Saturday, November 14, 2020

ShriRamcharitmans Part 59 श्रीरामचरितमानस भाग ५९

 

ShriRamcharitmans Part 59 
Doha 268 to 271 
श्रीरामचरितमानस भाग ५९ 
दोहा २६८ ते २७१ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड

दोहा—सांत बेषु करनी कठिन बरनि न जाइ सरुप ।

धरि मुनितनु जनु बीर रसु आयउ जहँ सब भूप ॥ २६८ ॥

वेष शांत, परंतु कृती मात्र उग्र. त्या सर्व राजांच्या सभेत वीर-रसच जणु शरीर धारण करुन प्रकट झाला होता. ॥ २६८ ॥

देखत भृगुपति बेषु कराला । उठे सकल भय बिकल भुआला ॥

पितु समेत कहि कहि नीज नामा । लगे करन सब दंड प्रनामा ॥

परसुरामांचे ते उग्र रुप पाहून सर्व राजे भयाने व्याकूळ होऊन उठून उभे राहिले आणि आपल्या पित्याचे नाव घेत आपली ओळख देऊन दंडवत करु लागले. ॥ १ ॥

जेहि सुभायँ चितवहिं हितु जानी । सो जानइ जनु आइ खुटानी ॥

जनक बहोरि आइ सिरु नावा । सीय बोलाइ प्रनामु करावा ॥

त्यांनी आपुलकीने सहजपणे कोणाकडे पाहिले तरी त्याला वाटे की आता आपला काळ आला. नंतर जनक राजांनी येऊन ( परशुरामांच्या चरणांवर ) मस्तक ठेवले आणि जानकीला बोलावून प्रणाम करायला लावला. ॥ २ ॥

आसिष दीन्ही सखीं हरषानीं । निज समाज लै गईं सयानीं ॥

बिस्वामित्रु मिले पुनि आई । पद सरोज मेले दोउ भाई ॥

परशुरामांनी सीतेला आशीर्वाद दिला. सख्यांना आनंद झाला आणि ( आता तेथे आणखी थांबणे योग्य न समजून ) त्या चतुर सख्या सीतेला घेऊन आपल्या मंडळींमध्ये गेल्या. नंतर विश्र्वामित्र येऊन भेटले व त्यांनी दोन्ही भावांना परशुरामांच्या चरणी घातले. ॥ ३ ॥

रामु लखनु दसरथ के ढोटा । दीन्ही असीस देखि भल जोटा ॥

रामहि चितइ रहे थकि लोचन । रुप अपार मार मद मोचन ॥

विश्र्वामित्र म्हणाले, ‘ हे राम व लक्ष्मण राजा दशरथांचे पुत्र आहेत. ‘ त्यांची सुंदर जोडी पाहून परशुरामांनी आशीर्वाद दिला. कामदेवाचा अहंकार उतरविणारे श्रीरामांचे अपार लावण्य पाहून त्यांचे नेत्र थक्क झाले. ॥ ४ ॥

दोहा—बहुरि बिलोकि बिदेह सन कहहु काह अति भीर ।

पूँछत जानि अजान जिमि ब्यापेउ कोपु सरीर ॥ २६९ ॥

नंतर सर्व पाहून व जाणूनही काहीच माहीत नसल्यासारखे त्यांनी विचारले, सांगा, ही मोठी गर्दी कसली जमली आहे ? ‘ हे विचारताना ते संतापले होते. ॥ २६९ ॥

समाचार कहि जनक सु नाए । जेहि कारन महीप सब आए ॥

सुनत बचन फिरि अनत निहारे । देखे चापखंड महि डारे ॥

राजा जनकांनी सर्व राजे लोक कशासाठी आले होते, तो वृत्तांत सांगितला. जनकांचे बोलणे ऐकून परशुरामांनी वळून दुसरीकडे पाहिले, तर धनुष्याचे तुकडे जमिनीवर पडलेले दिसले. ॥ १ ॥

अति रिस बोले बचन कठोरा । कहु जड़ जनक धनुष कै तोरा ॥

बेगि देखाउ मूढ़ न त आजू । उलटउँ महि जहँ लहि तव राजू ॥

अत्यंत क्रोधाने व कठोर शब्दात ते म्हणाले, ‘ अरे, मूर्ख जनका, धनुष्य कोणी मोडले ? ते सांग. मला तो तत्काळ दाखव, नाही तर मूर्खा, जितके तुझे राज्य आहे, तितकी पृथ्वी मी उलथून टाकीन, ‘ ॥ २ ॥

अति डरु उतरु देत नृपु नाहीं । कुटिल भूप हरषे मन माहीं ॥

सुर मुनि नाग नगर नर नारी । सोचहिं सकल त्रास उर भारी ॥

राजा घाबरला, त्यामुळे उत्तर देऊ शकला नाही. ते पाहून दुष्ट राजे मनातून खूष झाले. देव, नाग, मुनी, आणि नगरातील स्त्री-पुरुष काळजीत पडले. सर्वांच्या मनात भयंकर भीती होती. ॥ ३ ॥

मन पछिताति सीय महतारी । बिधि अब सँवरी बात बिगारी ॥

भृगुपति कर सुभाउ सुनि सीता । अरध निमेष कलप सम बीता ॥

सीतेची आई मनात पश्र्चात्ताप करु लागली की, ‘ अरेरे, विधात्याने सगळे जुळून आलेले बिघडवून टाकले. ‘ परशुरामांचा स्वभाव ऐकून सीतेला अर्धा क्षणही कल्पासारखा वाटू लागला. ॥ ४ ॥

दोहा—सभय बिलोके लोग सब जानि जानकी भीरु ।

हृदयँ न हरषु बिषादु कछु बोले श्रीरघुबीरु ॥ २७० ॥

तेव्हा श्रीरामचंद्रांनी सर्व लोकांना भयभीत झालेले पाहून व सीतेला घाबरलेली बघून म्हटले, त्यावेळी त्यांच्या मनात हर्ष नव्हता की विषाद नव्हता. ॥ २७० ॥

मासपारायण, नववा विश्राम

नाथ संभुधनु भंजनिहारा । होइहि केउ एक दास तुम्हरा ।

आयसु काह कहिअ किन मोही । सुनि रिसाइ बोले मुनि कोही ॥

‘ हे नाथ, शिवांचे धनुष्य मोडणारा कुणी तुमचा दासच असणार. काय आज्ञा आहे ? मला का नाही विचारत ? हे ऐकून क्रुद्ध मुनी रागारागाने म्हणाले, ॥ १ ॥

सेवकु सो जो करै सेवकाई । अरि करनी करि करिअ लराई ॥

सुनहु राम जेहिं सिवधनु तोरा । सहसबाहु सम सो रिपु मोरा ॥

‘ जो सेवेचे काम करतो, तो सेवक असतो. शत्रूसारखे काम केल्यावर युद्धच केले पाहिजे. हे रामा, ऐक. ज्याने शिवांचे धनुष्य मोडून टाकले, तो सहस्रार्जुनासारखा माझा शत्रू होय. ॥ २ ॥       

सो बिलगाउ बिहाइ समाजा । न त मारे जैहहिं सब राजा ॥

सुनि मुनि बचन लखन मुसुकाने । बोले परसुधरहि अपमाने ॥

ज्याने हे केले आहे त्याने या समाजातून बाजूला व्हावे, नाहीतर सर्व राजे मारले जातील.’ मुनींचे बोलणे ऐकून लक्ष्मणाने स्मित केले आणि परशुरामांचा अपमान करण्यासाठी तो म्हणाला, ॥ ३ ॥

बहु धनुहीं तोरीं लरिकाईं । कबहुँ न असि रिस कीन्हि गोसाईं ॥

एहि धनु पर ममता केहि हेतु । सुनि रिसाइ कह भृगुकुलकेतू ॥

महाराज, लहानपणी आम्ही अशा पुष्कळ धनुकल्या मोडल्या आहेत, परंतु तेव्हा तुम्ही कधी असे रागावला नाही ? या धनुष्याबद्दल तुम्हांला एवढी ममता का वाटते ? हे ऐकून भृगुवंशाला ध्वजास्वरुप असलेले परशुराम तावातावाने बोलू लागले, ॥ ४ ॥

दोहा—रे नृप बालक काल बस बोलत तोहि न सँभार ।

धनुही सम तिपुरारि धनु बिदित सकल संसार ॥ २७१ ॥

‘ अरे राजपुत्रा, कालाला वश झाल्यामुळे तुला बोलण्याचीसुद्धा शुद्ध उरली नाही. सार्‍या जगात प्रसिद्ध असलेले शिवांचे धनुष्य काय धनुकलीप्रमाणे आहे ? ‘ ॥ २७१ ॥

लखन कहा हँसि हमरें जाना । सुनहु देव सब धनुष समाना ॥

का छति लाभु जून धनु तोरें । देखा राम नयन के भोरें ॥

लक्ष्मण हसत म्हणाला, ‘ हे देवा, ऐका. आमच्या लेखी सर्व धनुष्ये एकसारखीच आहेत. जुने धनुष्य मोडले, त्यात हानि-लाभ कसला ? श्रीरामचंद्रांना हे नवीन असल्याचे वाटले होते. ॥ १ ॥

छुअत टूट रघुपतिहु न दोसू । मुनि बिनु काज करिअ कत रोसू ॥

बोले चितइ परसु की ओरा । रे सठ सुनेहि सुभाउ न मोरा ॥

मग स्पर्श करताच हे मोडून गेले. यात श्रीरघुनाथांचा काय दोष ? मुनी तुम्ही विनाकारण का रागावता ? परशुरामांनी आपल्या कुर्‍हाडीकडे पाहात म्हटले,’ अरे दुष्टा, तू माझा स्वभाव ऐकलेला नाहीस ? ॥ २ ॥

बालकु बोलि बधउँ नहिं तोही । केवल मुनि जड़ जानहि मोही ॥

बाल ब्रह्मचारी अति कोही । बिस्व बिदित छत्रियकुल द्रोही ॥

तुला मी बालक समजून मारत नाही. अरे मूर्खा, तू मला फक्त मुनी समजतोस काय ? मी बालब्रह्मचारी आणि अत्यंत क्रोधी आहे. क्षत्रियकुलाचा शत्रू म्हणून मी जगात विख्यात आहे. ॥ ३ ॥

भुजबल भूमि भूप बिनु कीन्ही । बिपुल बार महिदेवन्ह दीन्ही ॥

सहसबाहु भुज छेदनिहारा । परसु बिलोकु महीपकुमारा ॥

आपल्या बाहुबलाने मी पृत्वी राजारहित केली आहे आणि पुष्कळ वेळा ती ब्राह्मणांना दान दिलेली आहे. हे राजकुमारा, सहस्रबाहुच्या भुजा तोडून टाकणारी ही माझी कुर्‍हाड बघ. ॥ ४ ॥




Custom Search

No comments: