Saturday, April 3, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 7 Part 4 श्रीज्ञानेश्र्वरी,अध्याय ७ भाग ४

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 7 Part 4 
Ovya 91 to 118 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ७ भाग ४ 
ओव्या ९१ ते ११८

जेथ वैराग्याची नाव न रिगे । विवेकाचा तागा न लगे ।

वरि कांहीं तरों ये योगें । तरी विपायें तो ॥ ९१ ॥

९१) ज्या मायानदींत वैराग्याची नाव प्रवेश करुं शकत नाहीं व त्याचप्रमाणें विवेकरुपी वेळूला ठाव लागत नाही; याउपर अष्टांग योगानें कांहीं तरणोपाय होतो; पण तो क्वचित् होतो,.

ऐसें जीवाचिये आंगवणें । इये मायानदीचें उतरणें ।

हे कासयासारिखें बोलणें । म्हणावें पां ॥ ९२ ॥

९२) याप्रमाणें अंगच्या सामर्थ्यानें ही नदी उतरुन जाणें हें म्हणणें कशासारखें आहे म्हणून म्हणावें ?

जरी अपथ्याशीळा व्याधी । कळे साधूसी दुर्जानाची बुद्धि ।

कीं रागी सांडी रिद्धि । आली सांती ॥ ९३ ॥

९३) जर पथ्य न करणाराला रोग घालवितां येईल, किंवा साधूला दुर्जनाची बुद्धि कळेल, अथवा एखादा लोभी पुरुष, त्यास ऐश्र्वर्य प्राप्त झालें असतां, त्याचा त्याग करील;

जरी चोरां सभा दाटे । अथवा मीना गळु घोटे ।

नातरी भेडा उलटे । विवसी जरी ॥ ९४ ॥

९४) चोरांना जर चौकशी करणारे सभासद ( न्यायाधीश ) भीतील अथवा माशाला जर गळ गिळतां येईल, किंवा एखाद्या भित्र्या मनुष्याला पिशाच्चावर हल्ला करतां येईल;

पाडस वागुर करांडी । जरी मुंगी मेरु वोलांडी ।

तरी मायेची पैलथडी । देखती जीव ॥ ९५ ॥

९५) हरिणाच्या पाडसाला जर जाळें कुरतडून तोडतां आलें, मुंगीला जर मेरु पर्वत ओलांडता आला, तरच मायानदीच्या पलीकडचा कांठ जीव पाहूं शकतील. 

म्हणऊन गा पंडुसुता । जैसी सकामा न जिणवेचि वनिता ।

तैसी मायामय हे सरिता । न तरवे जीवां ॥ ९६ ॥

९६) म्हणून हे अर्जुना, ज्याप्रमाणें विषयासक्त पुरुषाला स्त्री जिंकतां येत नाहीं त्याप्रमाणें जीवांना ही मायारुप नदी स्वसामर्थ्यानें तरतां येणार नाहीं.

येथ एकचि लीला तरले । जे सर्वभावें मज भजले ।

तयां ऐलीच थडिये सरलें । मायाजळ ॥ ९७ ॥

९७) या ठिकाणीं जे सर्वभावानें मला भजले, तेच एक, ही मायानदी सहज तरुन गेले; त्यांना मायानदीच्या अलीकडच्या कांठावर तिचें पाणी संपलें,

जयां सद्गुरु तारु पुढें । जे अनुभवाचिये कासे गाढे ।

जया आत्मनिवेदनतरांडें । आकळलें ॥ ९८ ॥

९८) ज्यास सद्गुरु हा पुढें तारणारा ( नावाडी ) आहे, ज्या साधकांनी आत्मानुभवरुपी कासोटा घट्ट बांधला आहे व ज्यांना आत्मनिवेदनरुपी ताफा प्राप्त झाला आहे;

जे अहंभावाचें वोझें सांडुनी । विकल्पाचिया झळका चुकाउनि ।

अनुरागाचा निरु ताउनी । पाणीढाळु ॥ ९९ ॥

९९) जे अहंभावाचें ओझें टाकून, विकल्परुपी वार्‍याच्या झुळुका चुकवून संसारावरील ओहोटीचें पाणी तपासून,

जया ऐक्याचिया उतारा । बोधाचा जोडला तारा ।

मग निवृत्तीचिया पैल तीरा । झेंपावले जे ॥ १०० ॥

१००) व ज्यांना जीव व परमात्मा यांच्या ऐक्यरुपी उतार असलेल्या पाण्यांत ज्ञानरुपी सोपी पायवाट संपवून मग जे ( पलीकडल्या ) निवृत्तिरुपी तीराकडे वळले; 

ते उपरतीचां वांवीं सेलत । सोहंभावाचेनि थावें पेलत ।

मग निघाले अनकळित । निवृत्तितटीं ॥ १०१ ॥

१०१) वैराग्यरुपी हातांनी पाणी तोडीत व मीच परमात्मा आहे, अशा समजुतीच्या बळानें तोल सांभाळीत कसल्याहि अडचणीत न पडतां, निवृत्तिरुपी कांठावर ते बाहेर आले.

येणें उपयें मज भजले । ते हे माझी माया तरले ।

परि ऐसे भक्त विपाइले । बहुवस नाहीं ॥ १०२ ॥

१०२) या उपायानें जे मला भजले, ते ही माझी माया तरुन गेले; परंतु असे भक्त थोडे आहेत, फार नाहींत.

मूळ श्लोक

न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः ।

माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः ॥ १५ ॥

१५) दुष्कर्मी, मूर्ख, अधम असें लोक मायेनें ( त्यांचें ) ज्ञान नष्ट झाल्यामुळे आसुरी मार्गाचा अवलंब करतात, ( आणि ) मला शरण येत नाहींत. 

चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन ।

आर्तो जिज्ञासुरथार्थि ज्ञानी च भरतर्षभ ॥ १६ ॥

१६) हे अर्जुना, चार प्रकारचे पुण्यवान लोक माझी भक्ति करतात. भरतश्रेष्ठा, ( ते चार प्रकार हे ) दुःखानें ग्रस्त झालेला, जाणण्याची इच्छा करणारा आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झालेला.

जे बहुतां एका अवांतरु । अहंकाराचा भूतसंचारु ।

जाहला म्हणोनि विसरु । आत्मबोधाचा ॥ १०३ ॥

१०३) कारण कीं, वरील साधकांशिवाय बहुतेक इतरांना अहंकाररुपी भूतांचा संचार झाल्यामुळे त्यांना आत्मज्ञानाची विस्मृति झालेली असते.

ते वेळीं नियमाचें वस्त्र नाठवे । पुढीले अधोगतीची लाज नेणवे ।

आणि करितातजें न करावें । वेदु म्हणे ॥ १०४ ॥

१०४) त्या वेळीं नियमरुप वस्त्राची आठवण त्यांना राहात नाहीं, पुढें असलेल्या अधोगतीची लाज त्यांना वाटत नाही, व वेद ज्या गोष्टी करुं नये म्हणतो, त्या गोष्टी ते करतात.

पाहें पा शरीराचिया गांवा । जयालागीं आले पांडवा ।

तो कार्यार्थु आघवा । सांडूनियां ॥ १०५ ॥

१०५) अर्जुना,पाहा ! ज्या कार्याकरिता या शरीररुपी गांवाला ते आले, तो कार्यभाग सर्व सोडून देऊन, 

इंद्रियाग्रामींचां राजबिंदीं । अहंममतेचियां जल्पवादीं ।

विकारांतरांची मांदी । मेळविताती ॥ १०६ ॥

१०६) इंद्रयरुपी गांवाच्या राजरस्त्यावर ममत्वाच्या व माझेपणाच्या बडबडीनें, नाना प्रकारच्या विकारांचे समुदाय ते गोळा करतात; 

दुःखशोकांचां घाईं । मारिलियाची सेचि नाहीं ।

हें सांगावया कारण काई । जे ग्रासिले माया ॥ १०७ ॥

१०७) दुःखशोकांच्या घावांनीं कितीहि मारले, तरी त्यांना त्याची आठवण राहात नाहीं, हें सांगावयाचें कारण एवढेंच कीं, असें ते मायेनें ग्रासलेले असतात.  

म्हणोनि ते मातें चुकले । आइकां चतुर्विध मज भजले ।

जिहीं आत्महित केलें । वाढतें गा ॥ १०८ ॥

१०८) म्हणून ते मला चुकले. आतां ऐका; दुसरें, ज्यांनी आपलें आत्महित वाढतें केलें, ते मला चार प्रकारांनीं भजले.  

तो पहिला आर्तु म्हणिजे । दुसरा जिज्ञासु बोलिजे ।

तिजा अर्थार्थी जाणिजे । ज्ञानिया चौथा ॥ १०९ ॥

१०९) त्यांतील जो पहिला त्याला आर्त म्हणावें; दुसर्‍याला जिज्ञासु या नांवानें ओळकावें, आणि तिसरा अर्थार्थि आणि चौथा तो ज्ञानी होय असें समजावें 

मूळ श्लोक

तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते ।

प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थंमहं स च मम प्रियः ॥ १७ ॥

१७) यांमध्यें नित्य व (  माझ्याशीं ) अन्य ( होऊन ) भक्ति करणारा ज्ञानी श्रेष्ठ होय. कारण ज्ञानी मनुष्याला मी अत्यंत प्रिय आहे व तो माझा अत्यंत प्रिय आहे. 

तेथ आर्तु तो आर्तीचेनि व्याजें । जिज्ञासु तो जाणावयाचिलागीं  भजे ।

तिजेनि तेणें इच्छिजे । अर्थसिद्धि ॥ ११० ॥

११०) त्यांत जो आर्त आहे, तो पीडेच्या निमित्तानें भक्ति करतो; व जो जिग़ासु आहे, तो जाणण्याकरितांच भक्ति करतो; आणि त्यांतील जो तिसरा, तो अर्थ प्राप्तीची इच्छा करतो.  

मग चौथियाचां ठायीं । कांहीचि करणें नाहीं ।

म्हणोनि भक्तु एक पाहीं । ज्ञानिया जो ॥ १११ ॥

१११) मग राहिलेल्या चौथ्याच्या ठिकाणीं कांहीं कर्तव्य उरलेलें नसते; म्हणून अर्जुना, जो ज्ञानी आहे, तोच एक भक्त आहे, असे समज.

जे तया ज्ञानाचेनि प्रकाशें । फिटलें भेदाभेदांचें कवडसें ।

मग मीचि जाहला समरसें । आणि भक्तुही तेथींचि ॥ ११२ ॥

११२) कारण कीं, ज्ञानाच्या प्रकाशानें त्याच्या ठिकाणचा द्वैताद्वैतरुपी अंधार नाहींसा होतो; नंतर ब्रह्मैक्यभावानें तो मद्रुप होतो, आणि मद्रुप होऊनसुद्धां तो माझा भक्त असतोच.    

परि आणिकांचिये दिठी नावेक । जैसा स्फटिकुची आभासे उदक ।

तैसा ज्ञानी नव्हे कौतुक । सांगतां तो ॥ ११३ ॥

११३) जसा इतरांच्या दृष्टीला स्फटिकच क्षणभर पाण्यासारखा भासतो, तसा इतरांच्या दृष्टाला ज्ञानी ( हा त्याच्या भजनपूजनादिक बाह्य क्रियांवरुन ) माझ्याहून वेगळा दिसतो, पण ज्ञानी हा तसा ( माझ्याहून वेगळा ) नाहीं, त्याचें वर्णन करण्यास मोठें कौतुक वाटतें. 

जैसा वारा कां गगनीं विरे । मग वारेपण वेगळें नुरे ।

तेवि भक्त हे पैज न सरे । जरी ऐक्या आला ॥ ११४ ॥

११४) ज्याप्रमाणें वारा आकाशांत विराला म्हणजे त्याचे वारेपण वेगळे राहात नाहीं, त्याप्रमाणें ज्ञानी जरी माझ्याशी ऐक्याला पावला तरी त्याची भक्त ही प्रतिज्ञा जात नाहीं. 

जरी पवन हालवूनि पाहिजे । तरी गगनावेगळा देखिजे ।

एर्‍हवीं गगन तो सहजें । असे जैसें ॥ ११५ ॥

११५) जरा वारा हलवून पाहिला, तर तो आकाशाहून भिन्नदेखील दिसतो; एर्‍हवीं तो वारा स्वभावतःच आकाशरुप असतो.

तैसें शरीरें हन कर्में । तो भक्त ऐसा गमे ।

परी अंतरें प्रतीतिधर्में । मीचि जाहला ॥ ११६ ॥

११६) त्याप्रमाणें ज्ञानी पुरुष जेव्हां शारीरिक क्रिया ( भजनपूजनादि ) करतो, त्या वेळी तो भक्त असा वाटतो; पण आतील अनुभवाच्या अंगाने तो मद्रूपच झालेला असतो.

आणि ज्ञानाचेनि उजिडलेपणें । मी आत्मा ऐसें तो जाणे ।

म्हणऊनि मिहि तैसेंचि म्हणें । उचंबळला सांता ॥ ११७ ॥

११७) आणि ज्ञानाचा उदय झाल्यामुळें तो मला आपला आत्मा समजतो, म्हणून मीहि आनंदभरित होऊन, ज्ञानी हा माझा आत्मा आहे, असें म्हणतों.  

हा गां जीवापैलीकडिलिये खुणे । जो पावोनि वावरोंही जाणे ।

तो देहाचेनि वेगळेपणें । काय वेगळा होय ॥ ११८ ॥

११८) अरे, अर्जुना, जीवाच्या पलीकडील खुणेच्या

 ठिकाणी प्राप्त होऊन, जो ( भक्तीचा ) व्यवहार कसा

 करावा हें समजतो, तो देहाच्या वेगळेपणानें खरोखर

 वेगळा होईल काय ?   



Custom Search

No comments: