Dnyaneshwari Adhyay 2
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा ओव्या १२६ ते १५०
Dnyaneshwari Adhyay 2 Stanzas 126 to 150
या उपाधिमाजीं
गुप्त । चैतन्य असे सर्वगत ।
तें तत्त्वज्ञ
संत । स्वीकारिती ॥ १२६ ॥
१२६) या देहादि
प्रपंचामध्यें सर्वत्र चैतन्य गुप्त रुपानें आहे. तत्त्व जाणणारे संत ते ओळखून
त्याचेंच ग्रहण करतात.
सलिल पय जैसें
। एक होऊनि मीनलें असे ।
परी निवडूनि
राजहंसें । वेगळें कीजे ॥ १२७ ॥
१२७) दूध
पाण्याशीं एकरुप होऊन त्यांत अगदीं मिळून गेलेलें असतें; पण राजहंस ज्याप्रमाणें
निवडून तें वेगळें करतो;
कीं
अग्निमुखें किडाळ । तोडोनियां चोखाळ ।
निवडिती केवळ
। बुद्धिमंता ॥ १२८ ॥
१२८) अथवा चतुर
लोक अग्नीच्या साहाय्यानें हिणकस धातु काढून टाकून केवळ शुद्ध सोनें ज्याप्रमाणें
निवडून काढतात;
ना तरी जाणिवेचिया
आयणी । करितां दधिकडसणी ।
मग नवनीत
निर्वाणीं । दिसे जैसें ॥ १२९ ॥
१२९) अथवा
बुद्धिचातुर्यानें दही घुसळलें असतां, ज्याप्रमाणें शेवटी लोणी दृष्टीस
पडतें;
कीं भूस बीज
एकवट । उपणितां राहे घनवट ।
तेथ उडे तें
फलकट । जाणों आलें ॥ १३० ॥
१३०) किंवा एकत्र
झालेलें भूस व धान्य उफळलें असतां धान्या जागेवर राहतें व उडून गेलेलें तें फोलकट,
असें ज्याप्रमाणें समजून येतें;
तैसें
विचारितां निरसलें । तें प्रपंचु सहजें सांडवलें ।
मग तत्त्वता
तत्त्व उरलें । ज्ञानियांसी ॥ १३१ ॥
१३१)
त्याप्रमाणें विचार केला असतां ज्याचा निरास होतो ( जो मिथ्या ठरतो ) असा प्रपंच (
देहादि उपाधि ) ज्ञानी पुरुषाकडून सहज टाकला जातो व मग ज्ञानी पुरुषांना खरोखर एक
तत्त्व ( ब्रह्म ) मात्र उरते.
म्हणोनि
अनित्याचां ठायीं । तयां आस्तिक्यबुद्धि नाहीं ।
निष्कर्ष
दोहींही । देखिला असे ॥ १३२ ॥
१३२) म्हणून
ज्यांनी दोहोंमधील ( उपाधी व चैतन्य यांमधील ) सार ओळखलें, त्यांचा ( शरीरादि )
अशाश्वत वस्तूंच्या ठिकाणीं, त्या नित्य आहेत, असा निश्र्चय नसतो.
देखें सारासार
विचारितां । भ्रांति ते पाहीं असारता ।
तरी सार तें
स्वभवता । नित्य जाणें ॥ १३३ ॥
१३३) पाहा,
सारासाराचा विचार केला असतां, त्यांतील असारता ही भ्रांति आहे, असें समज आणि सार
हें स्वभावतःच नित्य आहे, असे जाण.
हा
लोकत्रयाकारु । तो जयाचा विस्तारु ।
तेथ नाम वर्ण
आकारु । चिन्ह नाहीं ॥ १३४ ॥
१३४) हे तिन्ही
लोक हा ज्याचा विस्तार आहे, त्याला नाम, वर्ण, आकार अशीं कांहीं चिन्हें ( लक्षणें
) नाहींत;
जो सर्वदा
सर्वगतु । जन्मक्षयातीतु ।
तया केलियाहि
घातु । कदाचि नोहे ॥ १३५ ॥
१३५) जो शाश्वत
व सर्वव्यापी असून जन्ममरणरहित आहे त्याचा करुं गेलें तरी केव्हांहि घात होत
नाहीं.
आणि शरीरजात
आघवें । हें नाशवंत स्वभावें ।
म्हणोनि तुवां
झुंझावें । पंडुकुमरा ॥ १३६ ॥
१३६) आणि शरीर
म्हणून जेवढें आहे, तेवढें सगळें स्वभावतः नाशवंत आहे; म्हणून अर्जुना तूं
लढावेंस, हें योग्य आहे.
तूं धरुनि
देहाभिमानातें । दिठी सूनि या शरीरातें ।
मी मारिता हे
मरते । म्हणत आहासी ॥ १३७ ॥
१३७) तूं
देहाचा अभिमान धरुन या शरीराकडेच दृष्टि देऊन मी ( अर्जुन ) मारणारा आणि हे ( कौरव
) मरणारे, असे म्हणत आहेस.
तरी अर्जुना
तूं हें नेणसी । जरी तत्त्वता विचारिसी ।
तरी वधिता तूं
नव्हेसी । हे वध्य नव्हती ॥ १३८ ॥
१३८) तरी
अर्जुना तुला खरें तत्त्व समजत नाही. जर तत्त्वतः विचार करुन पाहशील, तर तूं
मारणारा नाहींस आणि हे मारले जातील असेहि नाहींत.
जैसें
स्वप्नामाजिं देखिजे । तें स्वप्नींचि साच आपजे ।
मग चेऊनियां
पाहिजे । तंव कांहीं नाहीं ॥ १३९ ॥
१३९)
ज्याप्रमाणें जें स्वप्नांत पाहावें, तें स्वप्न आहे तोंपर्यंतच खरें वाटतें, पण
मग जागे होऊन पाहावें, तो कांहींएक नसतें.
तैसी हें जाणा
माया । तूं भ्रमत आहासी वायां ।
शस्त्रें
हाणितलिया छाया । जैसी आंगीं न रुपे ॥ १४० ॥
१४०)
त्याप्रमाणें ही ( केवळ ) माया आहे असें समज. तूं व्यर्थ ( हिच्या ) भ्रमांत पडला
आहेस. ज्याप्रमाणें ( मनुष्याच्या ) सावलीला शस्त्रानें मारल्यास त्याच्या अंगाला
घाव लागत नाहीं;
कां पूर्ण कुंभ उलंडला । तेथ बिंबाकारु दिसे भ्रंशला ।
परी भानु नाहीं नासला । तयासवें ॥ १४१ ॥
१४१) किंवा भरलेला घडा पालथा झाला म्हणजे त्यांतील
सूर्याचें प्रतिबिंब नाहीसें झालेलें दिसतें; परंतु त्या प्रतिबिंबाबरोबर सूर्याचा
नाश झालेला नसतो.
ना तरी मठीं आकाश जैसें । मठाकृती अवतरलें असे ।
तो भंगलिया आपैसें । स्वरुपचि ॥ १४२ ॥
१४२) किंवा, ज्याप्रमाणें आकाश हें मठांत मठाच्या आकाराचें
झालेले दिसतें; पण तो मठ मोडल्यावर तें आकाश सहजच आपल्या मूळ रुपानें राहतें;
तैसें शरीराचां लोपीं । सर्वथा नाशु नाहीं स्वरुपीं ।
म्हणऊनि तूं हे नारोपीं । भ्रांति बापा ॥ १४३ ॥
१४३) त्याप्रमाणें शरीराचा नाश झाला तरी प्राण्याच्या मूळ
स्वरुपाचा मुळींच नाश होत नाहीं. म्हणून बाबा, तूं स्वरुपाच्या ठिकाणीं नाशाच्या
भ्रांतीचा आरोप करुं नकोस.
जैसें जीर्ण वस्त्र सांडिजे । मग नूतन वेढिजे ।
तैसें देहांतरातें
स्वीकारिजे । चैतन्यनाथें ॥ १४४ ॥
१४४) ज्याप्रमाणें जुनें वस्त्र टाकावें आणि मग नवीन
नेसावें, त्याप्रमाणें हा आत्मा एक देह टाकून दुसरा ( देह ) स्वीकारतो.
हा अनादि नित्यसिद्धु । निरुपाधि विशुद्धु ।
म्हणऊनि शस्त्रादिकीं छेदु । न घडे यया ॥ १४५ ॥
१४५) हा आत्मा अनादि, नित्यसिद्ध ( शाश्र्वत असणारा )
उपाधिरहित व अत्यंत शुद्ध असा आहे. म्हणून याचा शस्त्रादिकांच्या योगानें घात होत
नाही.
हा प्रळयोदकें
नाप्लवे । अग्निदाहो न संभवे ।
एथ महाशोषु न
प्रभवे । मारुताचा ॥ १४६ ॥
१४६) हा (
आत्मा ) प्रळयकाळच्या पाण्यानें बुडत नाहीं, हा अग्नीने जळणें संभवत नाहीं; येथें
वायूच्या महाशोषणशक्तीचा प्रभाव चालत नाही.
अर्जुना हा
नित्यु । अचळु हा शाश्र्वतु ।
सर्वत्र
सदोदितु । परिपूर्णु हा ॥ १४७ ॥
१४७) अर्जुना,
हा नित्य, स्थिर, शाश्वत असून सर्व ठिकाणीं नेहमीं भरलेला असा आहे.
हा तर्काचिये
दिठी । गोचर नोहे किरीटी ।
ध्यान याचिये
भेटी । उत्कंठा वाहे ॥ १४८ ॥
१४८) अर्जुना,
हा तर्काच्या दृष्टीला दिसणारा नाहीं, ध्यान तर याच्या भेटीसाठी उत्कंठित झालेलें
असतें.
हा सदा
दुर्लभु मना । आपु नोहे साधना ।
निःसीमु हा
अर्जुना । पुरुषोत्तमु ॥ १४९ ॥
१४९) हा मनाला
नेहमीं दुर्लभ आहे व साधनाला प्राप्त न होणारा ( आहे. ) अर्जुना, हा पुरुषोत्तम
अनंत आहे.
हा
गुणत्रयरहितु । व्यक्तीसी अतीतु ।
अनादि अविकृतु
। सर्वरुप ॥ १५० ॥
१५०) हा (
सत्त्वादि ) तीन गुणांनी रहित, आकाराच्या
पलीकडचा, अनादि, विकार न पावणारा व
सर्वव्यापी
आहे.
Custom Search
No comments:
Post a Comment