Saturday, April 3, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 7 Part 2 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ७ भाग २

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 7 Part 2 
Ovya 31 to 59 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ७ भाग २ 
ओव्या ३१ ते ५९

ऐसें होय दिसे न दिसे । हें मजचि माजिवडे असे ।

मियां विश्र्व धरिजे जैसे । सूत्रें मणि ॥ ३१ ॥

३१) त्याप्रमाणें जगाची उत्पत्ति, स्थिति आणि लय हे माझ्यामध्येंच आहेत. ज्याप्रमाणें दोरा मण्यांना धारण करतो त्याप्रमाणें मी जगाला धारण करतो.

सुवर्णाचे मणी केले । ते सोनियांचा सुतीं वोविले ।

तैसें म्यां जग धरिलें । सबाह्याभ्यंतरीं ॥ ३२ ॥

३२) सोन्याचे मणी करुन ते सोन्याच्या सुतांत ओंवावेत, त्याप्रमाणें आंत-बाहेर जग मींच धरलें आहें.

मूळ श्लोक

रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः ।

प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु ॥ ८ ॥

८) हे कौन्तेया, उदकांतील रस मी आहे, चंद्र-सूर्यांमधील प्रभा मी आहें, सर्व वेदांमधील ॐकार, आकाशांतील शब्द, पुरुषांमधील पौरुष मी आहें.

पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्र्चास्मि विभावसौ ।

जीवनं सर्व भूतेषु तपश्र्चास्मि तपस्विषु ॥ ९ ॥

९) पृथ्वीवरील शुद्ध गंध आणि अग्नि मधील तेज मी आहें. प्राणीमात्रांचे जीवन आणि तपस्वांचें तप मी आहें.

म्हणोनि उदकी रसु । कां पवनीं जो स्पर्शु ।

शशिसूर्या जो प्रकाशु । तो मीचि जाण ॥ ३३ ॥ 

३३) म्हणून पाण्यामध्यें रस किंवा वार्‍यामध्यें स्पर्श अथवा चंद्र-सूर्यांमध्यें जें तेज आहे तें मीच आहे, असें समज.   

तैसाचि नैसर्गिकु शुद्धु । मी पृथ्वीचां ठायीं गंधु ।

गगनीं मी शब्दु । वेदी प्रणवु ॥ ३४ ॥

३४) त्याप्रमाणें पृथ्वीच्या ठिकाणी स्वभावतःच असणारा शुद्ध वास मीच आहें. आकाशाच्या ठिकाणीं असणारा शब्द मी आहें व वेदांमधील ॐकार मी आहें.  

नरांचा ठायीं नरत्व । जें अहंभाविजे सत्त्व ।

तें पौरुष मी हें तत्त्व । बोलिजत असे ॥ ३५ ॥

३५) मनुष्याच्या ठिकाणीं अहंपणाचें सारभूत जें पुरुषत्व आहे तो पराक्रम मी आहें, हें तत्त्व मी तुला सांगतों.

अग्नि ऐसें आहाच । तेजा नामचें आहे कवच ।

तें परौतें केलिया साच । निजतेज तें मी ॥ ३६ ॥

३६) तेजाला अग्नि अशा नांवाचें जें वरवर दिसणारे कवच आहे, ते दूर केल्यावर जें स्वयंसिद्ध तेज असतें ते मीं आहें.

आणि नानाविध योनीं । जन्मोनि भूतें त्रिभुवनी ।

वर्तते आहाती जीवनीं । आपुलालां ॥ ३७ ॥

३७) आणि त्रैलोक्यांमध्यें नाना प्रकारच्या योनींत प्राणी उत्पन्न होऊन आपआपला आहार सेवन करुन राहतात.

एकें पवनेचि पिती । एकें तृणास्तव जिती ।

एकें अन्नाधारें राहती । जळें एकें ॥ ३८ ॥

३८) कित्येक वाराच पितात, कित्येक गवतावर जगतात, कित्येक अन्नावर राहातात आणि कित्येक पाण्यावर जगतात.

ऐसें भूतांप्रति आनान । जें प्रकृतिवशें दिसे जीवन ।

तें आघवाठायीं अभिन्न । मीचि एक ॥ ३९ ॥

३९) याप्रमाणे प्राण्यांना ज्याच्या त्याच्या प्रकृतीला अनुसरुन जो आहार दिसतो, त्या सर्व निरनिराळ्या आहारांच्या ठिकाणीं मीच एकअभिन्नत्वानें आहें. 

मूळ श्लोक

बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् ।

बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजतेजस्विनामहम् ॥ १० ॥

१०) हे पार्था, सर्व प्राण्यांचें शाश्वत असे आदि कारण ( तें ) मी आहें असें जाण. बुद्धिमंतांची बुद्धि मी आहे ( व ) तेजस्व्यांचें तेज मी आहे.  

बलं बलवतां चाहं कामरागविवर्जितम् ।

धर्मविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ॥ ११ ॥

११) काम आणि राग  या ( दोहोंनीं ) विरहित असें बलवानांचें बल मी आहे. हे भरतश्रेष्ठा, भूतांच्या ठिकाणीं धर्माला अनुसरुन असलेला जो काम, तो मी आहें.

पैं आदिचेनि अवसरें । विरुद्धे गगनाचेनि अंकुरें ।

जें अंतीं गिळी अक्षरें । प्रणवपटींचीं ॥ ४० ॥

४०) जें ( आत्मतत्त्व ) सृष्टीच्या उत्पत्तिकालीं आकाशाच्या अंकुरानें वाढतें व जें सृष्टीच्या लयाच्या काळी ॐकाररुपी पटावरील अक्षरांचा ग्रास करतें,

जंव हा विश्र्वाकार असे । तंव जें विश्र्वाचिसारखें दिसे ।

मग महाप्रळयदशें । कैसेंही नव्हे ॥ ४१ ॥

४१) जोंपर्यंत हा विश्र्वाकार असतो तोपर्यंत जें विश्र्वासारखें दिसत; मग महाप्रलयकालीं जें कोणत्याच आकाराचें नसतें,

ऐसें अनादि जें सहज । तें मी गा विश्र्वबीज ।

हें हातातळीं तुज । देइजत असे ॥ ४२ ॥

४२) असें जे स्वभावतः अनादि विश्वाचें बीज तें मी आहें, हें मी तुला तळहातांत देतों ( स्पष्ट सांगतो. )

मग उघड करुनि पांडवा । जैं हें आणिसील सांख्याचिया गांवा ।

तैं तयाचा उपेगु बरवा । देखशील ॥ ४३ ॥

४३) नंतर हें चांगलें नीट समजून घेऊन जेव्हां तू हे विचारांच्या गांवाकडे आणशील ( म्हणजे याचा विचार करशील ), तेव्हां याचा उपयोग तुला चांगला दिसून येईल.

परी हे अप्रासंगिक आलाप । आतां असतु न बोलों संक्षेप ।

जाण तपियांचां ठायीं तप । तें स्वरुप माझें ॥ ४४ ॥

४४) परंतु हे विषयाला सोडून बोलणें राहूं दे; तें मी आतां बोलत नाहीं. ( आतां माझ्या विभुतीसंबंधानें ) थोडक्यांत सांगतों. तपस्वी लोकांच्या ठिकाणीं तप ही माझी विभुति आहे, असें समज. 

बळियांमाजीं बळ । तें मी जाणें अढळ ।

बुद्धिमंती केवळ । बुद्धि ते मी ॥ ४५ ॥

४५) बलवान लोकांमध्यें जें अढळ बल आहे ती माझीच विभुति आहे व बुद्धिवानांच्या ठिकाणी जी बुद्धि म्हणून आहे, ती माझीच विभुति आहे. 

भूतांचां ठायीं कामु । तो मी म्हणे आत्मारामु ।

जेणें अर्थास्तव धर्मु । थोरु होय ॥ ४६ ॥

४६) ज्या कामाच्या योगानें धर्माचा उत्कर्ष होतो, असा प्राणीमात्रांच्या ठिकाणीं असणारा जो काम, तो मी आहें, असें आत्माराम ( श्रीकृष्ण ) म्हणाले.

एर्‍हवीं विकाराचेनि पैसें । करी कीर इंद्रियांचेयाचि ऐसें ।

परी धर्मासि वेखासें । जावों नेदी ॥ ४७ ॥

४७) एर्‍हवीं विकारांच्या फैलावानें इंद्रियांसच अनुकूल अशी कर्में ( तो काम ) खरोखर करतो, परंतु ती कर्में धर्मास विरुद्ध जाऊं देत नाहीं.  

जे अप्रवृत्तीचा अव्हांटा । सांडूनि विधीचिया निघे वाटा ।

तेवींचि नियमाचा दिवटा । सवें चाले ॥ ४८ ॥

४८) कारण कीं, ( जो काम ) शास्त्रनिषिद्ध कर्मांची आडवाट सोडून शास्त्रविहित कर्मांच्या राजमार्गानें निघतो व त्याप्रमाणें विधीच्या मार्गानें तो जात असतांना त्याच्याबरोबर नियमरुपी मशालजी चालतो.

कामु ऐशिया वोजा प्रवर्ते । म्हणोनि धर्मासि होय पुरतें ।

मोक्षतीर्थेंचे मुक्तें । संसारु भोगी ॥ ४९ ॥

४९) अशा रीतीनें काम चालतो म्हणून धर्माची पूर्तता होते. मग तो काम संसार भोगतो म्हणजे मोक्षतीर्थांतील जणूं काय मोतीच भोगतो.  

जो श्रुतिगौरवांचा मांडवीं । काम सृष्टीचा वेलु वाढवी ।

जंव कर्मकळेंसीं पालवी । अपवर्गी टेके ॥ ५० ॥

५०) जो काम वेदाच्या मोठेपणाच्या मांडवावर ( कर्म ) सृष्टिरुप वेल, कर्मफलासह त्याची पानें मोक्षाला जाऊन भिडेपर्यंत वाढवितो ( म्हणजे जो वेदांनीं गौरव केलेल्या कर्मांचे आचरण मोक्षप्राप्ति होईपर्यंत करवितो. )   

ऐसा नियतु कां कदर्पु । जो भूतां यां बीजरुपु ।

तो मी म्हणे बापु । योगियांचा ॥ ५१ ॥

५१) असा नियम केलेल्या व प्राणीमात्रांच्या उत्पत्तीस कारण असणारा जो काम, तो मी आहें, असें योग्यांचा श्रेष्ठ पुरुष, श्रीकृष्ण म्हणाले.

हें एकैक किती सांगावें । आतां वस्तुजातचि आघवें ।

मजपासूनि जाणावें । विकरलें असे ॥ ५२ ॥

५२) हें वेगळें वेगळें किती सांगावें ? आतां जेवढे म्हणून पदार्थ आहेत तेवढे सर्व माझ्यापासून आकाराला आलेले आहेत, असें समज.

मूळ श्र्लोक

ये चैव सात्त्विका भावा राजसास्तामसाश्च ये ।

मत्त एवेति तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयि ॥ १२ ॥

१२) आणि सात्त्विक, राजस आणि तामस म्हणून जे पदार्थ आहेत, ते सर्व माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत असें जाण. ते माझ्यामध्यें आहेत, पण मी त्यांच्यामध्यें नाही.

जे सात्त्विक हन भाव । कां रजतमादि सर्व ।

ते ममरुपसंभव । वोळख तूं ॥ ५३ ॥

५३) जें सात्त्विक, राजस किंवा तामस पदार्थ ( आहेत ) ते सर्व माझ्या स्वरुपापासून उत्पन्न झाले आहेत असेम समज.

हें जाले तरी माझां ठायीं । परी ययामाजीं मी नाहीं ।

जैसी स्वप्नींचां डोहीं । जागृति न बुडे ॥ ५४ ॥

५४) हे पदार्थ माझ्या ठिकाणी उत्मन्न झाले परंतु या पदार्थांत मात्र मी नाहीं. ज्याप्रमाणें जागृतीपासून स्वप्न उत्पन्न झाले असलें तरी ) स्वप्नांतील डोहांत जागृति बुडत नाहीं ( म्हणजे स्वप्नांत जागृति नसते ); 

नातरी रसाचीचि सुघट । जैशी बीजकणिका तरी घनवट ।

परी तियेस्तव होय काष्ठ । अंकुरद्वारें ॥ ५५ ॥

५५) अथवा ज्याप्रमाणें भरीव बी गोठलेला रसच असतो. पण त्यापासून अंकुर उत्पन्न होऊन त्याचेच लाकूड बनतें.

मग तया काष्ठांचा ठायीं । सांग पा बीजपण असे काई ।

तैसा मी विकारीं नाहीं । जरी विकारला दिसें ॥ ५६ ॥

५६) मग त्या लाकडाच्या ठिकाणी बीपणा कांहीं आहे कां ? सांग. त्याप्रमाणें मी जरी विकारलेला दिसलों, तरी मी त्या विकारांत नाही.  

पैं गगनीं उपजे आभाळ । परि तेथ गगन नाहीं केवळ ।

अथवा आभाळीं होय सलिल । तेथ अभ्र नाहीं ॥ ५७ ॥

५७) आकाशामध्ये ढग उत्पन्न होतात. परंतु ढगात केवळ आकाश नसते; किंवा ढगांत पाणी असतें, परंतु पाण्यांत ढग नसतात. 

मग तया उदकाचेनि आवेशें । प्रगटलें तेज जें लखलखीत दिसे ।

तिये विजूमाजीं असे । सलिल कायी ॥ ५८ ॥

५८) मग त्या पाण्याच्या जोरानें उत्पन्न झालेलें जें लखलखीत तेज दिसतें त्या वीजेमध्यें पाणी आहे काय ?

सांगें अग्नीस्तव धूम होये । तिये धूमीं काय अग्नी आहे ।

तैसा विकारु हा मी नोहें । जरी विकारला असें ॥ ५९ ॥

५९) सांग अग्नीपासून धूर तयार होतो, त्या धूरांत अग्नि

 आहे काय ? त्याप्रमाणें जरी विकार माझ्यापासून झाले

 तरी मीं विकारी होत नाहीं.    

 


Custom Search

No comments: