Shri Dnyaneshwari Adhyay 4 Part 5
तेणें न पाहतां विश्र्व देखिलें । न करितां सर्व केलें ।
न भोगितां भोगिलें । भोग्यजात ॥ १०१ ॥
१०१) त्यानें विश्र्व पाहिलें नसतांनाहि तें
पाहिल्याप्रमाणेंच आहे. कांहीं न करतांहि सर्व कांहीं केल्याप्रमाणेंच आहे व भोग्य
वस्तूंचा उपभोग न घेतांहि त्या भोगल्याप्रमाणेंच आहेत.
एकेचि ठायीं बैसला । परि सर्वत्र तोचि गेला ।
हें असो विश्र्व जाहला । आंगेचि तो ॥ १०२ ॥
१०२) एकाच ठिकाणीं तो बसून असला, तरी तो सर्वत्र
गेल्याप्रमाणेंच आहे, फार कशाला ? तो स्वतः विश्र्वरुपच झालेला असतो.
जयां पुरुषाचां ठायीं । कर्माचा तरी खेदु नाहीं ।
परी फळापेक्षा कहीं । संचरेना ॥ १०३ ॥
१०३) ज्या पुरुषाच्या ठिकाणीं कर्माविषयीं तर तिरस्कार
नसतो; पण ज्याच्या चित्तांत फलाची इच्छा चुकून केव्हांहि प्रवेश करीत नाहीं;
आणि हें कर्म मी करीन । अथवा आदरिलें सिद्धी नेईन ।
येणें संकल्पेंही जयाचें मन । विटाळेना ॥ १०४ ॥
१०४) आणि हें कर्म मी करीन, अथवा आरंभिलेलें मी पुरें करीन,
ह्या कल्पनेनेंहि ज्याचें मन विटाळत नाहीं;
ज्ञानाग्नीचेनि मुखें । जेणें जाळिलीं कर्में अशेखें ।
तो ब्रह्मचि मनुष्यवेखें । वोळख तूं ॥ १०५ ॥
१०५) ज्ञानरुपी अग्नीच्या द्वारां ज्यानें सर्व कर्में
जाळून टाकलीं आहेत तो मनुष्याचें रुप घेतलेलें प्रत्यक्ष ब्रह्मच आहे असें तूं
समज.
जो शरीरी उदासु । फळभोगीं निरासु ।
नित्यता उल्हासु । होऊनि असे ॥ १०६ ॥
१०६) तो शरीरविषयीं उदास असतो, फलाच्या उपभोगाविषयीं
निरिच्छ असतो व नेहमी आनंदरुप होऊन राहिलेला असतो.
जो संतोषांचा गाभारां । आत्मबोधाचिया वोगरा ।
पुरे न म्हणेचि धनुर्धरा । आरोगितां ॥ १०७ ॥
१०७) अर्जुना, तो संतोषाच्या गाभार्यांत जेवत असतो.
आत्मबोधाच्या पक्वानाला पुरें असें कधीं म्हणतच नाही.
कैसी आधिकाधिक आवडी । घेत महासुखाची गोडी ।
सांडोनियां आशा कुरोंडी । अहंभावेंसीं ॥ १०८ ॥
१०८) अहंकाराच्या वृत्तीसह आशेचा बली देऊन नित्य वाढणार्या
आवडीनें परमानंदाची रुची तो किती तरी घेत असतो.
म्हणोनि अवसरें जें जें पावे । कीं तेणेंचि तो सुखावे ।
जया आपुलें आणि परावें । दोन्हीं नाहीं ॥ १०९ ॥
१०९) म्हणून वेळेनुसार जें जें मिळेल, त्यांतच तो संतुष्ट
असतो. त्याला आपले व परकें ही दोन्हीं नसतात.
तो दिठी जें पाहे । तें आपणचि होऊनि जाये ।
आइके तें आहे । तोचि जाहला ॥ ११० ॥
११०) तो दृष्टीनें जें पाहातों, तें आपणच होऊन जातो आणि तो
जें ऐकतो तेंच तो झालेला असतो.
चरणीं हन चाले । मुखें जें जें बोले ।
ऐसें चेष्टाजात तेतुलें । आपणचि जो ॥ १११ ॥
१११) पायानें जें चालतो, तोंडानें जें बोलतो, ( तात्पर्य )
याप्रमाणें जेवढे म्हणून व्यापार त्याच्याकडून होतात, तेवढें सर्व तोच अंगानें
झालेला असतो.
हें असो विश्र्व पाहीं । जयासि आपणपेंवांचूनि नाहीं ।
आतां कवण तें कर्म कायी । बाधी तयातें ॥ ११२ ॥
११२) हें असो; पाहा, हें विश्व ज्याला आपल्याहून वेगळें (
दिसत ) नाहीं, आतां त्याला कर्म ते कसलें व तें त्याला बाधा काय करणार ?
हा मत्सरु जेथ उपजे । तेतुलें नुरेचि जया दुजें ।
तो निर्मत्सरु काइ म्हणिजे । बोलवरी ॥ ११३ ॥
११३) हा मत्सर ज्या द्वैतापासून उत्पन्न होतो, तें द्वैत
ज्याच्या ठिकाणीं मुळींच उरलेलें नसतें, तो निर्मत्सर आहे, हें कां शब्दानें बोलून
दाखविलें पाहिजे ?
म्हणोनि सर्वांपरी मुक्तु । तो सकर्मुचि कर्मरहितु ।
सगुण परि गुणातीतु । एथ भ्रांति नाहीं ॥ ११४ ॥
११४) म्हणून तो सर्व प्रकारानें मुक्त आहे; कर्म करित
असतांहि कर्मरहित आहे व गुणयुक्त असूनहि गुणातीत आहे; ह्यांत संशय नाहीं.
तो देहसंगें तरी असे । परी चैतन्यासारिखा दिसे ।
पाहतां परब्रह्माचेनि कसें । चोखाळु भला ॥ ११५ ॥
११५) तो देहधारी तर असतो, पण ( निर्गुण ) चैतन्यासारखा
दिसतो. परब्रह्माच्या कसोटीनें त्यास पाहिलें असतां, तो अगदीं शुद्ध आहे असे आढळून येतें.
ऐसाही परी कौतुकें । जरी कर्में करी यज्ञादिकें ।
तरी तियें लया जाती अशेखें । तयांचांचि ठायीं ॥ ११६ ॥
११६) असें असून देखील कौतुकानें त्यानें जरी यज्ञादिक
कर्में केलीं तरी तीं सर्व त्याच्याच ठिकाणीं लय पावतात.
अकाळींचीं अभ्रें जैशीं । उर्मीवीण आकाशीं ।
हारपती आपैशीं । उदयलीं सांतीं ॥ ११७ ॥
११७) आकाशांत अकालीं आलेले मेघ ज्याप्रमाणें कांहीं जोर न
करतां, आले तसें आपोआप जागच्या जागी विरुन जातात;
तैशीं विधिविधान विहितें । जरी आचरे तो समस्तें ।
तरी तियें ऐक्यभावें ऐक्यातें । पावतीचि गा ॥ ११८ ॥
११८) त्याप्रमाणें वेदांनीं सांगितलेल्या एकूण एक विधानांचें
यथासांग जरी तो अनुष्ठान करतो, तरी त्याच्या ऐक्यभावनेमुळें तीं शेवटीं ऐक्यालाच
मिळतात. ( त्याच्या ठिकाणीं दुजाभाव नसल्यामुळें त्याच्याच ठिकाणीं लय पावतात.
जें हें हवन मी होता । कां इयें यज्ञीं हा भोक्ता ।
ऐसीया बुद्धीसि नाहीं भंगता । म्हणऊनियां ॥ ११९ ॥
११९) कारण, हें यज्ञरुपी कर्म व तें करणारा मी किंवा या
यज्ञामध्यें ( अमुक ) भोक्ता, असा त्याच्या बुद्धीच्या ठिकाणीं भेद नाहीं.
जे इष्टयज्ञ यजावे । ते हविर्मंत्रादि आघवें ।
तो देखतसे अविनाशभावें । आत्मबुद्धि ॥ १२० ॥
१२०) जे जे इष्ट यज्ञ तो करतो, त्यांतील होमद्रव्यें, मंत्र
इत्यादि सर्व तो आत्म्याच्या ठिकाणीं स्थिरबुद्धी असलेला पुरुष, तीं ब्रह्मच आहेत,
अशा बुद्धीने पाहातो.
म्हणऊनि ब्रह्म तेंचि कर्म । ऐसें बोधा आलें जया सम ।
तया कर्तव्य तें नैष्कर्म्य । धनुर्धरा ॥ १२१ ॥
१२१) म्हणून कर्म ब्रह्मच आहे, असें साम्य ज्याच्या
प्रतीतीला आलें, त्यानें कर्तव्यकर्म जरी केलें तरी अर्जुना, तें नैष्कर्म्यच
होय.
आतां अविवेककुमारत्वा मुकले । जयां विरक्तीचें पाणिग्रहण
जाहलें ।
मग उपासन जिहिं आणिलें । योगाग्नीचें ॥ १२२ ॥
१२२) आतां ज्यांचें अविवेकाचें बालपण गेलेलें आहे ( म्हणजे
विवेकरुप तारुण्य ज्यांना प्राप्त झालेलें आहे ), ज्यांनी विरक्तीशीं लग्न लाविलें
आहे आणि मग ज्यांनीं योगरुप अग्नीची उपासना स्वीकारली आहे;
जे यजनशील अहर्निशीं । जिहीं अविद्या हविली मनेंसीं ।
गुरुवाक्यहुताशीं । हवन केलें ॥ १२३ ॥
१२३) जे रात्रंदिवस यज्ञ करण्यात गुंतलेले आहेत, ज्यांनीं
गुरुवाक्यरुपी अग्नीमध्यें मनासह अविद्येची आहुति देऊन हवन केलें आहे,
तिहीं योगाग्निकीं यजिजे । तो दैवयज्ञु म्हणिजे ।
जेणें आत्मसुख कामिजे । पंडुकुमरा ॥ १२४ ॥
१२४) ते योगरुपी अग्नीचें ग्रहण केलेंले अग्नीहोत्री जो
यज्ञ करतात त्यास दैवयज्ञ असेम म्हणतात, अर्जुना, त्यात आत्मसुखाचीच इच्छा असते.
दैवास्तव देहाचें पाळण । ऐसा निश्र्चयो परिपूर्ण ।
जो चिंतीना देहभरण । तो महायोगी जाण दैवयोगें ॥ १२५ ॥
१२५) देहाचें पालन प्रारब्धवशात् होत असतें, असा
ज्याचा पूर्ण निश्र्चय झालेला असतो, तो देहाच्या पोषणाविषयीं मनांत चिंता वाहात नाहीं. तो या दैवयज्ञरुप योगानें महायोगी झालेला आहे, असे समज.
No comments:
Post a Comment