Friday, August 13, 2021

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 36 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग ३६

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 36 
Doha 209 and 214 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग ३६ 
दोहा २०९ आणि २१४

दोहा—जासु सनेह सकोच बस राम प्रगट भए आइ ।

जे हर हिय नयननि कबहुँ निरखे नहीं अघाइ ॥ २०९ ॥

ज्यांच्या प्रेम व सद्गुणांच्या अधीन होऊन प्रत्यक्ष सच्चिदानंदघन भगवान, श्रीराम होऊन प्रकट झाले, ज्या श्रीरामांचे स्वरुप आपल्या हृदयात पाहून श्रीमहादेवही कधी तृप्त होत नाहीत, ॥ २०९ ॥

कीरति बिधु तुम्ह कीन्ह अनूपा । जहँ बस राम पेम मृगरुपा ॥

तात गलानि करहु जियँ जाएँ । डरहु दरिद्रहि पारसु पाएँ ॥

परंतु यांच्याहून अधिक तू कीर्तिरुपी अनुपम चंद्र उत्पन्न केलास, या चंद्रामध्ये श्रीरामांचे प्रेम हरिणाच्या चिह्नाच्या रुपाने राहाते. भरता ! तू विनाकारण मनात दुःखी होत आहेस. जणू परीस मिळूनही तू दारिद्र्याला घाबरत आहेस. ॥ १ ॥

सुनहु भरत हम झूठ न कहहीं । उदासीन तापस बन रहहीं ॥

सब साधन कर सुफल सुहावा । लखन राम सिय दरसनु पावा ॥

हे भरता, ऐक. आम्ही असत्य बोलत नाही. आम्ही निष्पक्ष आहोत, तपस्वी आहोत, कुणाच्या तोंडाकडे पाहून बोलत नाही आणि निरपेक्षपणे वनात राहातो. सर्व साधनांचे उत्तम फल म्हणून आम्हांला लक्ष्मण, श्रीराम व सीता यांचे दर्शन घडले. ॥ २ ॥

तेहि फल कर फलु दरस तुम्हारा । सहित पयाग सुभाग हमारा ॥

भरत धन्य तुम्ह जसु जगु जयऊ । कहि अस पेम मगन मुनि भयऊ ॥

आणि त्या तिघांच्या दर्शनाच्या महान फलाचे परम फल म्हणजे तुझे दर्शन होय. तीर्थराज प्रयागासह हे आमचे मोठे भाग्य. हे भरता, तू धन्य आहेस, तू आपल्या कीर्तीने जग जिंकले आहेस. ‘ असे म्हणून मुनी भरताच्या प्रेमात मग्न झाले. ॥ ३ ॥

सुनि मुनि बचन सभासद हरषे । साधु सराहि सुमन सुर बरषे ॥

धन्य धन्य धुनि गगन पयागा । सुनि सुनि भरतु मगन अनुरागा ॥

भरद्वाज मुनींचे हे बोलणे ऐकून सर्व सभासद आनंदित झाले. ‘ उत्तम, उत्तम ‘ म्हणून व प्रशंसा करीत देवांनी फुले उधळली. आकाशात व प्रयागराजामध्ये ‘ धन्य, धन्य ‘ चा ध्वनी ऐकून भरतही प्रेम-मग्न झाला. ॥ ४ ॥

दोहा—पुलक गात हियँ रामु सिय सजल सरोरुह नैन ।

करि प्रनामु मुनि मंडलिहि बोले गदगद बैन ॥ २१० ॥

भरताचे शरीर रोमांचित झाले. त्याच्या हृदयात श्रीसीताराम विराजमान होते आणि कमलासारखे नेत्र प्रेमाश्रूंनी भरुन आले होते. तो मुनिसमुदायाला प्रणाम करुन सद्गदित वाणीने म्हणाला, ॥ २१० ॥

मुनि समाजु अरु तीरथराजू । सॉंचिहुँ सपथ अघाइ अकाजू ॥

एहिं थल जौं किछु कहिअ बनाई । एहि सम अधिक न अघ अधमाई ॥

‘ येथे मुनिगण आहे, शिवाय तीर्थराज आहे. येथे खरी शपथ घेतली, ( आणि ती पाळली नाही, ) तरी मोठी हानी होते. या ठिकाणी जर काही बनवाबनवी करुन सांगितले, तर त्याच्याइतके कोणतेही मोठे पाप आणि नीचपणा असणार नाही. ॥ १ ॥

तुम्ह सर्बग्य कहउँ सतिभाऊ । उर अंतरजामी रघुराऊ ॥

मोहि न मातु करतब कर सोचू । नहिं दुखु जियँ जगु जानिहि पोचू ॥

मी प्रामाणिकपणे सांगतो. तुम्ही सर्वज्ञ आहात आणि श्रीरघुनाथांच्या मनातील जाणणारे आहात. मी खोटे बोललो, तर ते तुम्हांला कळल्याशिवाय राहाणार नाही. माता कैकेयीच्या कृत्याची मला मुळीच चिंता नाही आणि जग मला नीच समजेल, या गोष्टीचेही दुःख नाही. ॥ २ ॥

नाहिन डरु बिगरिहि परलोकू । पितहु मरन कर मोहि न सोकू ॥

सुकृत सुजस भरि भुअन सुहाए । लछिमन राम सरिस सुत पाए ॥

माझा परलोक बिघडेल, याची मला भीती नाही आणि पित्याच्या मरणाचाही शोक नाही. कारण त्यांचे पुण्य व सुकीर्ती विश्वात शोभून राहिली आहे. त्यांना श्रीराम-लक्ष्मण यांच्यासारखे पुत्र लाभले. ॥ ३ ॥

राम बिरहँ तजि तनु छनभंगू । भूप सोच कर कवन प्रसंगू ॥

राम लखन सिय बिनु पग पनहीं । करि मुनि बेष फिरहिं बन बनहीं ॥

शिवाय, ज्यांनी श्रीरामचंद्रांच्या विरहामुळे आपल्या क्षणभंगूर देहाचा त्याग केला, अशा राजांविषयी शोक का करायचा ? खरे म्हणजे श्रीराम, लक्ष्मण व सीता मुनींचा वेष धारण करुन अनवाणी वनात फिरत आहेत, याचे मला दुःख आहे. ॥ ४ ॥

दोहा—अजिन बसन फल असन महि सयन डासि कुस पात ।

बसि तरु तर नित सहत हिम आतप बरषा बात ॥ २११ ॥

ते वल्कले नेसतात, फळे खाऊन राहतात, जमिनीवर कुश व पाने पसरुन त्यावर झोपतात आणि वृक्षांखाली राहून थंडी, उकाडा, वारा, पाऊस सहन करतात. ॥ २११ ॥

एहि दुख दाहँ दहइ दिन छाती । भूख न बासर नीद न राती ॥

एहि कुरोग कर औषधु नाहीं । सोधेउँ सकल बिस्व मन माहीं ॥

या दुःखाच्या झळीने एकसारखे माझे अंतःकरण जळत आहे. मला दिवसा भूक लागत नाही की रात्री झोप येत नाही. मी मनातल्या मनात सर्व जग धुंडाळले, पण या रोगावर कुठेही औषध नाही. ॥ १ ॥

मातु कुमत बढ़ई अघ मूला । तेहिं हमार हित कीन्ह बँसूला ॥

कलि कुकाठ कर कीन्ह कुजंत्रू । गाड़ि अवधि पढ़ि कठिन कुमंत्रू ॥

आईचा कुविचार हा या पापांचा मुळचा सुतार आहे. त्याने आमच्या हिताची तासणी तयार केली. तिने कलहरुपी किडक्या लाकडापासून दुष्ट यंत्र ( जमिनीत पुरायचा खुंटा ) तयार केले आणि चौदा वर्षांचा काळरुपी अघोर कुमंत्र फुंकून ते यंत्र पुरुन ठेवले. ॥ २ ॥

मोहि लगि यहु कुठाटु तेहिं ठाटा । घालेसि सब जगु बारहबाटा ॥

मिटइ कुजोगु राम फिरि आएँ । बसइ अवध नहिं आन उपाएँ ॥

त्याने माझ्यासाठी हा अमंगल थाट सजविला आणि सार्‍या जगाला छिन्न-भिन्न करुन नष्ट केले. हा कुयोग श्रीरामचंद्र परत आल्यावर नष्ट होऊ शकेल. दुसर्‍या कोणत्याही उपायाने नाही. ‘ ॥ ३ ॥

भरत बचन सुनि मुनि सुखु पाई । सबहिं कीन्हि बहु भॉंति बड़ाई ॥

तात करहु जनि सोचु बिसेषी । सब दुखु मिटिहि राम पग देखी ॥

भरताचे बोलणे ऐकून मुनींना आनंद वाटला. सर्वांनी भरताचा अनेक प्रकारे गौरव केला. मुनी म्हणाले, ‘ भरता जास्त चिंता करु नकोस. श्रीरामचंद्राच्या चरणांचे दर्शन होताच सर्व दुःख नाहीसे होईल. ‘ ॥ ४ ॥

दोहा—करि प्रबोधु मुनिबर कहेउ अतिथि पेमप्रिय होहु ।

कंद मूल फल फूल हम देहिं लेहु करि छोहु ॥ २१२ ॥

अशाप्रकारे मुनिश्रेष्ठ भरतद्वाजांनी भरताचे समाधान करुन म्हटले, ‘ आता, तुम्ही सर्वजण आमचे प्रिय पाहुणे आहात आणि कृपा करुन कंद-मुळे, फळे-फुले जे आम्ही देतो, त्याचा स्वीकार करा. ॥ २१२ ॥

सुनि मुनि बचन भरत हियँ सोचू । भयउ कुअवसर कठिन सँकोचू ॥

जानि गरुइ गुर गिरा बहोरी । चरन बंदि बोले कर जोरी ॥

मुनींचे बोलणे ऐकून भरताला काळजी वाटू लागली की, अयोग्य वेळी हा विचित्र संकोचाचा प्रसंग आला. मग तो गुरुजनांच्या म्हणण्याचा मान राखत व त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन म्हणाला, ॥ १ ॥                   

सिर धरि आयसु करिअ तुम्हारा । परम धरम यहु नाथ हमारा ॥

भरत बचन मुनिबर मन भाए । सुचि सेवक सिष निकट बोलाए ॥

‘ हे नाथ, तुमची आज्ञा शिरोधार्य मानून तिचे पालन करणे, हे आमचे परम कर्तव्य आहे. ‘ भरताचे बोलणे ऐकून मुनिश्रेष्ठांना बरे वाटले. त्यांनी आपल्या विश्वासू सेवकांना व शिष्यांना बोलावले. ‘ ॥ २ ॥

चाहिअ कीन्हि भरत पहुनाई । कंद मूल फल आनहु जाई ॥

भलेहिं नाथ कहि तिन्ह सिर नाए । प्रमुदित निज निज काज सिधाए ॥

आणि सांगितले की, ‘ भरताचा पाहुणचार करायला हवा. जाऊन कंद मुळे व फळे आणा.’ ‘ ठीकआहे. ‘ असे म्हणून ते नतमस्तक झाले आणि मोठ्या आनंदाने आपल्या कामगिरीसाठी गेले. ॥ ३ ॥

मुनिहि सोच पाहुन बड़ नेवता । तसि पूजा चाहिअ जस देवता ॥

सुनि रिधि सिधि अनिमादिक आईं । आयसु होइ सो करहिं गोसाईं ॥

आपण फार मोठ्या पाहुण्याला निमंत्रण दिले, म्हणून मुनींनी विचार केला. जसा देव, तशी त्याची पूजा झाली पाहिजे. हे ऐकताच ऋद्धी व अणिमादी सिद्धी आल्या व म्हणाल्या, ‘ हे स्वामी, तुमची जी आज्ञा असेल, त्याप्रमाणे आम्ही करु.’ ॥ ४ ॥

 

दोहा—राम बिरह ब्याकुल भरतु सानुज सहित समाज ।

पहुनाई करि हरहु श्रम कहा मुदित मुनिराज ॥ २१३ ॥

मुनिराज प्रसन्न होऊन म्हणाले, ‘ श्रीरामचंद्रांच्या विरहामुळे भरत हा शत्रुघ्न व आपल्या परिवारासह व्याकूळ आहे. तेव्हा पाहुणचार करुन त्यांचा श्रम-परिहार करा. ‘ ॥ २१३ ॥

रिधि सिधि सिर धरि मुनिबर बानी । बड़भागिनि आपुहि अनुमानी ॥

कहहिं परसपर सिधि समुदाई । अतुलित अतिथि राम लघु भाई ॥

ऋद्धि-सिद्धींना मुनिराजांची आज्ञा शिरोधार्य मानण्यांत धन्यता वाटली. सर्व सिद्धी आपसात म्हणू लागल्या की, श्रीरामचंद्रांचे लहान बंधू भरत हे असे अतिथी आहेत की, त्यांची तुलना कोणाशीही करता येणार नाही. ॥ १ ॥

मुनि पद बंदि करिअ सोइ आजू । होइ सुखी सब राज समाजू ॥

अस कहि रचेउ रुचिर गृह नाना । जेहि बिलोकि बिलखाहिं बिमाना ॥

म्हणून मुनींच्या चरणांना वंदन करुन आज असे केले पाहिजे की, या सर्व राजपरिवाराला सुख लाभेल. ‘ असे म्हणून त्यांनी पुष्कळ सुंदर घरे तयार केली. ज्यांच्यापुढे राजमहालही तुच्छ वाटावेत. ॥ २ ॥

भोग बिभूति भूरि भरि राखे । देखत जिन्हहि अमर अभिलाषे ॥

दासीं दास साजु सब लीन्हें । जोगवत रहहिं मनहि मनु दीन्हें ॥

त्या घरांमधून पुष्कळसे भोग-पदार्थ व थाटमाट करुन ठेवले. ते पाहून देवांनाही हेवा वाटला. दास-दासी सर्व सामग्री घेऊन मनःपूर्वक पाहुण्यांच्या आवडीप्रमाणे करु लागल्या. ॥ ३ ॥

सब समाजु सजि सिधि पल माहीं । जे सुख सुरपुर सपनेहुँ नाहीं ॥

प्रथमहिं बास दिए सब केही । सुंदर सुखद जथा रुचि जेही ॥

जे सुखाचे सामान स्वर्गामध्ये स्वप्नातही असणार नाही, ते सर्व सिद्धींनी क्षणात भरुन ठेवले. प्रथमतः त्यांनी सर्वांना त्यांच्या आवडीप्रमाणे आरामशीर निवासस्थाने दिली. ॥ ४ ॥

दोहा—बहुरि सपरिजन भरत कहुँ रिषि अस आयसु दीन्ह ।

बिधि बिसमय दायकु बिभव मुनिबर तपबल कीन्ह ॥ २१४ ॥

आणि नंतर भरताला कुटुंबासह राहाण्यासाठी जागा दिल्या, कारण ऋषींनी तशी आज्ञा केली होती. ( आपल्या सर्व सोबत्यांना आराम मिळावा, असे भरताला वाटत होते, हे जाणून मुनींनी प्रथम त्यांची व्यवस्था करण्यास सांगितले होते. ) मुनिश्रेष्ठ भरद्वाजांनी आपल्या तपोबलाने ब्रह्मदेवांनाही थक्क करुन सोडणारे वैभव भरुन टाकले होते. ॥ २१४ ॥

मुनि प्रभाउ जब भरत बिलोका । सब लघु लगे लोकपति लोका ॥

सुख समाजु नहिं जाइ बखानी । देखत बिरति बिसारहिं ग्यानी ॥

मुनींचा प्रभाव जेव्हा भरताने पाहिला, तेव्हा त्याला इंद्र, वरुण, यम, कुबेर इत्यादी लोकपालांचे लोकही तुच्छ वाटले. ज्ञानी लोकसुद्धा जी सुखे पाहून वैराग्य विसरुन जातात, त्या सुखसामग्रीचे वर्णन काय करावे ?  ॥ १ ॥

आसन सयन सुबसन बिताना । बन बाटिका बिहग मृग नाना ॥

सुरभि फूल फल अमिअ समाना । बिमल जलासय बिबिध बिधाना ॥

आसने, शय्या, सुंदर वस्त्रे, चांदवे, वन, बागा, तर्‍हेतर्‍हेचे पक्षी व पशू, सुगंधित फुले आणि अमृतासारखी स्वादिष्ट फळे, अनेक प्रकारचे तलाव, विहिरी इत्यादी निर्मल जलाशय, ॥ २ ॥

असन पान सुचि अमिअ अमी से । देखि लोग सकुचात जमी से ॥

सुर सुरभी सुरतरु सबही कें । लखि अभिलाषु सुरेस सची कें ॥

आणि अमृतासारखे खाण्या-पिण्याचे पवित्र पदार्थ होते. ते पाहून सर्व लोक विरक्त मुनींसारखे संकोचत होते. सर्वांच्या राहण्याच्या जागी कामधेनू व कल्पवृक्ष होते. ते पाहून इंद्र व इंद्राणी यांनासुद्धा लोभ सुटला. ॥ ३ ॥

रितु बसंत बह त्रिबिध बयारी । सब कहँ सुलभ पदारथ चारी ॥

स्रक चंदन बनितादिक भोगा । देखि हरष बिसमय बस लोगा ॥

वसंतऋतू होता. शीतल, मंद व सुगंधित अशा तिन्ही

 प्रकारचे वारे वाहात होते. सर्वजणांना धर्मादी चारही

 पदार्थ सुलभ होते. माला, चंदन, स्त्रिया इत्यादी भोग

 पाहून सर्व लोकांना हर्ष व विस्मय वाटत होता. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: