Dnyaneshwari Adhyay 2 Part 9
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग ९
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा ओव्या २०१ ते २२५
म्हणोनि
स्वधर्म हा सांडसील । तरी पापा वरपडा होसील ।
आणि अपेश तें
न वचेल । कल्पांतवरी ॥ २०१ ॥
२०१) म्हणून
तूं आपला धर्म टाकशील, तर पापाला पात्र होशील आणि अपकीर्तीचा डाग तर
कल्पान्तापर्यंतहि जाणर नाहीं.
जाणतेनि तंवचि
जियावें । जंव अपकीर्ति आंगा न पवे ।
आणि सांग पां
केवीं निगावें । एथोनियां ॥ २०२ ॥
२०२) अपकीर्ति
जोपर्यंत अंगाला शिवली नाहीं, तोपर्यंतच शहाण्यानें जगावें. आतां सांग बरें; येथून
कसें परत फिरावें ?
तूं
निर्मत्सरु सदयता । येथूनि निघसी कीर माघौता ।
परी ते गति
समस्तां । न मनेल यया ॥ २०३ ॥
२०३) तूं मला
टाकून व दयेनें युक्त होऊन रणांतून परत फिरशील खरा; पण तुझी स्थिति या सर्वांना
पटणार नाहीं.
हे चहूंकडूनि
वेढितील । बाणवरी घेतील ।
तेथ पार्था न
सुटिजेल । कृपाळुपणें ॥ २०४ ॥
२०४) म्हणून हे
तुला चारी बाजूंनीं घेरतील; तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील; त्या प्रसंगी अर्जुना,
कृपाळूपणामुळें तुझी सुटका होणार नाहीं.
ऐसेनिहि
प्राणसंकटें । जरी विपायें पां निघणें घटे ।
तरी तें
जियालेंही वोखटें । मरणाहुनी ॥ २०५ ॥
२०५) जरी
कदाचित त्या प्राणसंकटांतून तुझी कशीबशी सुटका झाली, तरी ( तसें ) तें जगणेंहि
मरणाहून वाईटच.
तूं आणीकही एक
न विचारिसी । एथ संभ्रमें झुंजों आलासी ।
आणि सकणवपणें
निघालासीं । मागुता जरी ॥ २०६ ॥
२०६) आणखीहिं
अर्जुना, एका गोष्टीचा विचार तूं करीत नाहींस; येथें तूं मोठ्या उत्साहानें
लढण्याकरितां म्हणून आलास आणि आतां जर दया
उत्पन्न झाल्यामुळें परत फिरलास;
तरी तुझें तें
अर्जुना । या वैरियां दुर्जनां ।
कां प्रत्यया
येईल मना। सांगें मज ॥ २०७ ॥
२०७) तर
अर्जुना, तुझें तें करणें या दुष्ट वैर्यांच्या मनाला खरें वाटेल का ? सांग बरें
मला.
हे म्हणतील
गेला रे गेला । अर्जुन आम्हां बिहाला ।
हा सांगें
बोलु उरला । निका कायी ॥ २०८ ॥
२०८) ते
म्हणतील, ‘ हा पळाला रे पळाला !’ , अर्जुन आम्हांला भ्याला ‘; असा दोष तुझ्यावर
राहिला, तर तें चांगलें का ? सांग.
लोक सायासें
करुनि बहुतें । कां वेंचिती आपुलीं जिवितें ।
परी वाढविती
कीर्तीतें । धनुर्धरा ॥ २०९ ॥
२०९) लोक अनेक
कष्ट करतात किंवा प्रसंगीं आपलें प्राणहि खर्ची घालतात; पण, धनुर्धरा, कीर्ती
वाढवितात.
ते तुज
अनायासें । अनकळित जोडिली असे ।
हें अद्वितीय
जैसें । गगन आहे ॥ २१० ॥
२१०) ती तुला
अनायासें संपूर्ण लाभली आहे. आकाश हें ज्याप्रमाणें अद्वितीय आहे;
तैसी कीर्ती
निःसीम । तुझां ठायीं निरुपम ।
तुझे गुण
उत्तम । तिहीं लोकीं ॥ २११ ॥
२११)
त्याप्रमाणें अनंत व उपमारहित, अशी तुझी कीर्ति आहे. तिन्ही लोकांत तुझे गुण उत्तम
( म्हणून प्रसिद्ध ) आहेत.
दिगंतीचे
भूपति । भाट होऊनि वाखाणिती।
जे ऐकिलिया
दचकती । कृतांतादिक ॥ २१२ ॥
२१२)
देशोदेशींचे राजे भाट अजून ( तुझी कीर्ति ) वाखाणतात, ती ऐकून यमादिकांनाहि धास्ती
पडते.
ऐसा महिमा
घनवट । गंगा तैसी चोखट ।
जया देखी जगीं
सुभट । वांठ जाहली ॥ २१३ ॥
२१३) अशी (
तुझी ) थोरवी भरीव व गंगेसारखी निर्मल आहे. ती पाहून जगांतील मी मी म्हणणारे वीर
चकित होतात.
तें पौरुष
तुझें अद्भुत । आइकोनियां हे समस्त ।
जाहले आथि विरक्त
। जीवितेंसी ॥ २१४ ॥
२१४) तो तुझा
अपूर्व पराक्रम ऐकून, या सगळ्यांनीं आपल्या जीवाची आशा सोडली आहे.
जैसा
सिंहाचिया हांका । युगांतु होय मदमुखा ।
तैसा कौरवां
अशेखां । धाकु तुझा ॥ २१५ ॥
२१५)
ज्याप्रमाणें सिंहाच्या गर्जनेनें मदोन्मत्त हत्तीला प्रलयकाळ होतों, त्याप्रमाणें
या कौरवांना तुझा धाक बसला आहे.
जैसे पर्वत
वज्रातें । ना तरी सर्प गरुडाते ।
तैसे अर्जुना
हे तूंतें । मानिती सदा ॥ २१६ ॥
२१६)
ज्याप्रमाणें पर्वत वज्राला किंवा सर्प गरुडाला समजतात, त्याप्रमाणें अर्जुना, हे
तुला नेहमीं मानतात.
तें अगाधपण
जाईल । मग हिणावो अंगा येईल ।
जरी मागुता
निघसील । न झुंजतचि ॥ २१७ ॥
२१७) जर तूं न
लढतांच परत निघशील, तर तुझा तो मोठेपणा नाहींसा होईल आणि मग तुला हीनपणा येईल.
आणि हे पळतां
पळों नेदिती । धरुनि अवकळा करिती ।
न गणित कुटी
बोलती । आइकतां तुज ॥ २१८ ॥
२१८) तूं ( जरी
) पळून जाऊं लागलास तरी हे कौरव तुला जाऊं देणार नाहींत; तुला पकडून तुझी फजिती
करतील आणि तूं ऐकत असतांना तुझी अमर्याद निंदा करतील.
मग ते वेळी
हियें फुटावें । आतां लाठेपणें कां न झुंजावें ।
हें जिंतलें
तरी भोगावें । पृथ्वीतल ॥ २१९ ॥
२१९) मग त्या
वेळीं तुझें हृदय विदीर्ण होईल. त्यापेक्षां आज शौर्यानें कां लढूं नये ? ह्यांना
जिंकलेस तर पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घेशील.
ना तरी रणीं एथ
। झुंजतां वेंचलें जीवित ।
तरी स्वर्गसुख
अनकळित । पावसील ॥ २२० ॥
२२०) अथवा
समरांगणावर युद्ध करतांना प्राण खर्चीं पडलें, तर स्वर्गांतील सुख ( तुला )
त्रासावांचून प्राप्त होईल.
म्हणोनि ये
गोठी । विचारु न करीं किरीटी ।
आतां धनुष्य
घेऊनि उठी । झुंजें वेगीं ॥ २२१ ॥
२२१)
एवढ्याकरितां अर्जुना, या गोष्टींचा विचार करीत बसूं नकोस. आतां हे धनुष्य घेऊन ऊठ
आणि लवकर युद्धाला आरंभ कर.
देखें
स्वधर्मु हा आचरतां । दोषु नाशे असता ।
तुज भ्रांति
हे कवण चित्ता । एथ पातकाची ॥ २२२ ॥
२२२) पाहा, या
स्वधर्माचें आचरण केलें असतां असलेलीं पापें नाहींशीं होतात. ( मग हें युद्ध
केल्यानें ) पातक लागेल, ही भ्रांति या ठिकाणीं तुझ्या चित्तांत कशीं आली ?
सांगें
प्लवेंचि काय बुडिजे । कां मार्गीं जातां आडळिजे ।
परी विपायें
चालों नेणिजे । तरी तेंही घडे ॥ २२३ ॥
२२३) अर्जुना
सांग, नावेनें कोणी बुडेल कां ? किंवा ( चांगल्या ) वाटेनें जातांना ठेंच लागेल
कां ? पण कदाचित् नीट चालतां येत नसेल तर तेंहि होईल.
अमृतें तरीचि
मरिजे । जरी विखेंसी सेविजे ।
तैसा
स्वधर्में दोषु पाविजे । हेतुकपणें ॥ २२४ ॥
२२४) दूधच पण जर
विषासह सेवन केलें तरच त्यानें मरण येईल. त्याचप्रमाणें फलाशेनें स्वधर्मापासून
दोष लागतो.
म्हणोनि तुज
पार्था । हेतु सांडोनि सर्वथा ।
क्षात्रवृत्ती
झुंजतां । पाप नाहीं ॥ २२५ ॥
२२५) म्हणून
पार्था, सर्व प्रकारें फलाशा सोडून
क्षत्रियांच्या धर्माप्रमाणें युद्ध
क्षत्रियांच्या धर्माप्रमाणें युद्ध
कर. म्हणजे
तुला पाप मुळींच लागणार नाहीं.
Custom Search
No comments:
Post a Comment