Shri Dnyaneshwari Adhyay 4 Part 9
तैसें साच आणि लटिकें । विरुद्ध आणि निकें ।
संशयीं तो नोळखे । हिताहित ॥ २०१ ॥
२०१) त्याप्रमाणें खरें आणि खोटें, प्रतिकूल आणि अनुकूल,
हित व अहित हीं संशयग्रस्त मनुष्याला ओळखतां येत नाहींत.
हा रात्रिदिवसु पाहीं । जैसा जात्यंधा ठाऊबा नाहीं ।
तैसें संशयीं असतां कांहीं । मना नये ॥ २०२ ॥
२०२) पाहा, ही रात्र आणि हा दिवस असें जन्मांधाला
ज्याप्रमाणें ठाऊक नसतें, त्याप्रमाणें जोंपर्यंत ( मनुष्य ) संशयग्रस्त आहे,
तोपर्यंत त्याच्या मनाला काही पटत नाहीं.
म्हणऊनि संशयाहूनि थोर । आणिक नाहीं पाप घोर ।
हा विनाशाची वागुर । प्राणियासी ॥ २०३ ॥
२०२) म्हणून संशयापेक्षां मोठें असे दुसरे थोर पातक कोणतेंच
नाहीं. हा संशय प्राण्याला विनाशाचें एक जाळेंच आहे.
येणें कारणें तुवां त्यजावा । आधीं हाची एकु जिणावा ।
जो ज्ञानाचिया अभावा--। माजी असे ॥ २०४ ॥
२०४) एवढ्याकरितां तूं याचा त्याग करावा; जेथें ज्ञानाचा
अभाव असतो, तेथेंच जो असतो, त्या ह्या एकट्याला पहिल्यानें जिंकावें.
जैं अज्ञानाचें गडद पडे । तैं हा बहुवस मनीं वाढे ।
म्हणोनि सर्वथा मागु मोडे । विश्र्वासाचा ॥ २०५ ॥
२०५) जेव्हां अज्ञानाचा गाढ अंधार पडतो, तेव्हां हा मनांत
फार वाढतो. म्हणून श्रद्धेचा मार्ग अगदीच बंद पडतो.
हृदयीं हाचि न समाये । बुद्धीतें गिंवसूनि ठाये ।
तेथ संशयात्मक होये । लोकत्रय ॥ २०६ ॥
२०६) हा फक्त हृदयालाच व्यापून राहतो असें नाहीं; तर
बुद्धीलाहि व्यापून टाकतो. त्या वेळीं तिन्ही लोक संशयरुप होऊन जातात.
ऐसा जरी थोरावे । तरी उपायें एकें आंगवे ।
जरी हातीं होय बरवें । ज्ञानखङ्ग ॥ २०७ ॥
२०७) एवढा जरी तो वाढला, तरी एका उपायानें तो जिंकता येतो.
चांगलें ज्ञानरुप खङ्ग जर हातीं असेल,
तरी तेणें ज्ञानशस्त्रें तिखटें । निखळु हा निवटे ।
मग निःशेष खता फिटे । मानसींचा ॥ २०८ ॥
२०८) तर त्या ज्ञानरुपी तीक्ष्ण शस्त्रानें हा संपूर्ण नाश पावतो.
मग मनावरील सर्व मळ निःशेष नाहींसा होतो.
याकारणें पार्था । उठी वेगीं वरौता ।
नाशु करोनि हृदयस्था । संशयासी ॥ २०९ ॥
२०९) एवढ्याकरितां अर्जुना, अंतःकरणांत असलेल्या सर्व
संशयांचा नाश करुन लौकर ऊठ पाहूं.
ऐसें सर्वज्ञानाचा बापु । जो कृष्ण ज्ञानदीपु ।
तो म्हणतसे सकृपु । ऐकें राया ॥ २१० ॥
२१०) ( संजय म्हणाला, ) राजा धृतराष्ट्रा, ऐक. सर्व
ज्ञानाचा जनक व ज्ञानाचा केवळ दीपच, असा जो श्रीकृष्ण तो मोठ्या कृपाळूपणानें (
याप्रमाणें ) अरजुनास म्हणाला.
तंव या पूर्वापर बोलाचा । विचारुनि कुमरु पंडूचा ।
कैसा प्रश्नु हन अवसरींचा । करिता होईल ॥ २११ ॥
२११) पुढें या मागच्यापुढच्या बोलण्याचा विचार करुन अर्जुन
कसा समयोचित प्रश्न विचारील.
ते कथेची संगति । भावाची संपत्ति ।
रसाची उन्नति । म्हणिपेल पुढां ॥ २१२ ॥
२१२) ती संगतवार कथा, ती अर्थाची खाण, तो रसांचा उत्कर्ष,
पुढें सांगण्यात येईल.
जयाचिया बरवेपणीं । कीजे आठां रसांची ओवाळणी ।
सज्जनाचिये आयणी । विसांवा जगीं ॥ २१३ ॥
२१३) ज्याच्या चांगलेंपणावरुन बाकीचे आठहि रस ओवाळून टाकले,
जो या जगांत सज्जनांच्या बुद्धीचें विश्रांतिस्थान आहे;
तो शांतुचि अभिनवेल । ते परियसा मर्हाठे बोल ।
जे समुद्राहूनि खोल । अर्थभरित ॥ २१४ ॥
२१४) तो शांतरसच ज्यांत अपूर्वतेनें प्रकटेल, जे अर्थपूर्ण
व समुद्रापेक्षां गंभीर आहेत, ते मराठी बोल ऐका.
जैसें बिंब तरी बचकें एवढें । परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडें
।
शब्दाची व्याप्ति तेणें पाडें । अनुभवावी ॥ २१५ ॥
२१५) सूर्यबिंब जरी बचके एवढे दिसतें, तरी त्याच्या
प्रकाशाला त्रिभुवन अपुरें पडतें; त्याचप्रमाणें या शब्दांची व्याप्ति आहे, असे
अनुभवास येईल.
ना तरी कामितयाचिया इच्छा । फळे कल्पवृक्षु जैसा ।
बोलु व्यापकु होय तैसा । तरी अवधान द्यावें ॥ २१६ ॥
२१६) अथवा इच्छा करणार्याच्या संकल्पाप्रमाणें कल्पवृक्ष
फळ देतो, त्याप्रमाणें हे बोल व्यापक आहेत, म्हणून नीट लक्ष द्यावें.
हें असो काय म्हणावें । सर्वज्ञु जाणती स्वभावें ।
तरी निकें चित्त द्यावें । हें विनंति माझी ॥ २१७ ॥
२१७) पण हें राहूं द्या. जास्त काय सांगावें ? जे सर्वज्ञ
आहेत, त्यांना आपोआप समजतेंच आहे. तरी नीट लक्ष द्यावें, हीच माझी विनंति
आहे.
जेथ साहित्य आणि शांति । हे रेखा दिसे बोलती ।
जैसी लावण्यगुणकुळवती । आणि पतिव्रता ॥ २१८ ॥
२१८) ज्याप्रमाणें ( एखादी स्त्री ) रुप, गुण आणि कुल
यांनीं युक्त आणि पतिव्रता असावी, त्याप्रमाणें या बोलण्याच्या पद्धतीत शांतरसाला
अलंकाराची जोड दिलेली दिसेल.
आधींचि साखर आवडे । आणि तेचि जरी ओखदीं जोडे ।
तरी सेवावी ना कां कोडें । नावानावा ॥ २१९ ॥
२१९) आधींच साखर प्रिय, आणि त्यांत तीच जर औषध म्हणून
मिळाली, तर मग आनंदानें तिचें वारंवार सेवन का न करावें ?
सहजें मलयानिलु मंद सुगंधु । तया अमृताचा होय स्वादु ।
आणि तेथेंचि जोडे नादु । जरी दैवगत्या ॥ २२० ॥
२२०) मलय पर्वतावरील वारा स्वभावतःच मंद सुगंधी असतो,
त्यांतच जर त्याला अमृताची गोडी प्राप्त होईल आणि दैवयोगानें त्याच्या ठिकाणींच
सुस्वर उत्पन्न होईल;
तरी स्पर्शें सर्वांग निववी । स्वादें जिव्हेतें नाचवी ।
तेवींचि कानाकरवीं । म्हणवी बापु माझा ॥ २२१ ॥
२२१) तर तो आपल्या स्पर्शाने सर्व शरीर शांत करील,
आपल्या गोडीने जीभेला नाचविल,त्याप्रमाणे कानांकडून
वाहवा म्हणविल.
तैसें कथेचें इये ऐकणें । एक श्रवणासि होय पारणें ।
आणि संसारदुःख मूळवणें । विकृतीविणें ॥ २२२ ॥
२२२) तसेच या कथेच्या श्रवणाने होणार आहे. एकतर कानाचें
पारणें फिटेल आणि दुसरें अनायासें संसारदुःखाचें समूळ उच्चाटन होईल.
जरी मंत्रेचि वैरी मरे । तरी वायांचि कां बांधावीं कटारें ।
रोग जाय दुधें साखरे । तरी निंब कां पियावा ॥ २२३ ॥
२२३) जर मंत्रप्रयोगानेच शत्रूस ठार करतां येईल, तर कमरेस
कट्यार व्यर्थ कां बांधून ठेवावी ? जर दुधाने व साखरेनेंच रोग नाहींसा होईल तर
कडूनिंबाचा रस पिण्याचे काय कारण ?
तैसा मनाचा मारु न करितां । आणि इंद्रियां दुःख न देतां ।
एथ मोक्षु असे आयता । श्रवणादिमाजी ॥ २२४ ॥
२२४) त्याप्रमाणे मनाला न मारतां, इंद्रियांना दुःख न
देतां, येथें ( नुसत्या ) ऐकण्यानेंच घरबसल्या मोक्ष मिळणार आहे.
म्हणोनि आथिलिया आराणुका । गीतार्थु हा निका ।
ज्ञानदेवो म्हणे आइका । निवृत्तिदासु ॥ २२५ ॥
२२५) म्हणून प्रसन्न मनानें हा गीतार्थ चांगला ऐका, असे
निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्र्वर म्हणतात.
इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानसंन्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः ॥ श्र्लोक
४२; ओव्या २२५ )
॥ ॐश्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ॥
No comments:
Post a Comment