Friday, April 2, 2021

AyodhyaKanda Part 16 अयोध्याकाण्ड भाग १६

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 16 
Doha 89 to 94 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग १६ 
दोहा ८९ ते ९४

दोहा—सिय सुमंत्र भ्राता सहित कंद मूल फल खाइ ।

सयन कीन्ह रघुबंसमनि पाय पलोटत भाइ ॥ ८९ ॥

सीता, सुमंत, लक्ष्मण यांच्यासह श्रीरामांनी कंद-मुळांचा आहार घेऊन रघुकुलमणी श्रीरामचंद्र पहुडले. लक्ष्मण त्यांचे पाय चेपू लागला. ॥ ८९ ॥

उठे लखनु प्रभु सोवत जानी । कहि सचिवहि सोवन मृदु बानी ॥

कछुक दूरि सजि बान सरासन । जागन लगे बैठि बीरासन ॥

नंतर प्रभू श्रीराम झोपले आहेत, असे पाहून लक्ष्मण उठला आणि कोमल वाणीने सुमंत्रास झोपण्यास सांगून तेथून काही अंतरावर धनुष्य-बाण सज्ज करुन वीरासनात बसून पहारा देऊ लागला. ॥ १ ॥

गुहँ बोलाइ पाहरु प्रतीती । ठावँ ठावँ राखे अति प्रीती ॥

आपु लखन पहिं बैठेउ जाई । कटि भाथी सर चाप चढ़ाई ॥

गुहाने आपल्या विश्र्वासू पहारेकर्‍यांना बोलावून ठिकठिकाणी तैनात केले आणि आपण स्वतः भाता बांधून आणि धनुष्याला बाण लावून लक्ष्मणाजवळ जाऊन बसला. ॥ २ ॥

सोवत प्रभुहि निहारि निषादू । भयउ प्रेम बस हृदयँ बिषादू ॥

तनु पुलकित जलु लोचन बहई । बचन सप्रेम लखन सन कहई

प्रभू जमिनीवर झोपले आहेत, हे पाहून प्रेमामुळे निषादराजाला वाईट वाटले. त्याचे शरीर पुलकित झाले आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तो प्रेमाने लक्ष्मणाशी बोलू लागला. ॥ ३ ॥

भूपति भवन सुभायँ सुहावा । सुरपति सदनु न पटतर पावा ॥

मनिमय रचित चारु चौबारे । जनु रतिपति निज हाथ सँवारे ॥

‘ महाराज दशरथांचा महाल खरोखर सुंदर आहे. इंद्राचे भवनही त्याच्याबरोबरीचे नाही. तेथील सुंदर रत्नांनी बनविलेले वरचे मजले जणू कामदेवाने स्वतः आपल्या हातांनी सजविले आहेत. ॥ ४ ॥

दोहा—सुचि सुबिचित्र सुभोगमय सुमन सुगंध सुबास ।

पलँग मंजु मनि दीप जहँ सब बिधि सकल सुपास ॥ ९० ॥

ते पवित्र, मोठे विलक्षण, सुंदर भोग-पदार्थांनी भरलेले आणि फुलांनी सुगंधित आहे. तेथे सुंदर पलंग आणि रत्न दीप आहेत आणि सर्वप्रकारे ते आरामशीर आहेत. ॥ ९० ॥

बिबिध बसन उपधान तुराईं । छीर फेन मृदु बिसद सुहाईं ॥

तहँ सिय रामु सयन निसि करहीं । निज छबि रति मनोज मदु हरहीं ॥

तेथे अंथरण्या-पांघरण्याची वस्त्रे-गाद्या-गिरद्या आहेत. त्या दुधाच्या फेसाप्रमाणे कोमल, निर्मल व सुंदर आहेत. तेथे वरच्या माडीवर श्रीराम व सीता रात्री झोपत असत आणि आपल्या शोभेने रती व कामदेव यांचा गर्व हरण करीत असत. ॥ १ ॥

ते सिय रामु साथरीं सोए । श्रमित बसन बिनु जाहिं न जोए ॥

मातु पिता परिजन पुरबासी । सखा सुसील दास अरु दासी ॥

तेच सीता आणि श्रीराम हे आज थकून गवत-काड्यांच्या पथारीवर अंथरुण-पांघरुन झोपले आहेत. अशा अवस्थेंत त्यांच्याकडे पाहावत नाही. माता-पिता, कुटुंबीय, प्रजा, मित्र चांगल्या स्वभावाचे दास व दासी, ॥ २ ॥

जोगवहिं जिन्हहि प्रान की नाईं । महि सोवत तेइ राम गोसाईं ॥

पिता जनक जग बिदित प्रभाऊ । ससुर सुरेस सखा रघुराऊ ॥

हे सर्वजण ज्यांना प्राणाप्रमाणें जपतात, तेच प्रभू श्रीरामचंद्र आज जमिनीवर झोपले आहेत. जिचे पिता जगप्रसिद्ध जनक राजे आहेत आणि श्वशुर हे इंद्राचे मित्र रघुराज दशरथ आहेत, ॥ ३ ॥

रामचंदु पति सो बैदेही । सोवत महि बिधि बाम न केही ॥

सिय रघुबीर कि कानन जोगू । करम प्रधान सत्य कह लोगू ॥

आणि पती श्रीरामचंद्र आहेत, तीच जानकी आज जमिनीवर झोपलेली आहे. दैव कुणाला प्रतिकूल होत नाही ? सीता व श्रीरामचंद्र हे काय वनात राहण्यास योग्य आहेत ? कर्म हेच मुख्य असते, असे लोक म्हणतात, हेच खरे. ॥ ४ ॥

दोहा—कैकयनंदिनि मंदमति कठिन कुटिलपनु कीन्ह ।

जेहिं रघुनंदन जानकिहि सुख अवसर दुखु दीन्ह ॥ ९१ ॥

कैकयराजाची कन्या, नीच बुद्धीची, कैकेयी हिने दुष्ट कारस्थान केले. त्यामुळे रघुनंदन श्रीराम आणि जानकी यांना सुखाच्या काळात दुःख दिले. ॥ ९१ ॥

भइ दिनकर कुल बिटप कुठारी । कुमति कीन्ह सब बिस्व दुखारी ॥

भयउ बिषादु निषादहि भारी । राम सीय महि सयन निहारी ॥

ती कैकेयी सूर्यकुलरुपी वृक्षासाठी कुर्‍हाड बनली. त्या दुष्ट स्त्रीने संपूर्ण जगाला दुःखी केले. ‘ श्रीराम व जानकी यांना जमिनीवर झोपलेले पाहून निषादराजास फार दुःख वाटले. ॥ १ ॥

बोले लखन मधुर मृदु बानी । ग्यान बिराग भगति रस सानी ॥

काहुन कोउ सुख दुख कर दाता । निज कृत करम भोग सबु भ्राता ॥

तेव्हा लक्ष्मण ज्ञान, वैराग्य आणि भक्तिरसपूर्ण मधुर व मृदु वाणीने म्हणाला, ‘ हे बंधू, कोणी कोणाला सुख-दुःख देणारा नसतो. सर्वजण आपण केलेल्या कर्मांची फळे भोगत असतात. ॥ २ ॥

जोग बियोग भोग भल मंदा । हित अनहित मध्यम भ्रम फंदा ॥

जनमु मरनु जहँ लगि जग जालू । संपति बिपति करमु अरु कालू ॥

संयोग-वियोग, चांगले-वाईट भोग, शत्रू, मित्र व तटस्थ हे सर्व भ्रम आहेत. जन्म-मृत्यू, संपत्ति-विपत्ती, कर्म आणि काल हे सर्व जितके म्हणून जगातील जंजाळ आहेत. ॥ ३ ॥

धरनि धामु धनु पुर परिवारु । सरगु नरकु जहँ लगि ब्यवहारु ॥

देखिअ सुनिअ गुनिअ मन माहीं । मोह मूल परमारथु नाहीं ॥

जमीन, घर, धन, नगर, परिवार, स्वर्ग व नरक इत्यादी जे काही सर्व व्यवहार आहेत, जे पाहण्यात , ऐकण्यात येतात व मनात घोळतात. या सर्वाचे मूळ अज्ञान होय. परमार्थाच्या दृष्टीने हे नाहीतच. ॥ ४ ॥

दोहा—सपनें होइ भिखारि नृपु रंकु नाकपति होइ ।

जागें लाभु न हानि कछु तिमि प्रपंच जियँ जोइ ॥ ९२ ॥

ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये राजा भिकारी झाला किंवा एखादा कंगाल स्वर्गाचा स्वामी इंद्र झाला, तरी जागे झाल्यावर नफा-नुकसान काहीही होत नाही, तसेच या दृश्य प्रपंचाकडे मनाने पाहिले पाहिजे. ॥ ९२ ॥

अस बिवारि नहिं कीजिअ रोसू । काहुहि बादि न देइअ दोसू ॥

मोह निसॉं सबु सोवनिहारा । देखिअ सपन अनेक प्रकारा ॥

असा विचार करुन क्रोध करु नये आणि कोणाला विनाकारण दोष देऊं नये. सर्व लोक मोहरुपी रात्रीमध्ये झोपणारे आहेत आणि झोपेमध्ये त्यांना अनेक प्रकारची स्वप्ने दिसतात. ॥ १ ॥

एहिं जग जामिनि जागहिं जोगी । परमारथी प्रपंच बियोगी ॥

जानिअ तबहिं जीव जग जागा । जब सब बिषय बिलास बिरागा ॥

या जगरुपी रात्रीमध्ये योगी लोक जागतात. ते परमार्थिक असून मायिक जगापासून दूर असतात. जगामध्ये जीव हा जागा आहे, असे तेव्हा समजावे, जेव्हा त्याला संपूर्ण भोग-विलासाबद्दल वैराग्य येते. ॥ २ ॥

होइ बिबेकु मोह भ्रम भागा । तब रघुनाथ चरन अनुरागा ॥

सखा परम परमारथु एहू । मन क्रम बचन राम पद नेहू ॥

विवेक उत्पन्न झाल्यावर मोहरुपी भ्रम नाहीसा होतो. अज्ञान नाहीसे झाल्यावर श्रीरघुनाथांच्या चरणी प्रेम उत्पन्न होते. मित्रा ! कायावाचामनाने श्रीरामांच्या चरणी प्रेम उत्पन्न होणे, हाच सर्वश्रेष्ठ परमार्थ होय. ॥ ३ ॥

राम ब्रह्म परमारथ रुपा । अबिगत अलख अनादि अनूपा ॥

सकल बिकार रहित गतभेदा । कहि नित नेति निरुपहिं बेटा ॥

श्रीराम परमार्थस्वरुप परब्रह्म आहेत. ते जाणता न येणारे, अदृश्य, अनादी, अनूपम, सर्व विकारांनी रहित आणि भेदशून्य आहेत. वेद त्यांचे निरुपण नित्य ‘ नेति ‘ नेति ‘ असे म्हणून करतात. ॥ ४ ॥

दोहा—भगत भूमि भूसुर सुरभि सुर हित लागि कृपाल ।

करत चरित धरि मनुज तनु सुनत मिटहिं जग जाल ॥ ९३ ॥

ते कृपाळू श्रीरामचंद्र हे भक्त, पृथ्वी, ब्राह्मण, गाय आणि देव यांच्या हितासाठी मनुष्यशरीर धारण करुन लीला करतात. त्या लीलांचे श्रवण केल्यामुळे जगातील मायेचे जाळे नाहीसे होते. ॥ ९३ ॥

 मासपारायण, पंधरावा विश्राम

सखा समुझि अस परिहरि मोहू । सिय रघुबीर चरन रत होहू ॥

कहत राम गुन भा भिनुसारा । जागे जग मंगल सुखदारा ॥

हे मित्रा, असे समजून व मोहाचा त्याग करुन श्रीरामांच्या चरणी प्रेम कर. ‘ अशा प्रकारे श्रीरामचंद्रांचे गुण गाता गाता सकाळ झाली. तेव्हा जगाचे मंगल करणारे आणि त्याला सुख देणारे श्रीराम जागे झाले. ॥ १ ॥

सकल सौच करि राम नहावा । सुचि सुजान बट छीर मगावा ॥

अनुज सहित सिर जटा बनाए । देखि सुमंत्र नयन जल छाए ॥

मुखमार्जनादी करुन पवित्र आणि ज्ञानी श्रीरामचंद्रांनी स्नान केले. नंतर वडाचा चीक मागवला आणि लक्ष्मणासह त्या चिकाने डोक्यावर जटा बांधल्या. हे पाहून सुमंत्राचे नेत्र आसवांनी डबडबले. ॥ २ ॥

हृदयँ दाहु अति बदन मलीना । कह कर जोरि बचन अति दीना ॥

नाथ कहेउ अस कोसलनाथा । लै रथु जाहु राम के साथा ॥

त्याच्या हृदयाला यातना झाल्या व मुख उदास झाले. तो हात जोडून अत्यंत दीनपणे म्हणाला, ‘ हे नाथ, मला कोसलनाथांनी आज्ञा दिली होती की, तू रथ घेऊन श्रीरामांबरोबर जा. ॥ ३ ॥

बनि देखाइ सुरसरि अन्हवाई । आनेहु फेरि बेगि दोउ भाई ॥

लखनु रामु सिय आनेहु फेरी । संसय सकल सँकोच निबेरी ॥

वन दाखवून आणि गंगा-स्नान करवून दोघा भावांना त्वरित परत आण. सर्व संशय आणि संकोच दूर करुन लक्ष्मण, राम व सीता यांना वनात फिरवून आण. ॥ ४ ॥

दोहा—नृप अस कहेउ गोसाइँ जस कहइ करौं बलि सोइ ।

करि बिनती पायन्ह परेउ दीन्ह बाल जिमि रोइ ॥ ९४ ॥

महाराज असे म्हणाले होते. आता हे प्रभू ! तुम्ही जसे म्हणाल, तसेच करीन. मी माझा जीव तुमच्यावरुन ओवाळून टाकतो.’ असे म्हणून सुमंत्र श्रीरामांच्या चरणांवर पडून लहान मुलाप्रमाणे ढसाढसा रडला. ॥ ९४ ॥

तात कृपा करि कीजिअ सोई । जातें अवध अनाथ न होई ॥

मंत्रिहि राम उठाइ प्रबोधा । तात धरम मतु तुम्ह सबु सोधा ॥

नंतर म्हणाला, ‘ हे कुमार, ज्यामुळे अयोध्या अनाथ होणार नाही, असे करा. ‘ श्रीरामांनी त्याला उठवून धीर देत समजावले. ते म्हणाले, ‘ हे तात, तुम्ही धर्माचे सर्व सिद्धांत जाणता. ॥ १ ॥

सिबी दधीच हरिचंद नरेसा । सहे धरम हित कोटि कलेसा ॥

रंतिदेव बलि भूप सुजाना । धरमु धरेउ सहि संकट नाना ॥

शिबी, दधीची, हरिश्र्चंद्र यांनी धर्मासाठी अनेक कष्ट सहन केले होते. बुद्धिमान राजा रंतिदेव आणि बली यांनी अनेक संकटे सहन केली, परंतु ते धर्माला चिकटून राहिले. ॥ २ ॥

धरमु न दूसर सत्य समाना । आगम निगम पुरान बखाना ॥

मैं सोइ धरमु सुलभ करि पावा । तजें तिहूँ पुर अपजसु छावा ॥

वेद, शास्त्र आणि पुराणे यामध्ये म्हटले आहे की, सत्यासारखा दुसरा धर्म नाही. मला तो धर्म सहजपणे मिळाला. या सत्यरुपी धर्माचा त्याग केला, तर त्रैलोक्यकात अपकीर्ति पसरेल. ॥ ३ ॥

संभावित कहुँ अपजस लाहू । मरन कोटि सम दारुन दाहू ॥

तुम्ह सन तात बहुत का कहऊँ । दिएँ उतरु फिरि पातकु लहऊँ ॥

प्रतिष्ठित पुरुषाला अपकीर्ती ही कोट्यावधी मृत्युसारखी भीषण यातना देणारी आहे. हे तात, मी तुम्हाला जास्त काय सांगू ? उलट उत्तर देण्यामुळेसुद्धा मी पापाचा भागीदार ठरत आहे. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: