ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग ७
ज्ञानेश्र्वरी
अध्याय दुसरा ओव्या १५१
ते १७५
अर्जुना ऐसा
जाणावा । हा सकळात्मकु देखावा ।
मग सहजें शोकु
आघवा । हरेल तुझा ॥ १५१ ॥
१५१) अर्जुना, असा हा आहे, हें लक्षांत घे. हा
सकलात्मक आहे हें ओळख. मग तुझा हा सगळा शोक आपोआप नाहींसा होईल.
अथवा ऐसा
नेणसी । तूं अंतवंतचि हे मानिसी ।
तर्ही शोचूं
न पवसी । पंडुकुमरा ॥ १५२ ॥
१५२) अथवा, हा
असा आहे, हें न जाणतां तूं ( हा ) नाशवंत आहे असें जरी मानलेंस, तरी अर्जुना, तुला
शोक करणें उचित नाही.
जे
आदि-स्थिति-अंतु । हा निरंतर असे नित्यु ।
जैसा प्रवाहो
अनुस्यूतु । गंगाजळाचा ॥ १५३ ॥
१५३) कारण,
गंगेच्या पाण्याचा प्रवाह जसा अखंड आहे, तसा उत्पत्ति, स्थिति व नाश यांचा क्रम
अखंडच आहे.
तें आदि नाहीं
खंडलें । समुद्रीं तरी असे मिनलें ।
आणि जातचि
मध्यें उरलें । दिसे जैसें ॥ १५४ ॥
१५४) तें (
गंगाजल ) उगमस्थानीं तुटत नाहीं. ( त्याची उत्पत्ति एकसारखी सुरुंच असते ) व
शेवटीं समुद्रांत तर एकसारखें मिळत असतें आणि मध्यंतरीं ज्याप्रमाणें वाहात
राहिलेलें दिसतें;
इयें तिन्ही
तयापरी । सरसींच सदा अवधारीं ।
भूतांसि कवणीं
अवसरीं । टाकती ना ॥ १५५ ॥
१५५)
त्याप्रमाणें उत्पत्ति, स्थिति व लय, ही तिन्हीं नेहमी बरोबर असतात, असें समज. ही
कोणत्याहि वेळीं प्राण्यांना थांबविता येत नाहीत.
म्हणोनि हें
आघवें । एथ तुज नलगे शोचावें ।
जे स्थितीची
हे स्वभावें । अनादि ऐसी ॥ १५६ ॥
१५६) म्हणून या
सगळ्यांचा शोक करण्याचें येथें तुला कारण नाहीं; कारण मुळापासून स्वभावतः अशी ही
व्यवस्था चालत आलेली आहे.
ना तरी हें
अर्जुना । नयेचि तुझिया मना ।
जे देखोनि
लोकु अधीना । जन्मक्षया ॥ १५७ ॥
१५७) अथवा
अर्जुना, हा जीवलोक जन्ममृत्युच्या आधीन आहे, असे पाहून जरी हें ( वरील म्हणणें )
तुझ्या मनात येत नसेल,
तरी येथ
कांहीं । तुज शोकासी कारण नाहीं ।
जे जन्ममृत्यु
हे पाहीं । अपरिहर ॥ १५८ ॥
१५८) तरीपण
त्यांत तुला शोक करण्याचें कारण नाहीं; ( कारण ) असें पाहा कीं, हे जन्ममृत्यु
टाळतां न येणारे आहेत.
उपजे तें नाशे
। नाशलें पुनरपि दिसे ।
हें
घटिकायंत्र तैसें । परिभ्रमे गा ॥ १५९ ॥
१५९) जें
उत्पन्न होतें तें नाश पावतें व नाश पावलेलें पुन्हां दिसतें. अर्जुना,
रहाटगाडग्यासारखा असा हा क्रम अखंड चालतो;
ना तरी उदो
अस्तु आपैसे । अखंडित होत जात जैसे ।
हे जन्ममरण
तैसे । अनिवार जगीं ॥ १६० ॥
१६०) अथवा, उदय
अस्त हे आपोआप ज्याप्रमाणें निरंतर होत जात असतात, त्याप्रमाणें जन्ममृत्यु हे
जगांत चुकवितां येणारे नाहीत.
महाप्रळयअवसरे
। हें त्रैलोक्यही संहरे ।
म्हणोनि हा
परिहरे । आदि अंतु ॥ १६१ ॥
१६१)
महाप्रलयाच्यावेळीं या त्रैलोक्याचाहि संहार होतो; म्हणून हा उत्पत्तिनाश टळत
नाहीं
तूं जरी हें
ऐसें मानसी । तरी खेदु कां करिसी ।
काय जाणतचि
नेणसी । धनुर्धरा ॥ १६२ ॥
१६२) असें हे
जर तुला पटत असेल, तर मग खेद कां करीत आहेस ? अर्जुना, तूं शहाणा असून
वेड्यासारखें कां करतोस ?
एथ आणीकही एक
पार्था । तुज बहुतीं परीं पाहतां ।
दुःख करावया
सर्वथा । विषो नाहीं ॥ १६३ ॥
१६३) या ठिकाणी
अर्जुना, आणखीहि एका तर्हेनें विचार करतां येईल. पुष्कळ बाजूंनीं पाहिलें तरी
तुला दुःख करण्याचें मुळींच कारण दिसत नाहीं.
जे समस्तें
इयें भूतें । जन्माआदि अमूर्ते ।
मग पातलीं
व्यक्तीतें । जन्मलेया ॥ १६४ ॥
१६४) कारण हे
सर्व जीव जन्माच्या अगोदर निराकार होते, मग जन्मल्यावर त्यांना आकार प्राप्त झाला,
तियें क्षयासि
जेथ जाती । तेथ निभ्रांत आनें नव्हती ।
देखें पूर्व
स्थितीच येती । आपुलिये ॥ १६५ ॥
ते जेथें नाश
होऊन जातात, तेथें निःसंशय वेगळे असत नाहींत. पाहा ते आपल्या मूळच्या ( अव्यक्त )
अवस्थेंत येतात.
येर मध्यें
जें प्रतिभासे । तें निद्रिता स्वप्न जैसें ।
तैसा आकारु हा
मायावशें । सत्स्वरुपीं ॥ १६६ ॥
१६६) आतां
मध्यंतरी जें निराळें ( व्यक्तरुप ) दिसतें, तें निद्रिताच्या स्वप्नाप्रमाणेंच
होय. त्याप्रमाणेंच सत्स्वरुप चैतन्याच्या ठिकाणीं मायेमुळें हा जगदाकार दिसतो;
ना तरी पवनें
स्पर्शिलें नीर । पढियासे तरंगाकार ।
का परापेक्षा
अळंकार- । व्यक्ति कनकीं ॥ १६७ ॥
१६७) अथवा
उदकाला वार्याचा स्पर्श झाल्याबरोबर तें लाटांच्या आकाराचें भासतें, किंवा दुसर्याच्या
इच्छेनें सोन्याला दागिन्याचा आकार येतो;
तैसें सकळ हें
मूर्त । जाण पां मायाकारित ।
जैसें आकाशीं
बिंबत । अभ्रपटळ ॥ १६८ ॥
१६८)
त्याप्रमाणें ही सर्व आकाराला आलेली सृष्टि मायेनें केली आहे, असें समज.
ज्याप्रमाणें आकाशांत मेघांचा पडदा उत्पन्न होतो;
तैसें आदीचि
जें नाहीं । तयालागीं तूं रुद्रसि कायी ।
तूं अवीट तें
पाहीं । चैतन्य एक ॥ १६९ ॥
१६९)
त्याप्रमाणें जें मूळांतच नाहीं, त्याकरितां तूं काय रडत बसला आहेस ! निर्विकार
असें जें चैतन्य त्याच्याकडे तूं लक्ष दे.
जयाची आर्तीचि
भोगित । विषयीं त्यजिले संत ।
जयालागीं
विरक्त । वनवासिये ॥ १७० ॥
१७०) ज्या
चैतन्याच्या प्राप्तीची तळमळ ( संतांच्या ठिकाणीं ) उत्पन्न होतांच, त्या संतांना
विषय सोडून जातात. जे विरक्त आहेत, ते त्या आत्म्याच्या लाभाकरितां वनवास
स्वीकारतात.
दिठी सूनि
जयातें । ब्रह्मचर्यादि व्रतें ।
मुनीश्र्वर
तयातें । आचरताती ॥ १७१ ॥
१७१)
त्याच्यावर नजर ठेवून मोठाले मुनि ब्रह्मचर्यादिक व्रतांचे आणि तपांचें आचरण
करतात.
एक अंतरीं
निश्र्चळ । जें निहाळितां केवळ ।
विसरले सकळ ।
संसारजात ॥ १७२ ॥
१७२) कित्येक
स्थिर अंतःकरणाचे लोक त्याला ( आत्म्याला ) निरखून पाहतांच सर्व संसार विसरुन
जातात.
एकां
गुणानुवादु करितां । उपरति होऊनि चित्ता ।
निरवधि
तल्लीनता । निरंतर ॥ १७३ ॥
१७३) कित्येक
त्याच्या गुणांचें वर्णन करतां करतां चित्तात वैराग्य उत्पन्न होऊन अमर्याद व अखंड
तन्मयता पावतात.
एक ऐकतांचि
निवाले । तें देहभावीं सांडिले ।
एक अनुभवें
पातले । तद्रूपता ॥ १७४ ॥
१७४) कित्येक (
त्याचे स्वरुपवर्णन ) ऐकतांच शांत होतात व त्यांची देहभावना सुटते. कित्येक (
त्याच्या ) अनुभवाने तद्रूपता पावतात.
जैसे सरिता ओघ
समस्त । समुद्रामाजिं मिळत ।
परी माघौते न
समात । परतले नाहीं ॥ १७५ ॥
१७५) सर्व
नद्या समुद्राला मिळतात; पण त्यांत त्यांचा समावेश झाला नाहीं, म्हणून त्या
परतल्या, असे ज्याप्रमाणें केव्हांहि होत नाहीं;
Custom Search
No comments:
Post a Comment