Tuesday, June 16, 2020

Dnyaneshwari Adhyay 2 Part 8 ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग ८


Dnyaneshwari Adhyay 2 Part 8 
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग ८
Dnyaneshwari Adhyay 2 ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा ओव्या १७६ ते २००
तैसिया योगीश्र्वरांचिया मती । मिळणीसवें एकवटती ।
परी जे विचारुनि पुनरावृत्ति । भजतीचिना ॥ १७६ ॥
१७६) त्याप्रमाणें थोरथोर योग्यांच्या बुद्धि आत्मस्वरुपाचा साक्षात्कार होतांच तद्रूप होतात; पण एकदां ते तद्रुप झाले कीं विचार करुन पुन्हां देहतादात्म्यावर येत नाहींत. 
जें सर्वत्र सर्वही देहीं । जया करितांही घातु नाहीं ।
तें विश्र्वात्मक तूं पाहीं । चैतन्य एक ॥ १७७ ॥
१७७) जें सर्वत्र व सर्व देहांत आहे व करुं लागलें तरी ज्याचा घात होत नाहीं, तें विश्र्वव्यापी एक चैतन्य तूं लक्षांत घे.
याचेनिचि स्वभावें । हें होत जात आघवें ।
तरी सांग काय शोचावें । एथ तुवां ॥ १७८ ॥
१७८) हें सर्व जग ( आपल्या स्वभावानें ) उत्पन्न होत आहे व नाश पावत आहे. तर सांग, येथे तुला शोक करण्यासारखें काय आहे ?
एर्‍हवीं तरी पार्था । तुज कां नेणों न मने चित्ता ।
परी किडाळ हें शोचितां । बहुतीं परीं ॥ १७९ ॥
१७९) परंतु हे अर्जुना, विचार करुन पाहिलें तर तुझ्या चित्ताला हें कां पटूं नये, हे मला समजत नाही; पण याचा शोक करणें हें पुष्कळ प्रकारांनी वाईट आहे.
तूं अझुनि कां न विचारिसी । काय हें चिंतितु आहासी ।
स्वधर्मु तो विसरलासी । तरावें जेणें ॥ १८० ॥
१८०) तूं अजून ( ह्याचा ) कां विचार करीत नाहींस ? काय हें मनांत घेऊन बसला आहेस ? ज्याच्या योगानें तरुन जावयाचें, तो आपला धर्म तूं विसरला आहेस.  
या कौरवां भलतें जाहलें । अथवा तुजचि कांहीं पातलें ।
कीं युगचि हे बुडालें । जर्‍ही एथ ॥ १८१ ॥
१८१) या कौरवांचे वाटेल तें झालें अथवा तुझ्यावरच कांहीं प्रसंग आला, अथवा या वेळीं युगान्त जरी झाला, 
तरी स्वधर्मु एक आहें । तो सर्वथा त्याज्य नोहे ।
मग तरिजेल काय पाहें । कृपाळूपणें ॥ १८२ ॥
१८२) तरी स्वधर्म म्हणून जो एक आहे, तो मुळींच टाकतां येत नाहीं; असें असतां विचार कर, कृपाळूपणा धरुन तुला तरुन जातां येईल काय ?
अर्जुना तुझें चित्त । जर्‍ही जाहलें द्रवीभूत ।
तर्‍ही हें अनुचित । संग्रामसमयीं ॥ १८३ ॥
१८३) अर्जुना, तुझें चित्त जरी दयेनें विरघळून गेलें, तरी तें तसें होणें या युद्धाच्या प्रसंगी योग्य नाहीं.
अगा गोक्षीर जरी जाहलें । तरी पथ्यासि नाहीं म्हणितलें ।
ऐसोनिहि विष होय सुदलें । नवज्वरीं देतां ॥ १८४ ॥
१८४) अरे, दूध जरी गाईचे असलें, तरी तें पथ्यास घेऊं नये, असें ( वैद्यशास्त्रानें ) सांगितलें असतांहि ( आग्रहानें ) नवज्वरांत दिलेंच तर तें विषवत् ( मारक ) होतें.  
तैसें आनीं आन करितां । नाशु होईल हिता ।
म्हणऊनि तूं आतां । सावध होईं ॥ १८५ ॥
१८५) त्याप्रमाणें भलत्या ठिकाणीं भलतें केले असतां, हिताचा नाश होतो; एवढ्याकरितां तूं आतां सावध हो.
वायांचि व्याकुळ कायी । आपुला निजधर्मु पाहीं ।
जो आचरितां बाधु नाहीं । कवणे काळीं ॥ १८६ ॥
१८६) तूं विनाकारण शोकाकुल कां होतोस ? ज्याचें आचरण केलें असतां केव्हांहि दोष लागावयाचा नाहीं, त्या आपल्या स्वधर्माकडे लक्ष दे.
जैसें मार्गेचि चालतां । अपावो न पचे सर्वथा ।
कां दीपाधारें वर्ततां । नाडळिजे ॥ १८७ ॥
१८७) ज्याप्रमाणें सरळ रस्त्यानें चाललें असतां मुळींच अपाय पोंचत नाहीं, किंवा दिव्याच्या आधारानें चाललें असतां ठेंच लागत नाहीं;  
तयापरी पार्था । स्वधर्में राहाटतां ।
सकळकामपूर्णता । सहजें होय ॥ १८८ ॥
१८८) त्याप्रमाणें पार्था, स्वधर्मानें वागलें असतां, सर्व इच्छा सहजच पुर्‍या होतात.
म्हणोनि यालागीं पाहीं । तुम्हां क्षत्रियां आणीक कांहीं ।
संग्रामावांचूनि नाहीं । उचित जाणें ॥ १८९ ॥ 
१८९) म्हणून हें पाहा, तुम्हां क्षत्रियांना युद्धावांचून दुसरें कांहीं उचित नाहीं, हें लक्षांत ठेव.
निष्कपटा होआवें । उसिणा घाई जुंझावें ।
हें असो काय सांगावें । प्रत्यक्षावरी ॥ १९० ॥
१९०) मनांत कपट न धरातां मार्‍याला मारा करुन आवेशानें लढावें; पण हें ( बोलणें ) असो. प्रत्यक्षच प्रसंग आला आहे, तेव्हां जास्त काय सांगावें ?
अर्जुना झुंज देखें आतांचें । हें हो काज दैव तुमचें ।
की निधान सकळ धर्माचें । प्रगटलें असे ॥ १९१ ॥
१९१) अर्जुना, सांप्रतचें युद्ध पाहा; हें कार्य म्हणजे जणूं काय तुमचें दैवच फळलें आहे, अथवा सर्व धर्मांचा ठेवाच ( तुमच्यापुढें ) उघडा झालेला आहे !
हा संग्रामु काय म्हणिपे । कीं स्वर्गुचि येणें रुपें ।
मूर्त कां प्रतापें । उदो केला ॥ १९२ ॥
१९२) याला काय युद्ध म्हणावें ? युद्धाच्या रुपानें हा मूर्तिमंत स्वर्गच ( अवतरला ) आहे. अथवा, मूर्तिमंत तुझा प्रतापच हा उगवला आहे. 
ना तरी गुणाचेनि पतिकरें । आर्तीचेनि पडिभरें ।
हे कीर्तीचि स्वयंवरें । आली तुज ॥ १९३ ॥
१९३) अथवा, तुझ्या गुणांवर लुब्ध होऊन ही कीर्तीच उत्कट इच्छेनें तुला वरण्याला आली आहे.
क्षत्रियें बहुत पुण्य कीजे । तें झुंज ऐसें हें लाहिजे ।
जैसें मार्गें जातां आडळिजे । चिंतामणीसी ॥ १९४ ॥
१९४) क्षत्रियानें पुष्कळ पुण्य करावें; तेव्हां त्याला असें हें युद्ध करावयास मिळतें.ज्याप्रमाणें वाटेने जात असतां ठेंच लागावी व काय लागलें म्हणून पाहावें, तों चिंतामणि आढळावा; 
ना तरी जांभया पसरे मुख । तेथ अवचटें पडे पीयूख ।
तैसा संग्रामु हा देख । पातला असे ॥ १९५ ॥
 १९५) अथवा, जांभई देण्यासाठीं तोंड उघडलें असतां अकस्मात अमृत येऊन त्यांत पडावें; त्याप्रमाणें हें युद्ध ( अनायासें ) आलेलें आहे असें समज.
आतां हा ऐसा अव्हेरिजे । मग नाथिले शोचूं बैसिजे ।
तरी आपण आहाणा होईजे । आपणपेयां ॥ १९६ ॥
१९६) आतां असा हा ( संग्राम ) टाकून, नाहीं त्याचा शोक करीत बसलास, तर आपण आपलाच घात केल्यासारखें होईल. 
पूर्वजांचें जोडलें । आपणचि होय धाडिलें ।
जरी आजि शस्त्र सांडिलें । रणीं इये ॥ १९७ ॥
१९७) आज जर तूं या युद्धांत शस्त्र टाकून दिलेंस, तर पूर्वजांनीं मिळवून ठेवलेलें ( पुण्य व यश ) आपणच चालविल्यासारखें होईल.
असती कीर्ति जाईल । जगचि अभिशापु देईल ।
आणि गिंवसित पावतील । महादोष ॥ १९८ ॥
१९८) इतकेंच नव्हे तर, तुझी असलेली कीर्ति जाईल, सगळें जग तुला नांवें ठेवील आणि महापातकें तुला हुडकीत येऊन गांठतील.
जैसी भ्रतारेंहीन वनिता । उपहति पावे सर्वथा ।
तैशी दशा जीविता । स्वधर्मेंवीण ॥ १९९ ॥
१९९) ज्याप्रमाणें पतिविरहित स्त्री सर्व प्रकारें अनादराला पात्र होते, त्याप्रमाणें स्वधर्मत्यागानें जीविताची तशी दशा होते.
ना तरी रणीं शव सांडिजे । तें चौमेरीं गिधिं विदारिजे ।
तैसें स्वधर्महीन अभिभविजे । महादोषीं ॥ २०० ॥

२००) अथवा, युद्धभूमीवर टाकून दिलेल्या प्रेताला ज्याप्रमाणें चोहों बाजूंनीं 


गिधाडें तोडतात, त्याप्रमाणे स्वधर्मरहित पुरुषाला महादोष घेरतात.



Custom Search

No comments: