Friday, June 5, 2020

ShriRamcharitmans Part 20 श्रीरामचरितमानस भाग २०


ShriRamcharitmans
  श्रीरामचरितमानस 
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड

दोहा—सहित सहाय सभीत अति मानि हारि मन मैन ।
गहेसि जाइ मुनि चरन तब कहि सुठि आरत बैन ॥ १२६ ॥
तेव्हा कामदेवाने फार घाबरुन व मनात पराजय मान्य करुन आपल्या सहकार्‍यांसह मोठ्या दीनतेने मुनींचे पाय धरले. ॥ १२६ ॥
भयउ न नारद मन कछु रोषा । कहि प्रिय बचन काम परितोषा ॥
नाइ चरन सिरु आयसु पाई । गयउ मदन तब सहित सहाई ॥
नारदांना मुळीच राग आला नाही. त्यांनी गोड शब्दांत कामदेवाचे समाधान केले. तेव्हा मुनींच्या चरणीं मस्तक ठेवून व त्यांची आज्ञा घेऊन आपल्या सहकार्‍यांसह तो परत गेला. ॥ १ ॥
मुनि सुसीलता आपनि करनी । सुरपति सभाँ जाइ सब बरनी ॥
सुनि सब कें मन अचरजु आवा । मुनिहि प्रसंसि हरिहि सिरु नावा ॥
देवराज इंद्राच्या सभेत जाऊन त्याने मुनींचे शील आणि आपले कर्तृत्व सांगितले. ते ऐकून सर्वांना आश्र्चर्य वाटले आणि त्यांनी मुनींची प्रशंसा करीत श्रीहरींना नमन केले. ॥ २ ॥
तब नारद गवने सिव पाहीं । जिता काम अहमिति मन माहीं ॥
मार चरित संकरहि सुनाए । अतिप्रिय जानि महेस सिखाए ॥
मग नारद श्रीशिवांच्याकडे गेले. त्यांच्या मनात अहंकार उत्पन्न झाला की, मी कामदेवाला जिंकले. त्यांनी शिवांना कामदेवाची करणी सांगितली. शिवांनी त्यांना आपला आवडता समजून असा उपदेश दिला, ॥ ३ ॥
बार बार बिनवउँ मुनि तोही । जिमि यह कथा सुनायहु मोही ॥
तिमि जनि हरिहि सुनावहु कबहूँ । चलेहुँ प्रसंग दुराएहु तबहूँ ॥
‘ हे मुनी, मी तुम्हांला वारंवार विनंती करतो की, ही कथा तुम्ही मला जशी सांगितली, तशी भगवान श्रीहरींना कधी सांगू नका. बोलण्याच्या ओघात विषय आला तरीही लपवून ठेवा. ‘ ॥ ४ ॥
दोहा—संभु दीन्ह उपदेस हित नहिं नारदहि सोहान ।
भरद्वाज कौतुक सुनहु हरि इच्छा बलवान ॥ १२७ ॥
श्रीशिवांनी हा त्यांच्या भल्याचा उपदेश केला, परंतु नारदांना तो पटला नाही. हे भरद्वाज, आता गंमत ऐका. श्रीहरींची इच्छा मोठी बलवान आहे. ॥ १२७ ॥
राम कीन्ह चाहहिं सोइ होई । करै अन्यथा अस नहिं कोई ॥
संभु बचन मुनि मन नहिं भाए । तब बिरंचि के लोक सिधाए ॥
श्रीरामचंद्रांना जे करायचे असते, तेच होते. त्याविरुद्ध करु शकेल, असा कोणीही नाही. शिवांचे बोलणें नारदांना रुचले नाही, तेव्हा ते तेथून ब्रह्मलोकी गेले. ॥ १ ॥
एक बार करतल बर बीना । गावत हरि गुन गान प्रबीना ॥
छीरसिंधु गवने मुनिनाथा । जहँ बस श्रीनिवास श्रुनिवास श्रुतिमाथा ॥
एकदा गानविद्येत कुशल असलेले मुनिनाथ नारद हाती सुंदर वीणा घेऊन हरिगुण गात-गात क्षीरसागरात गेले. तेथे मूर्तिमंत वेदान्ततत्त्व असलेले लक्ष्मीनिवास भगवान नारायण राहतात. ॥ २ ॥  
हरषि मिले उठि रमानिकेता । बैठे आसन रिषिहि समेता ॥
बोले बिहसि चराचर राया । बहुते दिनन कीन्हि मुनि दाया ॥
भगवान लक्ष्मीकांत उभे राहून नारदांना आनंदाने भेटले आणि ते ऋषी नारदांसोबत आसनावर बसले. चराचराचे स्वामी भगवान हसून म्हणाले, ‘ हे मुनी, आज बर्‍याच दिवसांनी ( येण्याची ) दया केली. ॥ ३ ॥
काम चरित नारद सब भाषे । जद्यपि प्रथम बरजि सिवँ राखे ॥
अति प्रचंड रघुपति कै माया । जेहि न मोह अस को जग जाया ॥
जरी श्रीशिवांनी नारदांना पूर्वीच ‘ हे सांगू नका, ‘ अशी सूचना केली होती, तरीही त्यांनी कामदेवाची सर्व करणी भगवंतांना सांगितली. श्रीरघुनाथांची माया मोठी प्रबळ असते. ती मोहित करु शकणार नाही, असा या जगांत कोण जन्मला आहे ? ॥ ४ ॥
दोहा—रुख बदन करि बचन मृदु बोले श्रीभगवान ।
तुम्हरे सुमिरन तें मिटहिं मोह मार मद मान ॥ १२८ ॥
भगवान तटस्थपणे वरवर कोमल स्वरात म्हणाले की, ‘ हे मुनिराज, तुमचे स्मरण केल्यानेही इतरांचे मोह. काम, मद व अभिमान हे नाहीसे होतात. ( मग तुमच्याबद्दल काय बोलायचे ? ) ॥ १२८ ॥
सुनु मुनि मोह होइ मन ताकें । ग्यान बिराग हृदय नहिं जाकें ॥
ब्रह्मचरज ब्रत रत मतिधीरा । तुम्हहि कि करइ मनोभव पीरा ॥
हे मुनी, ज्याच्या हृदयात ज्ञान-वैराग्य नसते, त्याच्या मनात मोह येतो. तुम्हीतर ब्रह्मचर्यव्रतामध्ये तत्पर आणि मोठ्या धीरबुद्धीचे आहात. तुम्हांला कामदेव कधी त्रास देऊ शकेल काय ?’ ॥ १ ॥
नारद कहेउ सहित अभिमाना । कृपा तुम्हारि सकल भगवाना ॥
करुनानिधि मन दीख बिचारी । उर अंकुरेउ गरब तरु भारी ॥
नारदांनी मोठ्या अभिमानाने म्हटले की, ‘ भगवन ही सर्व तुमची कृपा आहे. ‘ करुणानिधान भगवंतांनी मनात विचार करुन पाहिले की, यांच्या मनात प्रचंड गर्वाच्या वृक्षाचा अंकुर उत्पन्न झाला आहे. ॥ २ ॥
बेगि सो मैं डारिहउँ उखारी । पन हमार सेवक हितकारी ॥
मुनि कर हित मम कौतुक होई । अवसि उपाय करबि मैं सोई ॥
सेवकांचे हित करणे हे माझे ब्रीद आहे. तेव्हा मी तो अंकुर ताबडतोप उपटून टाकतो. मुनींचे कल्याण आणि माझा गंमतीचा खेळ होईल, असा उपाय आपण अवश्य करावा. ॥ ३ ॥
तब नारद हरि पद सिर नाई । चले हृदयँ अहमिति अधिकाई ॥
श्रीपति निज माया तब प्रेरी । सुनहु कठिन करनी तेहि केरी ॥
तेव्हा नारद भगवंताच्या चरणी मस्तक ठेवून निघाले. त्यांच्या मनात अभिमान अधिकच वाढला होता. तेव्हा लक्ष्मीपती भगवंतांनी आपल्या मायेला प्रेरित केले. तिची करणी किती दुस्तर असते ते पाहा. ॥ ४ ॥
दोहा—बिरचेउ मग महुँ नगर तेहिं सत जोजन बिस्तार ।
श्रीनिवासपुर तें अधिक रचना बिबिध प्रकार ॥ १२९ ॥
तिने ( हरिमायेने ) वाटेत शंभर योजनांचे ( चारशे कोसाचे ) नगर रचले. त्या नगरातील विविध रचना विष्णूंच्या वैकुंठापेक्षाही अधिक सुंदर होत्या. ॥ १२९ ॥
बसहिं नगर सुंदर नर नारी । जनु बहु मनसिज रति तनुधारी ॥
तेहिं पुर बसइ सीलनिधि राजा । अगनित हय गय सेन समाजा ॥
त्या नगरीत इतके सुंदर स्त्रि-पुरुष राहात होते की, जणू कामदेव व रती हेच मानवदेह धारण केलेले असावेत. त्या नगरीत शीलनिधी नावाचा राजा राहात होता. त्याच्याकडे असंख्य घोडे, हत्ती व सैन्याची दले होती. ॥ १ ॥
सत सुरेस सम बिभव बिलासा । रुप तेज बल नीति निवासा ॥
बिस्वमोहनी तासु कुमारी । श्री बिमोह जिसु रुपु निहारी ॥
त्याचे वैभव आणि विलास शंभर इंद्रासमान होते. तो स्वतः रुप, तेज, बल आणि नीतीचे घर होता. त्याला विश्र्वमोहिनी नावाची एक रुपवती कन्या होती, तिचे रुप पाहून लक्ष्मीनेसुद्धा मोहित व्हावे. ॥ २ ॥
सोइ हरिमाया सब गुन खानी । सोभा तासु कि जाइ बखानी ॥
करइ स्वयंबर सो नृपबाला । आए तहँ अगनित महिपाला ॥
ती सर्व गुणांची खाण भगवंतांची मायाच होती. तिच्या शोभेचे वर्णन कसे करता येईल ? ती राजकुमारी स्वयंवर करु इच्छित होती. त्यासाठी तेथे अगणित राजे आले होते. ॥ ३ ॥
मुनि कौतुकी नगर तेहिं गयऊ । पुरबासिन्ह सब पूछत भयऊ ॥
सुनि सब चरित भूपगृहँ आए । करि पूजा नृप मुनि बैठाए ॥

नारद मुनी कुतूहलाने त्या नगरीत गेले आणि नगरवासीयांकडे त्यांनी विचारपूस केली. सर्व वार्ता ऐकल्यावर ते राजाच्या महालात आले. राजाने त्यांची पूजा करुन त्यांना आसनावर बसविले. ॥ ४ ॥
दोहा—आनि देखाई नारदहि भूपति राजकुमारि ।
कहहु नाथ गुन दोष सब एहि के हृदयँ  बिचारि ॥ १३० ॥
नंतर राजाने राजकुमारीला आणून नारदांना दाखविले. ( आणि विचारले ) ‘ हे नाथ, तुम्ही विचार करुन हिचे सर्व गुण-दोष सांगा.’ ॥ १३० ॥
देखि रुप मुनि बिरति बिसारी । बडी बार लगि रहे निहारी ॥
लच्छन तासु बिलोकि भुलाने । हृदयँ हरष नहिं प्रगट बखाने ॥
तिचे रुप पाहून नारद मुनी वैराग्य विसरुन गेले आणि बराच वेळ तिच्याकडे बघतच राहिले. तिची लक्षणे पाहून मुनी स्वतःला विसरुन गेले आणि मनात हर्षित झाले. परंतु प्रकटपणे त्यांनी लक्षणे सांगितली नाहीत. ॥ १ ॥
जो एहि बरइ अमर सोइ होई । समरभूमि तेहि जीत न कोई ॥
सेवहिं सकल चराचर ताही । बरइ सीलनिधि कन्या जाही ॥
( त्या लक्षणांचा विचार करुन ते मनात म्हणाले ) जो हिच्याशी विवाह करील, तो अमर होईल आणि रणभूमीमध्ये त्याला कोणी जिंकू शकणार नाही. ही शीलनिधीची कन्या ज्याला वरील, सर्व चराचर त्याची सेवा करील. ॥ २ ॥
लच्छन सब बिचारि उर राखे । कछुक बनाइ भूप सन भाषे ॥
सुता   सुलच्छन कहि नृप पाहीं । नारद चले सोच मन माहीं ॥
ती सर्व लक्षणें मुनींनी मनात ठेवली आणि राजाला त्यांनी आपल्या मनाने काही लक्षणे सांगितली. राजाला मुलीची सुलक्षणे सांगून नारद निघून गेले. परंतु त्यांच्या मनात असे आले की, ॥ ३ ॥
करौं जाइ सोइ जतन बिचारी । जेहि प्रकार मोहि बरै कुमारी ॥
जप तप कछु न होइ तेहि काला । हे बिधि मिलइ कवन बिधि बाला ॥

आता जाऊन असा उपाय करावा की, ही कन्या मलाच 

मिळेल. यावेळी जप, तप करुन काही होणार नाही. हे 

विधात्या, ही कन्या मला कशी बरे मिळेल ? ॥ ४ ॥


Custom Search

No comments: