Shri Dnyaneshwari
मूळ श्र्लोक
त्रिभुर्गुणमयैर्भावैरेभिः
सर्वमिदं जगत् ।
मोहितं
नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम् ॥ १३ ॥
१३) या
तीन ( सत्त्व, रज व तम ) गुणमय भावांनीं ( त्रिगुणात्मक मायेनें ) मोह पाडलेलें
हें सर्व जग, या गुणांहून वेगळा व विकाररहित अशा मला जाणत नाही.
परी उदकीं
झाली बाबुळी । तें उदकातें जैसी झांकोळी ।
कां वायांचि
आभाळीं । आकाश लोपे ॥ ६० ॥
६०)
परंतु पाण्यांत उत्पन्न झालेलें गोंडाळ ज्याप्रमाणें पाण्याला झाकून टाकतें किंवा
ढगांच्या योगानें आकाश खोटेंच झाकल्यासारखें होतें .
हां गा
स्वप्न हें लटिकें म्हणों ये । वरि निद्रावशें बाणलें होये ।
तंव आठवु काय
देत आहे । आपणपेयां ॥ ६१ ॥
६१) अरे
अर्जुना, स्वप्न हें खोटे आहें असें म्हटलें तरी, आपण निद्रेच्या आधीन झाल्यमुळें
तें जेंव्हां आपल्या अनुभवाला येतें, त्यावेळीं तें आपलीं आपल्याला आठवण होऊं देते
कां ?
हें असो
डोळ्यांचें । डोळांचि पडळ रचे ।
तेणें
देखणेपण डोळ्यांचे । न गिळीजे कायि ॥ ६२ ॥
६२) हेम
वरील दृष्टांत राहूं दे, डोल्यांचें पाणी डोळ्यांत गोठून त्याचा पडदा डोळ्यावर
येतो, तो पडदा डोळ्यांची दृष्टी नाहींशी करित नाहीं का ?
तैसी हे
माझीच बिंबली । त्रिगुणात्मक साउली ।
कीं मजचि आड
वोडवली । जवनिका जैसी ॥ ६३ ॥
६३)
त्याप्रमाणें त्रिगुणात्मक माया ( ही ) माझीच पडलेली छाया आहे. ती जणूं काय
पडद्याप्रमाणें माझ्या आड आली आहे. ( मला तिनें झांकलें आहे )
म्हणऊनि
भूतें मातें नेणती । माझींच परी मी नव्हती ।
जैसीं
जळींचीं जळीं न विरती । मुक्ताफळें ॥ ६४ ॥
६४)
म्हणून प्राणीं मला जाणत नाहींत; ते माझेच आहेत, पण मद्रुप होत नाहींत.
ज्याप्रमाणें मोत्यें ही पाण्याचींच होतात, पण पाण्यांत विरघळत नाहींत.
पैं
पृथ्वीयेचा घटु कीजे । सवेंचि पृथ्वीसि मिळे जरी मेळविजे ।
एर्हवीं
तोचि अग्निसंगे असिजे । तरी वेगळा होय ॥ ६५ ॥
६५) (
जसें ) मातीचें मडकें करावें व ते केल्याबरोबर ( कच्या स्थितींत ) मातीशीं मिळवलें
तर मातींत मिळून जातें, पण तें मडकें भाजलें असतां, ते मातीशी न मिळतां
खापररुपानें वेगळें राहातें;
तैसें
भूतजात सर्व । हे माझेचि कीर अवयव ।
परि
मायायोगें जीव-। दशे आले ॥ ६६ ॥
६६)
त्याचप्रमाणें सर्व प्राणिमात्र हे खरोखर माझेच अवयव आहेत; पण मायेच्या योगानें ते
जीवदशेत आले.
म्हणोनि
माझेचि मी नव्हती । माझेचि मज नोळखती ।
अहंमताभ्रांती
। विषयांध झाले ॥ ६७ ॥
६७)
म्हणून हे प्राणी माझेच असून मीं नाहींत, माझेच असून मला ते ओळखत नाहींत, कारण मी
आणि माझेंपण या भ्रांतीनें ते विषयांध झाले आहेत.
मूळ श्र्लोक
दैवी ह्येषा
गुणमयी मम माया दुरत्यया ।
मामेव ये
प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥ १४ ॥
१४)
कारण कीं, ही माझी त्रिगुणात्मिका दैवी माया तरुन जाण्यास दुस्तर आहे. जे मलाच शरण
येतात, ते ही माया तरुन जातात.
आतां महदादि
हे माझी माया । उतरोनियां धनंजया ।
मी होईजे
हें आया । कैसेनि ये ॥ ६८ ॥
६८)
आतां आर्जुना, महत् तत्त्वादि जी माझी माया, ती पार उतरुन मद्रूप होणें, हे साध्य
कसें होईल ?
जिये
ब्रह्माचळाचां आधाडां । पहिलिया संकल्पजळाचा उमडा ।
सवेंचि
महाभूतांचा बुडबुडा । साना झाला ॥ ६९ ॥
६९) जी
मायानदी ब्रह्मरुपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यांतून मूळ संकल्परुपी उसळीनें
निघाल्याबरोबर तिच्यांत पंचमहाभूतांचा लहान बुडबुड उत्पन्न झाला;
जे
सृष्टिविस्ताराचेनि वोधें । चढत काळकलनेचेनि वेगें ।
प्रवृत्तिनिवृत्तिचीं
तुंगें । तटें सांडी ॥ ७० ॥
७०) जी
सृष्टीच्या विस्ताररुपी ओघानें, कालाच्या ग्रास करणार्या शक्तिरुपाच्या वेगानें
वाढून, प्रवृत्ति व निवृत्ति या दोन्ही उंच काठांबाहेर वाहातें;
जे
गुणधनाचेनि वृष्टिभरें । भरली मोहाचेनि महापूरें ।
घेऊनि जात
नगरें । यमनियमांचीं ॥ ७१ ॥
७१) जी
गुणरुपी मेघांचा जोरदार वर्षाव झाल्यानें, मोहरुपी महापुरानें भरुन यमनियमरुपी
गांवें वाहून नेते;
जेथ
द्वेषाचां आवतीं दाटत । मत्सराचे वळसे पडत ।
माजी
प्रमदादि तळपत । महामीन ॥ ७२ ॥
७२) जी
द्वेषरुपी भोंवर्यानें दाट भरली आहे व मत्सररुपी वळणें जिला पडलीं आहेत व
जिच्यामध्यें तरुण स्त्रिया वगैरे मोठे मासे चमकत आहेत;
जेथ
प्रपंचाचीं वळणें । कर्माकर्मांचीं वोभाणें ।
वरी तरताती
वोसाणें । सुखदुःखांचीं ॥ ७३ ॥
७३)
जिच्यामध्यें प्रपंचरुपी वळणें आहेत व जिला कर्माकर्मरुपी पूर येत आहे आणि
सुखदुःखरुपी पुराड जिच्यावर तरत आहे;
रतीचिया
बेटा । आदळती कामाचिया लाटा ।
जेथ जीवफेन
संघाटा । सैंघ दिसे ॥ ७४ ॥
७४)
रतीच्या बेटावर जिच्या कामरुपी लाटा आदळतात व जेथें जीवरुपी फेसाचा समुदाय एकसारखा
दिसतो,
अहंकाराचिया
चळिया । वरि मदत्रयाचिया उकळिया ।
जेथ
विषयोमींचिया आकळिया । उल्लाळे घेती ॥ ७५ ॥
७५)
जिच्यामध्यें अहंकाराच्या मोठ्या धारा आहेत, त्यावर विद्यादि ( विद्या, धन व कुल
ह्या ) ह्या तीन मदांच्या उकळ्या येतात व ज्या नदीमध्यें विषयरुपी लाटांवर लाटा
उसळतात,
उदोअस्ताचे
लोंढे । पाडीत जन्ममृत्यूचे चोंढे ।
तेथ
पांचभौतिक बुडबुडे । होती जाती ॥ ७६ ॥
७६) ज्या
नदींत उदयअस्तांचे लोंढे जन्ममृत्युरुप खळगे पाडतात व तेथें पंचमहाभूतांपासून
झालेले शरीररुपी बुडबुडे होतात व जातात;
संमोह
विभ्रम भासे । गिळित धैर्याचीं आविसें ।
तेथ देव्हडे
भोंवत वळसे । अज्ञानाचे ॥ ७७ ॥
७७) (
जिच्यांत ) अविवेक व गोंधळ हेच कोणी मासे, ते सात्त्विक धर्मरुपी आमिष गिलतात व
ज्या नदींत अज्ञानाचे भोंवरें चक्रगतीनें फिरतात;
भ्रांतीचेनि
खडुळें । रेवले आस्थेचे अवगाळे ।
रजोगुणाचेनि
खळाळें । स्वर्गु गाजे ॥ ७८ ॥
७८)
जिच्यांत भ्रांतीच्या गढूळपणानें आशारुप गाळांत प्राणी फसले व रजोगुणाच्या
खळबळीनें स्वर्ग गाजूं लागला;
तमाचे धारसे
वाड । सत्त्वाचे स्थिरपण जाड ।
किंबहुना हे
दुवाड । मायानदी ॥ ७९ ॥
७९) अशा
या मायानदीत तमोगुणाची मोठी धार असते. सत्त्व गुणाचा स्थिरपणा गंभीर असतो. फार काय
सांगावें ? ही माया नदी ( तरुन जाण्यास )
फार कठीण आहे.
पैं
पुनरावृत्तीचेनि उभडें । झळंवती सत्यलोकींचे हुडे ।
घायें
गडबडती धोंडे । ब्रह्मगोलकाचे ॥ ८० ॥
८०)
तिच्या पुनर्जन]मरुप लाटांची उसळी सत्यलोकाच्या बुरुजांवर जाऊन आदळते व पुनरावृत्तीच्या
आघातानें ब्रह्मांडाचे धोंडे कोसळून पडतात.
तया
पाणियाचेनि वहिलेपणें । अझुनी न धरिती वोभाणें ।
ऐसा मायापूर
हा कवणें । तरिजेल गा ॥ ८१ ॥
८१) त्या
पाण्याच्या वेगानें वाहत असलेला जोराचा पूर अद्याप थांबत नाहीं, असा हा मायेचा पूर
कोण तरुन जाईल ?
येथ एक
नवलावो । जो जो कीजे तरणोपावो ।
तो तो अपावो
। होय तें ऐक ॥ ८२ ॥
८२) या
मायानदी संबंधानें एकच आश्र्चर्य आहे; तें हें कीं, हिच्यातून तरुन जाण्याला जो जो
म्हणून उपाय करावा तो तो अपायच होतो. तो प्रकार कसा तें ऐक.
एक स्वयंबुद्धीचां
बाहीं । रिगाले तयांची शुद्धीचि नाहीं ।
एक
जाणिवेचां डोहीं । गर्वेंचि गिळिले ॥ ८३ ॥
८३) एक आपल्याच बुद्धिरुपी बाहूनें ही नदी तरुन जाण्याकरितां, या नदींत शिरलें,
तें कोठें गेलें त्याचा पत्ताच नाहीं; दुसरें कितीएक ( मायानदींत ) ज्ञानाच्या
डोहामध्यें अभिमानानें गिळले गेलें.
एकीं
वेदत्रयाचिया सांगडी । घेतलिया अहंभावाची धोंडी ।
ते
मदमीनाचां तोंडीं । सगळेचि गेले ॥ ८४ ॥
८४)
किती एकांनी तीन वेदरुपी सांगडीचा ( मायानदीतून तरण्याकरितां ) आश्रय केला. पण
त्याचबरोबर अभिमानाचे मोठें धोंडे घेतलें. ते मदरुपी माशांच्या तोंडांत सबंध
गेले.
एकी
वयसेंचें जाड बांधलें । मग मन्मथाचिये कासे लागले ।
ते विषयमगरी
सांडिले । चघळुनियां ॥ ८५ ॥
८५)
किती एकांनी तारुण्यरुपी कांसपेटा कमरेस बांधला व मग मदनाच्या कांसेला लागले; ते
विषयरुपी मगरांनीं चघळून टाकले.
आतां
वृद्धाप्याचिया तरंगा- । माजीं मतिभ्रंशाचा जरंगा ।
तेणें
कवळिजताती पैं गा । चहूंकडे ॥ ८६ ॥
८६)
आतां म्हातारपणरुपी लाटेमध्यें असणार्या बुद्धिभ्रंशरुपी जाळ्यानें ते
चोहोंबाजूंनी व्यापले जातात.
आणि शोकांचा
कडां उघडत । क्रोधाचां आवर्ती दाटत ।
आपदागिधीं
चुंबिजत । उधवला ठायीं ॥ ८७ ॥
८७) आणि
शोकरुपी कांठावर आपटून, क्रोधरुपी भोवर्यांत गुरफटुन, ज्या ठिकाणी वर येतात, त्या
ठिकाणी संकटरुपी गिधाडांकडून टोचले जातात.
मग दुःखाचेनि
बरवटें बोंबलें । पाठीं मरणाचिये रेवे रेवले ।
ऐसे कामचिये
कासे लागले । तें गेलें वायां ॥ ८८ ॥
८८)
नंतर ते दुःखरुपी चिखलाने भरले व मरणाच्या गाळांत फसले, याप्रमाणें ज्यांनी कामाचा
आश्रय केला, ते व्यर्थ गेले.
एकीं
यजनक्रियेची पेटी । बांधोनि घातली पोटीं ।
ते
स्वर्गसुखाचा कपाटीं । शिरकोनि ठेले ॥ ८९ ॥
८९)
कितीएकांनी यज्ञक्रियारुपी पेटी मायानदी तरण्याकरितां आपल्या पोटाशी बांधली. ते
स्वर्गसुखाच्या कपारीमध्ये अडकून राहिले.
एकीं
मोक्षीं लागावयाचिया आशा । केला कर्मबाह्यांचा भरंवसा ।
परि ते पडले
वळसां । विधिनिषेधांचां ॥ ९० ॥
९०) किती एकांनी मोक्षरुपी पलीकडल्या किनार्याला
लागावें, या आशेनें कर्मरुपी बाहूंवर विश्र्वास ठेवला; परंतु ते विधिनिषेधांच्या वळणांत सांपडले.
No comments:
Post a Comment