिकडे तिने चुकूनही बघितले नाही. नारदमुनी वारंवार मान उंचावून बघत होते आणि चरफडत होते. त्यांची ती दशा पाहून शिवगण हसत होते. ॥ १ ॥
धरि नृपतनु तहँ गयउ कृपाला । कुअँरि हरषि मेलेउ जयमाला ॥
दुलहिनि लै गे लच्छिनिवासा । नृपसमाज सब भयउ निरासा ॥
कृपाळू भगवंतही राजाचे शरीर धारण करुन तेथे जाऊन पोहोचले. राजकुमारीने आनंदित होऊन त्यांच्या गळ्यांत जयमाला घातली. लक्ष्मीनिवास भगवंत नवरीला घेऊन गेले. सर्व राजे मंडळी निराश झाली. ॥ २ ॥
मुनि अति बिकल मोहँ मति नाठी । मनि गिरि गई छूटि जनु गाँठी ॥
तब हर गन बोले मुसुकाई । निज मुख मुकुर बिलोकहु जाई ॥
मोहामुळे नारद मुनींची बुद्धी नष्ट झाली होती. त्यामुळे ते ( राजकुमारी गेल्याचे पाहून ) खट्टू झाले, जणू गाठीतील रत्न हरवले होते. तेव्हा शिवांचे गण हसून म्हणाले की, ‘ जाऊन आरशात आपले तोंड तर बघा.’ ॥ ३ ॥
अस कहि दोउ भागे भयँ भारी । बदन दीख मुनि बारि निहारी ॥
बेषु बिलोकि क्रोध अति बाढा । तिन्हहि सराप दीन्ह अति गाढा ॥
असे म्हणून ते दोघे घाबरुन पळून गेले. मुनींनी पाण्यामध्ये डोकावून आपले तोंड पाहिले. आपले रुप पाहून त्यांना फार राग आला. त्यांनी शिवांच्या त्या गणांना कठोर शाप दिला. ॥ ४ ॥
  दोहा—होइ निसाचर जाइ तुम्ह कपटी पापी दोउ ।
हँसेहु हमहि सो लेहु फल बहुरि हँसेहु मुनि कोउ ॥ १३५ ॥
‘ तुम्ही दोघे कपटी आणि पापी राक्षस व्हाल. तुम्ही माझे हसे केले, त्याचे फळ भोगा. यापुढे कोणा मुनीची फजिती कराल ?’ ॥ १३५ ॥
पुनि जल दीख रुप निज पावा । तदपि हृदयँ संतोष न आवा ॥
फरकत अधर कोप मन माहीं । सपदि चले कमलापति पाहीं ॥
मुनींनी पुन्हा पाण्यात पाहिले, तर त्यांना आपले ( खरे ) रुप प्राप्त झाले.  तरीही त्यांचे समाधान झालें नाही. त्यांचे ओठ फडफडत होते, मनात राग भरला होता. त्वरीत ते भगवान कमलापतींच्याकडे गेले. ॥ १ ॥
देहउँ श्राप कि मरिहउँ जाई । जगत मोरि उपहास कराई ॥
बीचहिं पंथ मिले दनुजारी । संग रमा सोइ राजकुमारी ॥
( मनात विचार चालला होता की, ) ‘ जाऊन आता शाप तरी द्यावा किंवा प्राण तरी द्यावा. त्यांनी जगात माझे हसे केले.’ त्यांना दैत्यांचे शत्रू भगवान श्रीहरी वाटेतच भेटले. त्यांच्या सोबत लक्ष्मी आणि तीच राजकुमारी होती. ॥ २ ॥
बोले मधुर बचन सुरसाईं । मुनि कहँ चले बिकल की नाईं ॥
सुनत बचन उपजा अति क्रोधा । माया बस न रहा मन बोधा ॥
देवांचे स्वामी भगवंतांनी गोड वाणीने विचारले, ‘ हे मुनी, व्याकुळ झाल्यासारखे कुठे निघालात ?’ हे शब्द ऐकताच नारदांना फार राग आला. मायेच्या अधीन झाल्यामुळे मनाला विवेकाचा विसर पडला. ॥ ३ ॥
पर संपदा सकहु नहिं देखी । तुम्हरें इरिषा कपट बिसेषी ॥
मथत सिंधु रुद्रहि बौरायहु । सुरन्ह प्रेरि बिष पान करायहु ॥
( मुनी म्हणाले, ) ‘ तुम्हांला दुसर्‍याचे बरे झालेले पाहवत नाही. तुमच्यामध्ये ईर्ष्या आणि कपट आहे. समुद्रमंथन करताना तुम्ही शिवांना बावळट बनविले आणि देवांना प्रेरित करुन त्यांना ( शिवांना ) विष प्राशन करायला लावले. ॥ ४ ॥
दोहा—असुर सुरा बिष संकरहि आपु रमा मनि चारु ।
स्वारथ साधक कुटिल तुम्ह सदा कपट ब्यवहारु ॥ १३६ ॥
असुरांना मदिरा आणि शिवांना विष देऊन तुम्ही स्वतः मात्र लक्ष्मी आणि सुंदर कौस्तुभ मणी घेतलात. तुम्ही धोकेबाज आणि स्वार्थी आहात. नेहमी कपटी व्यवहार करता. ॥ १३६ ॥
परम स्वतंत्र न सिर पर कोई । भावइ मनहि करहु तुम्ह सोई ॥
भलेहि मंद मंदेहि भल करहू । बिसमय हरष न हियँ कछु धरहू ॥
तुम्ही पूर्ण स्वतंत्र आहात. तुमच्यावर अंकुश ठेवणारा कोणी नाही, म्हणून मनाला येईल तसे करता. चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगले करता. मनात हर्ष-विषाद काहीही आणत नाही. ॥ १ ॥
डहकि डहकि परिचेहु सब काहू । अति असंक मन सदा उछाहू ॥
करम सुभासुभ तुम्हहि न बाधा । अब लगि तुम्हहि न काहूँ साधा ॥
सर्वांना ठकवून ठकवून सोकावला आहात आणि फार बेफिकीर झाला आहात. म्हणून ( ठकविण्याच्या बाबतीत ) तुमच्या मनात नेहमी उत्साह असतो. शुभ-अशुभ कर्मांची तुम्हांला बाधा नसते. आजपर्यंत तुम्हांला कोणी सरळ केलेले नाही. ॥ २ ॥
भले भवन अब बायन दीन्हा । पावहुगे फल आपन कीन्हा ॥
बंचेहु मोहि जवनि धरि देहा । सोइ तनु धरहु श्राप मम एहा ॥
या वेळीं तुम्ही चांगल्या घरी वाण दिले आहे. ( माझ्यासारख्या भारी व्यक्तिला डिवचले आहे. ) म्हणून स्वतःच्या कर्माचे फळ नक्की मिळेल. जे राजाचे शरीर धारण करुन तुम्ही मला ठकविले आहे, तेच शरीर तुम्ही धारण कराल, हा माझा शाप आहे. ॥ ३ ॥
कपि आकृति तुम्ह कीन्हि हमारी । करिहहिं कीस सहाय तुम्हारी ॥
मम अपकार कीन्ह तुम्ह भारी । नारि बिरहँ तुम्ह होब दुखारी ॥
तुम्ही माझे रुप माकडासारखे बनविले होते, म्हणून माकडेच तुम्हांला मदत करतील. ( मला ज्या स्त्रीची इच्छा होती, तिच्याशी माझा वियोग करुन ) तुम्ही माझे मोठे अहित केले आहे, म्हणून तुम्हीसुद्धा स्त्रीच्या वियोगाने दुःखी व्हाल. ॥ ४ ॥
दोहा—श्राप सीस धरि हरषि हियँ प्रभु बहु बिनती कीन्हि ।
निज माया कै प्रबलता करषि कृपानिधि लीन्हि ॥ १३७ ॥
प्रभूंनी तो शाप मोठ्या आनंदाने शिरोधार्य मानून नारदांचे सांत्वन केले आणि कृपानिधान भगवंतांनी आपली प्रबळ माया काढून घेतली. ॥ १३७ ॥
जब हरि माया दूरि निवारी । नहिं तहँ रमा न राजकुमारी ॥
तब मुनि अति सभीत हरि चरना । गहे पाहि प्रनतारति हरना ॥
जेव्हा भगवंतांनी आपली माया दूर सारली, तेव्हा तेथे लक्ष्मी राहिली नाही आणि राजकुमारीही राहिली नाही. तेव्हा मुनींनी अत्यंत घाबरुन श्रीहरींचे चरण धरले आणि म्हटले, ‘ हे शरणागतांची दुःखे हरण करणारे प्रभो, माझे रक्षण करा. ॥ १ ॥   
मृषा होउ मम श्राप कृपाला । मम इच्छा कह दीनदयाला ॥
मैं दुर्बचन कहे बहुतेरे । कह मुनि पाप मिटिहिं किमि मेरे ॥
हे कृपाळू, माझा शाप खोटा ठरु दे.’ तेव्हा दीनांवर दया करणारे भगवान म्हणाले, ‘ हे सर्व माझ्या इच्छेने घडले आहे. ‘ तेव्हा नारद म्हणाले, ‘ मी तुम्हांला अत्यंत वाईट साईट बोललो. माझे पाप कसे नाहीसे होईल ?’ ॥ २ ॥
जपहु जाइ संकर सत नामा । होइहि हृदयँ तुरत बिश्रामा ॥
कोउ नहिं सिव समान प्रिय मोरें । असि परतीति तजहु जनि भोरें ॥
( भगवंतानी म्हटले, ) ‘ जाऊन शंकरांच्या शतनाम स्तोत्राचा जप करा, त्यामुळे मनाला शांतता लाभेल. शिवांसारखा दुसरा कोणीही मला प्रिय नाही, याची खात्री बाळगा. ॥ ३ ॥
जेहि पर कृपा न करहिं पुरारी । सो न पाव मुनि भगति हमारी ॥
अस उर धरि महि बिचरहु जाई । अब न तुम्हहि माया निअराई ॥
हे मुनी, शिव ज्याच्यावर कृपा करीत नाहीत, त्याला माझी भक्ती लाभत नाही. मनात असा दृढ विश्वास बाळगून पृथ्वीवर जाऊन संचार करा. आता माझी माया तुमच्याजवळ फिरकणार नाही. ॥ ४ ॥
दोहा—बहुबिधि मुनिहि प्रबोधि प्रभु तब भए अंतरधान ।
सत्यलोक नारद चले करत राम गुन गान ॥ १३८ ॥
अशा रीतीने पुष्कळ प्रकारे मुनींना समजावून सांगून प्रभू अंतर्धान पावले आणि नारद श्रीरामचंद्रांचे गुण-गान करीत सत्यलोकी निघाले. ॥ १३८ ॥
हर गन मुनिहि जात पथ देखी । बिगत मोह मन हरष बिसेषी ॥
अति सभीत नारद पहिं आए । गहि पद आरत बचन सुनाए ॥
शिवांच्या ( त्या दोन्ही ) गणांनी मुनींना जेव्हा मोहरहित व प्रसन्न मनाने वाटेने जाताना पाहिले, तेव्हा ते अत्यंत घाबरुन नारदांच्याजवळ आले आणि त्यांचे चरण धरुन दीनपणे म्हणाले, ॥ १ ॥
हर गन हम न बिप्र मुनिराया । बड अपराध कीन्ह फल पाया ॥
श्राप अनुग्रह करहु कृपाला । बोले नारद दीनदयाला ॥
‘ हे मुनिराज, आम्ही ब्राह्मण नसून शिवांचे गण आहोत. आम्ही मोठा अपराध केला, त्याचे फळ आम्हांला मिळाले. हे कृपाळू, आता शाप दूर करण्याची कृपा करा. ‘ दीनांच्यावर दया करणारे नारद म्हणाले, ॥ २ ॥
निसिचर जाइ होहु तुम्ह दोऊ । बैभव बिपुल तेज बल होऊ ॥
भुजबल बिस्व जितब तुम्ह जहिआ । धरिहहिं बिष्नु मनुज तनु तहिआ ॥
‘ तुम्ही दोघेजण राक्षस बना, तुम्हांला महान ऐश्वर्य, तेज आणि बल मिळो. तुम्ही आपल्या बाहुबलाने जेव्हा संपूर्ण जग जिंकून घ्याल, तेव्हा भगवान विष्णू मनुष्य शरीर धारण करतील. ॥ ३ ॥
समर मरन हरि हाथ तुम्हारा । होइहहु मुकुत न पुनि संसारा ॥
चले जुगल मुनि पद सिर नाई । भए निसाचर कालहि पाई ॥
युद्धामध्ये श्रीहरींच्या हातून तुमचा मृत्यु होईल, त्यामुळे तुम्ही मुक्त व्हाल आणि पुन्हा संसारात जन्म घेणार नाही.’ ते दोघे मुनींच्या चरणी नमन करुन निघाले आणि पुढे योग्य वेळी राक्षस झाले. ॥ ४ ॥
दोहा—एक कलप एहि हेतु प्रभु लीन्ह मनुज अवतार ।
सुर रंजन सज्जन सुखद हरि भंजन भुबि भार ॥ १३९ ॥
देवांना प्रसन्न करणार्‍या, सज्जनांना सुख देणार्‍या आणि पृथ्वीचा भार हरण करणार्‍या भगवंतांनी एका कल्पामध्ये त्यासाठीच मनुष्य अवतार धारण केला होता. ॥ १३९ ॥
एहि बिधि जनम करम हरि केरे । सुंदर सुखद बिचित्र घनेरे ॥
कलप कलप प्रति प्रभु अवतरहीं । चारु चरित नानाबिधि करहीं ॥
अशाप्रकारे भगवंतांचे अनेक सुंदर, सुखदायक आणि अलौकिक जन्म आणि कर्मे आहेत. प्रत्येक कल्पामध्ये जेव्हा जेव्हा भगवान अवतार घेतात आणि नाना प्रकारच्या सुंदर लीला करतात, ॥ १ ॥
तब तब कथा मुनीसन्ह गाई । परम पुनीत प्रबंध बनाई ॥
बिबिध प्रसंग अनूप बखाने । करहिं न सुनि आचरजु सयाने ॥
तेव्हा तेव्हा मुनीश्वरांनी परम पवित्र काव्यरचना करुन त्यांच्या कथांचे गायन केलेले आहे आणि वेगवेगळ्या अनुपम प्रसंगांचे वर्णन केलेले आहे. ते ऐकल्यावर विचारी लोक आश्र्चर्य करीत नाहीत. ॥ २ ॥
हरि अनंत हरिकथा अनंता । कहहिं सुनहिं बहुबिधि सब संता ॥
रामचंद्र के चरित सुहाए । कलप कोटि लगि जाहिं न गाए ॥
श्रीहरि अनंत आहेत, त्यांच्या कथाही अनंत आहेत. सर्व संत त्या नाना प्रकारे सांगतात व ऐकतात. श्रीरामांचे सुंदर चरित्र कोट्यावधी कल्पांमध्येही गाता येत नाही. ॥ ३ ॥
यह प्रसंग मैं कहा भवानी । हरिमायाँ मोहहिं मुनि ग्यानी ॥
प्रभु कौतुकी प्रनत हितकारी । सेवत सुलभ सकल दुखहारी ॥
( शिव म्हणतात ) ‘ हे पार्वती, मी हा प्रसंग एवढ्यासाठी सांगितला की, ज्ञानी मुनीसुद्धा भगवंतांच्या मायेमुळे मोहित होतात. प्रभूंची ही कौतुकमय लीला आहे आणि शरणागताचे हित करणारी आहे. ते प्रभू सेवा करण्यास फार सुलभ आणि सर्व दुःखे हरण करणारे आहेत. ॥ ४ ॥
सो—सुर नर मुनि कोउ नाहिं जेहि न मोह माया प्रबल ।
अस बिचारि मन माहिं भजिअ महामाया पतिहि ॥ १४० ॥
देव, मनुष्य आणि मुनी यांच्यापैकी असा कोणीही नाही की त्याला भगवंतांची महान प्रबळ माया मोहित करीत नाही, मनात असा विचार करुन त्या महामायेचे स्वामी असणार्‍या श्री भगवंतांचे भजन करायला हवे. ॥ १४० ॥
अपर हेतु सुनु सैलकुमारी । कहउँ बिचित्र कथा बिस्तारी ॥
जेहि कारन अज अगुन अरुपा । ब्रह्म भयउ कोसलपुर भूपा ॥
हे गिरिराजकुमारी, आता भगवंतांच्या अवताराचे दुसरे कारण ऐक. मी त्याची मनोहर कथा विस्ताराने सांगतो. ज्यामुळे जन्मरहित, निर्गुण व रुपरहित ( अव्यक्त सच्चिदानंद ) ब्रह्म अयोध्यापुरीचे राजे झाले. ॥ १ ॥
जो प्रभु बिपिन फिरत तुम्ह देखा । बंधु समेत धरें मुनिबेषा ॥
जासु चरित अवलोकि भवानी । सती सरीर रहिहु बौरानी ॥
ज्या प्रभू, श्रीरामांना तू, बंधू लक्ष्मणासोबत मुनींसारखा वेष धारण करुन वनात फिरताना पाहिले होतेस आणि हे भवानी, ज्यांची लीला पाहून सतीच्या शरीरात असताना तू अशी भ्रमित झाली होतीस की, ॥ २ ॥
अजहुँ न छाया मिटति तुम्हरी । तासु चरित सुनु भ्रम रुज हारी ॥
लीला कीन्हि जो तेहिं अवतारा । सो सब कहिहउँ मति अनुसारा ॥
अजूनही तुझ्या भ्रमाचे पटल दूर झालेले नाही. त्या भ्रमरुपी रोगाचे हरण करणारे त्यांचे चरित्र श्रवण कर. त्या अवतारात भगवंतांनी ज्या ज्या लीला केल्या , त्या सर्व मी आपल्या बुद्धीप्रमाणे तुला सांगतो.’ ॥ ३ ॥
भरद्वाज सुनि संकर बानी । सकुचि सप्रेम उमा मुसुकानी ॥
लगे बहुरि बरनै बृषकेतू । सो अवतार भयउ जेहि हेतू ॥

( याज्ञवल्क्य म्हणाले, ) ‘ हे भरद्वाज, शंकरांचे वचन 

ऐकून पार्वती संकोचाने प्रेमपूर्वक हसली. नंतर ज्या

 कारणाने भगवंतांचा तो अवतार झाला होता, त्याचे 

वर्णन शिव करु लागले. ॥ ४ ॥


Custom Search

No comments: