Shri Dnyaneshwari
मूळ श्र्लोक
येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः ।
तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् ॥ २३ ॥
२३) जे श्रद्धेनें युक्त असलेले भक्त (
माझ्याहून ) अन्य देवतांचीं ( अन्य म्हणून ) देखील पूजा करतात, ते देखील, हे
अर्जुना, माझीच पूजा ( पण ) अज्ञानानें करतात.
आतां आणिकहीं संप्रदायें । परी मातें नेणती समवायें ।
जे अग्नि-इंद्र-सूर्य-सोमाये । म्हणऊनि यजिती ॥
३४४ ॥
३४४) आतां सांगितलेल्या संप्रदायांखेरीज इतर
जे संप्रदाय आहेत, ते सर्व समान असणारा जो मी, त्या मला जाणत नाहींत तर ते अग्नये,
इंद्राय, सूर्याय आणि सोमाय असे म्हणत यज्ञ करतात.
तेंही कीर मातेंचि होये । कां जे हें आघवें मीचि
आहें ।
परि ते भजती उजरी नव्हे । विपम पडे ॥ ३४५ ॥
३४५) तें त्यांनीं इंद्रादिकांच्या भावनेनें
केलेलें भजन वास्तविक माझेंच ( भजन ) होत असतें, कारण कीं, ह्या सर्व रुपांनीं मीच
एक आहें, पण तो त्यांचा भजन करण्याचा संप्रदाय सरळ नसून वांकडा ( चुकीचा )
आहे.
पाहें पां शाखा पल्लव वृक्षाचे । हे काय नव्हती
एकाचि बीजाचे ।
परी पाणी घेणें मुळांचे । तें मुळींचि घापे ॥ ३४६
॥
३४६) अर्जुना, पाहा. झाडांच्या फांद्या आणि
पानें ही एकाच बीजापासून नसतात काय ? परंतु पाणी घेणे हें मुळांचें काम असल्यामुळे
पाणी मुळांतच घातलें पाहिजे.
कां दहाही इंद्रियें आहाती । इयें जरी एकेचि
देहींचीं होती ।
आणि इहीं सेविले विषयो जाती । एकाचि ठाया ॥ ३४७ ॥
३४७) किंवा हीं दहा इंद्रियें आहेत आणि हीं
जरी एकाच देहांत आहेत, आणि यांनीं भोगलेलें विषय एकाच ठिकाणीं ( भोक्त्याला ) जाऊन
पोंचतात
तरि करोनि रससोय बरवी । कानीं केविं भरावी ।
फुलें आणोनि बांधावीं । डोळां केविं ॥ ३४८ ॥
३४८) असें जरी आहे, तरी उत्तम पक्वान करुन
कानांत कसें भरावें ? फुलें आणून तीं डोळ्यांकशीं बांधावीं ?
तेथ रसु तो मुखेंचि सेवावा । परिमळु तो घ्राणेंचि
घ्यावा ।
तैसा मी तो यजावा । मीचि म्हणोनि ॥ ३४९ ॥
३४९) त्या ठिकाणी पक्वानें ती तोंडानेंच
खाल्ली पाहिजेत. जो वास नाकानेंच घेतला पाहिजे. त्याप्रमाणें माझें भजन माझ्या
भावनेनेंच करावें.
येर मातें नेणोनि भजन । तें वायांचि गा आनेंआन ।
म्हणोनि कर्माचे डोळे ज्ञान । तें निर्दोष होआवें
॥ ३५० ॥
३५०) अर्जुना, मला न जाणून जें भजन होतें तें
भजन व्यर्थ. भलत्यास भलतें असें होतें, याकरितां माझें भजनकर्म ज्या ज्ञानानें
होतें, त्या ज्ञानाची दृष्टि स्वच्छ असली पाहिजे.
मूळ श्र्लोक
अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च ।
न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च्यवन्ति ते ॥ २४
॥
२४) कारण सर्व यज्ञांचा मीच भोक्ता आणि
स्वामी आहे. पण ते ( लोक ) मला यथार्थ रुपानें जाणत नाहींत. म्हणून घसरतात.
एर्हवीं पाहें पां पंडुसुता । या यज्ञपहारां
समस्तां ।
मीवांचूनि भोक्ता । कवणु आहे ॥ ३५१ ॥
३५१) एर्हवीं अर्जुना, पाहा की, या सर्व
यज्ञांतील सामग्रीचा माझ्यावाचून भोग घेणारा दुसरा कोण आहे ?
मी सकळां यज्ञांचा आदि । आणि यजना या मीचि अवधि ।
कीं मातें चुकोनि दुर्बुद्धि । देवां भजले ॥ ३५२
॥
३५२) सर्व यज्ञांचा आरंभ मी आहे आणि यज्ञांचा
शेवटहि मीच आहें, अशा प्रकारें यज्ञाच्या आरंभी व अंतीं असणारा जो मी, त्या मला
टाकून हे दुर्बुद्धीचे याज्ञिक ( इंद्रादि ) देवांना भजले.
गंगेचे उदक गंगे जैसें । अर्पिजे देवपितरोद्देशे
।
माझें मज देती तैसें । परि आनानी भावीं ॥ ३५३ ॥
३५३) ज्याप्रमाणें गंगेच्या कांठी तर्पण
करावयास बसलें, म्हणजे गंगेतील पाणी घेऊन तें देव आणि पितर यांना उद्देशून गंगेतच
पुन्हां टाकतात; त्याप्रमाणें माझेंच मला देतात; परंतु तें वेगवेगळ्या भावनेनें
देतात,
म्हणऊनि ते पार्था । मातें न पवतीचि सर्वथा ।
मग मनीं वाहिली जे आस्था । तेथ आले ॥ ३५४ ॥
३५४) म्हणून हे अर्जुना, ते कधीहि माझ्या
ठिकाणीं प्राप्त होत नाहींत; तर ते ज्यांची इच्छा मनांत करतात त्या लोकांना जातात.
मूळ श्लोक
यान्ति देवव्रता देवान्
पितृन् यान्ति पितृव्रताः ।
भूतानि यान्ति भूतेज्या
यान्ति मद्याजिनोऽपि माम् ॥ २५ ॥
२५) देवांची भक्ति
करणारे देवत्वाप्रत जातात, पितरांची भक्ति करणारे पितृत्वाप्रत जातात, भूतांचें
पूजन करणारे भूतत्वाप्रत जातात; तसेंच माझें पूजन करणारे मद्रूप होतात.
मनें वाचा करणीं । जयांचीं
भजनें देवांचिया वाहणी ।
ते शरीर जातियेक्षणीं ।
देवाचि जाले । ३५५ ॥
३५५) मनानें, वाचेनें व
सर्व इंद्रियांनी ज्यांचा भजन प्रवाह इंद्रादि देवांच्या मार्गाकडे आहे, त्यांचा
देह पडताक्षणींच त्यांना स्वर्गांत देवशरीर मिळतें.
अथवा पितरांचीं व्रतें ।
वाहती जयांची चित्तें ।
जीवित सरलिया तयांतें ।
पितृत्व वरी ॥ ३५६ ॥
३५६) अथवा
श्राद्धपक्षादि जीं पितरांची व्रतें आहेत, तीं व्रतें जे अंतःकरणपूर्वक पाळतात; ते
मेल्यावर त्यांना पितृलोकांची प्राप्ति होते.
कां क्षुद्रदेवतादि भूतें ।
तियेचि जयांचीं परमदैवतें ।
जिहीं अभिचारिकीं तयांतें ।
उपासिलें ॥ ३५७ ॥
३५७) किंवा भूतखेतादि
क्षूद्र देवता हींच ज्यांची श्रेष्ठ दैवतें आहेत व त्यांची ज्यांनी जारण, मारण
उच्चाटन इत्यादि तामस कर्मांनी उपासना केली आहे,
तयां देहाची जवनिक फिटली ।
आणि भूतत्वाची प्राप्ति जाहली ।
एवं संकल्पवशें फळलीं ।
कर्में तयां ॥ ३५८ ॥
३५८) त्यांचा देहरुपी
पडदा दूर होतो आणि नंतर त्यांना भूतखेतादिंकांची गति मिळते; याप्रमाणें ज्यांनीं अशा
हेतूने कर्में केलीं असतील, ती त्यांची तशीं फलद्रूप होतात.
मग मीचि डोळां देखिला ।
जिहीं कानीं मीचि ऐकिला ।
मनीं मी भाविला । वानिला
वाचा ॥ ३५९ ॥
३५९) मग ज्यांनीं
डोळ्यांनीं मलाच पाहिलें, ज्यांनीं कानांनी माझ्याच गोष्टी ऐकल्या मनामध्ये
ज्यांनी माझी कल्पना केली व वाणीनें माझें वर्णन केलें;
सर्वांगीं सर्वांठायी ।
मीचि नमस्कारिला जिहीं ।
दानपुण्यादिकें जें कांहीं
। तें माझियाचि मोहरा ॥ ३६० ॥
३६०) सर्व अंगांनीं व
सर्व वाणीनें मीच समजून, ज्यांनी नमस्कार केला व ज्यांनी दानपुण्य इत्यादि जें
कांहीं केलें, तें सर्व माझ्याच उद्देशानें केलेलें असतें,
जिहीं मातेंचि अध्ययन केलें
। जे आंतरबाहेरि मियांचि धाले ।
जयांचें जीवित्व जोडलें ।
मजचिलागीं ॥ ३६१ ॥
३६१) ज्यांनी माझें
ज्ञान करुन देणार्या ज्ञानाचा अभ्यास केला, जे आंतबाहेर माझ्याच योगानें तृप्त
झालेले आहेत, ज्यांना माझ्याकरितांच आयुष्य लाभलेलें आहे ( म्हणजे जे आपलें आयुष्य
माझाच लाभ होण्याकरितांच खर्च करतात );
जे अहंकारु वाहत आंगीं ।
आम्ही हरीचे भूषावयालागीं ।
जे लोभिये एकचि जगीं ।
माझेनि लोभें ॥ ३६२ ॥
३६२) आम्ही हरीचे दास
आहोंत, असें भूषण मिरविण्याकरितां जे आपल्या ठिकाणीं अहंकार घेतात, जे जगांत एक
माझ्याच लोभानें लोभी आहेत;
जे माझेनि कामें सकाम । जे
माझेनि प्रेमें सप्रेम ।
जे माझिया भुली सभ्रम ।
नेणती लोक ॥ ३६३ ॥
३६३) जे
माझ्याविषयींच्या कामनेनेंच कामनायुक्त आहेत, जे माझ्याविषयींच्या प्रेमानें
प्रेमयुक्त आहेत व जे माझ्या ठिकाणीं भुलल्यामुळें वेडे झाले आहेत; म्हणून लोकांना
जाणत नाहींत;
जयांचीं जाणती मजचि
शास्त्रें । मी जोडें जयांचेनि मंत्रें ।
ऐसे जे चेष्टामात्रें ।
भजले मज ॥ ३६४ ॥
३६४) ज्यांची शास्त्रें
तर मलाच जाणतात, जें अशा मंत्राचा जप करतात कीं त्यापासून त्यांना माझीच प्राप्ति
होते; अशा प्रकारें ज्यांनीं आपल्या कायिक, वाचिक, मानसिक या सर्व कर्मांनी माझें
भजन केलें,
ते मरणाऐलीचकडे । मज मिळोनि
गेले फुडे ।
मग मरणीं आणिकीकडे । जातील
केविं ॥ ३६५ ॥
३६५) त्यांना मरण
येण्याच्या पूर्वींच त्यांचें माझ्या स्वरुपाशीं निष्चयेंकरुन ऐक्य झालेले असते ते
मग मरणसमयीं इतर गतीस कसें जातील ?
No comments:
Post a Comment