Shri Dnyaneshwari Adhyay 4 Part 8
सांगे भुवनत्रयाची काजळी । जे गगनमाजि उधवली ।
तिये प्रळयींचे वाहटुळी । काय अभ्र पुरे ॥ १७६ ॥
१७६) तिन्ही लोकांचीं राख आकाशांत उडवून देणारी जीं
प्रळयकाळची वावटळ, तिच्या पुढें ढग काय टिकणार आहेत ? सांग बरें.
कीं पवनाचेनि कोपें । पाणियेंचि जो पळिपे ।
तो प्रळयानळु दडपे । तृणें काष्ठें काइ ॥ १७७ ॥
१७७) अथवा, वार्याच्या क्षोभानें जो प्रळयकाळचा अग्नि केवळ
पाण्यानेंच पेटतो तो गवत व काष्ठें यांनी दबेल काय ?
म्हणोनि असो हें न घडे । ते विचारितांचि असंगडें ।
पुढती ज्ञानाचेनि पाडें । पवित्र न दिसे ॥ १७८ ॥
१७८) असो; म्हणून असें घडणें अशक्य आहे. यावर विचार केला
तरी हें अशक्य आहे, असें दिसतें. एकंदरीत पाहतां ज्ञानासारखें पवित्र कांहीं
नाहीं.
एथ ज्ञान हें उत्तम होये । आणिकही एक तैसें कें आहे ।
जैसें चैतत्य कां नोहे । दुसरें गा ॥ १७९ ॥
१७९) इहलोकीं ज्ञान हे उत्तम आहे. अरे, ज्याप्रमाणें दुसरें
चैतन्य नाहीं, त्याप्रमाणें ( ज्ञानाइतकें उत्तम ) दुसरें कोठें आहे ?
या महातेजाचेनि कसें । जरी चोखाळु प्रतिबिंब दिसे ।
कां गिंवसिलें गिंवसे । आकाश हें ॥ १८० ॥
१८०) या सूर्याच्या कसोटीला लावून पाहातां, त्याचें
प्रतिबिंब जर तेजस्वी आहे असें आढळेल किंवा आकाशाला कवळूं जाता, जर कवळतां येईल;
नातरी पृथ्वीचेनि पाडें । कांटळि जरी जोडे ।
तरी उपमा ज्ञानीं घडे । पंडुकुमरा ॥ १८१ ॥
१८१) अथवा, योग्यतेने पृथ्वीच्या तोलाचें जर कांहीं मिळेल,
तरच अर्जुना, ज्ञानाला उपमा सांपडेल.
म्हणूनि बहुतीं परीं पाहतां । पुढतपुढतीं निर्धारिता ।
हे ज्ञानाची पवित्रता । ज्ञानींचि आथि ॥ १८२ ॥
१८२) म्हणून अनेक प्रकारांनीं विचार केला असतां व पुनः
पुन्हां निर्णय करुन पाहिलें असतां असें दिसतें कीं, ज्ञानाची पवित्रता ही फक्त
ज्ञानाच्याच ठिकाणी आहे.
जैसी अमृताची चवी निवडिजे । तरी अमृताचिसारिखी म्हणिजे ।
तैसें ज्ञान हें उपमिजे । ज्ञानेंसींचि ॥ १८३ ॥
१८३) अमृताची चव कशासारखी आहे, हे निवडूं जातां ती
अमृतासारखीच आहे, असें ज्याप्रमाणें म्हणावें लागतें, त्याप्रमाणेंच ज्ञानाला
ज्ञानाचीच उपमा देणें भाग आहे.
आतां यावरी जें बोलणें । ते वायांचि वेळु फेडणें ।
तंव सांचचि जी हें पार्थु म्हणे । जें बोलत असां ॥ १८४ ॥
१८४) आतां ( यापेक्षां ज्ञानाच्या महतीविषयीं ) जास्त
बोलणें म्हणजे केवळ वेळ फुकट घालविणें होय. यावर अर्जुन म्हणाला, महाराज, आपण जे
बोलत आहांत तें खरेंच आहे;
परि तेंचि ज्ञान केवीं जाणावें । ऐसें अर्जुनें जंव पुसावें
।
तंव तें मनोगत देवें । जाणितलें ॥ १८५ ॥
१८५) पण तेंच ज्ञान प्राप्त करुन कसें घ्यावें ? असें
अर्जुन विचारणार तोंच तें त्याचें मनोगत देवानें जाणलें.
मग म्हणतसे किरीटी । आतां चित्त देयीं गोठी ।
सांगेन ज्ञानाचिये भेटी । उपाय तुज ॥ १८६ ॥
१८६) मग देव म्हणाले, अर्जुना, ज्ञानाच्या प्राप्तीचा उपाय
मी तुला सांगतों. आतां या गोष्टीकडे नीट चित्त दे.
तरी आत्मसुखाचिया गोडिया । विटे जो कां सकल विषयां ।
जयाचां ठायीं इंद्रियां । मानु नाहीं ॥ १८७ ॥
तर आत्मसुखाची चटक लागल्यामुळें जो सर्व विषयांना विटतो,
ज्याच्या ठिकाणीं इंद्रियांचा बडेजाव नसतो;
जो मनासी चाड न सांगे । जो प्रकृतीचें केलें नेघे ।
जो श्रद्धेचेनि संभोगें । सुखिया जाहला ॥ १८८ ॥
१८८) जो कशाचीहि इच्छा मनांत येऊं देत नाही, जो प्रकृतीकडून
होणारीं कर्में ( त्या कर्मांचे कर्तृत्व
) आपल्याकडे घेत नाहीं, श्रद्धेच्या उपभोगाने जो सुखी झालेला असतो,
तयातेंचि गिंवसित । हें ज्ञान पावे निश्र्चित ।
जयामाजि अचुंबित । शांति असे ॥ १८९ ॥
१८९) ज्या ज्ञानांत निर्भेळ शांतीची वस्ती असते, तें ज्ञान
त्याला शोधीत येऊन निश्चित प्राप्त होतें.
तें ज्ञान हृदयीं प्रतिष्ठे । आणि शांतीचा अंकुर फुटे ।
मग विस्तार बहु प्रकटे । आत्मबोधाचा ॥ १९० ॥
१९०) तें ज्ञान अंतःकरणांत स्थिर होतें आणि मग शांतीचा
अंकुर फुटतो, मग आत्मज्ञानाचा विस्तार पुष्कळच प्रकट होतो.
मग जेउती वास पाहिजे । तेउती शांतीचि देखिजे ।
तेथ अपारा पारु नेणिजे । निर्धारितां ॥ १९१ ॥
१९१) मग जिकडे पाहील, तिकडे त्याला शांतीच दिसते. त्या
अमर्याद शांतीचें पैलतीर कुठें आहे, तें विचार करुनहि समजत नाहीं.
ऐसा हा उत्तरोत्तरु । ज्ञानबीजाचा विस्तारु ।
सांगतां असे अपारु । परि असो आतां ॥ १९२ ॥
१९२) अशा या ज्ञानरुप बीजाचा उत्तरोत्तर होत जाणारा विस्तार
सांगूं लागलों तर तो अपार आहे. पण तें आतां राहूं दे.
ऐकें जया प्राणियांचा ठायीं । इया ज्ञानाची आवडी नाहीं ।
तयाचें जियालें म्हणों काई । वरी मरण चांग ॥ १९३ ॥
१९३) ऐक. ज्या प्राण्याच्या ठिकाणीं या ज्ञानाची आवड नाहीं
त्याच्या जगण्याला काय म्हणावें ? त्यापेक्षां मरण बरें.
शून्य जैसें गृह । कां चैतन्येंवीण देह ।
तैसें जीवित तें संमोह । ज्ञानहीना ॥ १९४ ॥
१९४) जसें ओसाड घर किंवा जसा प्राणरहित देह ( व्यर्थ होय ),
तसे ज्ञानहीनास जीवित हें केवळ शून्यवत आहे.
अथवा ज्ञान कीर आपु नोहे । परी ते चाड एकी जरी वाहे ।
तरी तेथ जिव्हाळा कांहीं आहे । प्राप्तीचा पैं ॥ १९५ ॥
१९५) अथवा, खरोखर ज्ञानाची प्राप्ती झालेली नसली, पण त्याची
नुसती इच्छा जरी मनुष्यानें बाळगली, तरी त्याला ज्ञान प्राप्त होण्याची कांहीतरी
आशा आहे.
वांचूनि ज्ञानाची गोठी कायसी । परि ते आस्थाही न धरी मानसीं
।
तरी तो संशयरुपहुताशीं । पडिला जाण ॥ १९६ ॥
१९६) एर्हवीं ज्ञानाची गोष्ट कशाला ? पण जो त्याच्याबद्दल
आस्थाहि बाळगीत नाहीं, तो संशयरुप अग्नींत पडला, असें समज.
जे अमृतही परि नावडे । ऐसें साविताचि आरोचकु जैं पडे ।
तैं मरण आलें असें फुडें । जाणों ये कीं ॥ १९७ ॥
१९७) अमृतहि आवडत नाहीं, अशी अरुची ज्यावेळेस स्वभावतःच
येते, त्यावेळेस मरण ओढवलें आहे असें निश्र्चित समजावें.
तैसा विषयसुखें
रंजे । जो ज्ञानेंसींचि माजे ।
तो संशयें अंगीकारिजे । एथ भ्रांति नाहीं ॥ १९८ ॥
१९८) त्याप्रमाणें जो विषयसुखानें रंगून जातो व
ज्ञानाविषयीं जो बेपर्वा असतो, तो संशयानें घेरला जाईल, यांत संशय नाहीं.
मग संशयीं जरी पडला । तरी निभ्रांत जाणें नासला ।
तो ऐहिकपरत्रा मुकला । सुखासि गा ॥ १९९ ॥
१९९) अशा रीतीनें जो संशयांत पडला, त्याचा निःसंशय घात झाला
असें समज. तो इहलोकांतील सुखाला आचवला.
जया काळज्वरु आंगीं बाणे । तो शीतोष्णें जैशीं नेणे ।
आगी आणि चांदिणें । सरिसेंचि मानी ॥ २०० ॥
२००) ज्याला विषयज्वर झालेला असतो, त्याला जसें
शीत-उष्ण कांहीं कळत नाहीं; तो अग्नि आणि चांदणें ही
दोन्हीं सारखींच मानतो;
No comments:
Post a Comment