Friday, April 30, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 7 Part 6 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ७ भाग ६

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 7 Part 6 
Ovya 151 to 179 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ७ भाग ६ 
ओव्या १५१ ते १७९

मूळ श्लोक

अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः ।

परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ॥ २४ ॥

२४) अविनाशी, अत्यंत उत्तम व श्रेष्ठ असें माझें स्वरुप न जाणणारे, अल्पबुद्धि लोक अव्यक्त असलेल्या मला व्यक्त स्वरुपानें ओळखतात.

 परी तैसें न करिती प्राणिये । वायां आपुलां हीतीं वाणिये ।

पैं पोहताती पाणिये । तळहातींचेनि ॥ १५१ ॥

१५१) पण लोक तसें करीत नाहींत. व्यर्थ आपल्या हिताचा तोटा करतात. तें त्यांचें करणें तळहातांतील पाण्यांत पोहण्याप्रमाणें आहे;

नाना अमृताचां सागरीं बुडिजे । मग तोंडा कां वज्रमिठी पाडिजे ।

आणि मनीं तरी आठविजे । थिल्लरोदकांतें ॥ १५२ ॥‘

किंवा, अमृताच्या समुद्रामध्ये बुडी द्यावी आणि कां मग तोंड घट्ट मिटून धरावें ? आणि मनांत तर डबक्यांतील पाण्याची आठवण कां धरावी ?   

हें ऐसें काइसेया करावें । जें अमृतींही रिगोनि मरावें ।

तें सुखें अमृत होऊनि कां नसावें । अमृतामाजीं ॥ १५३ ॥

१५३) अमृतांत शिरुन तोंडांत अमृत जाऊं न देतां मरावें, असें हें कशाला करावें ? तर अमृतामध्यें सुखानें अमृत ( अमर ) होऊन कां राहूं नये ?  

तैसा फळहेतूचा पांजरा । सांडूनिया धनुर्धरा ।

कां प्रतीतिपाखीं चिदंबरा । गोसाविया नोहावें ॥ १५४ ॥ 

१५४) अर्जुना, त्याप्रमाणें फलाशेचा पिंजरा टाकून, आत्मानुभवरुपी पंखानें चिदाकाशांत हवा तसा संचार करणारा समर्थ कां होऊं नये ? 

जेथ उंचावतेनि पवाडें । सुखाचा पैसारु जोडे ।

आपुलेनि सुरवाडें । उडों ये ऐसा ॥ १५५ ॥

१५५) त्या चिदाकाशांत जितकें आपण उंच जाऊं, तितका आपणाला सुखानें संचार करण्याला हवा तसा विस्तार मिळतो.  

तया उमपा माप कां सुखावें । मज अव्यक्ता व्यक्त कां मानावें ।

सिद्ध असतां कां निमावें । साधनवरी ॥ १५६ ॥

१५६) त्या अमर्याद स्वरुपाला माप कां घालावें ? मला निराकाराला साकार कां समजावें ? मी स्वतःसिद्ध असतां माझ्या प्राप्तीकरितां साधनें करुन कां मरावें ?  

परि हा बोल आघवा । जरी विचारीजतसे पांडवा ।

तरी विशेषें या जीवां । न चोजवे गा ॥ १५७ ॥

१५७) अर्जुना, पण ह्या सर्व बोलण्याचा विचार केला, तर बहुतकरुन ह्या जीवांना ही गोष्ट समजत नाहीं.

मूळ श्लोक

नाहं प्रकाशः सर्वस्य योगमायासमावृत्तः ।

मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् ॥ २५ ॥

२५) सर्वांना माझें ज्ञान नाहीं; कारण योगमायेनें मी आच्छादित झालों आहें; म्हणूनच हें मूढ जग जन्मरहित व नाशरहित अशा मला जाणत नाहीं.  

कां जे योगमायापडळें । हे जाले आहाती आंधळे ।

म्हणोनि प्रकाशेचेनिहि देहबळें । न देखती मातें ॥ १५८ ॥

१५८) कारण कीं, ते योगमायेच्या पडद्यानें आंधळे झाले आहेत, म्हणून ( स्वरुप ) प्रकाशानें भरलेल्या दिवसाच्या बळानेदेखील ते मला पाहात नाहींत.

एर्‍हवीं मी नसें ऐसें । कांहीं वस्तुजात असे ।

पाहें पां कवण जळ रसें-। रहित आहे ॥ १५९ ॥

१५९) सहज विचार करुन पाहिले तर, ज्यामध्यें मी नाहीं, असा कांहीं पदार्थमात्र आहे काय ? असें पाहा कीं, रसाशिवाय पाणी कोठें आहे काय ?

पवन कवणातें न शिवेचि । आकाश कें न समायेचि ।

हें असो एक मीचि । विश्र्वीं असें ॥ १६० ॥

१६०) वारा कोणाला शिवत नाहीं ? आकाश कोठे व्यापीत नाहीं ? हें बोलणें राहूं दे, मीच एक सगळ्या विश्र्वास व्यापून आहें.

मूळ श्लोक

वेदाहंसमतीतानि वर्तमानानि चार्जुन ।

भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन ॥ २६ ॥

२६) हे अर्जुना, मागें झालेल्या, सध्या असलेल्या व होणार्‍या प्राण्यांना मी जाणतों; पण मला कोणी जाणत नाही.

येथें भूतें जियें अतीतलीं । तियें मीचि होऊनि ठेलीं ।

आणि वर्तत आहाति जेतुलीं । तींहि मीचि ॥ १६१ ॥

१६१) ह्या जगांत जितके प्राणी होऊन गेले, ते मीच होऊन राहिले; आणि हल्ली जितके प्राणी हयात आहेत, तेहि मीच आहेत,

भविष्यमाणें जियें ही । तींही मजवेगळीं नाहीं ।

हा बोलचि एर्‍हवीं कांहीं । होय ना जाय ॥ १६२ ॥

१६२) पुढें जे प्राणी होणार आहेत, तेहि माझ्यापासून निराळे नाहींत, हें सर्व फक्त बोलावयाचेंच वास्तविक कांहीं होत नाहीं व जात नाहीं. 

दोराचिया सापासी । डोंबा बडी ना गव्हाळा ऐसी ।

संख्या न करावे कोण्हासी । तेवीं भूतांसि मिथ्यत्वें ॥ १६३ ॥

१६३) दोरीवर भासणारा साप कोणत्या जातीचा आहे, म्हणजे डोंबा ( काळा ) आहे कीं बडी ( कवड्या ) आहे, कां गव्हाळा ( गव्हासारखा ठिपक्यांचा ) आहे, असा कोणताहि निश्र्चय करतां येत नाहीं. त्याप्रमाणें प्राण्यांसंबंधी निश्र्चय करतां येत नाही; कारण प्राणी मिथ्या आहेत.    

ऐसा मी पंडुसुता । अनुस्यूत सदा असतां ।

यां संसार जो भूतां । तो आनें बोलें ॥ १६४ ॥

१६४) अर्जुना, याप्रमाणें मी सदा अखंडित असतांना, या प्राण्यांच्या मागेजन्ममरणरुपी संसार लागला आहे. तो वेगळ्या प्रकारानें.

आतां थोडी ऐसी । गोठी सांगिजेल परियेसीं ।

जैं अहंकारतनूंसी । वालम पडिलें ॥ १६५ ॥

१६५) ( त्यासंबंधीं ) आतां थोडीशी गोष्ट सांगतों, ऐक. जेव्हां अहंकार आणि देह यांचें प्रेम एकमेकांवर जडलें,  

मूळ श्लोक

इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत ।

सर्वभूतानि संमोहं सर्गे यान्ति परंतप ॥ २७ ॥

२७ हे  शत्रुतापना, भारता, इच्छा व द्वेष यांपासून उत्पन्न झालेल्या ( सुखदुःखादि ) द्वंद्वरुपी मोहाच्या योगानें ( या सृष्टीमध्यें ) जन्माला येत्या वेळींच सर्व प्राणी मोह पावतात.  

तै इच्छा हे कुमारी जाली । मग ते कामाचिया तारुण्या आली ।

तेथ द्वेषेंसीं मांडिली । वराडिक ॥ १६६ ॥

१६६) तेव्हां त्यांना इच्छा ही मुलगी झाली; नंतर ती इच्छा कामरुपी तारुण्याला आली; त्या वेळीं तिचें द्वेषाशीं लग्न लावलें.

तया दोघांस्तव जन्मला । ऐसा द्वन्द्वमोह जाला ।

मग तो आजेयानें वाढविला । अहंकारें ॥ १६७ ॥

१६७) त्या दोघांपासून द्वंद्वमोह जन्मला; मग त्याचा आजा जो अहंकार त्यानें त्याला वाढविलें.

जो धृतीसि सदां प्रतिकूळु । नियमाही नागवे सळु ।

आशारसें दोंदिलु । जाला सांता ॥ १६८ ॥

१६८) तो द्वंद्वमोह सात्त्विक धैर्याला नेहमीं प्रतिकूल असतो आणि आशारुपी रसानें पुष्ट झाला असतां, तो छळणारा द्वंद्वमोह जुमानीत नाही.

असंतुष्टीचिया मदिरा । मत्त होवोनी धनुर्धरा ।

विषयांचा वोवरां । विकृतीसी असे ॥ १६९ ॥

१६९) अर्जुना, असंतोषरुप दारुच्या योगानें उन्मत्त होऊन पंचविषयरुपी खोलीमध्यें विकाररुपी स्त्रीसह राहतो. 

तेणें भावशुद्धीचिया वाटे । विखुरले विकल्पाचे कांटे।

मग चिरिले आव्हांटे । अप्रवृत्तीचे ॥ १७० ॥

१७०) त्या द्वन्द्वमोहानें अंतःकरणशुद्धीच्या वाटेवर विकल्परुपी कांटे पसरले आणि नंतर निषिद्ध कर्माचे आडमार्ग खुले केले.

तेणें भूतें भांबावलीं । म्हणोनि संसाराचिया आडवामाजीं पडिलीं ।

मग महादुःखाचां । घेतलीं दांडेवरी ॥ १७१ ॥

१७१) त्यायोगानें प्राणी भांबावले, म्हणून संसाररुपी अरण्यांत पडले; आणि मग मोठमोठाल्या दुःखांच्या दांडक्यानें बडवले गेले.

मूळ श्लोक

येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम् ।

ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रतः ॥ २८ ॥

२८) परंतु ज्या पुण्यकर्म करणार्‍या लोकांच्या पापाचा नाश झालेला असतो, ते ( सुखदुःखादि ) द्वंद्वरुपी मोहानें रहित होऊन निश्र्चयपूर्वक माझी भक्ति करतात. 

ऐसे विकल्पाचे वायांणे । कांटे देखोनि सणाणे ।                          

जे मतिभ्रमाचें पासवणें । घेतीचिना ॥ १७२ ॥

१७२) असे विकल्पांचे पोकळ अणकुचीदार कांटे पाहून जे बुद्धिभ्रंशरुपी माघार घेतच नाहींत ( म्हणजे बुद्धिला भ्रंश पडूं देत नाहीत ),

उजू एकनिष्ठतेचां पाउलीं । रगडूनि विकल्पाचिया भालीं ।

महापातकांची सांडिली । अटवीं जिहीं ॥ १७३ ॥

१७३) ज्यांनी सरळ एकनिष्ठेच्या पावलांनीं विकल्परुपी काट्यांची टोकें चेंगरुन मोठमोठ्या पातकांचें अरण्य ( मागें ) टाकलें आहे,    

मग पुण्याचे धांवा घेतले । आणि माझी जवळीक पातले ।

किंबहुना ते चुकले । वाटबघेयां ॥ १७४ ॥

१७४) नंतर ज्यांनीं पुण्यरुपी धांव घेतली आणि जे माझ्याजवळ प्राप्त झाले; फार काय सांगावें ? असे ते भक्त या ( काम, द्वंद्वमोह वगैरे ) वाटमार्‍यांच्या तडाख्यांतून सुटले.   

मूळ श्लोक

जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ।

ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम् ॥२९ ॥

२९) जे जरा व मरण यांपासून मुक्त होण्याकरितां माझा आश्रय करुन यत्न करतात, ते त्या ब्रह्माला, संपूर्ण अध्यात्माला व संपूर्ण कर्माला जाणतात.

एर्‍हवीं तरी पार्था । जन्ममरणाची निमे कथा ।

ऐसिया प्रयत्नातें आस्था । विये जयांची ॥ १७५ ॥

१७५) अर्जुना, सहज विचार करुन पाहिलें तर, ज्या प्रयत्नानें जन्ममरणाची कथा संपते, अशा प्रयत्नास ज्यांची इच्छा उत्पन्न करते,  

तयां तो प्रयत्नुचि एके वेळे । मग समग्रें परब्रह्में फळे ।

जया पिकलेया रसु गळे । पूर्णतेचा ॥ १७६ ॥

१७६) मग त्यांना तो प्रयत्नच एकदम संपूर्ण परब्रह्मरुप फळानें फलद्रुप होतो.तें परब्रह्मरुपी फळ पिकलें असतां त्यांतून पूर्णतेचा रस गळतो.

ते वेळीं कृतकृत्यता जग भरे । तेथ अध्यात्माचे नवलपण पुरे ।

कर्माचें काम सरे । विरमे मन ॥ १७७ ॥

१७७) त्यावेळीं कृतकृत्यतेनें जग मरुन जातें व ब्रह्माच्या सहजस्थितीची अनोळख फिटते, कर्मांचें प्रयोजन संपतें व मन नाहीसें होतें. 

ऐसा अध्यात्मलाभ तया । होय गा धनंजया ।

भांडवल जया । उद्यमीं मी ॥ १७८ ॥  

१७८) अर्जुना, ज्याच्या व्यापाराला भांडवल मी असतों, त्याला असा अध्यात्माचा लाभ होतो.  

तयातें साम्याचिये वाढी । ऐक्याची सांदे कुळवाडी ।

तेथ भेदाचिया दुबळवाडी । नेणिजे तो ॥ १७९ ॥

१७९) त्याला साम्याच्या वाढीमुळें ऐक्याचा व्यापार

 साधतो. त्या ऐक्याच्या ठिकाणीं तो भेदाचें दारिद्र्य 

जाणतच नाहीं. 



Custom Search

No comments: